– श्वेता मेहेंदळे
लहानपणापासून मी बाबांना आणि आजोबांना स्कूटर वा दुचाकी चालवताना बघत होते. त्यांच्याबरोबर मीही त्यावरून फिरायला जायचे. साहजिकच तेव्हापासूनच वाटायचं की, आपणही स्कूटर चालवावी. त्या वेळी बाबा हसून म्हणायचे, ‘‘मोठी झालीस की चालव.’’ हे वाक्य मनात खोलवर रुतलं होतं. आणि बाबांनीच दिलेले कार ड्रायव्हिंगचे धडे मोठेपणी बाइक चालवायला लागल्यावर उपयोगी पडले, माझा पहिला दुचाकी प्रवास हा माझ्या ‘अॅक्सेस’वरून मुंबई ते पुणे असा झाला. आणि तो तसाच चालू राहिला…
वेग आणि साहस या दोन्हींची मला आवड आहे. करोना साथीच्या काळात मला पहिल्यांदा ‘मोटोव्लॉग्स’ ही संकल्पना कळली. आपण बाइक चालवू या, ‘मोटोव्लॉग्स’ करू या हा विचारही माझ्या मनात नव्हता, कारण माझ्याकडे त्या वेळी बाइकच नव्हती. पण मला यश म्हणाला की, ‘‘बाइक घे आणि तूसुद्धा ‘मोटोव्लॉग्स’ कर.’’ यश म्हणजे यश प्रधान. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत आम्ही एकत्र काम करत होतो. तुम्ही त्याला एक गुणी अभिनेता म्हणून ओळखत असालच, त्यापलीकडे माझ्यासाठी तो ‘इन्स्पिरेशन’ आहे. एक उत्तम सहकलाकार ते एक उत्तम मित्र. ‘आयुष्यभर शिकत राहायचं’ हे त्याचं वाक्य कायम माझ्या लक्षात राहिलं आहे. त्यामुळेच म्हटलं, बघू या प्रयत्न करून, काही तरी वेगळं आहे हे.
मग मी पहिली बाइक घेतली ‘पल्सर’. तिचं नाव ‘बब्रुवाहन’. बब्रुने मला बाइक न येण्यापासून व्यवस्थित बाइक चालवायला येण्यापर्यंत नेलं. तिच्याबरोबरच मी चित्रीकरणाला जात होते. तिच्याबरोबरच मी मुंबई ते भंडारदऱ्यापर्यंत माझी पहिली ‘सोलो राइड’सुद्धा केली. ज्या वेळी मी ठरवलं की, ‘सोलो राइड’वर जाऊ या, त्या वेळी मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं होतं. भीती वाटली, पण ठरवलं की मग ते करायलाच हवं. सकाळी ६ वाजता निघाले. वाटेत कुठेही न थांबता थेट भंडारदऱ्याला पोहोचले… पोहोचल्यानंतर काही तरी नवीन गवसल्याची भावना मनात होती. अशी भावना जी आजपर्यंत मी कधीही अनुभवली नव्हती. साडेचार तास मी फक्त स्वत:बरोबर होते. ही शांतता, स्वत:शी संवाद साधण्याचा हा माझा पहिला अनुभव होता. त्यानंतर मला सतत अशा ‘राइडस्’कराव्याशा वाटू लागल्या. म्हणून मी इगतपुरीला जाऊन आले. लेकाला, आर्यला घेऊन ‘कर्नाळा पक्षी अभयारण्य’ पाहून आले.
त्यानंतर मात्र लांबच्या प्रवासाला जायचं, मोठी ‘राइड’ करायचं ठरलं. ते ठिकाण म्हणजे ‘माझं कोकण’. मी,अपेक्षा (चोकसी), यश असे तिघे निघालो. या प्रवासात खूप वेगवेगळी माणसं भेटली, वेगवेगळे अनुभव मला आले. महामार्गावर असताना माझ्या गळ्याला मधमाशी चावली. हेल्मेट, जॅकेट घातलेलं असतानाही ती कशी चावली हे कळलंच नाही. खूप दुखत होतं, झोंबत होतं, पण प्रवास करायचा होता. त्यामुळे जखमेला लाळ लावली आणि निघाले.
त्यानंतर आणखी एक अनुभव म्हणजे, आम्ही दापोलीजवळ पन्हाळेकाजीची लेणी बघायला गेलो होतो. भुसभुशीत लाल मातीचा कच्चा रस्ता, ज्यामध्ये बाइक रुतत होती. पुढे दामटवली तर मागे सटकत होती. प्रचंड ताण यायला लागला होता, पण आमच्याबरोबर यशसारखा अनुभवी चालक असल्याने त्यानं आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि मी तो रस्ता पार करू शकले. त्यानंतर गणपतीपुळे ओलांडताना रस्त्यावरच्या प्रचंड रहदारीमुळे यश आणि अपेक्षा यांची चुकामूक झाली. ‘मोबाइल नेटवर्क’ नसल्यामुळे आम्ही एकमेकांना फोनही करू शकत नव्हतो. मला वाटलं की, मी मागे राहिले, म्हणून ‘बब्रु’ पळवत राहिले. त्यामुळे त्यांना माझं ‘लोकेशन’ दिसत नव्हतं. अशा सगळ्या गोंधळात कोकणातल्या काळोखात पुढे असलेल्या एसटीच्या अंधूक प्रकाशात घाटी उतरत, मी गणपतीपुळे ते पावस हा टप्पा ओलांडला. आणि तोपर्यंत फोनच्या रेंजमध्येही आलो. फोनाफोनी झाली आणि साधारण २० मिनिटांनी आम्ही अखेर भेटलो. कोकणात एका चढावावर यू-टर्न मारताना मी बाइकवरून पडलेसुद्धा, पण लगेच आजूबाजूचे लोक धावत आले. त्या वेळी त्यांनी केलेली मदत मी कधी विसरू शकणार नाही. वेंगुर्ल्याला जाताना वाटेत मला आणि यशला एका ठिकाणी चित्रीकरण चालू असलेलं दिसलं. आम्ही तिकडे गेलो तर आमची काही मित्रमंडळीही भेटली. चित्रीकरणाचं वातावरण बघून अगदी घरी आल्यासारखं वाटलं. अशी ही सात दिवसांची ‘अॅडव्हेंचर ट्रीप’ झाल्यावर पुढचा टप्पा, गोवा.
सलग १२ तास ‘राइड’ करू शकतो हे आम्हाला त्या वेळी जाणवलं. कारण आमचं वरून तिघांचं प्रवास-प्रेम. अर्थात अधनंमधनं जेवायला, चहाला आम्ही थांबायचोच. गोव्याहून परताना ‘बब्रु’चा टायर पंक्चर झाला. मग माझं सामान यश आणि अपेक्षाच्या बाइकवर बांधून गोव्याच्या वाळूभरल्या रस्त्यांवरून बाइक चालवण्याची कसरत करत आम्ही पंक्चरवाल्यापर्यंत पोहोचलो.
असे अनेक अनुभव मला या सगळ्या प्रवासादरम्यान घेता आले. त्यानंतर मी घेतली ‘मित्रा’ म्हणजे ‘Meteor 350’. तिच्याबरोबर आत्तापर्यंत साताऱ्याची एकच ‘राइड’ मी केली आहे. आणि या वेळी माझ्याबरोबर आर्य होता. मुंबईहून-पुण्याला जाताना घाटात आम्हाला प्रचंड ‘ट्रॅफिक’ लागलं. नवीन बाइक आणि त्यात मागे आर्य. पुढची गाडी निघाल्यावर मला बाइक पुढे रेटताच येईना. थोडा ताण आला होता, कारण ‘ब्रेक’ सोडला तर बाइक मागे जात होती. आर्यला बहुदा कळलं की, मला टेन्शन आलंय. तो मला म्हणाला की, ‘‘आई टेन्शन घेऊ नकोस. छान चालवतेस तू बाइक. आत्ताही छान चालवतेस.’’ त्याच्या या शब्दांनी मला हुरूप आला आणि जणू काही झालंच नव्हतं, अशा तऱ्हेने मी तिथून बाइक काढली. त्या क्षणी मला जाणवलं की भीती ही आपण निर्माण करतो, त्यावर त्याच क्षणी मात करता येऊ शकते.
या प्रवासावरून परत येताना मला पुण्याहूनच थेट चित्रीकरणासाठी जायचं होतं. यश आणि अपेक्षाच्या घरून आम्ही सकाळी ६ वाजता निघालो. आणि वाटेत आम्हाला पाऊस लागला. मी त्यांना म्हटलं, ‘‘आपण थांबू या.’’ बाइक रस्त्याच्या कडेला घेतलीसुद्धा. पण आर्य म्हणाला, ‘‘कशाला थांबतेस. चल जाऊ मस्त पावसातून… हळूहळू जाऊ…’’ मी लगेच हो म्हणाले. ‘मित्रा’ वळवली…आणि लगेच निघालो.
मला बाइक चालवायला आवडते. कारण बाइकवर असताना आजूबाजूचा निसर्ग, तो वारा, ते डोंगर हे सगळं सुसाटपण प्रत्यक्ष अनुभवता येतं. शेतातल्या पिकांचा फुलोरा, मातीचा सुगंध, पावसाचा शिडकावा हे सगळं आपलं असल्यासारखं वाटतं. जे बंदिस्त गाडीत अनुभवता येत नाही. मी ‘सोलो ट्रॅव्हल’ करते म्हणजे ते काही बिनधास्तपणे केलेलं धाडस नसतं, तर तो एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय, नियोजन असतं. एकटं निघताना आपण जास्त सावध असतो, जास्त जबाबदार असतो. वेळेचं भान, ठिकाणांची निवड, थांबण्याची ठिकाणं हे सगळं डोक्यात ठेवूनच प्रवास करावा लागतो. मी दिवसाच प्रवास करते, निर्जन ठिकाणी थांबत नाही, जवळ थोडंफार खाणं ठेवते. एकटं प्रवास करणं म्हणजे माझ्यासाठी एकटेपणा नव्हे; तो माझा एकांत असतो आणि तो मला आवडतो. सोबत कोणी नसल्यावर निर्णय स्वत: घ्यायचे. कुठे थांबायचं, किती वेळ बसायचं, पुढे जायचं की नाही हे सगळं स्वत: ठरवायचं. आणि आता हा प्रवास फक्त मी आणि बाइकपुरता न राहता माझा स्वत:बरोबरचा झालाय.
चारचाकी गाडी मी उत्तम चालवतेच, पण बाइक चालवणं हे मला जास्त आव्हानात्मक वाटतं, कारण यात मला बाइकचा आणि माझा दोघांचाही तोल सांभाळावा लागतो. पूर्णत: मन एकाग्र करावं लागतं. या सगळ्या प्रवासात मी स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करते. आणि हा प्रवास कायम सुरूच राहणार… आणि हे सगळे अनुभव, त्यातल्या आठवणी माझ्यापाशी कायम राहाव्यात म्हणून मी त्याचे व्हिडीओज तयार करून माझ्या यूट्यूब चॅनेलवरही टाकलेत. अशी ही ‘मी’, ‘ती’ म्हणजे माझी बाइक आणि ‘तो’ म्हणजे माझा स्वत:बरोबरचा प्रवास.
● actorshweta@gmail.com
