नुकताच ‘मस्त महिला मंडळी’ हा माहितीपट पाहिला. मुंबईच्या दाटीवाटीच्या वस्तीत राहणार्‍या दहा जणी माहितीपट बनवायच्या उद्देशाने एकत्र येतात, प्रशिक्षण घेतात आणि हातातल्या मोबाइलने टिपत जातात, मस्त महिलांचं मस्त आयुष्य… अर्थात त्यांनी ते आयुष्य स्वतः मिळवलेलं असतं. प्राप्त परिस्थितीत आहे तसंच न जगता काही वेगळं करण्याचा त्यांचा इरादाच त्यांना खास माणूस बनवतो आणि तेच हा माहितीपट सांगतो, त्यांची गोष्ट… त्यांच्या जगण्याची, त्यांच्या असण्याची गोष्ट.

– प्रत्येक व्यक्तीची एक गोष्ट असते, तिच्या जगण्याची गोष्ट. आयुष्यातील घटना-प्रसंगातून, संघर्षातून घेतलेले अनुभव या गोष्टीला आकार देत जातात. गमतीची गोष्ट म्हणजे एखाद्याची गोष्ट दुसर्‍यालाही काही शिकवून जाते, कधी हसवते, तर कधी चक्क रडवतेही. याचं कारण ती सगळी एकाच जमिनीवरची माणसं असतात. असाच अनुभव देणारा ‘मस्त महिला मंडळी’ हा तासाभराचा माहितीपट. 

मुंबई उपनगरातील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये राहणार्‍या, काम करणार्‍या १० जणी एकत्र येतात, हातातल्या मोबाइल फोनवरच कधी एकमेकींच्या मुलाखती घेत, गप्पा मारत तर कधी प्रत्येकीच्या कामाच्या ठिकाणी जात त्यांच्या आयुष्यात डोकावतात. आणि त्यातून तयार होतो एक असा माहितीपट, ज्यात त्या प्रत्येकीची गोष्ट तर आहेच; परंतु त्यांच्या एकत्र असण्याचीही गोष्ट आहे. दु:खाचे कवडसे बाजूला सारत आनंदाची प्रकाशकिरणे शोधण्याची ही गोष्ट…

‘कोरो’ (उडफड) या संस्थेच्या ‘राइट टू पी’ अभियानाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या सगळ्या जणी. ‘कोरो’च्या संस्थापक-संचालक डॉ. सुजाता खांडेकर आणि ‘कोरो ग्रासरूट्स नॉलेज बिल्डिंग’च्या प्रमुख सुप्रिया जान ठरवतात, ‘कोरो’वर माहितीपट बनवायचा. मग साहजिकच  त्यातल्या स्त्रिया आणि त्यांचं आयुष्यच केंद्रभागी असायला हवं. आणि तो तयार करायचाही त्याच स्त्रियांनी. मग सुरु झाला प्रवास मोबाईल कॅमेरावर चित्रीकरण कसं करायचं इथपासून. त्यातलाच एक भाग होता कब्बडी खेळण्याचा. ठरवलं खरं, पण प्रत्यक्ष मैदानात उतरून खेळायचं तेही अशा बायांनी ज्यांच्या मनावर ‘मोठं’ झाल्यावर खेळायचं नसतं, हेच बिंबवलेलं असतं. त्यामुळे या सगळ्याच जणींचा प्रत्यक्ष मैदानात खेळेपर्यंतचा अनुभव त्यांच्या रोजच्या जगण्याची गोष्ट सांगत कसा पुढे जात राहतो तोच हा माहितीपट.

दर्शना मयेकर, गौरी राणे, रोहिणी कदम, कविता खोमणे, शीतल नवले, नाझनीन सिद्दकी, वैशाली माने, कविता घुगे, अंजुम शेख आणि रेहाना शेख अशा या दहा जणी, वय साधारण ३० ते ५० दरम्यान. वस्तीत किंवा परिसरातच नोकरी करणार्‍या. अंजुम व रेहना नक्षीदार कपडे तयार करणार्‍या, तर नाझनीन स्थानिक पत्रकार आणि दर्शना आणि कविता वस्तीच्या शौचालयाच्या ‘केअर टेकर’ आहेत. दर महिन्याला तेथे राहणार्‍या लोकांकडून पैसे घ्यायचे. त्याचा हिशेब ठेवायचा आणि कामगारांच्या मदतीनं स्वच्छता सांभाळायची. अशी कामं करणार्‍या या सगळ्याच जणी घराला थोडाफार आर्थिक भार लावणार्‍या.

त्यातच कामधंद्याच्या शोधात थेट दुबईला जाऊ इच्छिणारी रेहानाही आहे. आपण कष्ट घ्यायला तयार आहोत, पण योग्य काम मिळत नाही हे अश्रू भरल्या नजरेनं ती सांगत राहते, ‘‘खूप ठिकाणी काम शोधलं, पण मिळालं नाही. थेट विरार, अंधेरी, बोरिवली, ठाण्यापर्यंत जाऊन आलेय. लोक बोलवतात, तासन् तास बसून ठेवतात आणि नंतर सांगतात एवढे पैसे द्या, तरच नोकरी मिळेल. कुठून आणू इतके पैसे? आता एकाच्या ओळखीवरून इतक्या लांब दुबईला जातेय. कारण मुलांसाठी आम्हाला एक छोटं घर हवंय. छोटं दुकान घेता आलं तरी ते मी आयुष्यभर नीट चालवेन.’’ रेहाना हे सांगताना डोळ्यांतून टिपं काढते खरी, पण ती एकदम कलंदरही आहे. जेवण बनवता बनवता ‘आज की रात मजा हुस्न का, आँखों से लिजिए’ या गाण्यावर मस्त ठेका धरत नाचते. हसत म्हणते, ‘‘टेन्शन दूर करने का मेरा यही फंडा है। मेरा पती हसता है, कहता है, देख जमीन हिल रही है तेरे नाचने से। मी लक्ष देत नाही.’’ आयुष्यातले ताणतणाव बाजूला ठेवण्याचा तिने शोधलेला हा मार्ग. आपण तिच्या गोष्टीत सहजपणे गुंतत जातो नि तिला लवकर दुबईला जायला मिळो, अशी मनातल्या मनात प्रार्थनाही करतो.

वैशाली अधिक चटपटीत. लग्न झाल्यापासूनच कामात झोकून देणारी. सुरुवातीला सासूबरोबर घरकाम करायची, नंतर अंगणवाडी सेविका झाली, आता ती वस्तीमध्येच ‘महिला संपत्ती अधिकारा’चं काम करते. इतकंच नाही तर स्वत:ला वाढवण्यासाठी अपूर्ण राहिलेली पदवीही तिनं आता पूर्ण केलीय. आणि एमए करायचंही जाहीर केलंय. ‘आपल्याला जे करायचं ते आपण करायचं. दुसर्‍यांनी ते कशाला सांगितलं पाहिजे?’ असं तिचं साधं सरळ तत्त्वज्ञान, पण त्यामागे आहे तो तिचा कटू अनुभव. ‘तुला खूप सारे पैसे मिळाले तर काय करणार?’ या प्रश्नावर तिचं उत्तर होतं, ‘‘स्वत:चं घर घेईन. ज्याच्यावर माझ्या नावाची पाटी असेल. स्त्रियांना स्वत:चं घरच नसतं. लग्नाआधी माहेरचं नि लग्नानंतर सासरचं. ते आपलं कधी होऊ शकत नाही. म्हणून मला स्वत:चं हक्काचं घर हवं, जिथून मला कुणीही हकलू शकणार नाही असं.’’ तिच्या या वैयक्तिक दु:खातूनच तिची गोष्ट सहजपणे सार्वजनिक, विशेषत: अखिल स्त्रियांची होऊन जाते. 

शीतल घरोघरी जाऊन लोकांच्या तब्येतीची काळजी घेणारी. ताप, रक्तदाब मुलांच्या वेगवेगळ्या लशी इतकंच नव्हे तर  गर्भनिरोधक गोळ्या, निरोध वाटणारी ‘कम्युनिटी हेल्थ वर्कर’ अर्थात आरोग्यसखी. दिवसभर उन्हा-पावसात हिंडायचं काम करत संसारही सांभाळणारी. संसार सांभाळणं बाईचंच काम आहे, हे तिच्याही मनावर बिंबलेलं आहे, तरीही कधी कधी मुला-नवर्‍याकडून मदतीची मागणी करणारी, कधी रागवत तर कधी हसत हसत. बाईला तडजोड कुठे करायची हे माहीत असतं. ती करतेही, पण म्हणूनच घरातल्यांना मला मदत करा, असं ठामपणे ती सांगूही लागली आहे. हा ठामपणा तिला मिळतो तो तिच्या कामातून, आर्थिक स्वातंत्र्यातून. हे ऐकताना लक्षात येतं ही तर आजच्या बदलत्या, आधुनिक स्त्रीची गोष्ट. अर्थात त्या दृष्टीने ती सुदैवी. कारण तिचं निदान घरी ऐकलं तरी जातं, पण अंजुम आणि नाझनीज तेवढ्या नशीबवान नाहीत.  ‘बाईच्या जाती’चं दु:ख त्यांनी सहन केलंय, तेही प्रचंड काळ. दोघींचे नवरे त्रास देणारे. दिसायला अत्यंत सुंदर आणि आत्मविश्वासाने वावरणारी नाझनीन आता मोकळा श्वास घेते आहे, पण… ती म्हणते, ‘‘रोज रोज मारहाण, भांडणं, वस्तीतल्या लोकांसमोर तमाशे. स्वत: कमवा, घरचं सगळं करा आणि मारही स्वत:च खा, कुणी सांगितलंय? अनेकदा जेवायला काही नसायचं घरात. बाळाला दुधाची रिकामी बाटली चोखायला द्यायची मी, कधी काळा चहा बाटलीत भरून द्यायची, असे दिवस काढले, पण शेवटी घराबाहेर पडलेच,’’ हे म्हणताना इतका वेळ धिराने बोलणारी नाझनीन कोसळतेच. सांगते, ‘‘नको वाटतं तेच तेच दु:ख आठवायला आणि बोलायलाही, पण आजही सगळी दु:खं संपलेली नाहीत, बाहेरसुद्धा लढाया आहेतच, किस किससे लढू? थक गयी हू अब।’’ तिचं ऐकताना आपल्यासमोर त्या असंख्य ्त्रिरया उभ्या राहतात. ज्यांनी स्वत:चा संसार म्हणून सासरी पाय ठेवला, पण त्यांना फक्त मारहाण, अपमानच सहन करावा लागला… म्हणूनच नाझनीनची गोष्ट तिची एकटीची राहत नाही, ती अशा असंख्य स्त्रियांची होते. ‘कोरो’ ची पूर्णवेळ कार्यकर्ती असणार्‍या अंजुमच्याही घरात तीच समस्या होती. सलग सात वर्षं नवर्‍याची मारहाण, भांडणं यात काढल्यावर तीही बाहेर पडली. आज ती फोटोग्राफी करते. ती सांगते, ‘‘आमच्या घरीसुद्धा कॅमेरा होता, पण आम्हाला कधी हातही लावायला मिळाला नाही. आज मी फोटोग्राफी करते, पण नुसतेच फोटो नाही काढत, ज्याच्या काढायचा असतो त्याचा विचार करते, का काढायचा आहे मला हा फोटो? असं मी स्वत:लाच विचारत त्याच्या मागचा अर्थ शोधायचा प्रयत्न करते, मग छान येतात फोटो.’’ काय विलक्षण करामत आहे ना ही? आयुष्यातले सगळे गम, दु:ख विसरायला तिला कॅमेरा मिळाला आणि फोटोमागचा अर्थ शोधण्याचं फोटोग्राफीचं तत्त्व कुणीही न शिकवताही अंजुमला कळलं. एकदा तुम्ही ठरवलं की अपमान सहन करत नाही जगायचं की, तुम्हाला मार्ग सापडतोच… याच जगण्यातून तिची गोष्ट एका मानिनीची होऊन जाते.

जीम आणि संसार सांभाळणारी गौरी राणे म्हणते, मी लग्नापूर्वी बाबांची लाडली होते. अगदी राजासारखं आयुष्य होतं, पण बाबा गेले आणि संपलं सगळं. लग्नानंतर राजवाड्यातून झोपडपट्टीत आले जणू अशी अवस्था. खूप काही स्वप्नं होती आयुष्याबद्दची, पण विरूनच गेली. पण जगत गेले, आला दिवस साजरा करत गेले, हेच आयुष्य. तिच्यासारखीच स्वयंपाकाची कामं करणारी कविता घुगे, संविधानाला मानणारी, ते घरात ठेवणारी, बोलायला वागायला मोकळीढाकळी. ती सहज सांगून जाते, ‘‘मला नटायला, मेकअप करायला आवडतं, आणि खूप हसायलाही, पण सगळे ओरडतात, किती मोठ्याने हसतेस? सारखं सारखं ते ऐकून आता हसणंच कमी झालंय, पण थांबलं नाही,’’ हेही ते मोठ्याने हसतच सांगते. हेही एक आयुष्यच.

तर दुसरं ‘कोरो’ची पूर्णवेळ कार्यकर्ती असणार्‍या रोहिणीचं. लहानपणी मुलग्यांबरोबरच क्रिकेट खेळणारी, खेळ हेच आयुष्य मानणारी रोहिणी कदम. ती सांगते, ‘‘मी वयात आले नि हळूहळू मला खेळाचे दरवाजे बंद झाले, पण आजही मला खेळ उत्साहित करतो.’’ या लघुपटात चित्रित झालेला तिचा एक गमतीशीर प्रसंग नक्कीच सांगायला हवा. कब्बडी सामने खेळण्यासाठी ती क्रीडांगणाची परवानगी घ्यायला अग्निशमन दलाच्या एकाला फोन करते. ती त्याला सांगते, ‘‘आमची परवानगी घेऊन झाली आहे, फक्त तुमचं ‘एनओसी’ हवं आहे.’’ तेव्हा तो तिला सांगतो, ‘‘हे क्रीडांगण धार्मिक कार्यक्रमांना मोफत आहे. तुम्हाला पैसे भरावे लागतील.’’ त्यावर सणकून, पण आवाज शांत ठेवत ती सांगते, ‘‘अहो मैदानात खेळायला खरं तर परवानगी मागायलाच नको ना? आणि पैशांचं म्हणाल तर आम्हीसुद्धा मैदानात पूजा ठेवतो आणि खेळतो. चालेल का?’’ तिच्या या प्रश्नावर काय बोलणार होता तो?

या सगळ्यांचीच कौटुंबिक स्थिती आर्थिकदृष्ट्या मध्यम, पण एकदा तसं जगायची सवय लावून घेतली की, त्यातही समाधान मानायला शिकतो माणूस आणि मग आनंदाच्या वेगळ्या वाटा सापडत जातातच. जसं या ‘मस्त महिला मंडळी’ला कब्बडीचीही एक वाट सापडली. गौरी आणि रोहिणीने सगळ्यांना शारीरिकदृष्ट्या तयार केलंच, पण त्या आधी मानसिकदृष्ट्या तयार करणं गरजेचं होतं. आता कशाला? आता थोडंच खेळायला जमणार आहे? लोक काय म्हणतील? अशासारख्या प्रश्नांना उत्तर होतं, हा तुमचा वेळ आहे. स्वत:साठीचा. तुम्हाला खेळायचं आहे ना? मग तयारी करा आणि मैदानात उतरा. अखेर दर्शना ते मान्य करत म्हणते, ‘‘खरंच आपल्यासाठी आपण वेळ काढायलाच हवा.’’ सगळ्या जणींचा जणू तो जाहीरनामा होतो. आणि कब्बडीचा सामना रंगतो. इथं कोण जिंकणार, कोण हरणार, याचा विचारच नव्हता. वयाच्या तिशीनंतर पंजाबी ड्रेस, जीन्स घालून मोकळ्या हवेत, मैदानात ‘कब्बडी कब्बडी’ म्हणत प्रतिस्पध्र्याला शह द्यायचा आणि नंतर तिला आनंदानं मिठीही मारायची, हेच तर खरं ‘स्पोर्टिंग स्पिरीट’. या सगळ्यांमधली हीच खिलाडू वृत्ती संपूर्ण माहितीपटभर फिरत राहते. पुन्हा कब्बडी खेळायला आता कुणी नाही म्हणणार नाही याची साक्ष पटते. प्रत्येकीचं जगणं चालू आहे. ते चालूच राहणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्या आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीआयएसएस) येथील ‘स्कूल ऑफ मीडिया अँड कल्चरल स्टडीज’च्या प्राध्यापिका, आणि या चित्रपटाच्या सह-दिग्दर्शिका, संपादक डॉ. शिल्पी गुलाटी, यांचं मार्गदर्शन आणि ‘कोरो’ची निर्मिती असलेला हा माहितीपट तयार करायच्या निमित्ताने या दहाही जणींच्या आयुष्यात काही काळासाठी का होईना एक असा थांबा आला जो त्यांना आयुष्यातली श्रेयस आणि प्रेयस गोष्ट शिकवून गेला.

आता त्यांचं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नव्हतं… मोबाइल फोनवर हा लघुपट चित्रित करताना ‘व्हिडीओसाठी कोणतं बटण दाबायचं? या प्रश्नाने सुरू झालेला या लघुपटाचा प्रवास रेहनाचं दुबईला नोकरीसाठी निघण्याने पूर्ण होत असला तरी तिचीही गोष्ट अजून संपलेली नाही. त्याला वेगळं वळण मिळालं इतकंच. तशी कोणाचीही गोष्ट ती व्यक्ती हयात असेपर्यंत पूर्ण होत नसतेच… आयुष्य चालूच राहतं, आपण आपल्या परीनं त्यात रंग भरत जायचं… मग त्या गोष्टीला अर्थ मिळतोच…आणि अखेर ती पूर्णत्वाला पोहोचतेच.

arati.kadam@expressindia.com