विनोद द मुळे

‘ती बड्या घरची, मी सामान्य! तरी तिची माझ्याविषयीची आपुलकी, तिला असलेली सहानुभूती पुरेपूर जाणवायची. मी अल्लड वयानुसार हिंदी चित्रपटांप्रमाणे तिच्या मैत्रीत वेगळं परिमाण शोधण्याचा प्रयत्न केला… पण ती निखळ मैत्रीवर ठाम होती. माझ्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्याची ती साक्षीदार होती… आणि आता आठवणींतही कायम राहील!’

loksatta chaturang girl friend creative rival
माझी मैत्रीण : ‘Y’ची मैत्रीण ‘X’!
Marriage, Marriage Insights, Partner Selection, Relationship Dynamics, chaturang article,
इतिश्री : जोडीदाराची निवड…
Diet for conscious living
जिंकावे नि जागावेही: ‘सजग’ जगण्यासाठी आहार!
chaturang article, children first bike, children desire for bike in age of 16, Valuable Lesson in Gratitude, electric scooter, new generation, Changing Dynamics of Childhood Desires,
सांदीत सापडलेले.. ! वाढदिवस
loksatta chaturang International Widows Day Elderly Women Support Divorcees
एकमेकींच्या आधाराचा पूल
toxins, spices , news,
विषद्रव्यांचा हिमनग..
Loksatta chaturang Vijay Tendulkar mitrachi goshta Writer poet Alok Menon lesbian
‘ती’च्या भोवती..!: ‘ठरलेल्या’ जगण्याला आव्हान देणारी ‘मित्रा’!
Loksatta Chaturang Sad loneliness counselling Siddhartha Gautam Buddha
एका मनात होती: शोकाकुल एकटेपणा

ही १९७३ मधली, म्हणजेच तब्बल पन्नास वर्षांपूर्वीची घटना आहे. हायर सेकंडरी बोर्डाच्या (अकरावी) परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर (त्या वेळी आजच्यासारखी दहावी- बारावी बोर्डाची परीक्षा नसायची!) मी कला शाखेत पहिल्या वर्षात प्रवेश घेतला. तासाला सुरुवात झाली नव्हती, पण सर्व विद्यार्थी-अर्थातच मुलं आणि मुली दोघंही आपापल्या जागी बसले होते. आतापर्यंतचं माझं सर्व शिक्षण मुलग्यांच्या शाळेत झाल्यामुळे आता सुरू होणाऱ्या सहशिक्षणाचं टेन्शन डोक्यावर घेऊनच मी मांजरीच्या पावलांनी दबकत-दबकत वर्गात शिरलो. तोच अगदी पहिल्याच बाकावर बसलेल्या तिनं निरागसपणे टाळ्या वाजवून ‘‘या, स्वागत आहे!… आईये, स्वागत हैं!… वेलकम!’’ असं तिन्ही भाषेत माझं स्वागत केलं! अर्थातच तिच्यापाठोपाठ सर्वांनी तिचं अनुकरण केलं. मी भांबावून गेलो अन् ओशाळलोही. ही माझी आणि तिची पहिली ओळख!

जसजसा परिचय होत गेला, तसतसं तिच्याबद्दल कळू लागलं. ती आमच्याच शहरातल्या एका बड्या असामीची एकुलती एक मुलगी होती. पण असं तिच्या वागण्यावरून मलाच काय, इतर कुणालाही कधीच जाणवलं नाही. अगदी ‘डाऊन-टू-अर्थ’ म्हणतात तशी होती ती. माझी स्थिती मात्र तिच्याहून अगदी टोकाची-‘साऊथ पोल’ होती. माझे वडील गिरणी कामगार होते. चार भावंडांत मी सर्वांत मोठा. इंदोरच्या कामगार वस्तीत आम्ही सर्व एका खोलीत भाड्यानं राहात होतो. तिला मात्र याच्याशी काहीच घेणंदेणं नव्हतं. तिचं वागणं माझ्याशी अगदी निखळ मित्रत्वाचं असायचं. जसा काळ लोटत गेला, आमच्या मैत्रीची वीण अधिकच घट्ट होत गेली. तिच्या वागण्यावरून मला हमखास जाणवायचं, की तिच्या मनात माझ्याबद्दल आणि माझ्या कौटुंबिक स्थितीबद्दल एक वेगळीच सहानुभूती आहे.

आणखी वाचा-महागडी पुस्तके आपण मुलांच्या हाती केव्हा देणार?

एकदा मी सहज तिच्या घरी गेलो होतो. त्या काळातही एखाद्या फार्म हाऊससारखं घर होतं तिचं. आमची कॉलेजची नवी नवी मैत्री असल्यामुळे आम्ही एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मी तिला म्हणालो, ‘‘मी नं, जरा ‘मेलंकली’(melancholy) स्वभावाचा आहे!’’ माझ्या या वाक्यावर ती खळखळून हसली, अगदी एखाद्या धबधब्याप्रमाणे. मला ते जाणवल्याशिवाय राहिलं नाही. माझी चूक पटकन लक्षात आली. इंग्रजी साहित्याच्या वर्गात शेले आणि किट्ससारख्या कवींचा अभ्यास करतेवेळी माझ्या वाचनात ‘मेलंकली’ हा शब्द आला होता. त्याचा अर्थ विषाद किंवा खिन्नता असा होतो. नवीन शिकलेला शब्द उगाच कुठेही वापरण्याची ऊर्मी मला झाली! त्या शब्दावरच ती बहुधा हसत होती, मी ते विचारण्याइतपत मोकळेपणा तोवर आला नव्हता.

माझ्याबद्दल तिच्या मनात असलेली आपुलकीची भावना दर्शवणारी अशीच आणखी एक आठवण. आमची मैत्री झाल्यानंतरची पहिलीच दिवाळी होती. माझ्या घरी मी फटाके उडवत होतो. शोभेचा अनार हातात धरून उडवत असताना तो अचानक फुटला अन् माझा उजवा हात मनगटापर्यंत चांगलाच भाजला. रात्रभर मला झोप आली नाही. सारखा तळमळत होतो. सकाळी केव्हा डोळा लागला कळलंच नाही. जेव्हा जागा झालो तेव्हा आई म्हणाली, ‘‘अरे विनोद, तुझ्या वर्गातली दीपा आली होती तुला बघायला. मी तुला काही उठवलं नाही.’’ मला कोडंच वाटलं, न कळवता कधीच न येणारी ती अशी अचानक घरी कशी आली? कसं कळलं असेल तिला? मात्र माझ्याबद्दल तिचा जिव्हाळा बघून मी मनोमनी सुखावलो. पण ती येऊन गेल्याचा मला आनंद कमी आणि ओशाळल्यासारखंच जास्त झालं. आमचं ते लहानसं घर, तो पसारा. काय वाटलं असेल तिला? असं वाटून गेलंच.

हिंदी ‘फॉर्म्युला’ चित्रपटांत कधी कधी बघायला मिळतं, तसं मी तिच्या मित्रत्वात वेगळंच परिमाण शोधायचो. पण लवकरच लक्षात आलं, की हा माझा फक्त भ्रमच होता. प्रेम आणि त्यातून केल्या जाणाऱ्या लग्नाच्या बाबतीत तिचं असणारं परखड मत आमच्या सर्व मित्रांच्या गप्पागोष्टींत नेहमीच व्यक्त व्हायचं. ती नेहमी म्हणत असे, ‘‘गरीब मुलगा आणि श्रीमंत मुलीचं लग्न-बिग्न फक्त चित्रपटात किंवा कथा-कवितांतच होतं. वास्तविक जीवनात असं कधी होत नाही. आणि जर झालंच, तर कुठे ना कुठे त्याच्या मुळाशी तडजोडी असतात, ज्या वरपांगी इतरांना सहजासहजी दिसत नसतात.’’ कदाचित तिनं तसं आजूबाजूला पाहिलेलं असावं. काही अनुभव तुमच्यासाठी सार्वत्रिक सत्य होऊन जातात. पण तिच्या या ठाम विचारांचा माझ्यावर योग्य तो परिणाम झाला. माझ्यासाठी तिची मैत्री इतर कशाहीपेक्षा खूप महत्त्वाची होती. तिनंही ती कायम जपली. तिच्या या निखळ मित्रत्वानं मला आयुष्यभर बरंच काही दिलं. एक-दोन प्रसंग तर अगदी आवर्जून नमूद करावेसे वाटतात.

आणखी वाचा-‘एका’ मनात होती : जोडीदाराशिवायचं एकटेपण!

माझ्या कॉलेजमध्ये मीच एकमेव असा विद्यार्थी होतो, ज्यानं इंग्रजी साहित्य आणि हिंदी साहित्य असे दोन्ही विषय घेतले होते. माझ्या अडचणींकडे दुर्लक्ष करत दोन्ही विषयांचे वर्ग एकाच वेळी घेतले जायचे. त्यामुळे माझा कधी हा वर्ग हुकायचा, तर कधी तो. हे मी आमच्या प्राचार्यांच्या ध्यानी आणलं. पण त्यांनी मला धुडकावून लावलं. ‘‘अब किसी एक के लिये तो हम पूरा टाईमटेबल बदल नहीं सकते ना!’’ माझी ही अडचण जेव्हा तिला समजली, तेव्हा तिनं तिच्या बाबांच्या ओळखीनं आमच्या प्राचार्यांना ते टाईमटेबल बदलायला भाग पाडलं! आज तिच्यामुळेच हे दोन्ही माझा हातखंडा असलेले विषय आहेत. असं म्हणायलाही काहीच हरकत नाही, की माझ्या पुढच्या आयुष्यात मला नोकरीही या विषयांमुळेच लागली.

असाच आणखी एक प्रसंग. एकदा तिनं मला तिच्या घरी जेवायला बोलावलं. आम्ही एका मोठ्या डायनिंग टेबलाभोवती बसलो होतो. तिथला तो थाट बघून मी तर हबकलोच. इतर सर्व जण सर्रास सुरी-काट्यानं (फोर्क आणि नाईफ!) जेवत होते. मला मात्र सुरी कोणत्या हातात घ्यावी आणि काटा कोणत्या हातात, हेच माहीत नव्हतं! तिनं माझी अडचण ओळखली. ती मला अगदी मोकळेपणानं आणि आपुलकीनं म्हणाली, ‘‘अरे, सवय नसेल तर हातानंच खा. इथं कोणी परकं नाहीये.’’ केवढं मोकळं वाटलं म्हणून सांगू. आपली कुचंबणा समजून घेऊन कुणी तरी आपल्याला असं आश्वस्थ करतं तेव्हा किती समाधान मिळतं हे शब्दांत सांगता येत नाही. या घटनेनंतर एक-दोन दिवसांतच माझा वाढदिवस होता. तिनं मला एक उत्तम दर्जाचा सुरी-काट्याचा सेट भेट दिला आणि म्हणाली, ‘‘आता घरी याचा सराव कर! उद्यातू मोठा होशील, तुला उच्चभ्रू माणसांत वावरावं लागेल. तेव्हा कामास येईल.’’ पुढे हेही म्हणाली, ‘‘लवकरच तुला परत माझ्या घरी बोलवीन. विसरू नकोस!’’ आज जेव्हा कधी सुरी-काट्यानं जेवायचा प्रसंग येतो, तेव्हा ती आठवल्याशिवाय राहात नाही.

आम्ही एकाच वर्गात असल्यामुळे एकाच वयोगटातले होतो. पण तिच्या वागण्यात एक परिपक्व समंजसपणा असायचा. तिनं माझ्यातले मेहनतीचे, अभ्यासू वृत्तीचे गुण ओळखले होते आणि तिला माझ्या आर्थिक स्थितीची कल्पना होती. मी जीवनात प्रगती करून माझ्या कुटुंबाची उन्नती करावी, असं तिला वाटत होतं. पण माझ्या संकोची स्वभावाचीही तिला कल्पना होती. ती मला एकदा तिच्या बाबांकडे घेऊन गेली आणि त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. माझा संकोच दूर होऊन मला लोकांशी अधिक प्रभावी संपर्क साधता यावा म्हणून मग वेळोवेळी तिचे बाबा जमेल तसं मला मोठमोठ्या लोकांकडे घेऊन जात.

आणखी वाचा-‘ती’च्या भोवती : किमया तिच्या जिद्दीची!

पुढे आम्ही दोघंही इंग्रजी साहित्यात ‘एम.ए.’ झालो. घरच्या परिस्थितीमुळे मी बँकेत नोकरी करू लागलो. तिनं मात्र त्याच विषयात ‘पीएच.डी.’ केली अन् एका नामांकित कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवू लागली. मग तिथेच विभागाध्यक्षही झाली. यथावकाश आधी माझं लग्न झालं. अर्थात ती अक्षता टाकायला होतीच. नंतर तीही इंदोरच्याच एका उद्याोगपती घराण्याची सून झाली. तेव्हा मी सपत्निक उपस्थित होतो. आम्ही जेव्हा स्टेजवर नवदांपत्यास भेटायला गेलो, तेव्हा इतक्या गर्दीतही तिनं माझी ओळख तिच्या नवऱ्याशी करून दिली. माझ्या मेहनती स्वभावाचं भरभरून कौतुक केलं. तेव्हा तिचा मित्र असल्याचा खरा आनंद झाला.

पुढे माझी आर्थिक स्थिती जशी जशी उंचावत गेली, मी मोठं घर बांधलं आणि आईबाबांना सुखात ठेवण्याचा प्रयत्न केला. भावंडांनाही शिक्षणाच्या चांगल्या संधी दिल्या. माझ्या या उत्तरोत्तर प्रगतीची ती नेहमीच साक्षीदार असायची, त्याचं मोल मोठं होतं.

ती इंदोरलाच स्थायिक झाली होती, मी मात्र नोकरीच्या निमित्तानं गावोगावी हिंडत होतो. पण आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतोच. काळाचा प्रवाह पुढे पुढे लोटत होता. एकदा अचानक तिला कर्करोग झाल्याची बातमी मला कळली. जेव्हा कधी इंदोरला यायचो, तेव्हा तिला भेटल्याशिवाय जात नसे. प्रत्येक भेटीत तिची प्रकृती खालवतेय हे जाणवायचं. तिचं शरीर कृश होत गेलं, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं दाट होत गेली आणि केमोथेरपीमुळे तिचे काळेभोर दाट केस गळू लागले. तिच्या शेवटच्या दिवसांत एकदा तिला भेटायला गेलो होतो. तिच्या नवऱ्यासमोरच मला ती हिंदीत म्हणाली, ‘‘विनोद, अब बर्दाश्त नहीं होता। लगता हैं, अब मैं ज्यादा नहीं बचूंगी।’’ तिचं हे बोलणं ऐकून हृदय गलबलून गेलं. आणि एके दिवशी अपेक्षित असलेली तिच्या निधनाची वार्ता कानी आलीच. त्या क्षणी मला आमची मैत्री घट्ट होण्यामागचे सारे प्रसंग आठवत राहिले. आठवलं, कॉलेजच्या पहिल्या दिवशी ते तिचं टाळ्या वाजवून माझं स्वागत करणं, माझं टाईमटेबल बदलण्याकरिता खास तिच्या बाबांकडे केलेली शिफारस आणि तिची ती खास सुरी-काट्याची भेट!

आज तिला जाऊन दोन-तीन वर्षं लोटली. पण जीवनाच्या या धबडग्यात ती केव्हाही, कुठेही अन् कधीही डोळ्यांसमोर उभी ठाकते. अशा वेळी एक विचार हमखास मनात येतो. तिनं मला बरंच काही दिलं- अप्रत्यक्षरीत्या मला या जीवनात पाय रोवून उभं राहण्याचं बळ दिलं, आत्मविश्वास दिला आणि सर्वांत शेवटी, पण सर्वांत महत्त्वपूर्ण म्हणजे निखळ मैत्री अनुभवण्याची स्वर्गिक संधी दिली. पण याबदल्यात मी तिला काय दिलं? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर, काहीच नाही. खरंच, काहीच नाही. कारण माझ्यासारख्या अकिंचनाकडे देण्याजोगं होतंच काय? माझ्याच जीवनाची वाटचाल मुळी शून्यातून सुरू झाली होती. पण तिच्या सोबत असण्यानं मी मार्गस्थझालो. आयुष्यात यशस्वी झालो.

vinoddmuley@gmail.com