– अमृता माने
माझ्यासाठी मोटरसायकल हे केवळ एक वाहन नाही, तो माझ्या स्वातंत्र्याचा, आत्मविश्वासाचा आणि स्वत:ला शोधण्याचा मार्ग आहे. अनेक जण या प्रवासाकडे, राइडिंगकडे साहस म्हणून पाहतात, पण माझ्यासाठी ती आत्मपरिवर्तनाची एक प्रक्रिया आहे. एकटीने प्रवास करताना आणि ‘Women on Wheels’ या स्त्रियांच्या गटाबरोबर फिरताना मी केवळ रस्ते नाही, तर अनेक मानसिक आणि सामाजिक अडथळेही पार केले आहेत.
मी जेव्हा पहिल्यांदा अरुणाचल प्रदेशचा, लांब पल्ल्याचा प्रवास केला, तेव्हा भीती होती रस्त्यांची, लोकांच्या नजरेची, आणि ‘हे शक्य आहे का?’ या प्रश्नांची. पण प्रत्येक किलोमीटरबरोबर ती भीती आत्मविश्वासात बदलत गेली. लडाख, अरुणाचल प्रदेश, स्पिती व्हॅलीसारख्या आव्हानात्मक प्रदेशांमध्ये मोटरसायकलवरून फिरताना मी स्वत:च्या मर्यादा ओलांडल्या. ओढे, दगडी रस्ते, बर्फाळ वळणं या सगळ्यांनी मला शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही मजबूत केलं.
मी जेव्हा एकटी माझ्या मोटरसायकलवरून फिरायला बाहेर पडते तेव्हा स्वत:शी संवाद साधत राहते. त्या शांततेत स्वत:च्याच प्रश्नांची उत्तरं सापडतात. अनेकदा स्त्री आहे म्हणून रस्त्यावर थांबवून लोक प्रश्न विचारतात, ‘‘तू एकटीच?’’, ‘‘घरी कोण नाही का?’’ पण हळूहळू मी हेही शिकले की उत्तर देण्यापेक्षा पुढे चालत राहणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. माझी मोटरसायकल माझी ओळख बनली आणि रस्ता माझा शिक्षक.
याच प्रवासात माझ्या ‘Women on Wheels’ या स्त्रियांसाठीच्या उपक्रमाची सुरुवात दोन चाकांवरचा आत्मविश्वास झाली. २०१८ मध्ये सुरू केलेल्या या उपक्रमाचा उद्देश एकच होता- स्त्रियांना दोन चाकींसाठी आत्मनिर्भर बनवणं. आज आमच्या गटात १८ ते ५५ वयोगटातील स्त्रिया आहेत विद्यार्थिनी, गृहिणी, नोकरदार, आणि अगदी पहिल्यांदाच स्कूटर किंवा बाइक चालवणाऱ्या स्त्रियासुद्धा. त्यांच्यासोबत प्रवास करताना जाणवतं की, भीती ही वैयक्तिक नसून सामाजिक असते, आणि आपण एकत्र आलो की ती सहज कमी होते. तेच त्यानंतरच्या सगळ्या प्रवासात अनुभवायला मिळालं आहे.
आम्ही जेव्हा एकत्रित मोटरसायकल घेऊन प्रवासाला निघतो तेव्हा स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, पहिल्यांदा जेव्हा त्या महामार्गावर उतरतात तेव्हाचा आनंद आणि त्यातून येणारा ‘‘मी करू शकते’’ हा आत्मविश्वास पाहणं हे आत्तापर्यंतचं माझं सर्वात मोठं यश आहे, असं मला वाटतं. काही स्त्रिया ज्या कधी एकट्या घराबाहेर पडल्या नव्हत्या, त्या आज शेकडो किलोमीटरचा मोटरसायकलचा प्रवास करतात ते पाहून जाणवतं की बदल शक्य आहे.
माझ्या राइड्स केवळ पर्यटनासाठी नाहीत; त्या समाजाला संदेश देण्यासाठी आहेत, की स्त्री ही फक्त मागच्या सीटवर बसणारी नाही, ती स्वत:चा प्रवास स्वत: ठरवूही शकते आणि करूही शकते. मोटरसायकल चालवणं म्हणजे बंडखोरी नाही, तर स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आहे.

आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा अभिमान वाटतो. कारण हा प्रवास फक्त माझा नाही, तो अनेक स्त्रियांचा आहे. दोन चाकांवरचा हा प्रवास अजून संपलेला नाही. अजून अनेक कथित गैरसमज, अनेक रस्ते, आणि अनेक स्त्रियांना अद्याप सोबत घेऊन पुढे जायचं आहे. कारण शेवटी, रस्ता कुठेही जावो, स्वत:पर्यंत पोहोचणं हेच खरं ध्येय आहे, असायला हवं.
सोनालीसोबतचा मन:स्पर्शी अनुभव
सोनाली कुलकर्णीसोबत केलेली अलिबागची ‘राइड’ माझ्यासाठी केवळ एक प्रवास नव्हता, तर एक भावनिक अनुभव होता. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला हा प्रवास आपोआपच ‘खास’ झाला. सुरुवातीला मनात थोडी शंका होती. एवढ्या नामवंत व्यक्तीसोबत राइड करताना अंतर जाणवेल का, औपचारिकता असेल का? पण पहिल्याच दिवशी, पहिल्याच भेटीत ती शंका दूर झाली. सोनाली एका राइडरप्रमाणे, एका मैत्रिणीप्रमाणे सहज आमच्यात मिसळली. तिच्या त्या साधेपणामुळे आणि आपुलकीमुळे मी क्षणातच या प्रवासाचा भाग झाले. तिच्यासोबत ‘राइड’ करताना आत्मविश्वास वाढला, मन मोकळं झालं आणि जाणवलं की, खऱ्या अर्थाने मोठी माणसं तीच असतात जी समोरच्याला मोठं वाटायला लावतात. या ‘राइड’नं मला केवळ एक सुंदर आठवण दिली नाही, तर योग्य मार्गावर असल्याची खात्रीही दिली.
● amruta2997@gmail.com
