सलिल तांबे
काही नाती असतात, जी निखळ आनंद देणारी म्हणूनच आपल्या आयुष्यात असतात. एकमेकांची भाषा समजत नसली तरी भावनांचा ओलावा या नात्यांना समजत असतो. अशा नात्यांमध्ये एकदा विश्वासाने घर केलं की आयुष्यभरासाठी हे नातं पक्कं होतं, माझ्या परसबागेतल्या सख्यासोबत माझं नातं असंच घट्ट झालं, ज्या अनुभवाने मला खूप काही शिकवलं…

निसर्ग हा खरं तर चमत्कारांनी भरलेला एक अथांग सागर. आपण माणसांच्या मैत्रीबद्दल खूप ऐकतो, कथा वाचतो, कविता लिहितो आणि अनुभवतोही; पण जेव्हा एखादा मुका जीव, ज्याला आपली भाषा कळत नाही, जो पूर्णपणे स्वतंत्र आहे, तो जेव्हा तुमच्यावर मनापासून विश्वास ठेवतो, तेव्हा मिळणारा आनंद हा शब्दातीत असतो. अशा क्षणांना आपण कधीच विसरू शकत नाही, कारण ते क्षण आपल्या आत्म्याला स्पर्श करून जातात. माझ्या आयुष्यातला असाच एक अविस्मरणीय अनुभव मला माझ्या कोकणातल्या परसबागेत आला, ज्याने माझी केवळ निसर्गाकडे बघण्याची दृष्टीच बदलली नाही, तर जगण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला.

माझं गाव रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातलं ‘देवरुख’. कोकणातल्या इतर घरांप्रमाणेच आमचं घरही झाडाझुडपांनी वेढलेलं आहे. घराच्या सभोवती एक छोटीशी परसबाग आहे. या बागेत आठ नारळाची उंच झाडं आकाशाशी स्पर्धा करत उभी आहेत. सोबतीला एक कोकमाचं (रातांबा) झाड, दोन पेरूची झाडं आणि एक फणसाचं झाड अशी फळझाडं डौलाने उभी आहेत. केवळ फळझाडंच नाहीत, तर घराच्या खिडकीपर्यंत जास्वंद, मोगरा, रातराणी, कुंद आणि तगर अशा फुलांचा सुगंध दरवळत असतो. पहाटेची वेळ असते, तेव्हा या फुलांचा सुगंध मनात प्रसन्नता निर्माण करतो. अशा निसर्गरम्य बागेत जर पक्ष्यांचा वावर नसता, तरच नवल…!

दररोज सकाळ-संध्याकाळ आमच्या बागेत पक्ष्यांची जणू जत्राच भरते. बुलबुल, दयाळ, सातभाई, टिटवी, खंड्या, पोपट, तांबट आणि शिंजिर अशा विविध पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणं हा एक सुखद अनुभव असतो. कधी तर कोकणाचे वैभव असलेला ‘धनेश’(ऌः१ल्लु्र’) सुद्धा आपल्या भारदस्त चोचीसह दर्शन देऊन जातो.

बागेतल्या झाडांना पाणी घालणं आणि तिथे फेरफटका मारणं हा माझ्या आवडीचा छंद. झाडांच्या सावलीत उभं राहून पक्ष्यांच्या गोड गाण्यांचा आनंद घेणं म्हणजे माझ्यासाठी एक प्रकारची ‘ध्यानसाधना’ आहे. पण कोकणातला उन्हाळा, विशेषत: मार्च, एप्रिल महिना, खूपच कठीण असतो. रणरणतं ऊन आणि अंगाची लाहीलाही करणारा उकाडा. आमच्या घरी ग्रामपंचायतीचं पाणी दुपारी एक ते दोन या वेळेत यायचं. भर दुपारी, जेव्हा सूर्य डोक्यावर असायचा, तेव्हा मला झाडांना पाणी घालावं लागायचं. खरं तर त्या उन्हात बाहेर पडणं कष्टाचं होतं, पण मला ते कधीच कष्टप्रद वाटलं नाही. त्याचं कारण असं की, त्यानिमित्ताने मला झाडांशी आणि पक्ष्यांशी एकरूप व्हायला मिळायचं. मातीला पाण्याचा स्पर्श होताच जो मृदगंध यायचा, तो थकवा दूर करायला पुरेसा होता.

एका दुपारी मी नेहमीप्रमाणे झाडांना पाणी घालत होतो. अचानक माझ्या असं लक्षात आलं, एक ‘दयाळ’ पक्षी मी ज्या झाडाला पाणी घालून पुढे सरकत होतो, त्या झाडाच्या ओल्या पानांत जाऊन नाचत होता. तो काळा-पांढरा देखणा पक्षी आपली शेपटी वर-खाली करत पानांवर साचलेलं पाणी आपल्या अंगावर घेत होता. त्याला ते थंड पाणी मिळाल्यामुळे झालेला आनंद त्याच्या हालचालीतून स्पष्ट दिसत होता. मी पुढच्या झाडाला पाणी दिलं की तो पुन्हा तिथे येई. पहिल्या दिवशी मला हे त्याचं वागणं सहज वाटलं. पण दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशीही तोच प्रकार घडला. जेव्हा मी पाणी घालायला बाहेर पडायचो, तेव्हा तो कुठून तरी हजर व्हायचा. जेव्हा हा त्याचा नित्यक्रम झाला, तेव्हा मला त्याची खूप गंमत वाटली. मला जाणवलं की, तो केवळ योगायोगाने येत नाहीये, तर तो माझ्या पाणी घालण्याची वाट बघतोय.

एकदा मी थोडी गंमत करायचं ठरवलं. तो पक्षी अगदी जवळ आल्यावर मी नळीतून येणारी पाण्याची धार त्याच्या दिशेने हलकीच कारंज्यासारखी उडवली. पण तो मुका जीव! त्याला काय माहीत माझी इच्छा? तो अचानक घाबरला आणि दचकून दूर उडून गेला. लांब फांदीवर बसून तो माझ्याकडे संशयाने बघत राहिला. मला थोडं वाईट वाटलं. पण त्या दिवशी उकाडा खूपच जास्त होता. त्याला पाण्याचा मोह आवरला नाही. थोड्या वेळाने तो पुन्हा आला आणि पानांत खेळू लागला. मी त्या दिवशी त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं. मी माझं काम संपवलं आणि घरात गेलो. पण मनात एकच विचार होता, उद्या काय होईल? तो येईल का?

दुसर्या दिवशी दुपारी एक वाजता मी पाणी घालायला नळी हातात घेतली आणि काय आश्चर्य! ‘हा पठ्ठ्या’ आधीच तिथे एका फांदीवर बसून शेपटी उडवत माझी वाट पाहत होता. यावेळी मी सावध होतो. मी नळीच्या तोंडावर बोट धरून पावसाच्या अत्यंत हलक्या आणि बारीक सरींसारखा फवारा त्याच्या अंगावर उडवला. तो सुरुवातीला थोडा लांब गेला, चोच उघडून माझा अंदाज घेऊ लागला. जणू तो विचारत होता, ‘‘तू मला इजा तर करणार नाही ना?’’ पण जेव्हा त्या बारीक तुषारांचा सुखद गारवा त्याच्या अंगाला स्पर्शून गेला, तेव्हा त्याचा सर्व संकोच गळून पडला. त्याने चक्क तिथेच जमिनीवर मनसोक्त आंघोळ करायला सुरुवात केली. त्याने आपले पंख पूर्ण पसरले, अंग झटकलं आणि पाण्याचा प्रत्येक थेंब अंगावर झेलला. आंघोळ झाल्यावर त्याने एक लांब शीळ घातली आणि आनंदाने उडून गेला. त्या क्षणी मला जो आनंद झाला, तो कोणत्याही मोठ्या यशापेक्षा मोठा होता.

आता हा आमचा नित्यक्रम झाला आहे. मी नळी हातात घेतल्यावर तो कुठून तरी शीळ घालत हजर होतो. त्याला आता पाण्याच्या धारेची भीती वाटत नाही. त्याला पूर्ण विश्वास आहे की, हा माणूस माझा मित्र आहे आणि तो मला कधीच इजा करणार नाही. कधी कधी तर तो इतका जवळ येतो, की मला वाटतं मी त्याला हातात धरू शकेन, पण मी त्याची ती ‘स्पेस’ जपतो. मी पाण्याची धार पावसासारखी धरतो आणि त्याची आंघोळ जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी शांतपणे उभा राहतो. त्याचं समाधान झालं, की तो जवळच्याच जास्वंदीच्या झाडावर बसतो, आपले ओले पंख वाळवतो आणि जाताना माझ्याकडे बघून एक गोड, लांब शीळ घालतो. मला वाटतं, ती शीळ म्हणजे त्याने मानलेले ‘आभार’च असतात.

मला नेहमी आश्चर्य वाटतं, एवढ्याशा छोट्या पक्ष्याला माणसाच्या मनातला ओलावा कसा कळतो? त्याला कसं समजलं असेल की मी त्याला पाणी देऊन मदत करतोय? आम्ही दोघंही एकमेकांची भाषा बोलत नाही, तरीही आमच्यात एक अतूट नातं निर्माण झालं आहे. हा अनुभव मला खूप शिकवून गेला.

प्रेम आणि विश्वास व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते, ते केवळ कृतीतून आणि डोळ्यांतील भावनेतून पोहचते.

मैत्रीसाठी धैर्य आणि संयम हे दोन्ही गुण आवश्यक आहेत.

आपण मोठ्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो, पण निसर्गाच्या सान्निध्यात अशा छोट्या गोष्टींतून जो निखळ आनंद मिळतो, तो जगातल्या कोणत्याही श्रीमंतीत विकत घेता येत नाही.

आज तो दयाळ पक्षी फक्त एक पक्षी राहिला नसून माझ्या परसबागेतला एक लाडका मित्र, एक ‘अनोखा सखा’ झाला आहे. दिवसभर कामाचा कितीही ताण असला, तरी दुपारी त्याच्यासोबत घालवलेली ती १० मिनिटं मला मानसिक शांतता देऊन जातात.

निसर्ग आपल्याला रोज काहीतरी नवीन शिकवत असतो. ही झाडं, फुलं, पक्षी आपल्याला सांगतात की जीवनाचं खरं सौंदर्य हे एकमेकांवर विश्वास ठेवण्यात आणि सहजीवनात आहे.

त्या दयाळ पक्ष्याने माझ्या आयुष्यात येऊन मला हे पटवून दिलं की, विश्वास हा शब्दांनी नव्हे तर सातत्यपूर्ण कृतीतून निर्माण होतो आणि एकदा असा नि:स्वार्थी विश्वास निर्माण झाला, की तो आयुष्यभरासाठी एक गोड आठवण बनून राहतो. जेव्हा आपण निसर्गाला प्रेम देतो, तेव्हा निसर्ग आपल्याला त्याच्या हजारो पटीने परत करतो, हेच खरं!

usaliltambe1990@gmail.com