नीलिमा लेले
नवीन ‘टूबीएचके’ जागेत येऊन आज महिना झाला, पण अजून नवीन घराला सरावले नाही. छान सजवलंय घर, पण सतत आठवण येतेय त्या जुन्या चाळीतल्या घराची. इतक्या वर्षांची त्या जुन्या घराची सवय, उपनगरातलं सासर, छोटंसंच चाळीतलं घर, त्यातही खाली असलेल्या खोलीत सासू-सासरे- दीर आणि घराचा पोटमाळा होता आमच्या दोघांची खोली. ‘बेडरूम’ म्हटलं तरी चालेल. मुंबईत स्वत:ची खोली ही मध्यमवर्गासाठी चैनच. लग्न करून आले ती याच घरात. नव्याची नवलाई होती. खूप सुंदर क्षण दिले त्या दिवसांनी मला. नवर्याबरोबर तो पोटमाळाही माझ्या सुखाचा सोबती आहे. खूप काही शिकवलं त्याने मला.
लहान गावातून आले होते. मुंबईचं आकर्षण होतंच, पण फार अपेक्षा नव्हत्या. घरातला छोटासा शिडीचा जिना चढून वर आलं, की आमचा पोटमाळा. घराच्या वर कौलारू छप्पर असल्याने एका बाजूने उंची आणि एका बाजूला छत जमिनीच्या वर ३/४ फुटाइतकं खाली असा असतो पोटमाळा. त्याचा छान उपयोग होतो. दिवसा वावरायला, आपलं काही काम करायला त्याचा छान उपयोग होतो. पोटमाळ्यावर अभ्यास करून मी माझं शिक्षण पूर्ण केलं. छंद जोपासले. त्याला छान पडदे लावून आम्ही आमची ‘प्रायव्हसी’ही जपली. हवा येण्यासाठी छान खिडकीही होती. त्यातून छोटासाच आभाळाचा तुकडा दिसायचा, पावसाचं पाणी हातावर घेता यायचं. अथांग आभाळात स्वैर उडणारे पक्षी दिसायचे.
म्हटलं तर घराचाच भाग आणि वाटलं तर स्वातंत्र्य होतंच पोटमाळ्यावर. मी ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपट पाहिला आणि तेव्हा वाटलं त्यातील नायक नायिकांची खोली म्हणजे आमच्या संसाराचंच चित्रण आहे की हे! मग घर बदलताना वाटलं, हा पोटमाळा असाच्या असा घेऊन जाऊ या का? इतका जीव लावला होता त्याने. मनातून तो कधीच जाणार नाही. मनात तर राहणारच अगदी मनाचा पोटमाळा बनून…
खरंच! काय हरकत आहे ? असावा की, असा मनालाही एक पोटमाळा, जो फक्त आपला असेल. मनातलाच असला तरी थोडा मनापासून स्वतंत्र ज्यात कधीतरी फक्त आणि फक्त आपल्यालाच रमता येईल. नाहीतरी मन म्हणजे काय सतत सगळ्यात गुंतलेलं. त्यात दिवसभर सगळ्यांचा वावर, आलं गेलं, काळजी करा स्वागत करा, हसा, बोला.
मनाचा पोटमाळा तिथे मिळेल मनाला विसावा, कधी हवा असेल प्रकाशाचा कवडसा किलकिले करावे, तिथल्या खिडकीचे दार दिसतील काही गोड स्मृती मनात झिरपू दे मग उत्साह परत उमेदीने कामे सुरू कधी पाहावा वाटला आभाळाचा तुकडा, उघडावी तिथली खिडकी पाहावे डोळे भरून पूर्ण केलेले स्वप्न, पक्ष्यांचे विहरणे मन होईल तरल, फुटतील कल्पनांना पंख उतरतील झरझर कागदावर… कधी दाटतील मनाचे कढ येईल हुंदका गळ्याशी. लपवावे हे, सार्यांपासून सारे, आपल्याच मनाच्या अंतर्गृहात. कधी मन करावे मोकळे आपलेच आपल्याशी मिळतील प्रश्नांची उत्तरे अंतर्मुख मन चूक मान्य करेल मग मार्ग होईल सोपा मनाच्या पोटमाळ्यात जपलेले असतील शिकलेल्या अनेक कलांचे विशेष ते जोडतील सार्यांना रंगरेषांनी खुलवून.
लग्न झाल्यावर दहा वर्षं घरातल्या पोटमाळ्यात आनंदाने राहिले. बाळजन्माचा आनंद घेतला. त्याच्या कौतुकात रमले. छंद जोपासले, सार्यांची मनं जपली. असा, आपल्याला कित्येक वेळा शहाणं करणारा मनाचा पोटमाळा प्रत्येकाने जपावा. तो केवळ मनाचा एक कोपरा नसतो. घरासारखाच अनुभवाने शहाणं करणारा, मनाच्या माळ्यावर आपल्याबरोबर राहून आपलं मन जपणारा एक सच्चा मित्र असतो.
neelimalele62@gmail.com
