एकल वृद्ध स्त्रियांचे प्रश्न बऱ्याच अंशी समान आहेत; मग त्या विधवा असोत, की इतर कोणत्याही कारणानं एकट्या असोत. परंतु सामाजिक भांडवलाची ‘त्रिसूत्री’ हे प्रश्न सोडवायला उपयुक्त ठरू शकते. आजच्या विभक्त जगात एकमेकींचा आधार होणं, एकल वृद्धत्व आनंदानं घालवणं स्त्रियांना नक्की शक्य आहे. २३ जूनच्या (रविवार) ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिना’च्या निमित्तानं

वैधव्यामुळे किंवा इतर विविध कारणांमुळे एकल असलेल्या स्त्रिया हा एक लक्षणीय संख्या असूनही दुर्लक्षित राहिलेला घटक आहे. २३ जून हा ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिवस’ म्हणून पाळला जातो. गेली अनेक वर्षं संयुक्त राष्ट्रांतर्फे वेगवेगळे दिवस साजरे केले जातात, पण ‘विधवा’ या घटकाकडे त्यांचंही लक्ष जायला २०११ साल उजाडावं लागलं.

सांधा बदलताना: वैष्णव जन…
why after marriage while living in family many things in nature of partner start to change
इतिश्री: लग्नानंतर घडतंय बिघडतंय कशामुळे?
how to deal with loneliness and how to help yourself
‘एका’ मनात होती..!: माझीच मदत मला!
Loksatta chaturang Vijay Tendulkar mitrachi goshta Writer poet Alok Menon lesbian
‘ती’च्या भोवती..!: ‘ठरलेल्या’ जगण्याला आव्हान देणारी ‘मित्रा’!
chaturang article, modern child rearing, Daily Struggles of Feeding child, child feeding, child rearing, marathi article
सांदीत सापडलेले.. : पूर्णब्रह्म!
chaturanga anti aging marathi news
कारी बदरी जवानी की छटती नहीं…
Loksatta chaturang Women World Issues of Menstrual Leave
स्त्री ‘वि’श्व: मासिक पाळीच्या रजेचे प्रश्न
senior citizen chaturang
सांधा बदलताना : निवृत्तीचा काळ सुखाचा…

या निमित्तानं या लेखात प्रामुख्यानं वृद्ध एकल स्त्रियांचा विचार केला आहे. अविवाहित, घटस्फोटित आणि विभक्त स्त्रियांचे प्रश्न हे विधवांपेक्षा थोडेसे वेगळे असले, तरी सर्वसामान्यत: सर्व वृद्ध एकट्या स्त्रियांचे प्रश्न बऱ्याच अंशी समान आहेत. ‘विधवा’ किंवा ‘एकल’ असणं, ही स्थिती एकटेपणाशी निगडित आहे. ६५ ते ६९ या वयोगटात जवळपास ५० टक्के स्त्रिया विधवा असल्याचं, तसंच एकट्या राहणाऱ्या स्त्रियांपैकी ७७ टक्के स्त्रिया विधवा असल्याचं वेगवेगळ्या पाहण्यांमध्ये दिसून आलं आहे. २०१७ ते १९ या काळात भारतातील वृद्धांचं एक दीर्घकालीन संशोधन झालं. (The Longitudinal Survey in India) त्यात सात राज्यांतल्या ३ लाखांपेक्षा अधिक एकट्या वृद्धांची माहिती घेतली गेली होती. संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या पाहणीनुसार वृद्धांच्या संख्येचा विचार करता, भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. विधवा स्त्रियांचीही मोठी संख्या असलेला आपला देश आहे. झपाट्यानं नाहीशी झालेली एकत्र कुटुंबपद्धती, ग्रामीण भागातून शहरात, शहरातून परदेशी होणारं मुलांचं स्थलांतर, फ्लॅट संस्कृती, वाढलेली सरासरी आयुर्मर्यादा, सामाजिक असुरक्षितता, यामुळे एकट्या व्यक्तींचे आणि त्यातही विधवा आणि एकल वृद्ध स्त्रियांचे प्रश्न कमी कालावधीत गंभीर झाले. नुकताच आम्ही ‘सनवर्ल्ड सोसायटी फॉर सोशल सर्व्हिस’ या संस्थेतर्फे एकल वृद्ध स्त्रियांचा ‘ज्येष्ठा गौरी मेळावा’ पुण्यात घेतला. यात सहभागी स्त्रियांची संख्या इतर काही सर्वेक्षणांच्या तुलनेनं कमी आहे, पण त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरून एक चित्र उभं राहतं. त्यातून असं जाणवलं, की या स्त्रियांच्या सामाजिक, मानसिक, आर्थिक अशा विविध प्रकारच्या गरजांवर गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता आहे. आम्ही विधवा स्त्रियांना त्यांच्या समस्या आणि त्यांच्या अपेक्षा विचारल्या होत्या. त्यात एक सुखद धागा सापडला. २५ ते ३० टक्के विधवा स्त्रिया मेळाव्याला उपस्थित राहून आपल्यासारख्या इतर स्त्रियांना मदत करता येईल, या उद्देशानं आल्या होत्या. आपले अनुभव ‘शेअर’ करण्याची, दुसऱ्याचे अनुभव जाणून घ्यायची त्यांना आच होती. सहभागी झालेल्या ९९ टक्के एकल वृद्ध स्त्रियांनी त्यांना एकटेपणा जाणवतो, असं नमूद केलं. मुलांबरोबर राहणाऱ्या विधवांचं प्रमाण खूप कमी आढळलं आणि जरी त्या मुलांसह राहत असल्या तरी त्यांना घरात फारसं स्थान नसल्यामुळे एकटेपणा वाटतो. मुलं परदेशी असलेल्यांचंही प्रमाण लक्षणीय आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा मुलं येऊ शकणार नाहीत याची त्यांना चिंता वाटते. मालमत्तेसंदर्भातल्या गुंतवणुकीच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अनेकींना विश्वासू व्यक्ती उपलब्ध नाहीत. परदेशस्थ मुलांबरोबर तिथे स्थायिक होण्याला या स्त्रियांची फारशी तयारी नाही. काही स्त्रियांनी मुलांकडून अपमान, छळ सहन करावा लागतो, हेही सांगितलं. अनेकींनी दैनंदिन जीवनात वाटणाऱ्या असुरक्षिततेबद्दल सांगितलं. अगदी दुरुस्तीसाठी परका माणूस आला, तरी अनेकींना असुरक्षित वाटतं, प्रवास किंवा करमणूक यांसाठी बहुतेकजणींना सोबत मिळत नाही. बऱ्याच जणींना मित्र-मैत्रिणी आहेत, पण मनातलं बोलावं असा विश्वास वाटत नसल्याचं त्या सांगतात. या सर्व समस्या वरवर पाहता क्षुल्लक वाटू शकतील. पण वृद्ध एकल स्त्रियांच्या दृष्टिकोनातून विचार करता, त्याचा त्यांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम होतो.

एकल वृद्ध स्त्रियांनी अनेक अपेक्षाही मांडल्या. मालमत्ताविषयक आणि आर्थिक व्यवस्थापनविषयक माहिती घ्यायची त्यांना गरज वाटतेय. समवयीन, समान समस्या असलेल्या, समविचारी स्त्रियांचे गट करावेत, म्हणजे एकमेकींनी अडचणींवर कशी मात केली ते समजून घेता येईल, असं त्यांना वाटतं. ज्या एकल स्त्रिया इतर स्त्रियांना मदत करता येईल या दृष्टीनं सहभागी झाल्या होत्या, त्यांनी समस्याग्रस्त स्त्रियांशी बोलण्याची, त्यांचं ऐकून घेण्याची तयारी दाखवली.

या मेळाव्याचाच पुढचा भाग म्हणून विधवा व एकल वृद्ध स्त्रियांसाठी मार्गदर्शनपर परिसंवादाचंही आयोजन करण्यात आलं होतं. वृद्ध कल्याणाच्या क्षेत्रात अनेक वर्षं काम करताना हे आवर्जून सांगावंसं वाटतं, की या प्रकारचे मेळावे, परिसंवाद किंवा अगदी नुसते गप्पा मारण्याचे कार्यक्रम सर्व शहरांत तिथल्या स्थानिक संस्था एकल वृद्ध स्त्रियांसाठी सहज घेऊ शकतील. या गाठीभेटी प्रोत्साहन देणाऱ्या ठरतात.

विधवा आणि एकल वृद्ध स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘सामाजिक भांडवल’ (सोशल कॅपिटल) या संकल्पनेचा चांगला उपयोग करून घेता येईल. एखाद्या व्यक्तीच्या नात्यातल्या, आजूबाजूच्या, परिचयातल्या किंवा हेतुपूर्वक परस्पर सहकार्यासाठी एकत्र आलेल्या व्यक्तींच्या परस्पर संबंधांतून निर्माण केलेली उपयुक्त व्यवस्था म्हणजे सामाजिक भांडवल. यासाठीची एक त्रिसूत्री आहे. जोपासणे (Bonding), जोडणे (Bridging) आणि मार्ग काढणे (Networking). यातलं पहिलं पाऊल हे, की दुसऱ्याच्या गरजेच्या वेळी आपल्याला असलेली माहिती मनमोकळेपणानं त्याला सांगणं आणि जवळच्या नातेवाईकांशी उत्तम संबंध ठेवणं. नातेवाईकांच्या अडीअडचणीला तुम्ही धावून गेलात, तर तुमच्या गरजेला तेही उपयोगी पडतील. पूर्वी वाडा किंवा चाळ संस्कृती होती, तेव्हा संपूर्ण वाडा वा चाळ हेच एक कुटुंब होतं. पण आता तसं नाहीये, याचं भान ठेवायला हवं आणि कौटुंबिक संबंध प्रयत्नपूर्वक चांगले ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. यात ‘आता वेळ निघून गेलीय’ वगैरे काही नाही. कुटुंबियांशी, नातेवाईकांशी आवर्जून बोलणं, त्यांच्या सुखात अभिनंदन करणं, दु:खात सांत्वनाचे चार शब्द सांगणं, अनुभवाचे बोल सांगून मदतीचा हात देणं, हे तुम्हाला केव्हाही सुरू करता येईल. यापुढचा काळ आपल्या माणसांच्या कमतरतेचा असणार आहे. आज जे तरुण आहेत, त्यांनाही पुढे नातेवाईकांच्या सहकार्याची गरज नक्की जाणवणार आहे, हे लक्षात घ्या.

याची सुरुवात कशी करता येईल?… नातेवाईकांना आठवड्यातून एकदा तरी फोन करणं, केवळ आपलं सांगण्यापेक्षा त्यांचंही ऐकणं, सण-समारंभ, वाढदिवस अशा प्रसंगी शुभेच्छा देणं, शेजारी गावाला गेले असताना त्यांनी विनंती केली, तर त्यांच्या घराकडे येता-जाता थोडं लक्ष ठेवणं वगैरे. ‘मी मदत केली’ हे वारंवार बोलून न दाखवणं महत्त्वाचं! या प्रक्रियेत आपल्याला काही गरज असेल तेव्हा समोरच्याला मोकळेपणानं सांगणं, मदत मागणं हेही महत्त्वाचं. विनाकारण बाळगलेला अभिमान, दुरावा, कमीपणा, या भावना आता सोडून देणं हिताचं.

आधी ‘माझ्या नजरेतून मी कशी आहे?’- म्हणजे आपल्या क्षमता, ज्ञान, गुण, मर्यादा याची प्रामाणिकपणे यादी करावी. सामाजिक भांडवल उभं करताना ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे बघा- उदा. बँकेत नोकरी झाल्यामुळे मला आर्थिक व्यवहारांचं ज्ञान आहे, मला एखादी कला अवगत आहे, माझी प्रकृती उत्तम आहे, मला मोबाइलवर वाहन बुक करता येतं, ऑनलाइन खरेदी करता येते… वगैरे झाल्या तुमच्या क्षमता. तर, मला खरेदीला किंवा डॉक्टरांकडे जाताना कोणी तरी बरोबर असावंसं वाटतं, मुलाकडे परदेशात राहून परत आल्यावर खूप दिवस बैचेन वाटतं, विविध बिल भरणा आणि घरातल्या दुरुस्त्या यांचं दडपण येतं, वगैरे तुमच्या मर्यादा असू शकतात. इतरांची अडचण ती तुमची क्षमता किंवा गुण असू शकतो आणि उलटही! पण आपण तसा विचारच करत नाही! दुसरं पाऊल हे, की आसपासच्या आपल्यासारख्या एकल व्यक्तींना एकत्र बांधण्याचा प्रयत्न करणं. प्रथम जवळपास वास्तव्य असणाऱ्या विधवा वा एकल वृद्धा गट करू शकतील. मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये हे अगदी सहज करता येईल. एकट्या राहणाऱ्या डॉ. उषा केळकर. वय झाल्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस बंद केली आणि आध्यात्मिक वाचन, लेखन, शिवणकाम यात स्वत:ला गुंतवलं. एकटीला राहणं अशक्य झाल्यावर त्यांनी स्वत:चं घर भाड्यानं दिलं आणि त्या पैशातून वृद्धाश्रमात येऊन राहिल्या. विशेष म्हणजे वृद्धाश्रमात राहतानाही स्वत: सक्रिय राहात इतरांच्या उपयोगी पडत होत्या. दुसरं उदाहरण साठे वहिनींचं. त्यांना स्वत:चं घर नव्हतं. एकटीच मुलगी होती, ती सासरी गेली. त्यानंतर साठे वहिनी ओळखीच्या लोकांकडे- ज्यांना गरज असेल त्यांच्या घरी जाऊन राहात. आवश्यक ती मदत, सोबत करत. अनेक कुटुंबांना त्यांचा मोठा आधार वाटायचा. शेवटपर्यंत त्या उत्तम आयुष्य जगल्या. ज्या विधवा वा एकल वृद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, त्या स्वत:ला फारशी गरज नसली तरी घरकामाला जास्त वेळ मदतनीस ठेवू शकतील. गाडी असेल, तर ड्रायव्हर ठेवू शकतील. अडचणीच्या वेळी आजूबाजूच्या लोकांना सेवा उपलब्ध करून देता येईल. मी स्वत: प्रसंगी याप्रमाणे मदत उपलब्ध करून देते.

वैधव्यामुळे वा इतर कोणत्याही कारणानं एकल असलेल्या स्त्रीचा वृद्धत्वातला एकटेपणा विशेष अवघड असतो, हे खरं. परंतु व्यक्तीची मनापासून इच्छा असेल, बदलाची, नवीन अनुभव घेण्याची तयारी असेल, तर काही साध्या उपायांपासून सुरुवात करत त्यावर मार्ग शोधता येतात. निदान यानिमित्तानं या दिशेनं चिमणी पावलं टाकण्यास नक्कीच सुरुवात करता येईल!

rohinipatwardhan@gmail.com