‘‘बाई, मला लग्न नाही करायचंय… मला शिकायचंय…’’ नाशिकच्या एका मुलीने केलेल्या या विनवणीने महापालिका शिक्षिका असलेल्या कुंदा बच्छाव यांचं मन इतकं हेलावलं की, अशा अनेक मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांनी चंगच बांधला. गावपातळीवरील शिक्षण ते जागतिक स्तरावर होत असलेले शाळेतले उपक्रम पाहिले की, कुंदा यांचे प्रयत्न या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी किती मोलाचे आहेत, याची प्रचीती येते.आजच्या शिक्षकदिनी त्यांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येत आहे. त्या निमित्ताने त्यांच्या नि:स्पृह ज्ञानदानाविषयी.

‘‘बाई, मला तुमच्यासारखी शिक्षिका व्हायचं आहे. खूप शिकायचं आहे. स्वत:च्या पायावर उभं राहायचं आहे. पण आई-बाबा लग्नासाठी मागे लागलेत. मला लग्न नाही करायचं…’’ आईने हात करकचून धरलेली फाल्गुनी जिवाच्या आकांताने सांगत होती. त्या क्षणीच ठरलं. अशा अकाली बोहल्यावर चढणार्‍या, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून लांब फेकल्या जाणार्‍या मुलींसाठी काम करायचं. त्यांच्या मागे कोणी उभं नसेल, पण त्यांची ‘‘मॅडम खंबीरपणे उभी आहे.’’ असं सांगणार्‍या नाशिक महानगरपालिकेच्या ‘आनंदवली’ शाळेतील शिक्षिका कुंदा बच्छाव यांचा हा ठाम निर्धार त्यांच्यातील शिक्षिकेला आजही स्वस्थ बसू देत नाही. मागील २१ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या बच्छाव यांनी ‘शैक्षणिक पालकत्व’ या त्यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत १५० हून अधिक मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाची गंगा घराघरांत पोहोचवण्याचे काम महाराष्ट्राच्या गावागावांतील शिक्षक करत असतात. मात्र, कौटुंबिक पटलावर बालविवाहासारख्या प्रथांचा बळी ठरणार्‍या आणि कौटुंबिक आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणार्‍या गरजू मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलण्याचे कौतुकास्पद कार्य कुंदा करीत आहेत. अकरावीत असताना स्वत:चा विवाह ठरवला जात असताना केवळ शिक्षकांच्या समुपदेशनामुळे शिक्षण पूर्ण करू शकलेल्या बच्छाव यांनी शिक्षकच होण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्यामागे शिक्षक काका आणि अन्य नातेवाईकांची प्रेरणाही होतीच.

‘‘दहावीनंतर डी.एड. केले तर दोन वर्षांत शिक्षण पूर्ण होईल आणि शिक्षणासाठीचा खर्चही कमी होईल, असा विचार वडिलांनी त्यावेळी केल्यामुळे पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. मात्र, शिक्षण सुरू असतानाच लग्नाचा हार गळ्यात पडला. पण माहेर तसेच सासरच्या पाठिंब्यामुळे शिक्षण सुरू राहिले.’’ शिक्षिका म्हणून रुजू झाल्यावर जिल्हा परिषदेच्या आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या विश्वासनगर व आनंदवली शाळेत पंधराहून अधिक वर्षे त्यांनी सेवा दिली आहे. शासकीय शाळांमध्ये आठवीनंतर कौटुंबिक व आर्थिक अडचणींमुळे ५० टक्के मुली शाळा सोडतात आणि बालविवाहाच्या जाळ्यात अडकतात, हे विदारक सत्य त्यांनी जवळून अनुभवले.

‘‘शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडत लग्नाच्या बोहल्यावर चढणार्‍या मुलींसाठी आवाज उठवण्याचे धैर्य माझ्यात नव्हते. लग्नानंतर अगदी वर्षभरात मुली आई झाल्या. काहींचे बाळंतपण जीवावर बेतल्याचेही पाहिले. पण फाल्गुनीच्या आर्त हाकेने माझ्यातील शिक्षक आणि आई खडबडून जागी झाली. माझे थांबणारे शिक्षण केवळ माझ्या शिक्षकांमुळे पूर्ण होऊ शकले. आता या मुलींच्या शिक्षणासाठी मी त्यांच्या पाठीशी उभी राहणार, हा निर्धार पक्का झाला,’’ असे कुंदा सांगतात.

फाल्गुनीच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. मात्र, ते ऐकत नसल्याचे पाहून त्यांना कायद्याची भीती दाखवण्यात आली. त्यानंतर नाखुशीने का होईना, पण पालकांनी तिचे होणारे लग्न थांबवून शिक्षण पूर्ण करण्याची तयारी दर्शविली. यासाठी बच्छाव यांनी तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे तिचे शिक्षण सुरू राहिले. बच्छाव यांनी २०२१ मध्ये पाच मुलींना दत्तक घेऊन ‘शैक्षणिक पालकत्व’ या उपक्रमाची सुरुवात केली. केवळ पाच मुलींपासून सुरू झालेल्या या मोहिमेला नंतर समाजमाध्यमांची भक्कम साथ मिळाली. ‘फेसबुक’च्या माध्यमातून आवाहन केल्यानंतर देश-विदेशातून नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला. २०२१ पासून आतापर्यंत या उपक्रमासाठी सुमारे १४ लाख रुपयांच्या वर निधी जमा झाला आहे. या निधीतून मुलींच्या वह्या-पुस्तके, गणवेश, महाविद्यालयीन शुल्क, वाहतूक खर्च आणि करिअर मार्गदर्शनाचा खर्च केला जातो.

या उपक्रमातून आज अनेक मुली पदविका अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंतचिकित्सा, सीए, एसीए यासारख्या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. हा प्रवास सोपा नव्हता. प्रसंगी पदरमोडही करावी लागली. मुलींसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करताना त्याचा दुरुपयोग तर होत नाही ना, हे पाहण्याची जबाबदारी होतीच. यासाठी शाळेतील एक महिला सहकारीही मदतीला आली. या उपक्रमात केवळ नाशिकमधीलच नव्हे, तर राज्यातील अनेक जिल्ह्यांतील मुलींचा समावेश आहे. एक मुलगी विदर्भातील होती. समाजमाध्यमांवरील कुंदाबाईंची पोस्ट पाहून तिने मदतीची विचारणा केली आणि घरातील अडचणी सांगितल्या. आई हीच घरातील एकमेव कर्ती व्यक्ती असताना तिला दंतचिकित्सेचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा होता. शासकीय शुल्कापोटी लागणारे चार लाख रुपये तिच्या कुटुंबाकडे नव्हते. बच्छाव यांनी तिच्या घरी जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि ‘शैक्षणिक पालकत्व’ उपक्रमातून तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. अशा दीडशेहून अधिक मुलींना त्यांनी आतापर्यंत मदत केली आहे.

सामाजिक बांधिलकी जपत असतानाच शाळेतही केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी कुंदा यांनी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. यामध्ये ठळकपणे सांगता येईल असा ‘संविधान सापशिडी’ हा उपक्रम त्यांनी हाती घेतला. संविधानातील हक्क आणि कर्तव्ये खेळातून शिकवण्यासाठी त्यांनी ‘संविधान सापशिडी’ची निर्मिती केली. मुलांमध्ये संस्कारांची रुजवणूक व्हावी, संविधानातील कलमांची माहिती व्हावी आणि हक्कांबरोबरच त्यांना कर्तव्यांची जाणीव व्हावी, यासाठी खेळाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येते. यासोबतच ‘मूल्यमापन सापशिडी’ही तयार करण्यात आली. त्यातून मुले खेळत-खेळत मूल्यसंस्कार शिकली आणि ते प्रत्यक्ष जीवनात आणण्यासाठी क्षेत्रभेटी, मुलाखती, ‘आनंदवली शिक्षण कट्टा’ यासारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील अध्ययन अनुभव मिळवून देण्यात आले.

तसेच अमेरिकेसोबत ‘इ-ट्विनींग’, बांगलादेशासोबत ‘टेलिकोलाबरेशन’ आणि जर्मनीसोबत ‘लर्न जर्मन’ यासारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर संवादाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये जर्मन अंकलिपी तयार करण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थी आणि त्यांचे पालक जर्मन भाषा शिकत आहेत. सामाजिक उपक्रमात योगदान देत पूरग्रस्तांसाठी विद्यार्थ्यांनी १५ हजार रुपयांचा निधी जमा करून तो मुख्यमंत्री मदत निधीला दिला. तसेच आनंदवली परिसरात दोन हजारांहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली. याशिवाय बच्छाव यांच्या संकल्पनेतून शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

‘मिशन मोबाईल-फ्री’अंतर्गत विद्यार्थी भ्रमणध्वनीपासून दूर राहावेत, यासाठी शाळेच्या आवारात ‘ज्ञानभिंती’ आणि ‘आनंदवली शिक्षण कट्टा’ सुरू करण्यात आला. शाळेच्या आवारातील वेगवेगळ्या कोपर्‍यांमध्ये विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय आनंदवली गावातील मारुती मंदिरात तसेच संत कबीर वस्तीतील समाज मंडळात मुले, पालक आणि गावकर्‍यांसाठी संपूर्णपणे लोकसहभागातून सुमारे दोन हजार पुस्तकांचे खुले वाचनालय सुरू करण्यात आले आहे.

पालकांना नेहमी चिंता वाटायची की, आम्ही कामावर गेल्यानंतर मुले शाळेत जातात की कुठेतरी वाईट संगतीत फिरतात? त्यांची ही चिंता दूर करण्यासाठी शाळेत ‘स्मार्ट अटेंडन्स’ सुरू करण्यात आला. यामध्ये मुलांना ‘आरएफआयडी’ कार्ड असलेले ओळखपत्र देण्यात आले. हे ओळखपत्र ‘स्मार्ट अटेंडन्स किट’वर स्कॅन केल्यानंतर त्यांच्या पालकांना मुलं शाळेत आल्यावर आणि निघाल्यावर एक संदेश पाठवला जातो. यामुळे पालकांची आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठीची चिंता मिटली.

मुलांचे शिक्षण केवळ शाळेच्या चार भिंतींपुरते मर्यादित न राहता संपूर्ण गावच त्यांच्यासाठी शिक्षण देणारे माध्यम बनावे, यासाठी आनंदवली गावात ‘ज्ञानाच्या भिंती’ उभारण्यात आल्या. गावातील ३० ते ३५ घरांच्या भिंती नकाशे, गणिताच्या क्लृप्त्या, इंग्रजी शब्द यांनी रंगवण्यात आल्या. त्यामुळे मुले आता घरी भ्रमणध्वनीवर खेळणे सोडून या भिंती वाचू लागली आहेत. त्यावरील कोडी सोडवू लागली आहेत. आई-वडिलांसोबत भिंतींजवळ उभे राहून शिक्षणाचा आनंद घेऊ लागली आहेत. शाळेत स्किल लॅब, रेकॉर्डिंग रूम, ‘स्टेम’ म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित वर्ग यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना तंत्रज्ञानाची मैत्री घडवून २१व्या शतकातील कौशल्ये रुजविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.

वेगवेगळ्या संकल्पनांवर काम करत असताना बच्छाव यांना ‘जेन अल्फा’ पिढीसमोरची आव्हानेही जाणवतात. आजच्या ‘जेन अल्फा’ पिढीसमोर गॅजेट्स आणि समाजमाध्यमांवरील अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत त्यांना केवळ माहिती देण्यापेक्षा नैतिक मूल्ये आणि संवेदना शिकवणे हे शिक्षकांचे खरे कर्तव्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ‘‘मुलांमध्ये नैतिक मूल्ये रुजवली जायला हवीत. माहिती त्यांना कोठूनही मिळेल; पण मूल्ये रुजवणे तितकेच महत्त्वाचे आहे,’’ असे बच्छाव यांचे मत आहे.

आज आनंदवली महानगरपालिका शाळेत सुमारे ८०० विद्यार्थी शिक्षण घेत असून खासगी शाळांमध्ये शिकत असलेले अनेक विद्यार्थी या सरकारी शाळेत प्रवेश घेत आहेत. हीच त्यांच्या कामाची पावती आहे.

charu.kulkarni85@gmail.com