scorecardresearch

पाहायलाच हवेत : स्त्रीशोषणाचं पूर्ण ‘वर्तुळ’

एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीत जाता जाता इराणी स्त्रियांवर वेगवेगळय़ा स्तरांवर घातल्या गेलेल्या मर्यादांचं, त्यामुळे होणाऱ्या शोषणाचं वर्तुळ पूर्ण करतो.

the circle film
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मीना कर्णिक

जाफर पनाही या इराणी दिग्दर्शकाचा ‘द सर्कल’ हा चित्रपट कुणा एका बाईची गोष्ट सांगत नाही. एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीत जाता जाता इराणी स्त्रियांवर वेगवेगळय़ा स्तरांवर घातल्या गेलेल्या मर्यादांचं, त्यामुळे होणाऱ्या शोषणाचं वर्तुळ पूर्ण करतो. आणि लक्षात येतं, की केवळ इराणीच नाही, तर जगातल्या प्रत्येक पुरुषप्रधान व्यवस्थेतल्या बायकांचे चेहरे या वर्तुळात सामावले आहेत..

बायका.. पाठमोऱ्या. बिनचेहऱ्याच्या. बिननावाच्या. जाफर पनाही या इराणी दिग्दर्शकाच्या ‘द सर्कल’ या चित्रपटातल्या या बायका. या सिनेमाचं मूळ नाव ‘दायरे’.  दायरा म्हणजे मर्यादा किंवा ‘औकात’. बायकांसाठी सर्रास वापरला जाणारा शब्द. पनाहींच्या या सिनेमातल्या बायकांना चपखल बसणारा.

ही कुणा एका बाईची गोष्ट नाही. पण ती सुरू होते एका मुलीच्या जन्मानं. टायटल्स आपल्याला पडद्यावर दिसू लागतात तेव्हा पार्श्वभूमीला एका बाळंतिणीच्या कळा ऐकू येत असतात. टायटल्स संपतात तेव्हा बाळाचं रडणं ऐकू येतं आणि हॉस्पिटलच्या मॅटर्निटी वॉर्डमधली छोटीशी खिडकी उघडून एक नर्स ‘सोलमाझ गोलामी’चं नाव पुकारते. सोलमाझची म्हातारी आई, आपल्याला ती पाठमोरी दिसतेय, लगबगीनं खिडकीपाशी येते. ‘‘मुलगी झालीये. गोड आहे. बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत,’’ नर्स सांगते आणि खिडकी बंद करते. अजूनही आपल्याला आईची पाठच दिसतेय. पण तिचा उडालेला गोंधळ तरीही जाणवतोय. ती पुन्हा खिडकीवर टकटक करते. खिडकी उघडणाऱ्या दुसऱ्या नर्सला विचारते, ‘‘माझ्या मुलीला बाळ झालंय, पण काय ते मला सांगितलं नाही.’’ उत्तरामध्ये अर्थातच बदल होत नाही. ‘‘सोनोग्राफी केली तेव्हा तर मुलगा होणार सांगितलं होतं. आता काय करायचं? तिच्या घरच्यांना मुलगा हवा होता. म्हणजे ते तिला घटस्फोट देणार..’’ आता कॅमेऱ्याकडे तिचा चेहरा वळतो आणि त्या चेहऱ्यावरची काळजी आपल्याला दिसते. त्याच चिंतेत ती हॉस्पिटलच्या पायऱ्या उतरू लागते. हॉस्पिटलबाहेरील रस्त्यावर दिसतात तीन तरुण मुली. आरेझू, नरगेस आणि तिसरीचं तर नावही आपल्याला सांगितलं जात नाही. त्यांच्या बोलण्यावरून त्या तिघीही नुकत्याच तात्पुरत्या पासवर तुरुंगातून बाहेर आल्यात एवढं कळतं, पण नक्की कोणत्या गुन्ह्यासाठी  ते समजत नाही. बसच्या तिकिटासाठी पैसे पाहिजेत म्हणून बिननावाची ती मुलगी गळय़ातली चेन विकू पाहते आणि पोलिसांच्या तावडीत सापडते. यातली नरगेस अधिक तरुण आहे, स्वप्नाळू आहे. तिला दूर, आपल्या गावी परतायचंय. तिथला निसर्ग आणि आपला मित्र यांच्या सान्निध्यात आयुष्य आनंदात जाईल असा विश्वास तिला आहे. आरेझू वयानं मोठी आहे, वास्तवाची जाण असणारी आहे. आपण दोघी इथून निसटणं कठीण आहे हे लक्षात आल्यावर निदान नरगेसला तरी पळता यायला हवं म्हणून आरेझू पैशाची सोय करायचा प्रयत्न करते आणि यशस्वीही होते. आरेझू कुणा पुरुषाला भेटायला गेलेली आपल्याला दिसते आणि नंतर थेट पैसे घेऊन बाहेर पडताना. तिनं कोणत्या मार्गानं हे पैसे मिळवले आहेत याचा निर्णय पनाही आणि पटकथाकार काम्बोझिया पार्तोवी यांनी प्रेक्षकांवर सोडलाय. कॅमेरा आता नरगेसची गोष्ट सांगू लागलाय. पुरुष सोबत नसलेल्या एकटय़ा मुलीला तिकीट काढताना किती प्रश्नांना सामोरं जावं लागतं हे दाखवतोय. तिकीट मिळालं तरी प्रत्यक्ष बसमध्ये चढणं कसं अशक्य आहे हे सांगतोय. घाबरलेली नरगेस पुन्हा तेहरानमध्ये परतते. आता मदतीसाठी ती आपल्या तुरुंगात भेटलेल्या आणखी एका मैत्रिणीचा, परीचा शोध घेऊ पाहते.

 नरगेस परीच्या घरी पोहोचते, पण परीचे वडील तिला हाकलून देतात. ती कुठे जाते हे आपल्याला कळत नाही. कारण आपण परीची गोष्ट पाहायला लागलेले असतो. परीचे मोठे भाऊ घरी येतात आणि बहिणीनं कुटुंबाच्या इभ्रतीला कलंक लावला म्हणून तिला मारू लागतात. ही मारहाणसुद्धा दिग्दर्शक दाखवत नाही. परीच्या घराचा बंद दरवाजा आपण पाहात राहतो आणि आतून येणारे आवाज ऐकत राहतो. घरातून हाकलून लावलेली परी टॅक्सीत बसते. ती तुरुंगात असताना गरोदर राहिली आहे आणि तिला गर्भपात करून घ्यायचा आहे. मैत्रिणींकडून काही मदत होईल का, यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. एव्हाना उन्हं उतरू लागलीयेत. दोन मैत्रिणींकडून मदतीसाठी नन्नाचा पाढा ऐकलेली परी रस्त्यावर एकटीच फिरतेय. सोबत पुरुष नसल्यानं आणि आयडी कार्ड नसल्यानं ती हॉटेलमध्ये एखादी खोलीही घेऊ शकत नाही. परीला या प्रवासात भेटते एक आई. आपल्या सहा-सात वर्षांच्या मुलीला तिनं छानसा फ्रॉक घातलाय, तिच्या हातात बाहुली आहे. थोडय़ाच वेळात परीच्या आणि आपल्याही लक्षात येतं, की ही आई मुलीला रस्त्यावर सोडून निघून जाण्याचा प्रयत्न करतेय. कुणा चांगल्या कुटुंबानं किंवा अगदी पोलिसांनी तिला आसरा द्यावा अशी प्रार्थना करतेय.

मग आपला प्रवास सुरू होतो या आईबरोबर. मुलीला टाकून निघालेल्या आईला एक पुरुष गाडीतून लिफ्ट देऊ करतो आणि तिला वेश्या समजून पोलीस अटक करतात. इथे आपण आणखी एका बाईला भेटतो. ती वेश्या व्यवसाय करणारी आहे. पोलीस तिला पकडून तुरुंगात नेतात. ती भिंतीपाशी उभी राहून सिगारेट शिलगावते. बाहेर वाजणारा फोन आपल्याला ऐकू येऊ लागतो. तुरुंगाच्या भिंतीवर असलेली छोटी खिडकी उघडून बाहेरचा गार्ड आत डोकावून विचारतो, ‘इथे कुणी सोलमाझ गोलामी आहे का?’  कॅमेरा त्या खोलीतल्या इतर महिला कैद्यांवरून फिरत पुन्हा गार्डपाशी येतो. आतापर्यंत आपल्याला भेटलेल्या बहुतेक बायकांचे चेहरे तेवढय़ा काही सेकंदांमध्ये आपल्या नजरेला पडतात. बाहेर ढगांचा गडगडाट सुरू झालाय. रात्रीचा काळोख या सगळय़ा वातावरणाला अधिकच गडदपणा आणतोय. या बायकांच्या आयुष्यात आलेलं अंधारलेपण अधोरेखित करणारा.

 ‘‘सोलमाझ गोलामी बहुदा दुसऱ्या सेलमध्ये असावी..’’ गार्डच्या उत्तरावर ती छोटीशी खिडकी बंद होते आणि सिनेमा संपतो. एका दिवसात एक सर्कल, वर्तुळ, पूर्ण करून.

    या सिनेमाची गोष्ट इतक्या सविस्तरपणे सांगणं आवश्यक वाटलं, कारण इथे कुणी एक नायिका नाही. अनेक बायकांच्या आयुष्यात आपण थोडंथोडं डोकावतो आणि सगळय़ांचं मिळून निर्माण झालेल्या एका शोषित जगाचा अनुभव घेतो. पण केवळ तेवढंच नाही. यातली प्रत्येक बाई तिच्यावर असलेल्या बंधनांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतेय. ती पराभूत नाही. समाजासमोर, पुरुषप्रधान समाजासमोर, आपला निभाव लागणं कठीण आहे याची जाणीव तिला आहे. मुलीला रस्त्यावर सोडून देणारी आई मनावर दगड ठेवून मुलीच्या भवितव्याचा विचार करतेय. आपण नाही, तर निदान नरगेसला तरी तिच्या स्वप्नातल्या घरी जायला मिळावं म्हणून आपल्या शरीराचा वापर करून पैसे मिळवणारी आरेझू परिस्थितीला शरण जाणारी म्हणावी की कणखर?

जाफर पनाही यांचा हा तिसरा सिनेमा. पहिल्या दोन सिनेमांमध्ये (द व्हाईट बलून- १९९५ आणि द मिरर- १९९७) त्यांनी दोन लहान मुलींच्या गोष्टी सांगितल्या. पण इतर इराणी दिग्दर्शकांप्रमाणे त्या केवळ गोड गोड नव्हत्या. मात्र २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या या सिनेमानं एक निराळीच उंची गाठल्याचं लक्षात येतं. पनाहींच्या सिनेमांची, अगदी २०२२ मध्ये आलेल्या ‘नो बेअर्स’पर्यंत सगळय़ा सिनेमांची काही ठळक वैशिष्टय़ं आहेत. ते पार्श्वसंगीताचा शून्य वापर करतात. जे काही ध्वनी आपण ऐकतो ते सगळे आजुबाजूला घडणाऱ्या घटनांमधून निर्माण झालेले असतात. रस्त्यावरचं ट्रॅफिक, जोरजोरानं वाजणारे हॉर्न, गर्दीचे आवाज.. गोष्टीला अधिक अर्थ प्राप्त करून देणारा हा कोलाहल कोणत्याही कृत्रिम संगीतापेक्षा खूप जास्त परिणामकारक वाटतो. त्यांचा सिनेमा म्हणजे रोजच्या जगण्याचं, रोजच्या आयुष्याचं केलेलं ‘डॉक्युमेंटेशन’ असतं असं म्हटलं जातं ते उगीच नाही. कॅमेऱ्याचे अँगल्स, आधुनिक तंत्र यापैकी कुठल्याही गोष्टीकडे सिनेमा पाहताना आपलं लक्ष जात नाही, कारण ते महत्त्वाचं नसतंच. मुळात पनाही कोणत्याही क्लृप्त्या वापरत नाहीत. आपली गोष्ट ते अगदी ‘मॅटर ऑफ फॅक्ट’ पद्धतीनं सांगतात. एखादा हलकाफुलका प्रसंग पाहतानाही तो ‘रिलीफ’ म्हणून आणलाय असा विचार मनात येत नाही. ‘द सर्कल’ मध्येच, नरगेस रस्त्यावर ठेवलेली चित्रं पाहत असताना एक पुरुष तिच्या बाजूला येऊन उभा राहतो. समोर माठात ठेवलेल्या पाण्यात चेननं बांधलेला पेला बुडवतो आणि तोंड न लावता पाणी पिऊ लागतो. ते त्याच्या उंची सुटावर सांडतं आणि नरगेसला खुदकन हसू येतं. आपल्यालाही येतं.  सरकारच्या जाचक नियम-अटींविषयी पनाही जाणीवपूर्वक काहीच भाष्य करत नाहीत. पण जे सांगायचंय ते इतक्या ठामपणे मांडतात, की आपण दचकून जागं व्हावं.

या सिनेमात खूप बायकांना आपण भेटतो. पण या प्रत्येकीची व्यक्तिरेखा आपल्या मनात ठसठशीतपणे कोरली जाते. आरेझूूचं आक्रमक असणं, रस्त्यात छेड काढणाऱ्या पुरुषाचा शर्ट पकडणं, ‘सिगारेट ओढायची असेल तर दुकानात नको, बाहेर जाऊन ओढ’ असं दुकानदारानं सांगितल्यावर चिडचिड करणं, हे सगळं पाहताना आपल्याला इराणमध्ये स्त्रियांवर लादलेल्या बंधनांची जाणीव होते.

पण हे फक्त इराणमध्येच आहे असं तरी कसं म्हणावं? थोडय़ाफार फरकानं आपल्यासकट प्रत्येक पुरुषप्रधान समाजामध्ये हेच तर दिसत असतं. त्यामुळे आपल्या देशाची गोष्ट सांगता सांगता पनाही सगळय़ाच बायकांची व्यथा मांडू लागतात. मात्र, कुठल्याही बाईची गोष्ट दिग्दर्शक आपल्याला अथपासून इतिपर्यंत सांगत नाहीत. ते एका बाईपासून सुरुवात करतात, मग मध्येच तिला सोडून दुसऱ्याच बाईच्या आयुष्यात डोकावतात, तिचीही गोष्ट आपल्याला पूर्णपणे न सांगता तिसऱ्याच बाईविषयी बोलू लागतात. आरेझू असेल किंवा नरगेस किंवा परी, या तिघी तुरुंगातून सुटलेल्या आहेत हे आपल्याला समजतं. पण त्या कशासाठी तुरुंगात गेल्या होत्या ते कळत नाही. एका बाईला सोडून आपण दुसरीची गोष्ट पाहू लागतो तेव्हा त्या आधीच्या बाईचं काय झालं ते दिसत नाही. अपवाद अगदी शेवटच्या फ्रेमचा.

या सिनेमाविषयी बोलताना एके ठिकाणी पनाही म्हणाले होते, ‘‘एक दिवस वर्तमानपत्रात मी एक छोटीशी बातमी वाचली. ‘आपल्या दोन तरुण मुलींना ठार मारून महिलेची आत्महत्या’. या गुन्ह्यामागची किंवा आत्महत्त्येमागची कारणं बातमीमध्ये दिलेलीच नव्हती. कदाचित त्या वर्तमानपत्राला त्याची गरज वाटली नसेल. बहुतांश समाजांमध्ये बाईचं सर्वाधिक शोषण होत असतं. त्यांना मिळणारं स्वातंत्र्य मर्यादित असतं. जणू काही त्या एका भल्या मोठय़ा तुरुंगात आहेत. एका वर्तुळातल्या प्रत्येक बाईची जागा दुसरी कुणीही बाई घेऊ शकते.’’  इराणसारख्या देशात पनाहींचा हा सिनेमा प्रदर्शित होणं शक्यच नव्हतं. पण पनाहींनी काही सिनेमे बनवणं थांबवलं नाही की देश सोडून दिला नाही. सरकारच्या सेन्सॉरशिपला तोंड देत ते आपल्याला हवा तो सिनेमा बनवत गेले, आजही बनवताहेत. त्यासाठी त्यांनी खूप मोठी किंमत मोजलेली आहे, अजूनही मोजताहेत. त्यांचे सिनेमे स्मगल करून देशाबाहेर पाठवले जातात. ते देशद्रोही असल्याचा सरकारचा आरोप आहे. आधी ते घरच्या घरी नजरकैदेत होते. तिथेही त्यांनी सिनेमे बनवले. २०२२ च्या ऑगस्ट महिन्यात सरकारनं त्यांना सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. पण त्यांनी तिथे उपोषण केलं, आंतरराष्ट्रीय दबाव आला आणि अलीकडेच जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. ‘माझ्या देशात घडणाऱ्या अनेक गोष्टी मला मान्य नाहीत, एक कलाकार म्हणून त्या लोकांसमोर आणणं मला आवश्यक वाटतं. मी ते करतो, कारण माझा सरकारी नियमांना, अटींना, कायद्यांना विरोध असला, तरी माझ्या देशावर माझं निस्सीम प्रेम आहे,’ हे पनाहींचं आयुष्याचं तत्त्वज्ञान असावं. ‘द सर्कल’ अधिक गंभीरपणे हेच सांगतो. मोकळा श्वास घेण्याची बायकांची धडपड दाखवताना, पुरुषी मनोवृत्तीवर नेमकं बोट ठेवतो. त्यामुळे हा सिनेमा केवळ इराणमधल्या बायकांचा राहात नाही, तो वैश्विक बनतो. ही ताकद केवळ महान दिग्दर्शकांमध्येच असते.

(‘द सर्कल’चा ट्रेलर  https://www.youtube.com/watch?v=M6FahWs_ctg या लिंकवर पाहता येईल. यूटय़ूबवर हा संपूर्ण सिनेमा अपलोड केलेला आहे. तसंच ‘मुबी’ (MUBI) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या जाफर पनाहींचे जवळपास सगळे सिनेमे उपलब्ध आहेत.) 

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 00:05 IST