उष:प्रभा पागे

पर्वतांची विशाल उंची, त्याचं अवाढव्यपण नेहमीच माणसाला आपल्या क्षमतांची आणि मर्यादांचीही जाणीव करून देतं. पण त्याचवेळी त्यांचं मोहात पाडणारं सौंदर्य आणि साहसाला प्रवृत्त करणारा आवाकाही मोठा. तो अनुभवण्यासाठी पर्वतांकडे वळलेली भटक्यांची पावलं पुन:पुन्हा तोच ध्यास घेतात. हे के वळ सहलीचे अनुभव नसतात. त्याहून वेगळं खूप काही त्यात सामावलेलं असतं. मात्र, अलीकडे पर्यटन हा मोठा व्यवसाय होऊ लागल्यानं पर्वतांचं सौंदर्य टिकावं यासाठी शाश्वततेचा विचार करावा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘पर्वतीय शाश्वत पर्यटन’ हा विषय असलेल्या यंदाच्या ‘जागतिक पर्वत दिना’च्या (११ डिसेंबर) निमित्तानं हा खास लेख.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Divorce tendency of financially capable women
सुखी संसाराला अहंकाराचे ग्रहण! आर्थिक सक्षम महिलांचा घटस्फोटाकडे कल
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

पर्वत हा निसर्गाच्या अनेक आविष्कारांपैकी एक!  शास्त्रीय भाषेत जंगल, नदी, समुद्र, वाळवंट, तशी पर्वत हीसुद्धा परिसंस्था. सह्य़ाद्री पर्वताच्या रांगा गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ राज्यांना पश्चिमेकडे लाभल्या, तर संपूर्ण भारताला पूर्वोत्तर पसरलेल्या हिमालयाच्या रांगांचं वरदान मिळालं. सह्य़ाद्रीच्या रांगांनी पाऊस अडवला, त्यामुळे सह्य़ाद्रीलगतच्या राज्यांची पिण्याच्या अन् शेतीच्या पाण्याची सोय झाली, तर हिमालयामुळे उत्तरेकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यापासून उत्तरेकडील राज्यांचा बचाव झाला. या पर्वतांवर उगम पावणाऱ्या नद्यांनी धरती सुजलाम, सुफलाम केली, नद्यांच्या काठी संस्कृती नांदू लागल्या. जीवनदायी नद्या ‘लोकमाता’ झाल्या, तर मग पर्वतांना ‘पिता’ असंच म्हणायला हवं! सह्य़ाद्री किंवा पश्चिम घाट आणि हिमालय ही दोन्ही ठिकाणं जैवविविधतेनं संपन्न खरी, पण मानवी आघातांनी आणि हस्तक्षेपामुळे संवेदनशील झाली आहेत. त्यांची साद ऐकायलाच हवी..

हे सांगण्यास आज एक विशेष औचित्य आहे. ११ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक पर्वत दिवस’ म्हणून २००३ पासून अनेक देशांत साजरा केला जातो. पर्वत ही मानवी जीवनासाठी आवश्यक परिसंस्था. जागतिक लोकसंख्येच्या १५ टक्के  लोकसंख्या पर्वतीय प्रदेशात राहते. या परिसंस्थेवर होणारे आघात बहुविध आहेत. पर्वतातील जंगलांची तोड, तथाकथित विकासयोजना, खाणींसाठी पर्वतांचं खोदकाम आणि तापमानवाढ, यामुळे या परिसंस्थेला धोका पोहोचतो आहे. हिमालयातील हिमनद्या वेगानं वितळू लागल्या आहेत. पूर, वादळं आणि भूस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत. याचा सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होतो आहे. त्याला पर्वतीय प्रदेश अपवाद नाही. करोनाच्या साथीमुळे गेल्या दोन वर्षांत पर्यटन व्यवसाय आणि त्यावर रोजीरोटी अवलंबून असलेल्या लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. पर्यटन खात्याचा महसूलही यामुळे कमी झाला आहे. या जागतिक पार्श्वभूमीवर आता पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात येत आहे, म्हणूनच या वर्षांच्या पर्वत दिनाचा विषय आहे ‘पर्वतीय शाश्वत पर्यटन’. आतापर्यंत वेगवेगळे विषय केंद्रस्थानी ठेवून पर्वत दिन साजरा करण्यात आला. पर्वतातील लोकांच्या पाण्याचा प्रश्न, त्यांचं जीवनमान उंचावणं, पर्वतातील अल्पसंख्य तसंच स्थानिक लोकांविषयी सहसंवेदना, पर्वतात राहणाऱ्या लोकांची संस्कृती, वारसा, रीतिरिवाज, शाश्वत विकास, तरुण पिढी आणि पर्वतांविषयी सहसंवेदना, पर्वतीय जैवविविधता, त्याचे मानवाला होणारे फायदे आणि जैवविविधतेचं संरक्षण-संवर्धन अशा विविध विषयांबाबत यानिमित्तानं जनजागृती करण्याचा प्रयत्न झाला आहे. तरीही यंदाचा दिनविषय माझ्यासारख्या कोणत्याही गिरिभ्रमणप्रेमीला आपलासा वाटेल.

डोंगरदऱ्या पालथ्या घालणं ही नेहमीच्या पर्यटनासारखी गोष्ट नव्हे. हे प्रेम अनुभवातून वाढतं. त्यासाठी प्रसंगी गैरसोय सहन करायचीही तयारी ठेवावी लागते; पण एकदा का या पर्यटनातली मजा कळायला लागली, की पर्वतांबाबत, तिथल्या निसर्गाबद्दल आदर निर्माण होतो, अर्थात आपल्या क्षमतांची आणि मर्यादांचीही जाणीव होते.

भारतीय संस्कृती आणि साहित्यात पर्वतांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्र देशासाठी सह्य़ाद्रीचं विशेष महत्त्व हे, की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र मराठी राज्याची स्थापना केली ती सह्य़ाद्रीच्या आणि सह्य़ाद्रीतील शूर मावळ्यांच्या सहाय्यानं. हा सह्य़ाद्री कण्यासारखा मराठी राज्याचा पाठीराखा झाला.  कोल्हापूरवासी डॉ. अमर अडके सह्य़ाद्रीचे भक्त. गेली चाळीस वर्ष ते गडकोटांवर फिरताहेत. ते सांगतात, ‘गडकोटांवर असंख्य मनस्वी माणसे भेटली. जशी माणसे, तसे डोंगर, उभे कडे, अफाट दऱ्या, उंच गिरिशिखरे, अगदी झाडे आणि डोंगरदऱ्यांतील वाटाही मनस्वी असतात. त्या भेटत, बोलावत.’ सह्य़ाद्री आणि सह्य़ाद्रीपुत्रांशी डोंगरभटक्यांचं असं मैत्र जमतं. दुर्गाविषयी ते म्हणतात, ‘इथे शांतता शोधावी लागत नाही, इथे उंची गाठावी लागत नाही, इथे भव्यता मोजावी लागत नाही, ते सारे आपोआप तुमच्यात सामावून जाते..’

सह्य़ाद्रीचे अनेक आयाम आहेत आणि अभ्यासकांना इथे संशोधनाच्या किती तरी शक्यता उपलब्ध आहेत. सह्य़ाद्रीची भूशास्त्रीय घडण, कडे, कपारी, सुळके,तिथली जैवविविधता, गड-कोट-किल्लय़ांचं स्थापत्य, त्यातील पाण्याची साठवणूक, सह्य़ाद्रीतून उगम पावणाऱ्या नद्या.. तिथलं लोकजीवन, त्यांचं जीवनमान सुधारायच्या  दिशा, तिथल्या लेणी, गुहा, शिलालेख, घाटवाटा, पर्यावरण, तीनही ऋतूंमध्ये बदलणारं निसर्गसौंदर्य, अशा अनेक अंगांनी सह्य़ाद्री अभ्यासता आणि अनुभवता येतो. दुर्गाच्या स्वरूपात शिवाजी महाराजांनी दिलेला अलौकिक वारसाही सर्वागानं अभ्यासावा असाच. सह्य़ाद्रीच्या भटकंतीत वैविध्यपूर्ण आकर्षण स्थळं आहेत. डोंगरदऱ्यांतील भटकंती म्हणजे विजन स्थळांची भटकंती. सह्य़ाद्रीमध्ये शंकराच्या मंदिरांचं बाहुल्य आढळतं. डोंगरभटक्यांचे रात्रीचे मुक्काम अशा ठिकाणी असतात. अशा कित्येक सफरींविषयी आवर्जून सांगावंसं वाटतं. आषाढातल्या एके  दिवशी आम्ही रायरेश्वराच्या वाटेवर असताना मुसळधार पावसानं आम्हाला गाठलं. वाटेवरून चालत आहोत की नदीतून, असं वाटावं, इतक्या खळाळत्या पाण्यातून आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात पोचलो. असाच आणखी एक मुक्काम हरिश्चंद्र गडावरील मंदिरातला. हे अफलातून ठिकाण नगर, पुणे, ठाणे या जिल्ह्य़ांच्या सीमेवरचं. माळशेज घाटाजवळचा हा डोंगरी किल्ला विस्तारानं प्रचंड आहे. दऱ्या, खोंगळी शिखरं, उंचवटे, कडेकपारी, गुहांच्या पोटातील लेणी, पाण्याची कुंडं, जंगल, झाडी, अद्भुत असा कंकणाकृती कोकणकडा, हे सगळं इथे आहे. हा किल्ला म्हणजे भटक्यांचं नंदनवनच! ४,००० फूट उंचीवरील किल्लय़ाच्या एका खोलगटीत अमृतेश्वराचं मंदिर आहे. त्यावर खोदीव कोरीवकाम आहे. याच्या कळसावर मृगपद्म कोरलेली आहेत. असं शिखर अन्यत्र नाही. मंदिरालगतच्या गुहेत खडकात खोदलेली  टाकी आहेत; स्वच्छ, नितळ पाण्यानं भरलेली. त्यालगत गुहा आहेत. मंदिराच्या पुढय़ातील खडकातून कालवा खोदला आहे. इथल्या भूगर्भातून पाण्याचा प्रवाह निघतो आणि या कालव्यातून तो वाहत पाचनई या खालच्या गावात उतरतो. ही मंगळगंगा नदी. मंदिराबाहेरच्या संरक्षक भिंतीवर शिलालेख कोरलेला आहे. योगी चांगदेव यांचा निवास या गडावर असल्याची आणि त्यांनी इथे ‘चांगदेव पासष्टी’ पोथी लिहिल्याची साक्ष या शिलालेखात मिळते. मुख्य मंदिराशेजारी एक मोठी गुहा आहे, नितळ स्फटिकासारख्या पाण्यानं ओतप्रोत भरलेली. पाण्यात मधोमध शंकराची पिंडी आहे. या पिंडीची प्रदक्षिणाही त्या थंड पाण्यातूनच करायची असते. मंदिराच्या एका अंगाला मोठी पाण्याची पुष्करणी आणि कडेनं दगडी कोनाडे. या कोनाडय़ात विष्णूच्या अतिसुंदर कोरलेल्या मूर्ती होत्या. तस्करांच्या भीतीनं आता त्या नगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात ठेवल्या आहेत. गडाची दोन मुख्य शिखरं. पुराणातील राजा हरिश्चंद्र आणि राणी तारामती यांच्या नावानं ही शिखरं ओळखली जातात. शिखरांमागील पठारावर दाट जंगल आहे.

 श्रावणातल्या एका पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं. त्या ओल्या रात्री आम्ही गडावर पोहोचलो होतो आणि ग्रहण सुटल्यावर गुहेतील थंड पाण्यातून आम्ही पिंडीला प्रदक्षिणा घातली होती. हे अनुभव के वळ सहलीचे अनुभव नाहीत. त्याहून वेगळं खूप काही त्यात सामावलेलं असतं,अवर्णनीय. एक मात्र आहे, की सुरुवातीला आपल्याला फारशी माहिती नसताना अशा सफरींची उत्तम सवय असलेल्या व्यक्तींबरोबर आणि गटानंच फिरणं योग्य. हळूहळू या साध्या, कोणताही बडेजाव नसलेल्या पर्यटनाची तुम्हाला गोडी लागते की नाही बघा!

सह्य़ाद्रीत भटकंती करणारी कित्येक मंडळी श्रावणातल्या सोमवारच्या आधी येणाऱ्या रविवारी भीमाशंकराचा डोंगर कर्जतच्या बाजूनं, घाटानं चढून जातात. तेथील शिवाचं दर्शन घेऊन पुन्हा त्याच मार्गानं परत येतात. हा विशिष्ट धर्माचा उपचार नक्कीच नाही. हा तर निसर्गसंस्कार आहे. माणूस निसर्गापेक्षा श्रेष्ठ नाही, तर तो निसर्गाचाच एक अंश आहे आणि तो निसर्गसत्तेचा आदर करतो, हेच यातून व्यक्त होतं. शिवशंकर निस्संग, निर्लोभी, विजनवासातला. उंच पर्वत शिखरांवर त्याचा वास, ‘शंभू शिखरीचा राणा’. त्याची बरीच मंदिरं पर्वत-शिखरांवर निर्मिलेली आहेत. पूर्वीच्या काळच्या द्रष्टय़ा माणसांनी निसर्गतत्त्वाशी जवळीक राहावी, माणसाचा अहंकार गळून पडावा, मनाचं हीन नष्ट व्हावं, म्हणून शिवाची मंदिरं दुर्गम, उंच शिखरांवर, डोंगरात निर्मिली ती उच्च हेतूनं. त्याला संकुचित धार्मिक रूप देणं हा आपल्या बुद्धीचा कोतेपणा ठरेल.

सह्य़ाद्रीमध्ये भटकंती करणारा सह्य़ाद्रीचाच होऊन जातो, हा अनुभव सगळ्याच भटक्यांचा! भटकंती करताना सह्य़ाद्रीमध्ये राहणाऱ्या स्थानिक लोकांचा पाहुणचार लाभला नाही असा भटक्या विरळाच. वाटाडे म्हणून किती तरी वेळा आमच्याबरोबर हेच लोक आले आहेत. बंबाळ्या रानात वाट हरवते तेव्हा या वाटाडय़ांनी कैक वेळा आम्हाला वाटेवर आणलं, आपल्या एक पाखी झोपडीमध्ये अडचण सोसून रात्रीचा आसराही दिला, आमच्या डाळभातासाठी आपली चूल आम्हाला वापरायला दिली. आमच्या जवळचं पाणी संपल्यावर त्यांच्या मर्यादित पाण्यातून पाणी देऊन आमची तहान भागवली, काही वेळा भूकही भागवली, अगदी निरपेक्षपणे. कमळगडाच्या पठारावरच्या धनगरवाडय़ात तहानलेल्या आम्हा भटक्यांच्या पुढय़ात कारभारणीनं हंडाभर ताक आणून ठेवलं होतं. आम्ही तुडुंब प्यायलो आणि पाण्याच्या बाटलीतून भरूनही घेतलं. होळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी साल्हेर किल्ल्यावरून आम्ही खाली उतरलो, तेव्हा गावसीमेवरील एकानं तर आम्हाला आग्रहानं होळीच्या प्रसादाची पुरणपोळी खाल्लय़ाशिवाय जाऊ दिलं नव्हतं. सह्य़ाद्रीतील आदिवासी, धनगर, गावकुसाच्या सीमेवर राहणाऱ्या उपेक्षित घरांनी भटक्यांना असं घरपण दिलं, तेही कोणतीही अपेक्षा न ठेवता. आम्ही भटक्यांनी त्यांना काय दिलं? काही नाही. वाटाडय़ांना आम्ही फक्त मोबदला द्यायचो.

सह्य़ाद्री आणि हिमालय यांचे काय लागेबांधे आहेत कळत नाही, पण सह्य़ाद्रीच्या पदरात गुरफटलेला भटक्या हिमालयाकडे कधी खेचला जातो कळत नाही आणि एकदा हिमालयाकडे गेलेली पावलं वारंवार तिकडे वळतात. कित्येकांची अशी अवस्था होते, की हिमालयातील भ्रमंती संपते न संपते, तोच सह्य़ाद्रीची हाक कानी येते अन् सह्य़ाद्रीत असताना हिमालयाची साद येत राहते. कित्येक गिर्यारोहकांची अशी द्विस्थळी यात्रा सुरू होते. सह्य़ाद्री काय किंवा हिमालय काय, दोन्हीचा आत्मा एकच. त्या शिवाची अन् भटक्या जीवाची गाठ मग पक्कीच समजायची!

कालिदासानं ‘कुमारसंभव’ काव्यात हिमालयाचं वर्णन केलं आहे. 

‘अस्ति उत्तरस्याम दिशि देवतात्मा,

      हिमालयो नाम नगाधिराज:

पूर्वापरौ तोयनिधिवगाह्य़: स्थित:

    पृथ्विव्याम इव मानदण्ड:’ 

सर्वोच्च हिमालय पर्वत हा देवतात्मा आहे, तो पृथ्वीचा मानदंडच आहे. भारतीय तत्त्वज्ञ आणि योगी यांना हिमालय हा  चिरंतनाचं प्रतीक वाटतो. भूत, वर्तमान आणि भविष्य हे त्रिकाळ त्यात विलीन होतात, म्हणून  माणसाला पर्वतांचं आकर्षण वाटतं. ब्रिगेडिअर ग्यानसिंग म्हणतात, ‘अशक्य ते शक्य करून दाखवायची महत्त्वाकांक्षा माणसात असते. पर्वत चढण्याची त्याला ऊर्मी येते, मग तो थांबत नाही. माणसात ही तृष्णा चिरंतन जागी असते. पर्वताची हाक तुम्हाला ऐकू येते, तुम्ही भारल्यासारखे त्याच्याकडे खेचले जाता. ही हाक जेव्हा तुम्हाला ऐकू येईनाशी होते, तेव्हा तुमच्या ऱ्हासाची सुरुवात होते’.  प्रसिद्ध ‘द जंगल बुक’चा लेखक रुडय़ार्ड किप्लिंगवर पौर्वात्य संस्कारांचा प्रभाव होता. तो म्हणतो, पर्वताकडे जाणं म्हणजे आईच्या कुशीत शिरणं.  तर तत्त्वज्ञ लेखक जॉन रस्किन म्हणतात, ‘निसर्गसौंदर्याचा अंत आणि उगम म्हणजे पर्वत’. डॉ. जिम लेस्टर म्हणतात, ‘पर्वतात माणसाला त्याच्या संपूर्णपणाची एकसंध जाणीव होते.’ असे किती दाखले द्यावेत! ‘पर्वतांची तुम्हाला भीती नाही का वाटत?’ या प्रश्नाला उत्तर देताना भूविज्ञानतज्ज्ञ अनातोली बुकरीव म्हणतो, ‘पर्वतांची भीती मला कधीच वाटत नाही, उलट पर्वतात माझं मन मुक्त होतं. आभाळात पंख पसरून विहरणाऱ्या पक्ष्यासारखं मला विहार करायला आवडतं. तिथे मी ‘माझा मी’ असतो.’

  पर्वत निसर्गाचा एक आविष्कार असला तरी इतरांवेगळा आणि वैशिष्टय़पूर्ण. त्याची उंची, त्याचा विस्तार, आकार, उभी चढण यांचा धाक वाटतो आणि कुतूहलही. इतक्या उंचीवर काय असेल, त्याच्या पल्याड काय असेल, हे कुतूहल असतं ते. अज्ञात प्रांताचा शोध घेण्यासाठी प्राचीन काळापासून माणूस मुशाफिरी करत आला आहे. त्याच्या प्रगतीचं आणि विकासाचं तेच तर गुपित आहे. एरिक शिप्तन हे गिर्यारोहक होते. त्यांना वाटतं, की सुख आणि समाधानाचा उगम गिर्यारोहकांच्या साध्या राहणीत आहे. पाश्चिमात्य पर्वतांना क्रीडास्थळ समजतात, तर पौर्वात्य समुदाय पर्वतांना तीर्थस्थळ मानतात. शांती आणि मुक्ती यांच्या शोधात असलेले साधक आध्यात्मिक साधनेसाठी पर्वतात, त्यातही हिमालयाच्या सान्निध्यात जातात. निसर्गातील सौंदर्य, ताकद आणि सर्जनक्षमता यांचा साक्षात्कार पर्वतांच्या सान्निध्यात पुरेपूर घडतो.

हिमालय तटस्थ, स्थिर, अविचल असा. त्याच्या रौद्रतेची मनाला भूल पडते. माणसातल्या साहसाला तो आवाहन करत असतो, माणसाच्या साहसाला जणू जोखत असतो. भूवैज्ञानिकांनाही  याच्याबद्दल पराकोटीचं कुतूहल वाटतं. त्याची जडणघडण, त्याचं चलन-वळण, अंतर्गत घडामोडी, हिमनद्या यांच्या अभ्यासाची हिमालय ही प्रयोगशाळाच आहे. तिथले स्थलविशिष्ट प्राणी, वनस्पती यांचंही आकर्षण संशोधक आणि निसर्गप्रेमींना वाटतं. गिर्यारोहक जॉर्ज मेलरी यांना कुणा पत्रकारानं विचारलं होतं, की ‘पर्वत चढाईत एवढे धोके असताना तुम्ही का चढता?’ त्याचं मोठं मार्मिक उत्तर त्यांनी दिलं, ‘Because it is there.’ 

अलीकडच्या काही दशकांत पर्यटनाची गोडी खूप वाढली आहे. मोठा महसूल देणाऱ्या उद्योगात त्याचं रूपांतर झालं आहे. दळणवळण, रस्ते, वाहतूक  आणि प्रगत संदेशवहन यांनी पर्यटनाच्या वाढीला मदत झाली आहे. मात्र वाढत्या पर्यटनाचे काही दुष्परिणामही आता दिसू लागले आहेत. त्यामुळेच यंदाच्या पर्वत दिनाचा रोख आहे तो शाश्वततेवर. शाश्वतता म्हणजे निसर्गसंपत्तीचा नाश टाळणं आणि तिची जोपासना करणं. सजीव आणि निर्जीव सृष्टी यांच्यामधील नैसर्गिक समतोल राखणं यात अपेक्षित आहे. उदा. इंधन, पाणी, जंगल. पर्वतांच्या संदर्भात पर्यटनामधून पर्वतीय भागातील लोकांचं जीवनमान सुधारणं आवश्यक आहे. जगण्याचा चांगला दर्जा पर्वतीय लोकांना मिळावा. पर्यटनातून त्यांना व्यवसायाच्या संधी मिळाव्यात. अलीकडे सह्य़ाद्री परिसरात मार्गदर्शकांच्या स्थानिक संघटना तयार झाल्या आहेत. ही गोष्ट चांगलीच आहे. हिमालयातही स्थानिक प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या संघटना आहेत. शेरपा जमात हे त्याचं उत्तम, आदर्श असं उदाहरण. स्थानिक लोकांच्या कलावस्तू या पर्यटकांपुढे याव्यात. त्यातून कला, संगीत अशा सांस्कृतिक गोष्टींनाही उत्तेजन मिळावं. पर्यटकांच्या थाळीत प्रसंगी स्थानिक खाद्यपदार्थ, पेयं असावीत. त्यामुळे शेतीतही खास त्यांचं वैविध्य राखलं जाईल.

स्पितीच्या भ्रमंतीमध्ये त्या लोकांची तिब्बती रोटी एकदा आम्हाला मिळाली. तिची चव मी विसरूच शकत नाही, तसाच लडाखमधला नमकीन चहा. आमचे पोर्टर तो चहा प्यायचे. कधी त्यात बार्लीचं पीठ घालून प्यायचे. उंचीवर पोहोचलं तरी त्यामुळे दमही लागत नाही. धन्कर या गावी Sea buckthorn म्हणजे लेह  बेरीचा अर्क पाण्यात घालून पितात. तर ऱ्होडोडेन्द्रोनच्या फुलांचं सरबत सिक्कीममध्ये मिळतं, तेही आरोग्याला चांगलं, चवीला स्वादिष्ट असतं. या सगळ्या गोष्टी शाश्वततेला बळ देतात. याउलट बाजारात मिळणारी थंड कृत्रिम पेयं. त्यात पोषणमूल्यं तर नाहीतच, शिवाय त्यांच्या निर्मितीमध्ये अमर्याद पाणी लागतं, वीज लागते, हा निसर्गसंपत्तीवरचा मोठा आघात आहे.

पर्यटन नक्कीच माणसाच्या अनुभवाची कक्षा रुंदावतं; पण तशी तुमची मानसिकता हवी. पर्यटनाचेही दोन प्रकार आहेत. जबाबदार पर्यटन आणि बेजबाबदार पर्यटन- ज्यात चंगळवाद असतो. बरीच तारांकित रीसॉर्ट्स चंगळवादाला  खतपाणी घालतात. या ठिकाणी शॉवर असतो, बादली नसते. रोजचे कपडे धुण्याची, वाळत घालण्याची काहीच सोय नाही. हो, त्यांची धुलाई व्यवस्था असते. त्याचे दरही अवास्तव असतात. थोडक्यात काय, पैसे खर्च करा आणि नैसर्गिक संपत्तीच्या ऱ्हासाला कारण व्हा.

प्रत्येक स्थळाची धारण क्षमता असते. उदा. राजगड एका दिवशी किती लोकांना सामावू शकतो, ते ओळखून रोजचा प्रवाशांचा ओघ मर्यादित ठेवणं आवश्यक आहे. गडावर आलेल्या लोकांसाठी पुरेशी स्वच्छतागृहं असणं आवश्यक आहे. त्याअभावी या पवित्र स्थळी नाकावर रुमाल धरून जावं लागतं. बहुतेक गडांवर एके काळी खडकातील थंड, स्वच्छ  पाणी आम्ही पीत होतो. आता बहुतेक पाण्यात कचरा, प्लास्टिक यांचं प्रदूषण झालेलं आहे.  हरिश्चंद्रगड नंदनवन होतं, तो आता भूतकाळ झाला. आता तिथे मंदिराच्या बाजूलाच इतका कचरा असतो, की आपली आपल्याला लाज वाटते.

पर्वतीय किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या धारण क्षमतेप्रमाणे पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा असायला हवी. तिथे पाणी आणि स्वच्छतागृहं असावीत. राहण्याची सोय किल्ला वा पर्वत यांच्या पायथ्याशी, स्थानिक लोकांच्या घरी असावी, म्हणजे ‘होम स्टे’ अशी. त्यातून त्यांनाही व्यवसाय मिळेल.

महत्त्वाची परिसंस्था असलेल्या पर्वतांचं सौंदर्य, निकोप वातावरण आणि पर्वतनिवासी लोकांचं हित शाश्वत राहणं अंतिमत: आपल्या हिताशी निगडित आहे. हे जाणून आपण जबाबदार पर्यटक व्हायचं ठरवू या. पर्यटन खात्यानंही महसुलाच्या लोभानं हिताचा बळी देऊ नये, ही या प्रसंगी अपेक्षा!

ushaprabhapage@gmail.com