शैला सातपुते

उद्या ‘मदर्स डे’ला (१४ मे) जगभरात आईचा, आईपणाचा गौरव केला जाईल, तिचं कौतुक केलं जाईल. ते रास्तही आहे, कारण प्रत्येक आईला ‘आईपणा’च्या कमीअधिक वेणा सोसाव्याच लागतात. पण काही वेळा आई असणं कसोटीचं ठरतं. ते द्वंद्व असतं आईपण आणि तिच्यातलं माणूसपण यातलं. ‘हे शक्य नाही, समाज काय म्हणेल’ याचा विचार एकीकडे आणि दुसरीकडे ‘ते माझं मूल आहे, त्याला स्वीकारायलाच हवं’ अशा विचारांचा लंबक या आईची परीक्षा पाहात राहातो. आजच्या अंकातल्या या चार आई. आपल्या ‘एलजीबीटीक्यू (प्लस)’ मुलांची खरी लैंगिक ओळख पहिल्यांदा झाली, तेव्हा त्यांच्यासाठीही या लंबकाचा फटका जीवघेणाच होता. अखेर त्यांच्यातला आईपणाचा विजय झाला असला, तरी त्या सगळय़ा अनुभवांतून जाणं सोपं नव्हतंच..  कसा आहे हा प्रवास हे त्यांच्याच शब्दांत..

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
Anita Sangle of Vaibhavalakshmi Builders and Developers and Union Commerce and Industry Minister Piyush Goyal
नवोन्मेषाचा ‘तेजांकित’ सोहळा…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

तसं पाहता ‘गे मुलाची आई’ ही ओळख मी केव्हाच मागे टाकली आहे. आता माझा मुलगा निहाल ४६ वर्षांचा आहे आणि मी ७३ वर्षांची आहे. आमच्यापुरता कुटुंब आणि समाज या दोन्ही पातळय़ांवरचा संघर्ष तसा संपलेला आहे. मुंबईत राहात असताना निहालच्या पार्टनरच्या मृत्यूनंतर त्यानं गोव्यात स्थायिक होण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे जमवाजमव सुरू केली. त्यानंतर गेली सहा वर्ष आम्ही गोव्यात आहोत. त्यानं इथे पंधरा वर्षांपूर्वी सुरू केलेला आणि आता वाढवलेला ‘होम स्टे’चा व्यवसाय आम्ही करतो. आपल्या मित्रमंडळींबरोबर ‘Queer Kinara’ हे एक व्यासपीठ तयार करून निहाल गोव्यातल्या अनेक तरुणांमध्ये स्वत:च्या लैंगिकतेविषयी आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय.

   निहालनं त्याच्या लैंगिकतेविषयी मला वीस-बावीस वर्षांपूर्वी सांगितलं होतं; तेही अचानक. आताच्या पालकांना मुलांच्या किशोरावस्थेतच आपल्या मुलांची लैंगिकता समजते, पण वीस-पंचवीस वर्षांपूर्वी मला माझ्या मर्यादित मध्यमवर्गीय भवतालामुळे हा विषयच अज्ञात होता. त्यामुळे मला त्यानं सांगेपर्यंत त्याच्या लैंगिकतेची कल्पना नव्हती. एक दिवस आम्ही टीव्हीवर बातम्या बघत होतो आणि त्यात ‘समलैंगिकता’ या विषयावर चर्चा चालू होती. थोडा वेळ ती चर्चा ऐकल्यावर मी अस्वस्थ झाले आणि  निहालला म्हटलं, ‘‘चॅनल बदल.’’ त्यानं कारण विचारलं, तेव्हा मी म्हटलं, ‘‘ही सर्व पाश्चात्त्यांची फॅडं आहेत. असं असतं का कधी? हे सर्व निसर्गाच्या विरोधात आहे.’’ त्यावर निहाल माझ्याजवळ आला आणि खांद्यावर हात टाकून म्हणाला, ‘‘आई, जर मीच तसा असेन तर काय करशील?’’ थोडा वेळ मला काहीच सुचत नव्हतं. पोटात मोठा गोळा आला होता. मला वाटलं, की तो मस्करी करतो आहे, पण त्यानं ‘आपण या विषयावर गंभीर आहोत आणि आपला एक पार्टनरही आहे’, असं सांगितल्यावर माझी स्थिती सैरभैर झाली. निहाल मला म्हणाला, ‘‘तुला जर वाटत असेल की हे अनैसर्गिक आहे, तर तू मला कोणत्याही डॉक्टरकडे वा मानसोपचारतज्ज्ञाकडे नेऊ शकतेस.’’ निहालचे वडील खूप आधी वारले होते. मला आधार वाटला तो मोठय़ा मुलाचा. मी लगेच त्याला दिल्लीवरून बोलावून घेतलं आणि आम्ही तिघं माझ्या ओळखीच्या एका मानसोपचारतज्ज्ञांकडे गेलो. ते मानसोपचारतज्ज्ञ निहाललाही ओळखत होते. निहालनं आमच्या भेटीच्या आदल्या दिवशी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी स्वत:बाबत पूर्ण चर्चा केली होती. कदाचित त्यालाही हा प्रश्न भावनिकतेपेक्षा सैद्धांतिकदृष्टय़ा समजून घेण्याची आवश्यकता वाटत होती. आम्ही गेलो त्या वेळेला त्यांनी आमच्या तिघांची आणि नंतर माझी आणि निहालची अशी वेगवेगळी भेट घेतली आणि मला हा प्रश्न समजावून सांगितला. निहाल काम करत असलेल्या सिनेमा क्षेत्रातली अनेक उदाहरणं सांगितली. ते म्हणाले, ‘‘बरीच मुलं प्रथम आपली मित्रमंडळी किंवा भावंडं, यांच्याशी बोलतात. पण हा मुलगा प्रथम आईशी बोलला, या अर्थी तुमचं नातं खूप जवळचं आहे. तुम्ही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा.’’

अलीकडे सिनेमा, प्रसारमाध्यमं, यातून या प्रश्नाची बरीच चर्चा सार्वजनिक जीवनात चालू आहे. आता समलैंगिक लग्नाच्या मान्यतेसंबंधित प्रकरणं सर्वोच्च न्यायालयात सुरू आहेत. त्यांच्या बातम्या येत असतात. पण पंचवीस वर्षांपूर्वी हा प्रश्न म्हणजे एक मोठा ‘टॅबू’ होता. या प्रश्नाला वाचा फुटली नसल्यामुळे माझी काही वर्ष खूप घालमेलीची गेली. परंतु जसजसं मी त्याबद्दल वाचू लागले, या मुलांच्या संपर्कात येऊ लागले, त्यांच्या ‘प्राइड मेळावे’ वा रॅलींना जाऊ लागले, तसतसे माझे पूर्वग्रह आणि भीती गळून पडली. माझा मोठा मुलगा आणि त्याची बायको यांच्या मान्यतेबरोबरच त्यांचा मानसिक आधार मोठा होता. त्यामुळे मी सावरले.

माझे वडील मूळचे गोव्याचे. त्यामुळे आमच्या सर्वच कुटुंबाला गोव्याचं आकर्षण होतंच. आता गोव्याच्या एका निसर्गरम्य गावात आमचं घर आहे. हा निसर्गच नाही, तर माझा इथला परिवारही नैसर्गिक आणि उबदार आहे. ‘Queer Kinara’ आणि त्याच्याशी जोडलेली विशेषत: ‘गे’ मुलं माझ्या या परिवाराचा भाग आहेत. वयाच्या विशीपासून पन्नाशीपर्यंतचे अनेक जण या ‘किनाऱ्या’शी जोडले गेले आहेत. पंधरा-सोळा लाख लोकसंख्या असलेल्या गोव्याच्या निसर्गरम्य राज्यात भारतभरातून आणि जगातल्या अनेक देशांतून भिन्न लैंगिकतेची मुलं स्थायिक होण्यासाठी आली आहेत. काही घरच्या त्रासाला कंटाळून आली आहेत, काही पार्टनरबरोबर उघडपणे राहता येईल म्हणून आली आहेत. अशी अनेक कारणं आहेत. यात वेगवेगळे व्यावसायिक आहेत. लेखक, फॅशन डिझायनर, ‘कॉर्पोरेट’मध्ये ऑनलाइन काम करणारे लोक आहेत, मनोरंजन आणि ‘इव्हेंट’ क्षेत्रात काम करणारे आहेत. अनेक विषयांवर त्यांच्याबरोबर मुक्तपणे संवाद होऊ शकतो. गोव्याचा हिंदू आणि कॅथलिक समाज जरी बंदिस्त असल्याचे म्हटले जात असले, तरी बाहेरून येणाऱ्यांना समजून घेणारा आहे. गोव्याचं वातावरण सर्वसमावेशक आणि सहिष्णू असल्यामुळे इथे ही मुलं सहज मिसळून गेली आहेत.

    मुंबईच्या धकाधकीच्या, कौटुंबिक आणि सामाजिक गुंतागुंतीच्या, स्पर्धेच्या आणि कटकटीच्या सर्व गोष्टींपासून दूर एक शांत जीवनाचा मी अनुभव घेत आहे. माझ्या आजूबाजूला असलेली ‘गे’ मुलं कुठलीही पारंपरिक बंधनं आणि समाजमान्य- खाण्यापिण्याची, पोशाखाची, भाषेची, अभिव्यक्तीची बंधनं स्वत:वर घालत नाहीत. त्यामुळे वातावरणात एक प्रकारचा मोकळेपणा असतो. उदाहरणच द्यायचं झालं, तर घरी एखादी पार्टी असेल, तर एखाद्-दोन मुलं सहज साडय़ा नेसून येतात. ‘तुझ्याकडे साडी असेल तर नेसायला दे,’ म्हणून माझ्याकडे मागणीही करतात. एखादा छान फ्रॉक घालून गळय़ात, हातात मण्यांच्या माळा घालून येतो आणि खरंच सांगते, ते इतके गोड आणि सुंदर दिसतात आणि उत्स्फूर्त नाचतातही. ‘ड्रॅग’ (स्त्रीवेशात नृत्य व मनोरंजनपर कार्यक्रम सादर करणं) करणारी मुलंही घरी येतात. आपल्या नाचाचे व्हिडीओ दाखवतात.

    आपली स्वत:ची मुलं खूप दिवसांनी भेटल्यावर जशी मिठी मारून भेटतात, तशीच ही मुलं घरी आली की जवळ येतात, मिठी मारून भेटतात. करोनाच्या काळात आमच्याकडे एक पंचविशीचा अमेरिकी गोरा ‘गे’ मुलगा राहायला आला होता. खरं तर तो एका आठवडय़ासाठी आला, पण नंतरची टाळेबंदी आणि विमानं बंद झाल्यामुळे पाच महिने अडकून पडला. या काळात त्याची आई अमेरिकेत वारली. खूप अस्वस्थ आणि दु:खी होता तो. त्याचं सांत्वन कसं करावं समजत नव्हतं. मला थोडी भाषेचीही अडचण होती. ती अडचण त्यानं स्वत:च सोडवली आणि मला म्हणाला, ‘‘May I hug you?’’ आणि खूप गहिवरला. औपचारिक वागण्याची बंधनं नसतील तर माणूस किती सहज होऊन जातो!

असाच एखादा अभिषेक येतो आणि एखाद्या रेस्टॉरंटमध्ये नेऊन कधी न खाल्लेले वेगवेगळे पदार्थ आग्रहानं खाऊ घालतो. जगातल्या अनेक प्रकारच्या खाण्याच्या, पोशाखाच्या माहितीपासून सुरू झालेला त्याचा विषय ‘ब्लॅक ट्रान्स’ लोकांपर्यंत सहज येऊन पोहोचतो. त्यातलं राजकारण-समाजकारण तो उलगडून सांगतो आणि माझ्यासाठी हे खूप समृद्ध करणारं असतं. या मुलांच्या अभिव्यक्ती आणि विषयांप्रमाणे त्यांची भाषाही सर्वमान्य बंधनांच्या पलीकडे जाते. निहालच्या एका मित्राचं फ्रेंच मुलाबरोबर फ्रान्सला लग्न होतं. त्या लग्नासाठी तो गेल्यावर घरी मी एकटी आहे म्हणून मला एखादा विनित फोन करून विचारतो, ‘‘मी येऊ का सोबतीला?’’ ‘माझ्याबरोबर मैत्रीण आहे’ असं मी सांगितल्यावर त्याचा मेसेज असतो, ‘Are you having fun with your girl?’ ही भाषा आता मला या वयात दिलासा देऊन जाते, कारण यात कोणत्याही सभ्यतेची बंधने नसतात. असतं, ते निव्वळ प्रेम आणि काळजी! अनेक मानसिक आघात,ओढाताण, हे अनुभवून आता मी यापासून दूर आहे. विशेषत: जेव्हा आजूबाजूला नफरत आणि हिंसा यांचा बोलबाला आहे, अशा वेळी मी एक समृद्ध जीवन जगतेय आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात खूप समाधानी आणि आनंदी आहे कारण ही सारी माझी मुलंच आहेत. मी त्यांची आई झाले आहे..

पालकत्व, दोन ‘नॉन बायनरी’ मुलांचं!

मी ५० वर्षांची विज्ञान शिक्षिका. आमचं कुटुंब मुंबईत राहातं. आम्हाला दोन मुलं- श्रीश आणि रित्. मी स्वत:चा संदर्भ देताना स्त्रीलिंगी सर्वनाम वापरते, तर माझी दोन्ही मुलं ‘नॉन-बायनरी’ (स्वत:ची ओळख स्त्री वा पुरुष या दोन्ही रूढ व्याख्यांत करून न देणाऱ्या व्यक्ती) आहेत. श्रीश हा २३ वर्षांचा शास्त्रज्ञ आहे. इकोलॉजी आणि भौतिकशास्त्राचा त्याचा अभ्यास आहे. रित् हा १८ वर्षांचा ‘फिल्म आणि मीडिया’ चा विद्यार्थी आणि ट्रान्सजेंडर आहे.

  मुलं लहान असल्यापासूनच आमच्या घरात एक प्रकारची मैत्री आहे, संवादात मोकळेपणा आहे. त्यामुळेच मला वाटतं की रित्ला त्याची ओळख आम्हाला सांगताना पुरेसं सुरक्षित वाटलं असावं. रित्नं चौदाव्या वर्षीच त्याची लैंगिक ओळख काय आहे, याबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली होती. सोळाव्या वर्षी त्यानं आम्हाला सांगितलं, की त्याला त्यांची लैंगिक ओळख समजली आहे आणि तो ‘ट्रान्स नॉन-बायनरी’ आहे. म्हणजेच त्याची लैंगिक ओळख स्त्री वा पुरुष या लैंगिक ओळखीच्या रूढ अपेक्षांच्या बाहेरची आहे. त्याला जन्मानं जी शारीरिक लैंगिक ओळख मिळाली, ती त्याला आपली  वाटत नाही, वेगळी वाटते. त्यानं ते समजावून सांगितलं आणि त्याचं हे वास्तव मी स्वीकारलं.

आमच्या घरात ‘एलजीबीटीक्यू(प्लस)’ समुदायाबद्दल संभाषण सुरू करणारा रित् हाच पहिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराबद्दलच्या एका शालेय संशोधन प्रकल्पावर तो काम करत होता. तेव्हा त्यानं माझी आणि त्याच्या वडिलांची मुलाखत घेतली. आम्हा दोघांना ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाबद्दल काय वाटतंय, हे तो अजमावून पाहात होता. त्याचा आणखी एक उद्देश असा, की आमच्या जवळचं कुणीतरी, प्रिय व्यक्ती अशा लैंगिक अभिमुखतेची आहे असं आम्हाला कळलं, तर आमची प्रतिक्रिया काय असेल? तेव्हा मी म्हणाले होते, ‘‘मी त्यांना स्वीकारीन आणि पाठिंबा देईन.’’ पण प्रसन्नचा- रित्च्या वडिलांचा मात्र याला आक्षेप होता. अर्थात रित्नं टाकलेलं हे धाडसी पाऊल आमच्या घरात सामाजिक गोष्टींबद्दल ज्ञानवर्धक चर्चा आणि वादविवाद सुरू करणारी ठिणगीच होतं. अर्थात ही पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुलाखतीच्या या घटनेनंतर आम्ही हळूहळू लैंगिकतेवर (gender and sexuality) कुटुंबात अधिक चर्चा करू लागलो. अखेर एके दिवशी रित्नं आम्हाला, त्यानं इतके दिवस मनात ठेवलेलं सत्य सांगितलं, की तो ‘बायसेक्शुअल आणि ट्रान्स नॉन-बायनरी’ आहे. त्याच्यामुळेच  माझ्या पहिल्या मुलाला- श्रीशलासुद्धा त्याचं सत्य, अर्थात त्याचीही ‘नॉन बायनरी’ ही लैंगिक ओळख सांगण्याचं धाडस आलं. आणि त्यानं ते आमच्याजवळ व्यक्त केलं.

खरं सांगायचं, तर मला जेव्हा हे प्रथम कळलं, तेव्हा धक्का वगैरे बसला नव्हता. मुलं लहान असल्यापासून मी त्यांचा कायम स्वीकार करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्यावर कधी दबाव आणला नाही. कदाचित त्यामुळेच आणि या विषयावर इतकी चर्चा घरात झाल्यामुळेही असेल, या गोष्टीचा धक्का बसला नाही. असं असलं तरी, ‘ट्रान्सजेंडर’ म्हणजे नेमकं काय, याविषयी मला फारशी माहिती नव्हती. मग मी इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर अशा व्यक्तींच्या गोष्टी वाचायला सुरुवात केली. त्यामुळे मला माझ्या मुलांना आंतर्बाह्य समजून घेता आलं. सध्या रित् शिकतोय. तो ‘वेगळा’ आहे हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा सुरुवातीला त्याला नैराश्य आलं होतं. आजही त्यासाठी तो उपचारही घेत आहे. पण त्याच्या पदवीचा अभ्यास तो आनंदानं करतो आहे. स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करत आहे.    

श्रीश आणि रित्, दोन्ही भावंडं एकमेकांचं प्रेरणास्थान म्हणावीत अशी. एकमेकांच्या पाठीशी उभी राहणारी. अर्थात त्यांच्या वडिलांना हे सत्य स्वीकारायला थोडा वेळ लागला, पण जेव्हा आम्ही ‘स्वीकार- रेनबो ग्रुप’च्या पालकांशी जोडले गेलो, तेव्हा त्यांनीही रित्ला समर्थन देण्यास सुरुवात केली. नंतर रित्नं काही जवळच्या व्यक्तींना, प्रियजनांना सांगितलं. त्यांनीही -त्याच्या या धाडसाचं कौतुक केलं. पण दोन्ही मुलांनी आपला पेहराव, दिसणं बदललं, तेव्हा तो बदल मात्र काही नातेवाईकांना, आजूबाजूच्या काही व्यक्तींना पचवणं कठीण गेलं. त्यांच्यापैकी काहींनी तिरकस विनोद सुरु केले, ‘या दोघांनी त्यांचं लिंग कसं बदललं?’ ‘मुलगा मुलीसारखा दिसतोय आणि आता मुलगी मुलासारखी दिसते!’  ते ऐकताना मन दुखावत होतं. माझ्या मुलांना ते सहन करायला लागत होतं, त्याचा त्रास होत होता. मुलांनी स्वत:ला स्वीकारलं होतं, परंतु आजूबाजूचे लोक मात्र त्यांना ते सहज स्वीकारू देत नव्हते. टोमण्यांनी हैराण करत होते. म्हणूनच जेव्हा एखादा कमेंट करायचा तेव्हा मी मुलांच्या बाजूनं बोलत राहायची. जणू त्यांच्या जिव्हारी लागणारे बाण मी माझ्या शरीराची ढाल करून रोखत होते. मला आजही एक गोष्ट कळत नाही, इतर लोक या गोष्टीला इतकं महत्त्व का देत आहेत? माझ्या मुलांचं लिंग महत्त्वाचं की त्यांनी स्वत:ला सिद्ध करत केलेलं काम महत्त्वाचं? 

 पालक म्हणून त्यांचा समाजानंही स्वीकार करणं म्हणूनच आमच्यासाठी गरजेचं आहे. ‘स्वीकार’ संस्थेच्या ४०० पालकांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून सांगितलं आहे, की ‘आमच्या मुलांचं त्यांच्या जोडीदाराशी असलेलं नातं या देशात कायदेशीररीत्या स्वीकारलं जावं, त्यांना मान्यता मिळावी, हे आम्हाला पाहायचं आहे. विविधतेचा आदर करणाऱ्या आपल्या देशात आमच्या मुलांनाही विवाह समानतेचा अधिकार मंजूर होईल, अशी खात्री वाटते.’ आपल्या मुलांच्या आनंदापेक्षा एक आई म्हणून मला आणखी काय हवं असणार?..

समंजस स्वीकार..!

माझी मुलगी निष्ठा निशांत हिची मी एकल पालक. मी एक ‘ट्रान्स-पॅरेंट’ आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमानसुद्धा आहे. अर्थात आता मी तिचा बिनशर्त स्वीकार केला असला तरी तिचं लैंगिक वेगळेपण समजल्यापासून वास्तवाचा समंजस स्वीकार करेपर्यंतचा काळ माझ्यातल्या आईसाठी खूपच कठीण होता, हेही मान्य करायलाच हवं.

तिला मात्र लहानपणापासूनच तिच्यातल्या वेगळय़ा अस्तित्वाची जाणीव होत होती. २०१४ मध्ये, बावीस वर्षांची असताना तिला आपल्यातल्या लैंगिक विसंगतीचा अनुभव तीव्रतेनं आला आणि नंतर तर खात्रीच पटली. आपल्या बुटात कधी कधी बारीकसा खडा जाऊन बसतो आणि तो टोचत राहतो ना, जणू तसा अनुभव माझी मुलगी दररोज घेत होती. तिचा अनुभव मला स्पष्टपणे सांगणं तिला संकोचाचं वाटत होतं. म्हणून एकदा तिनं मला आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’चे या विषयावरचे एपिसोडस् दाखवले. त्यात पटकथालेखिका गजल धालिवाल यांच्यावरचा कार्यक्रम होता. गजल ‘मुलगा’ म्हणून जन्मल्या, पण खूप लहान असतानाच त्यांना आपल्याला स्त्री म्हणूनच जगायचं आहे, हे ठामपणे माहीत होत. आपणसुद्धा गजलसारखी ‘स्त्री’ आहोत, असं तो मला सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे माझ्या लक्षात येऊ लागलं. अर्थातच दोन दशकं ‘मुलगा’ म्हणून वाढलेल्या माझ्या मुलाला आता अचानक स्त्रीसारखं जगताना पाहणं, हे स्वीकारायला मी तयार नव्हते! मला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. काय करावं, कुणाशी बोलावं काहीच सुचत नव्हतं. त्याला लिंगबदलाची शस्त्रक्रिया पार पाडायची होती. पण मुळात मी त्याचं स्त्री म्हणून अस्तित्वच स्वीकारू शकत नव्हते. त्यात माझ्या भावंडांचा माझ्यावर मानसिक आणि समाजाचाही दबाव होताच. पण निष्ठा खूप समजूतदार आहे, त्यामुळे पुढच्या गोष्टी पार पडल्या. समोरच्याला समजून घेऊन आश्वस्त करण्याचा गुण तिच्यात आहे. तिनं माझी घालमेल पाहिली होती. ती, पद्मा अय्यर आणि अरुणा देसाई यांच्या मदतीनं मी ‘स्वीकार-द रेनबो पॅरेंट्स’शी जोडली गेले. हा‘एलजीबीटीक्यू(प्लस)’ समुदायातल्या मुलांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या पालकांचा गट आहे. अतिशय संकोचून मी त्यांच्या पहिल्या सभेला उपस्थित राहिले. ते वातावरण आणि वास्तव माझ्या समजुतीच्या पलीकडचं होतं. त्याचा स्वीकार होत नव्हता. ते दु:ख माझ्या डोळय़ांवाटे बाहेर पडत होतं. पण त्या मंडळींनी मला समजून घेतलं, शांत केलं. या समुदायातल्या मुलांचे, त्यांच्या पालकांचे अनुभव जाणून घेणं आणि मुळातच ‘लिंगओळख’,‘लैंगिक अभिमुखता’ या गोष्टी समजून  घेण्यासाठी त्यांनी मला अवकाश दिला. उलटसुलट विचारांनंतर, काहीही असलं तरी अखेर ते माझं स्वत:चं मूल आहे, मी तिची आई आहे आणि कायम असणार आहे, याचा स्वीकार केला. घरी परतले आणि निष्ठाला मिठी मारून रडले. आधी तिला समजून घेण्यात कमी पडल्याबद्दल माफी मागितली आणि तिच्या यापुढच्या प्रवासात मी कायम तिच्या पाठीशी असणार, हे वचन दिलं.

‘समाज काय म्हणेल’ याचा विचार न करण्याचा मी निर्णय घेतला खरा, पण मनातला एक कोपरा सतत धास्तावलेला असायचा. हा आम्हा दोघींसाठी कठीण काळ होता. आम्ही दोघी एकत्र प्रवास करत होतो, पण कधी कधी आई म्हणून मी भावनिकदृष्टय़ा कोलमडून जायचे. पण माझ्या लहान मुलानं- परितोषनं मला समजावलं, की निष्ठाला आता आधाराची गरज आहे आणि आपण मिळून तिला आधार द्यायचा आहे. निष्ठाचा हा खडतर प्रवास, त्यातले काही अनुभव ती लोकांबरोबर ‘शेअर’ करते, पण त्याहूनही किती तरी कठीण प्रसंग तिनं पचवले आहेत, जे तिनं कुणालाही सांगितलेले नाहीत. पण त्याचमुळे आज ती ठामपणे उभी आहे. कुटुंब म्हणून आम्ही सतत एकत्र राहिलो. त्यामुळे काही अंशी आश्वस्त झालेल्या निष्ठाला तिच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी खूप मदत झाली. निष्ठानं जैवविश्लेषणशास्त्रात (बायोअ‍ॅनालिटिकल सायन्सेस) शिक्षण घेतलं आहे. ती नवी मुंबईत एका मोठय़ा व्यावसायिक प्रयोगशाळेत ‘ऑपरेशन्स, ट्रेनिंग, लर्निग आणि डेव्हलपमेंट विभाग’ सांभाळते. ‘ट्वीट फाऊंडेशन’ची (ट्रान्सजेन्डर वेल्फेअर इक्विटी अ‍ॅण्ड एम्पॉवरमेंट ट्रस्ट) ती ‘बोर्ड मेम्बर’ आहे. सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या- ‘गरिमा गृह, मुंबई’ या प्रकल्पासाठी निष्ठाला ट्रान्सजेंडर समुदायातील तज्ज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. निष्ठाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मुख्य प्रवाहातील समाज आणि ट्रान्सजेंडर समुदाय यांच्यातली दरी कमी करण्याच्या कामाबद्दल तिला मुंबई पोलिसांकडून पुरस्कार प्राप्त झाला आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात व्यक्तिवैविध्य आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन अवलंबला जावा, यासाठी तिनं अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. 

माझ्या मुलीनं अनेक व्यक्तींच्या जीवनाला स्पर्श केला आहे, त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकला आहे, याचा मला खूप आनंद वाटतो. तिनं समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी केलेली वाटचाल बघून अभिमान वाटतो. केवळ ट्रान्सजेंडर समुदायच नव्हे, तर मुख्य प्रवाहातील समाजातही जागरूकता निर्माण करण्यासाठी तिनं काम केलं.

‘ट्रान्स-पॅरेंट’ म्हणून, एक आई म्हणून मला समजतं, की पालकांना त्यांच्या मुलांचा या वाटेवरचा अवघड प्रवास सहजपणे स्वीकारणं कठीण आहे. म्हणूनच अंतर्गत आणि बाह्य द्वंद्वात धडपडणाऱ्या या मुलांच्या पाठीशी उभं राहण्याचा मी प्रयत्न करते. ‘गरिमा गृह’मध्ये राहणारी, ‘ट्रान्सजेंडर’ अशी ओळख असलेली मुलं, कर्मचारी, यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी वेळ देते. त्यांना पालकांच्या पाठिंब्याची आणि प्रेमाची गरज आहे. ‘एलजीबीटीक्यू(प्लस)’ समुदायाच्या ‘प्राइड मार्च’, स्वीकृती संमेलन, एकत्र येऊन साजरे केले जाणारे सण किंवा मेळावे, अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचाही मी प्रयत्न करते. आज निष्ठामुळे मला अशा अनेक आईंची कथा-व्यथा लक्षात आली. प्रत्येकीचा आपापला प्रवास असणार आहे. कमी-अधिक तीव्रतेचा. पण आपल्या मुलांना आपणच स्वीकारायचं असतं, तेच तर आहे खरं आईपण!

सहजसुंदर आईपण!

करोना टाळेबंदी सुरू होती, तेव्हाची गोष्ट. एका ‘गे’ मुलाचा मला फोन आला. त्यांचं तेरा जणांचं हिंदीभाषक कुटुंब होतं. तो समलैंगिक असल्याचं त्याच्या कुटुंबाला पटवून देण्यासाठी त्याला माझी मदत हवी होती. त्यानं समलैंगिकतेबद्दल सांगताच त्याचे काका त्याला कुण्या ‘बाबां’कडे घेऊन गेले होते. त्यांनी त्याला एक पावडर औषधासारखी प्यायला दिली होती आणि कसला तरी व्यायामही सांगितला होता. हे केल्यावर तो ‘स्ट्रेट’ होईल असा त्यांचा दावा. घरातले सर्वजण तो उपाय नीट करतोय ना, यावर डोळय़ांत तेल घालून लक्ष ठेवत होते. त्या मुलाचा यात फार कोंडमारा होत होता. मी त्याच्या कुटुंबाशी बोलावं असं ठरलं.

टाळेबंदी असल्यानं ‘झूम’ कॉलवर आमची मीटिंग सुरू झाली. मुलासकट त्याचं अख्खं कुटुंब माझ्यासमोर होतं. अगदी त्याची अमेरिकेत वास्तव्यास असणारी बहीण, तिचा नवरा, हेही उपस्थित होते. माझ्यावर सर्व जण प्रश्नांचा भडिमार करू लागले. माझंच मत बदलवायचं, असा जणू निश्चयच करून ते मीटिंगला आलेले! मी शांत राहून एकेका प्रश्नाचं उत्तर देऊ लागले. शेवटी त्याचे काका म्हणाले, ‘‘.. पण त्या बाबांनी सांगितलंय, की त्यांनी दिलेला उपाय केल्यास तो ‘स्ट्रेट’ होण्याचा ७० टक्के चान्स आहे.’’ हे ऐकून मी मुद्दाम म्हणाले, ‘‘तुमचं या मुलावर किती प्रेम आहे! तो किती नैराश्यात गेलाय पाहताय ना? तुम्ही असं करा, त्याच्याबरोबर तुम्हीही उपचारांत सहभागी व्हा. त्या बाबांना विनंती करून तुम्हाला ‘होमोसेक्शुअल’ करायला सांगा आणि ‘हेटेरोसेक्शुअल’ व्हायचे उपचार तुम्हीही घ्या. उपचार ‘फुलप्रूफ’ असतील तर तुम्ही पुन्हा ‘स्ट्रेट’ व्हालच!’’

मी हा काय पोरखेळ लावलाय असं वाटून ते चिडले. म्हणाले, ‘‘पण मी ‘गे’ नाहीच आहे. मला ‘होमोसेक्शुअल’ कसं करता येईल?’’ अर्थातच अशा उपचारांनी ‘गे’ व्यक्ती ‘स्ट्रेट’ होणं शक्य नाहीये हे त्यांना लगेच उमगलं होतं. पुढच्या काही मिनिटांत ती मीटिंग संपली. पाच मिनिटांत त्या मुलाचा मला फोन आला, ‘‘आँटी, काका माझ्या खोलीत आले आणि मला मिठी मारून रडले. आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहू, तू मजेत जग, म्हणाले.’’ हा केवळ एक अनुभव. असे कित्येक अनुभव मी गेल्या पंधरा वर्षांत घेतले आहेत, कुटुंबाला त्यांचा मुलगा वा मुलगी परत देण्याचे! माझ्यातलं आईपण मला असं कुटुंब जोडायला मदत करतं. माझा एकुलता एक मुलगा- अभिषेक ‘गे’ आहे.  माझ्या वयाच्या चोविसाव्या वर्षी माझं लग्न झालं आणि तीन वर्षांनी अभिषेक जन्मला. त्यानं मला ‘गे’ असण्याबाबत सांगितलं तेव्हा माझं वय होतं ४३ आणि तो १७ वर्षांचा होता. तेव्हापर्यंत मला समलैंगिकता म्हणजे काय, याविषयी विशेष काहीही माहिती नव्हती. अभिषेकनं आणि त्याच्या जवळच्या मित्रानं मला हे सांगण्यासाठी एक युक्ती योजली होती. मी या बातमीवर काय प्रतिसाद देईन, अशी धाकधूक त्याला निश्चितच असणार आणि म्हणून त्याला माझं मत अजमावून पाहायचं होतं. त्यानं आणि त्याच्या मित्रानं एक गोष्ट रचून मला सांगितली, की त्यांच्या एका (काल्पनिक) मित्राला, तो ‘गे’ आहे म्हणून पालकांनी घरातून हाकलून दिलंय. तो एकटा पडला आहे आणि अगदी जेवण्याखाण्याचीही त्याची काही सोय नाही.. मला ते ऐकून खूप वाईट वाटलं आणि समलैंगिकता म्हणजे काय, याबद्दल प्रथमच जाणून घ्यावंसं वाटायला लागलं. त्यानंतरची ३ डिसेंबर २००७ ही तारीख मला चांगलीच आठवतेय. हा अभिषेकचा ‘क्लोजेट’मधून बाहेर यायचा दिवस! तो सकाळपासूनच रडवेला दिसत होता. त्याला मला काही तरी सांगायचं होतं, पण हिंमत होत नव्हती. त्याचा चेहरा पाहून मी त्याला काय झालंय हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला; पण तो सांगतही नव्हता.  शेवटी संध्याकाळी कधी तरी मला जाणीव झाली आणि त्यानं मला पूर्वी सांगितलेली त्याच्या मित्राची गोष्ट आठवली. मग मीच त्याला विचारलं, ‘‘तू ‘गे’ आहेस का?’’  त्यावर तो म्हणाला, ‘‘मम्मा, डू यू हेट मी?’’  माझ्या आयुष्यात पुढे काय काय बदल होणार आहेत, एका समिलगी मुलाची आई असण्याचा अर्थ काय असतो, हे मला तेव्हा पूर्णपणे समजलं नव्हतं; पण एक गोष्ट मनाशी पक्की होती, की हे माझं मूल आहे आणि माझी त्याच्यावर माया आहे. माझ्यातल्या आईपणानं या सत्याचा सहज स्वीकार केला होता. त्याला सांगितलं, की ‘‘अजिबात घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते.’’ अभिषेकनं त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच्या वडिलांना स्वत: सांगितलं. त्यांनीही ते लगेच स्वीकारलं. 

मला या विषयावरची अधिक माहिती मिळावी म्हणून मी ती ऑनलाइन शोधायला सुरुवात केली. अभिषेकनं मला ‘एलजीबीटीक्यू’ म्हणजे काय, हे नीट समजण्यासाठी एक पुस्तक वाचायला दिलं. नंतर तो मला ‘गे बॉम्बे’ या मदतगटानं आयोजित केलेल्या पालकांच्या संमेलनात घेऊन गेला. इतर पालक आणि मुलांशी संवाद साधल्यामुळे माझ्या आकलनात भरच पडली. इतर मुलांना भेटताना माझ्या स्वरात त्यांना नकारात्मकता जाणवत नसे, म्हणून हळूहळू मुलंमुली मला त्यांच्या पालकांशी याबद्दल बोलण्याचा आग्रह करू लागली. मी बिचकत बिचकत सुरुवात केली; पण या क्षेत्रात जसजसं काम करू लागले, तशी मी आत्मविश्वासानं ही प्रकरणं हाताळू लागले. अगदी थोडे पालक असं काही बोलायला तयार असतात. आपल्या मुलांबद्दल तिऱ्हाईत व्यक्तीनं येऊन आपल्याला काही डोस द्यावा, हे तसंही सहज पटणारं नाहीच. काही वेळा ही मुलंमुली त्यांच्या पालकांना घेऊन एखाद्या रेस्टॉरंटमध्ये येत आणि मी त्यांना अचानक भेटलेय असं दाखवून बोलणं सुरू होई, तर काही पालकांशी फोनवर बोलायचं असे.

   असाच एक अनुभव- मी काम सुरू केल्यानंतरच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांतला. एक लेस्बियन जोडपं होतं. त्यातल्या एकीच्या आईवडिलांनी तिचं लेस्बियन असणं स्वीकारलेलं, तर दुसरीचं कुटुंब- विशेषत: आई इतकी कडक, की त्यांनी तिला सरळ घराबाहेर काढलं होतं. ती आपल्या पार्टनरकडे राहात होती. मी तिच्याबरोबर तिच्या घरी गेले. मी बरोबर होते म्हणून आम्हाला त्यांनी घरात घेतलं आणि मी तिच्या आईशी, एकटीशी बोलू लागले. दोन तास आम्ही बोलत होतो. सुरुवातीला आईचा सूर अतिशय रागाचा होता. माझ्याशी या विषयावर काहीही चर्चा करण्यात तिला रस नव्हता. ती एकदम म्हणाली, ‘‘तुमचं मूल असं असतं ना, मग कळलं असतं काय वाटतं ते!’’ मी तिला माझ्या मुलाबद्दल सांगितल्यावर ती एकदम गप्पच झाली.  मग मी बारीक बारीक मुद्दे घेऊन बोलत राहिले. ‘‘आपण मूल जन्माला घालायचं ठरवतो, तेव्हा पालक म्हणून अनेक गोष्टी आपण आखत असतो, ठरवत असतो. बाळ मात्र त्यातलं काहीही ठरवू शकत नाही. तशीच या गोष्टीबाबतही मुलांची काय चूक?’’ आमचं बोलणं संपलं, तेव्हा त्यांच्या आवाजाचा सूर पार बदललेला. विशेष म्हणजे त्या क्षणीच त्या मुलीला आईनं घरात घेतलं. मी मनातल्या मनात आनंदानं उडय़ा मारत होते. दुसऱ्या दिवशीही मी पुन्हा तिच्या आईशी बोलले. हळूहळू परिस्थिती निवळत होती.

या मुलीची पार्टनर ‘ट्रान्सजेंडर’ (ट्रान्स मॅन) आहे. म्हणजे ती स्त्री म्हणून जन्माला आली, पण तिच्या जाणिवा पुरुषाच्या होत्या. ती पुरुष झाली. डिसेंबर २०१९ मध्ये त्या दोघींनी लग्न केलं. मला आग्रहानं बोलावलं होतं. मला त्या ‘अम्मा’ म्हणत होत्या. ‘अम्मामुळे हे लग्न झालं,’ असं सर्वाना सांगत होत्या. मार्च २०२० मध्ये या जोडप्याचं स्वत:चं घरही झालं. अशी उदाहरणं पाहिली, की खूप समाधान वाटतं. काही पालक मात्र अडून बसतात. ‘परत परत कशाला फोन करता? माझा मुलगा मुलगाच राहणार. मी त्याला कदापि मुलगी मानणार नाही.’ किंवा ‘मी तुमच्याविरुद्ध पोलिसात जाईन. तुम्हीच आमच्या मुलांना वाईट मार्गाला लावताय, अशी तक्रार करीन..’ असं म्हणणारे भेटतात; पण मीही आता त्यांना काय उत्तर द्यायचं हे शिकलेय. ‘‘मी इथे फोनवरच आहे. तुम्ही जरूर दुसऱ्या फोनवरून पोलिसांना फोन करा. पोलीस काय म्हणतात, ते मलाही सांगा,’’ असं शांतपणे म्हणण्याचं धारिष्टय़ माझ्यात हळूहळू येत गेलं.

माझ्यातली आई हे सारं समजून घेऊ शकते.  मला पालकांची मानसिकताही समजते. एकदम हे सत्य स्वीकारणं त्यांना कठीण गेलं तर ते नवल नाही. ‘आता आपल्या मुलाचं/ मुलीचं लग्न होणार नाही.’ किंवा ‘समाजात आपली पत आहे, त्याचं काय?’ असे प्रश्न त्यांना भेडसावत असतात; पण न थकता त्यांना समजून घेणं, थोडय़ा थोडय़ा दिवसांनी फोन करणं, हे करायला लागतं. प्रसंगी अगदी दोन-तीन तास पालकांशी बोलावं लागलं; पण माझ्या अनुभवानुसार बरेच पालक शेवटी या सत्याचा स्वीकार करतात व आपल्या मुलांच्या पुढच्या प्रवासात साथ देतात. मुलांनी नाव बदललं, तर तशी कागदपत्रं करून घेणं वगैरे गोष्टींत स्वत: उपस्थितसुद्धा राहतात.  या समुदायासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांकडून मला आजवर ‘क्विअरोज् पुरस्कार’, ‘आउट अँड लाउड पॅरेंट ऑफ द इयर पुरस्कार’, ‘नॅशनल ट्रान्सजेंडर विध्या पुरस्कार’ असे एकूण पाच पुरस्कार मिळाले. दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, नेपाळ इथे परिषदांमध्ये उपस्थित राहून बाजू मांडायची संधीही मिळाली. या सगळ्यात मला एक गोष्ट ठळकपणे जाणवली. ती ही, की मानसिकतेत बदल घडतो! संवाद मात्र सुरू ठेवायला हवा..