गेल्या १०-१२ दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील दोन निर्भय स्त्रियांची नावे गाजत आहेत, त्यांच्याविषयी चर्चा सुरू आहे. त्या आहेत, इराणच्या नर्गिस मोहम्मदी आणि व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मच्याडो.
५३ वर्षांच्या नर्गिस मोहम्मदी या इराणमधल्या स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळावेत यासाठी इस्लामिक राजवटीशी गेली अनेक वर्षे लढत आहेत. नुकतीच, १२ डिसेंबरला त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. तर व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मच्याडो या यंदाच्या ‘नोबेल शांतता पुरस्कार’ विजेत्या आहेत. त्या व्हेनेझुएलाच्या डाव्या विचारांच्या सरकारच्या विरोधात लढत आहेत. गेल्या एक वर्षापासून त्या भूमिगत राहून लढत असल्यामुळे पारितोषिक स्वीकारण्यासाठी त्या १० डिसेंबरला नोर्वेची राजधानी ओस्लो येथे पोहोचतील की नाही, याची चर्चा होती. मात्र हॉलीवूडमधील एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने त्या व्हेनेझुएलातून पळून ओस्लोला पोहोचल्या.
नर्गिस आणि मच्याडो यांच्यात काही साम्यस्थळे आहेत आणि फरकही आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे दोघींना स्वत: उपस्थित राहून नोबेल पुरस्कार स्वीकारता आलेला नाही. नर्गिसच्या जुळ्या मुला-मुलीने २०२३ मध्ये तर मच्याडो यांच्या मुलीने आपल्या आईच्या वतीने १० डिसेंबरला हा पुरस्कार स्वीकारला.
नर्गिस मानवाधिकारांच्या प्रश्नांवर काम करतात. तर मच्याडो या राजकीय नेत्या आहेत. नर्गिस यांना एकूण ३६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर मच्याडो १४-१५ महिन्यांपासून भूमिगत होत्या. आता त्या सुखरूप नोर्वे येथे पोहचल्या आहेत. तिथून त्या अमेरिकेत जाण्याची शक्यता वर्तवली जाते. दोघीही धाडसी आणि आपापल्या विचारांवर ठाम आहेत. मच्याडो या जाहीरपणे अमेरिकेच्या बाजूच्या असल्याने काही राष्ट्रे त्यांच्या- सोबत नाहीत.
नर्गिस मोहम्मदी यांच्यासाठी इराणच्या अत्याचारी राजवटीच्या विरोधात लढा देणे सोपे नव्हतेच. त्यातही स्त्रियांच्या प्रश्नांवर लढा देणे तर अधिकच कठीण. तिथे स्त्रियांवर अनेक बंधने घालण्यात आली आहेत. म्हणूनच स्त्रियांना हिजाब, बुरखा घालणे बंधनकारक असता कामा नये आणि मृत्युदंडाची शिक्षा रद्द केली जावी, या नर्गिस यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला तेव्हा त्या इराणच्या ईविन तुरुंगात होत्या. इराण सरकार त्यांना नोबेल पुरस्कार घेण्यासाठी सोडण्याची शक्यता नव्हती. नर्गिस यांच्या वतीने त्यांचे पती पत्रकार ताघी रहमानी तसेच मुलगा अली व मुलगी कियाना यांनी ओस्लो येथे जाऊन हा पुरस्कार स्वीकारला.
२०११ मध्ये ताघी यांना इराणहून पॅरिसला पळून जाण्याची संधी मिळाली. त्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे इराणच्या तुरुंगात काढली होती. त्यांच्या सामाजिक कार्यावर सरकारची सतत नजर असायची. २०१५ मध्ये त्यांची दोन्ही मुलेही पॅरिसला पोहोचली. मशाद शहरात हिंसक वातावरण निर्माण केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या नर्गिस यांना आत्तापर्यंत एकूण १३ वेळा अटक करण्यात आली आहे. यापूर्वी २०२१ मध्ये देशव्यापी आंदोलनात ठार करण्यात आलेल्या एका कार्यकर्त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. या वर्षी, १२ डिसेंबरलाही जवळपास तसेच झाले.
खोशरो अलीकोर्डी या वकिलाच्या संशयास्पद मृत्यूच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या सभेत नर्गिस यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. नर्गिस यांचा भाऊही त्या ठिकाणी उपस्थित होता. त्या सभेत ‘आम्ही लढा देतो, आम्ही मृत्यू पत्करतो, पण आम्हाला अपमान मान्य नाही,’अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. ‘नर्गिस फाउंडेशन’ने अटक करण्यात आलेल्या त्यांच्यासह सर्वांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. नर्गिस यांना कुठे नेण्यात आले आहे ते सरकारने सांगितले पाहिजे, अशी मागणी ‘नोबेल’ समितीने केली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नर्गिस यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तीन आठवड्यांसाठी तुरुंगातून सोडण्यात आले होते. डॉक्टरांच्या अहवालानंतर त्यांच्या सुटकेची मुदत वाढवून देण्यात आली होती. त्यामुळे नर्गिस यांना आता नवीन आरोपाखाली अटक करण्यात येईल की आधीच्याच आरोपाखाली तुरुंगात पाठवले जाईल, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. अलीकोर्डी यांच्या शोकसभेत भाषण करताना नर्गिस यांनी हिजाब घातला नव्हता, हे दाखवणारा व्हिडीओ ऑनलाइनवर दिसतो. यावेळी २०२२च्या डिसेंबर महिन्यात सार्वजनिक ठिकाणी मृत्युदंड देण्यात आलेल्या माजिदरेझा रहनावर्द (२३) यांची नर्गिस यांनी यावेळी आठवण काढली होती. महसा अमिनी (२३) हिचा पोलिसांच्या ताब्यात असताना झालेल्या मृत्यूनंतर इराणने अभूतपूर्व आंदोलन पाहिले होते.
१३ सप्टेंबर २०२२ रोजी हिजाब व्यवस्थित घातला नसल्याचा आरोप करून तिला पोलिसांनी पकडले होते. तीन दिवसांनंतर तिचा रुग्णालयात संशयास्पदरित्या मृत्यू झाला. त्या आंदोलनात स्त्रियांवर लादण्यात आलेली बंधने हटवण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. अनेक तरुणींनी हिजाब किंवा बुरखा न घालता आपले व्हिडीओ समाजमाध्यमावर ‘पोस्ट’ केले होते. याच निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही स्त्री खेळाडू मायदेशी परतलेल्या नाहीत.
त्या काळात झालेल्या आंदोलनात जवळपास ५०० लोक मृत्युमुखी पडले, असे मानवाधिकाराच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या चौकशी समितीने अमिनीच्या मृत्यूसाठी इराण जबाबदार असल्याचे म्हटले आहे. जून महिन्यात इराणने इस्त्रायलशी केलेल्या युद्धविरामानंतर तेथील अत्याचारात वाढ झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या नावाखाली लोकांवर अत्याचार करण्यात येत आहेत. सामाजिक-राजकीय कार्यकर्ते, पत्रकार, स्त्री कार्यकर्त्या आणि वांशिक अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात अटक करण्यात आली आहे. २००० पेक्षा अधिक लोकांना पकडण्यात आले आहे. तिथले वातावरण अजूनही बिघडलेलेच आहे. अशा काळात नर्गिस यांचे कार्य तेथील लोकांसाठी विशेषत: स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.
जनाधार असलेल्या मारिया
व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मच्याडो या राजकारणी आहेत, जनाधार असलेल्या नेत्या आहेत. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याविरुद्ध, तेथील हुकूमशाही राजवटीच्या विरोधात गेली अनेक वर्षे त्या शांततापूर्ण आंदोलन चालवित आहेत. त्याचसाठी त्यांना यंदाचा ‘शांतता नोबेल पुरस्कार’ देण्यात आला आहे. व्हेनेझुएलातील लोकांच्या लोकशाही अधिकारासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना नोबेल समितीने मान्यता दिली. विभाजित विरोधी पक्षांना एकत्रित आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचीही, नोंद समितीने केली आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा मादुरो निवडून आले. निवडणूक परिषदेने लबाडी करून मादुरो यांना निवडून आल्याचा आरोप मच्याडो आणि विरोधी पक्षाने केला होता. खरं तर मादुरो यांच्या विरोधात मच्याडो उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या असत्या, परंतु २०२३ मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तेथील कम्पट्रोलर जनरलने मारिया मच्याडो यांना पुढची १५ वर्षे कुठलेही पद स्वीकारता येणार नाही असा निकाल दिला होता. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल कायम ठेवला. विरोधी पक्षांचा उमेदवार एडमुंडो गोन्सालेझ यांना त्यांचा पाठिंबा होता. गेल्या वर्षाची निवडणूक खूप वादग्रस्त झाली होती. विरोधी पक्षांचे म्हणणे होते की, त्यांना जवळपास ७० टक्के मतदान झाले होते परंतु, निवडणूक परिषदेने मादुरो यांना ५१ टक्के मत मिळाल्याचे सांगून त्यांना विजयी जाहीर केले.
मादुरो यांचा विजय झाला नसल्याचे मत अमेरिका, चिली, ग्वाटेमाला, ब्रिटन, पेराग्वे, आदींनी व्यक्त केले. तर रशिया, चीन, क्युबा, उत्तर कोरिया, इराण, बोलिविया, निकारागुवा, सीरिया इत्यादी देश मादुरो यांच्या बाजूने आहेत. मादुरो १९ एप्रिल २०१३ पासून राष्ट्राध्यक्ष आहेत. या निकालानंतर आपल्याला अटक होऊ नये यासाठी मच्याडो भूमिगत झाल्या. जवळपास १४ ते १६ महिने त्या भूमिगत होत्या. नोबेल पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या ओस्लो येथे जाणार की नाही याची चर्चा होती. व्हेनेझुएलामधून बाहेर पडणे त्यांच्यासाठी फारच जोखमीचे होते. परंतु ती जोखीम त्यांनी स्वीकारली. त्या ११ डिसेंबरला ओस्लो येथे पोहोचल्या परंतु त्याआधी १० डिसेंबरला त्यांच्या कन्येने आईच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
खरेे तर माहिती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ेमच्याडो यांना शोधणे अशक्य नव्हते, मात्र गुप्तचर यंत्रणा किंवा अन्य कोणाला कळण्याआधी त्या कराकसच्या उपनगरातून निघून सुरुवातीला समुद्रमार्गाने आणि नंतर विमानाने त्या ओस्लोला पोहचल्या. यासाठी व्यवस्थित योजना आखण्यात आली होती.
अमेरिकेशी मच्याडो यांचे चांगले संबंध आहेत. आश्चर्य म्हणजे नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मच्याडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. ट्रम्प यांचा आपल्या कामासाठी आणि व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी ‘निर्णायक पाठिंबा’ असल्याचे मच्याडो यांनी यावेळी म्हटले होते. मच्याडो यांनी ट्रम्प प्रशासनाच्या निर्बंध, तेलाचे टॅन्कर जप्त करण्यासारख्या बाबींचेही समर्थन केले हे दुर्दैवी आहे.
मच्याडो यांचे पलायन अगदी योजनाबद्ध होते. ‘ऑपरेशन गोल्डन डायनामाइट’अंतर्गत त्यांना सुरुवातीला नौकेतून व्हेनेझुएलापासून लांब नेण्यात आले. या मोहिमेची प्रमुख जबाबदारी अमेरिकेच्या स्पेशल फोर्सचे माजी अधिकारी ब्रायन स्टर्न यांच्याकडे होती. ५ डिसेंबरला मच्याडो यांच्या सहकाऱ्यांनी स्टर्न यांच्याशी संपर्क केला आणि मच्याडो यांना ओस्लो येथे पोहोचवण्याची जबाबदारी दिली. ‘ग्रे बुल रेस्क्यू फाउंडेशन’चे ते अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. आजपर्यंत त्यांनी अनेक लोकांना अतिशय काळजीपूर्वक त्यांच्या देशातून बाहेर काढून वाचवले आहे. पण त्यात मच्याडो एवढे मोठे नाव आणि लोकप्रियता कोणाचीही नव्हती. त्यामुळे मच्याडो यांना सुरक्षित स्थळी पोहोचवणे सगळ्यात कठीण काम होते. या फाउंडेशनला अमेरिकी सरकारची मदत नाही. लोकांच्या देणगीवर फाउंडेशन चालत असल्याचे स्टर्न यांनी म्हटले आहे.
कराकस ते समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मच्याडो यांना लष्कराच्या किमान १० चेक-पोस्ट पाईंटमधून जावे लागले. त्यावेळी आपल्याला कोणी ओळखणार नाही याची मच्याडो यांनी काळजी घेतली होती. नंतरचा समुद्राचा प्रवास कठीण होता. मच्याडो मच्छीमारांच्या लहान बोटीत होत्या. अमेरिकेची विमाने बोटीवर हल्ला करणार नाहीत, हे बघणे महत्त्वाचे होते. कारण व्हेनेझुएलाच्या मच्छीमारच्या बोटीतून अमेरिकेत मादक पदार्थ आणले जातात, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
अलीकडे अशा बोटींवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात ५० हून अधिक लोक मारले गेले. अमेरिकेच्या लष्कराशी स्टर्न यांनी संपर्क साधून आपण कुठल्या भागातून जाणार आहोत याची माहिती दिली. मारिया मच्याडो यांची भेट झाल्यानंतर स्टर्न प्रभावित झाले कारण अतिशय जोखमीच्या, खवळणाऱ्या समुद्रातून जातानाही मच्याडो यांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट नव्हते. ११ डिसेंबरला स्टर्न यांनी त्यांना सुखरूप ओस्लो येथे पोहोचवण्याचे काम केले. त्यामुळे दोन वर्षानंतर मच्याडो आपल्या मुलीला भेटू शकल्या. मच्याडो यांच्या राजकीय भूमिकेबद्दल नक्कीच मतभेद असू शकतात. पण, आपला उद्देश साध्य करण्यासाठी त्या वेगवेगळे प्रयत्न करत राहणार, एवढं नक्की.
आपल्या देशातील लोकांसाठी लढणाऱ्या, शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या या दोघी. शांततेसाठी धाडस करणाऱ्या, त्यासाठी सतत अस्वस्थराहणाऱ्या म्हणूनच महत्त्वाच्या!
जतिन देसाई | jatindesai123 @gmail.com
