कोवळ्या आई-बाबांसाठी : आईचं दूध

स्तनपान खरोखर फार सोयीस्कर आहे. हवं तेव्हा, हवं तितकं, बरोब्बर पाहिजे त्या तापमानाचं जेवण बाळासाठी तयार असतं. बाटल्या किंवा इतर गोष्टींचं र्निजतुकीकरण हे काम वाचतं. फॉम्र्युला दूध किंवा वरच्या दुधाचा खर्च कमी येतो. आजारपणं कमी असल्यानं वैद्यकीय खर्चही वाचतो.

सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व
स्तनपान खरोखर फार सोयीस्कर आहे. हवं तेव्हा, हवं तितकं, बरोब्बर पाहिजे त्या तापमानाचं जेवण बाळासाठी तयार असतं. बाटल्या किंवा इतर गोष्टींचं र्निजतुकीकरण हे काम वाचतं. फॉम्र्युला दूध किंवा वरच्या दुधाचा खर्च कमी येतो. आजारपणं कमी असल्यानं वैद्यकीय खर्चही वाचतो.
गेल्या १०-१२ वर्षांत बालसंगोपनाच्या संकल्पनेत झालेला सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे स्तनपानाकडे बघण्याचा आजच्या आई-बाबांचा सकारात्मक दृष्टिकोन. ‘आम्ही विचार करून ठरवलंय, आमच्या बाळाला शक्य तितके दिवस ब्रेस्टफीड करायचं. मग त्यासाठी ‘ब्रेक’ घ्यावा लागला तरी चालेल,’ असं म्हणणाऱ्या कोवळ्या आई-बाबांची संख्या वाढत चालली आहे. खरं तर नवजात बाळासाठी आईचं दूध म्हणजे अमृत- हे ज्ञान पारंपरिक आहे. आदिम काळापासून स्तनपान करणाऱ्या पशूंपासून ती एक जैविक प्रेरणा आहे. त्यात बदल झाला ५०-६० वर्षांपूर्वी. जेव्हा सुशिक्षित स्त्रियांना स्तनपान हे बाळाशी जखडून पडणं वाटू लागलं. आपल्या बांधेसूदपणावरचं संकट वाटू लागलं. त्यातून मोकळीक हवी म्हणून स्तनपानाला पर्याय शोधले गेले. मात्र गेल्या काही वर्षांत सातत्यानं चाललेल्या संशोधनावरून सिद्ध होत आहे की, आईचं दूध म्हणजे केवळ बाळाचं पोषणच नव्हे तर त्याची कवचकुंडलं आहेत.
संरक्षक प्रथिनं
आजची तरुण पिढी ही प्रत्येक गोष्टीचं शास्त्रीय ज्ञान घेणारी आणि त्यावर आपले निर्णय घेणारी आहे. आज प्रसूतिपूर्व शिक्षणाचा भाग म्हणून त्यांना स्तनपानाचं महत्त्व समजावलं जातं, ते आई-बाळ दोघांनाही सुखद कसं होईल हेही सांगितलं जातं, त्यासाठी व्हिडीओ दाखवले जातात, इतकंच नव्हे तर प्रसूतिगृहात नव्या आईला मदतीचा हात द्यायला स्तनपान विशेषज्ञ(लॅक्टेशन कन्सल्टंट)सुद्धा हजर असतात.
तर मग आजच्या नूतन आईबाबांनो, पाहू या आईच्या दुधात एवढं विशेष काय आहे. आईचं दूध म्हणजे बाळाचं सर्वागीण पोषण. त्यात बाळाच्या वेगवान वाढीसाठी उच्च दर्जाची प्रथिनं, अमिनो अ‍ॅसिड्स असतात, तशीच बाळाची मज्जासंस्था आणि मेंदूच्या विकासासाठी आवश्यक ओमेगा-३ अ‍ॅसिड्स आणि कोलेस्टेरॉलपण असतं. बाळाला कार्यशक्ती पुरवण्यासाठी आहे लॅक्टोज आणि गॅलॅक्टोज प्रकारची साखर. व्हिटॅमिन्स ए, डी, ई, सी आणि क्षारसुद्धा आवश्यक प्रमाणात असतातच. आईचं दूध पिणाऱ्या बाळाला पाणी पिण्याची जरूर नसते. या सगळ्याव्यतिरिक्त आई बाळाला देते एक महत्त्वाची देणगी- अ‍ॅलर्जी आणि जंतुसंसर्ग यांपासून संरक्षण. बाळाच्या जन्मानंतर जे पहिलं दाट पिवळसर दूध येतं त्याला चीक किंवा कोलोस्ट्रम म्हणतात. त्यात संरक्षक पांढऱ्या पेशी भरपूर असतात. तसंच आय. जी. ए. नावाचं प्रथिनं- ज्याचा थर बाळाच्या आतडय़ांवर बसला की बाळाचं पोट आपोआप साफ होतं आणि आतडी विकसित-परिपक्व व्हायला मोलाची मदत होते. पुढच्या ३ ते ६ महिन्यांपर्यंत आई बाळाला ही संरक्षक प्रथिनं देत राहते.
‘ब्रेस्ट क्रॉल’
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ‘ब्रेस्ट क्रॉल’. जन्मानंतर काही मिनिटांतच (नाळ कापल्याबरोबर) बाळाला आईच्या छातीवर ठेवलं जातं. त्वचेचा त्वचेशी संपर्क होताच बाळाला प्रेरणा मिळते आणि काही मिनिटांचं ते बाळ कोलोस्ट्रम मिळवण्याचा प्रयत्न करू लागतं. बाळाच्या ओठांचा, जिभेचा स्पर्श होताच आईच्या शरीरात संप्रेरकं स्रवू लागतात आणि आईला ‘पान्हा’ फुटतो. नुकतंच जन्मलेलं वासरू किंवा पाडस झिडपिडत उठून उभं राहतं आणि थेट आईला लुचू लागतं तसाच हा प्रकार.
पाजतानाची काळजी
सुरुवातीला अगदी चमचा-दीड चमचा पिणारं बाळ थोडय़ाच दिवसांत ३० ते ६० मिली दूध पिऊ लागतं. स्रवणाऱ्या दुधाचा पहिला भाग पातळसर, तहान भागवणारा असतो (फोर मिल्क). नंतरचा भाग दाट, उष्मांकयुक्त, स्निग्ध आणि भूक भागवणारा असतो (हाइंड मिल्क). हे दुग्धपान बाळाला सुखकारक आणि सुलभ व्हावं म्हणून आईनं काळजी घ्यावी लागते. प्रथम बाथरूमला जाऊन यावं, पाणी प्यावं, पाठीला आणि कमरेला आधार देणाऱ्या उशांना टेकून बसावं. खुर्चीवर बसली असेल तर पायाखाली छोटं स्टूल घ्यावं. मांडीवर उशी घ्यावी, त्यावर बाळाला पूर्ण स्वत:कडे वळवून ठेवावं. यासाठी विशिष्ट नर्सिग पिलोसुद्धा मिळते. स्तनाग्रावर बाळानं व्यवस्थित ‘लॅच’ व्हावं- बाळाला नीट पिता येण्यासाठीची शरीररचना यासाठी अनुभवी सुईणी, घरातील ज्येष्ठ स्त्रिया किंवा लॅक्टेशन कन्सल्टंटची मदत जरूर घ्यावी. ते एक तंत्र आहे आणि सरावानं जमू शकतं हा विश्वास ठेवावा.
प्रत्येक बाजूला १० ते १५ मिनिटं घ्यावं. एका बाजूला पिऊन झालं की बाळाला खांद्यावर घेऊन ढेकर काढावी. दुसऱ्या बाजूनंतर पुन्हा तसंच करावं म्हणजे बाळाला दूध नीट पचतं, वर येत नाही किंवा पोट दुखत नाही. पिताना बाळ मध्ये मध्ये झोपतंसुद्धा. त्याला मुद्दाम जागं करावं लागतं. बाळ चुकीचं ‘लॅच’ झालं असेल तर आईला त्रास होऊ शकतो. करंगळीनं लॅच सोडवून पुन्हा प्रयत्न करावा. नवजात बाळ दिवसातून ८ ते १२ वेळा पिऊ शकतं. प्रत्येक वेळी ३० ते ४० मिनिटं म्हणजेच आईनं पाजण्याव्यतिरिक्त फक्त स्वत:चं खाणंपिणं आणि विश्रांती एवढंच करायचं आहे. मुख्य म्हणजे यासाठी भरपूर वेळ आणि संयम बाळगावा. आई आणि बाळ दोघेही नवशिके. सुरुवातीला अडचणी आल्या तरी हळूहळू जमतं. दूध भरपूर यावं म्हणून आपल्याकडे काही पारंपरिक गोष्टींचं सेवन करायला सांगतात- शतावरी, मेथी, डिंक, खसखस, हळीव इत्यादी. पण त्याहून महत्त्वाचं आहे तीन वेळा ताजं जेवण, दूध, भरपूर पाणी आणि तणावरहित मानसिकता.
हळूहळू आई आणि बाळ दोघेही ‘तयार’ होतात आणि स्तनपानाचे फायदे दोघांनाही दिसू लागतात. आईसाठी चांगली गोष्ट म्हणजे रोज किमान ५०० कॅलरीज जाळल्या जातात. गर्भवती अवस्थेत वाढलेलं वजन झपाटय़ानं कमी होतं. गर्भाशय पूर्वीच्या आकाराला परत येतं. मासिक पाळी लवकर सुरू होत नाही, त्यामुळे नैसर्गिकपणे संततीनियमन होतं. पुढच्या आयुष्यात स्तनांचा, ओव्हरीजचा कॅन्सर आणि हाडं ठिसूळ होणं (ऑस्टिओपोरोसिस) यापासून संरक्षण मिळतं. यातून महत्त्वाचा फायदा म्हणजे या अत्यंत निकटच्या संबंधांमुळे आई-बाळात एक अतूट बंधन निर्माण होतं.
आईच्या दुधावर बाळाची वजनवाढ चांगली होते. त्याला जुलाब किंवा ‘खडा’ होणं हे दोन्ही त्रास कमी होतात. अ‍ॅलर्जी, इसब, दमा यांची शक्यता कमी असते. कान, छाती किंवा पोटाचा जंतुसंसर्ग कमी होतो. अशा बाळांचा बुद्धय़ांकसुद्धा चांगला असतो. मोठेपणी स्थूलपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा रोगांची शक्यताही कमी असते.
याखेरीज स्तनपान खरोखर फार सोयीस्कर आहे. हवं तेव्हा, हवं तितकं, बरोब्बर पाहिजे त्या तापमानाचं जेवण बाळासाठी तयार असतं. बाटल्या किंवा इतर गोष्टींचं र्निजतुकीकरण हे काम वाचतं. फॉम्र्युला किंवा वरच्या दुधाचा खर्च कमी येतो. आजारपणं कमी असल्यानं वैद्यकीय खर्चपण वाचतो. ज्या आईला कामासाठी बाहेर जायचंय तिला ‘ब्रेस्ट पंप’चा पर्यायही उपलब्ध आहे.
फॉम्र्युला मिल्क
अर्थात स्तनपानाचं पुराण वाचून असं वाटू नये की स्तनपान जमलं नाही तर बाळाचं फार मोठं नुकसान होणार आणि त्याला आईचं जबाबदार आहे. काही वेळा परिस्थिती अशी असते की आईला दिवसभर बाहेर काम असतं. क्वचितप्रसंगी तिची प्रकृती फार बिघडते. तिला झालेल्या आजाराचे जंतू किंवा शक्तिमान औषधं दुधातून बाळाला जाण्याची शक्यता असते. अशा वेळी अर्थातच स्तनपान वज्र्य आहे. यासाठी फॉम्र्युला मिल्क हा चांगला पर्याय आहे. बाळाला पोषक तर आहेच पण हे दूध बाळाला बाबा किंवा अन्य कोणीही देऊ शकतं. प्रवासात किंवा सार्वजनिक ठिकाणीही बाटलीतून दूध देणं सोयीचं असतं. फॉम्र्युला मिल्क तसं महाग असतं. गाईचं दूध बाळासाठी पचायला हलकं म्हणून मुद्दाम आणतात, पण त्या दुधात बीटा लॅक्टग्लोब्युलिन नावाचं एक प्रथिन आहे ज्याची ५ टक्के बाळांना अ‍ॅलर्जी असते. दूध पचत नाही. जुलाब होतात. त्यापेक्षा सर्वत्र उपलब्ध असलेलं म्हशीचं दूध उकळून, साय काढून, बाळाच्या वयानुसार उकळलेलं पाणी मिसळून बाळाला पाजलं तर पचू शकतं. कारण त्यात हे विशिष्ट प्रथिन नाही.
सहा महिन्यांपुढे पूरक आहार चालू केला तरी दुधाची गरज असतेच. अगदी पूर्ण जेवणाऱ्या वर्षांच्या बाळांनीसुद्धा दिवसातून ५००-६०० मिलि दूध प्यायला पाहिजे. वर्ष-दीड वर्षांपर्यंत स्तनपान करणारी बाळं मात्र भाग्यशाली म्हणायला हवीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कट्टा मुलांचा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mothers milk

ताज्या बातम्या