माधवी मसुरकर
आज काळाच्या ओघात उत्सव मोठे झाले, त्यात भव्यता आली, तरुणाईचा उत्साह वाढला. हे चांगलंच आहे. बदल हा सृष्टीचा नियम आहेच. पण या भव्यतेच्या आणि गोंगाटाच्या गर्दीत जुना सा्त्विवक शांतपणा हरवल्यासारखा वाटतो का? वाद्यांचा ताल किंवा दिव्यांचा झगमगाट ही आजच्या पिढीच्या उत्सवांची भाषा आहे. भोंडल्याची जागा गरब्याने घेतली असली, तरी त्यामागील ‘एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची’ भावना तीच आहे. महत्त्वाचं हे की, नव्या माध्यमांद्वारेही आजची तरुण पिढी आपल्या मुळांशी म्हणजेच सणांशी, नवरात्रीच्या उत्सवाशी जोडली जात आहे.
पितृपक्षातील शांतता आणि साचलेपण दूर सारून अश्विन शुद्ध प्रतिपदेला जेव्हा घराघरांत घटस्थापना होते, तेव्हापासून वातावरणाचा नूरच पालटतो. सळसळणारा वारा, प्रसन्न सकाळची कोवळी उन्हं आणि हवेत पसरलेला फुलांचा दरवळ… शरदाची चाहूल लागली की हवेत एक वेगळाच टवटवीतपणा येतो. प्राजक्ताची फुलं अंगाखांद्यावर पडून जमिनीवर सडा घालू लागतात आणि बालपणी गावात पाहिलेल्या नवरात्रीच्या आठवणी आपोआप ताज्या होऊ लागतात…
काळ पुढे सरकला, जीवनशैली बदलली आणि त्यासोबतच नवरात्र साजरी करण्याची पद्धतही पार बदलून गेली. पूर्वी गावातली नवरात्र म्हणजे अत्यंत सा्त्विवक, शांत असा कौटुंबिक सोहळा असायचा. मातीची छोटी वेदी, त्यात पेरलेली नऊ धान्यं आणि त्यावर विराजमान झालेला तांब्याचा कलश… हे सगळं पाहताना निसर्गाच्या पुनर्जन्माचा उत्सव पाहिल्यासारखं वाटायचं. दिवसांमागून दिवस जायचे, तशी त्या मातीतून लहान-लहान हिरवे-पिवळे अंकुर डोकावू लागायचे. दिवसेंदिवस वाढणारं ते घटाचं धान्य पाहणं म्हणजे छोट्या मुलांसाठी मोठा चमत्कार असायचा. ‘‘आजी, बघ आज एवढं वाढलं!’’असं मुलं ओरडून सांगायची, तेव्हा आजी मंद हसून म्हणायची, ‘‘ते नुसतं धान्य नाही बाळांनो, ती अन्नपूर्णेची कृपा आहे. ती सृष्टीची वाढ आहे.’’ त्या उगवत्या धान्याकडे बघताना आयुष्यात आशेचा नवा अंकुर कसा फुलवायचा, याचे धडे नकळत मिळायचे.
तांब्यात गंगेचं पाणी, त्यावर आंब्याची पानं, सुपारी आणि नारळ. सुपातील माती आणि त्यात पेरलेली धान्यं. या मातीच्या सुगंधातच जणू सृजनशीलतेचा मूळ ध्यास लपलेला असायचा. नऊ दिवस त्या घटावर रोज बांधली जाणारी फुलांची माळ जणू विश्वातील सर्व सौंदर्य एकत्र गुंफण्याचा प्रयत्न करत असावी. संध्याकाळ झाली की घराघरांत धूप-दीप लावले जायचे. देवीच्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा तर उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावून देवीची साग्रसंगीत पूजा व्हायची. कलशाभोवती सुताचा धागा गुंडाळताना घरातील ्त्रिरया कुठलं तरी स्तोत्र पुटपुटत असत. तो कसला मंत्र असायचा हे लहानपणी कळायचं नाही, पण त्या स्वरात एक कमालीची आश्वासकता असायची.
समईतला स्निग्ध, पिवळसर नंदादीप आणि त्याच्या प्रकाशात उजळून निघणारं देवघर! आरतीच्या वेळचा घंटानाद, टाळांचा गजर आणि चारी बाजूंना पसरलेला धूप-कापुराचा सुगंध एका वेगळ्याच आत्मिक शांततेचा अनुभव द्यायचा. बाहेर अंधार पडत असला तरी देवघरातील तो नंदादीप मनातल्या सगळ्या शंका, भीती आणि चिंता दूर पळवून लावायचा. घट, हे धान्य आणि हा अंकुर आपल्याला प्रत्येक नवरात्रीत एकच गोष्ट शिकवून जातो, परिस्थिती कितीही कठीण असली, अवतीभोवती कितीही अंधार असला, तरी स्वत:वरचा आणि भविष्यावरचा विश्वास ढळू देऊ नका. तुमच्या आत रुजलेली आशेची बी योग्य वेळ येताच नक्की अंकुरित होईल आणि आयुष्याला पुन्हा एकदा हिरवागार, चैतन्यमयी आकार देईल.
रात्रीच्या वेळी अंगणात रंगणारा भोंडला किंवा हादगा हा तर गल्लीतील मुला-मुलींचा आणि स्त्रियांचा जीव की प्राण! ‘‘ऐलोमा पैलोमा गणेश देवा…’’ अशा साध्या, सोप्या लोकगीतांच्या तालावर फेर धरताना मिळणारा आनंद अवर्णनीय असायचा. खिरापत काय असेल, हे ओळखताना मुलांमध्ये लागणारी चढाओढ आणि शेवटी हातात पडणारा तो छोटासा मूठभर प्रसाद. त्यात प्रचंड समाधान असायचं. नवरात्र हा घराच्या उंबरठ्याआड जपलेला, शांत, सा्त्विवक आणि कौटुंबिक स्नेह जपणारा एक घरगुती उत्सव होता. आजही जेव्हा नवरात्र येते, तेव्हा चकचकीत दिव्यांच्या रोषणाईत उभे असताना मन क्षणभर बालपणीच्या त्या गावाकडे निघून जातं. जिथं रोषणाई नसली तरी एक शांत नंदादीप तेवत असायचा आणि गाजावाजा नसला तरी प्रत्येकाच्या मनात उत्सवाचा खरा आनंद फुललेला असायचा.
अलीकडची नवरात्र पाहताना काळ किती वेगाने बदललाय याची जाणीव होते. हल्ली शहरांमध्ये आणि आता गावांपर्यंतही नवरात्रीचं रूप कमालीचं ‘ग्लॅमरस’ आणि आधुनिक झालं आहे. गल्लीबोळांतील साधेपणाची जागा आता मोठ्या डिजिटल फलकांनी, चकचकीत डीजे आणि मोठ्या आवाजाच्या स्पीकर्सनी घेतली आहे. पारंपरिक भोंडल्याची जागा बॉलीवूडच्या तालावर रंगणार्या ‘हाय-फाय गरबा’ आणि ‘दांडिया नाइट्स’ने घेतली आहे. नऊ दिवसांचे नऊ रंग पूर्वी सहज पाळले जायचे, आता ते समाजमाध्यमांवरील फोटोंपुरते आणि ड्रेस कोडपुरते मर्यादित झाले आहेत. काळाच्या ओघात उत्सव मोठे झाले, त्यात भव्यता आली, तरुणाईचा उत्साह वाढला. हे वाईट मुळीच नाही. बदल हा सृष्टीचा नियम आहेच. पण या भव्यतेच्या आणि गोंगाटाच्या गर्दीत तो जुना सा्त्विवक शांतपणा हरवल्यासारखा वाटतो. घटाखाली हळूहळू उगवणार्या त्या हिरव्या धान्याकडे बघताना मिळणारा नवचैतन्याचा धडा आणि नंदादीपाच्या वातीकडे पाहताना मनाला मिळणारी ती नीरव शांतता आजच्या भपक्यात कुठं तरी झाकोळली गेली आहे का?
वरवर पाहता हा बदल काहीसा गोंधळाचा वाटू शकतो, जुन्या शांततेची आठवण येऊन सणांमध्ये अलीकडे ती अनुभवता येत नसल्याने खंतही वाटू शकते. हे साहजिकच पण या बदलाकडे थोडं वेगळ्या आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं, तर यामागे संस्कृतीचा एक सुंदर प्रवाह दिसतो. पूर्वी हा सोहळा कौटुंबिक होता. आता तो सार्वजनिक आहे. हजारोंच्या संख्येने जात, धर्म, पंथ, वय विसरून लोक एकाच तालावर, एकाच लयीत एकत्र नाचतात, तेव्हा तो फक्त गरबा राहत नाही तर ती एक सामाजिक एकतेची अनुभूती बनते.
आजच्या धकाधकीच्या आणि तुटत चाललेल्या शहरांमध्ये, हाच सार्वजनिक झगमगाट माणसांना एकमेकांशी जोडणारा एक भक्कम दुवा ठरतो आहे. भव्य मंचांवर वाद्यांचा मेळ सुरू होतो आणि भोंडल्याऐवजी भव्य प्रांगणात शेकडो पावलं गरब्याच्या तालावर थिरकतात. भोंडला हा पूर्वी मराठमोळ्या घराच्या चार भिंतींच्या आत किंवा अंगणापुरता मर्यादित होता. आजच्या गरब्यात आणि दांडियामध्ये ्त्रिरया पूर्ण मोकळेपणाने, आनंदाने आणि आत्मविश्वासाने सार्वजनिक प्रांगणात स्वत:चा आनंद साजरा करत आहेत. नंदादीपाची ती शांत ज्योत आज ्त्रिरयांच्या या आत्मविश्वासाच्या आणि उत्साहाच्या रूपाने अधिक व्यापक आणि तेजस्वी झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही.
नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा आणि देवीच्या विविध रूपांचा जागर. शैलपुत्रीपासून ते सिद्धिदात्रीपर्यंत, जगदंबेची नऊ रूपं जशी तिच्या विविध पैलूंची ओळख करून देतात, तशीच ती आपल्या आसपासच्या प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या अथांग शक्तीची जाणीव करून देतात. तिचं शांत, संयमी रूप जितकं वंदनीय असतं, तितकंच अन्यायाविरुद्ध पेटून उठणारं तिचं महाकाली रूपही तितकंच हवंहवंसं असतं. आजच्या काळात तर हा उत्सव केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता, स्त्रीच्या कर्तृत्वाचा, तिच्या अस्तित्वाचा आणि तिच्या स्वाभिमानाचा सोहळा बनला आहे. स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचा हा काळ. दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या रूपाने आपण शक्ती, समृद्धी आणि ज्ञानाची पूजा करतो. आजच्या काळात जेव्हा आपण आजूबाजूच्या ्त्रिरयांकडे पाहतो. ती कामावर जाणारी आई असो, कुटुंबाची काळजी घेणारी आजी असो वा स्वत:ची स्वप्नं पूर्ण करणारी मुलगी असो. प्रत्येकीमध्ये या अष्टभुजेचाच एक अंश दिसत राहतो.
संस्कृती ही नदीसारखी प्रवाही असते. काळ बदलला की उत्सवाचे कॅनव्हासही मोठे होतात. डीजेचा ताल किंवा दिव्यांचा झगमगाट हा आजच्या तरुण पिढीची भाषा आहे. कधी कधी तो कंठाळी, कर्णकर्कश होऊन रंगाचा बेरंगही करू शकतो; परंतु महत्त्वाचं हे आहे की, या नव्या माध्यमांद्वारेही आजची तरुण पिढी आपल्या मुळांशी म्हणजेच देवीच्या उत्सवाशी जोडली जात आहे. भोंडल्याची जागा गरब्याने घेतली असली तरी त्यामागील ‘एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची’ भावना तीच आहे. तंत्रज्ञानामुळे परदेशात राहणारे भारतीय ‘लाइव्ह’ दर्शनाच्या माध्यमातून थेट मंदिरांशी जोडले जातात. डिजिटल पेमेंट, ऑनलाइन बुकिंग आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली आहे. नवोदित कलाकार, संगीतकार आणि नृत्य कलाकारांना नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपली कला सादर करण्याची मोठी संधी मिळते. यामुळे आपली पारंपरिक लोककला आधुनिक ढंगात टिकून राहण्यास मदत झाली आहे.
थोडक्यात सांगायचं तर, आजचा नवरात्र उत्सव हा आपल्या प्राचीन परंपरांचा आदर करत आधुनिक विचारांची जोड देणारा ठरत आहे. पूर्वीचा सण शांत होता, तर आजचा सण ‘उत्सवप्रिय’ आहे. आजच्या मानसिक तणावाच्या युगात माणसाला आपल्या भावना, थकवा आणि ताण विसरण्यासाठी एका मोठ्या ऊर्जेची गरज असते. गरब्याचा तो ढोल आणि संगीताचा ठेका माणसाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो, जिथं तो स्वत:ला पूर्णपणे विसरून आनंदी होतो. नंदादीपाची ती स्निग्ध, शांत आणि आश्वासक ज्योत आजही आपल्या मनात तशीच तेवत आहे. बदललेला हा झगमगाट आणि गोंधळ म्हणजे त्या शांत ज्योतीतून निर्माण झालेला एक प्रचंड ऊर्जास्रोत आहे. पूर्वीच्या कौटुंबिक नवरात्राने आपल्याला ‘संस्कार आणि शांतता’ दिली, तर आजच्या सार्वजनिक नवरात्राने आपल्याला ‘उत्कटता आणि सामाजिक एकता’ दिली आहे. रूप बदललं तरी मूळ तत्त्व तेच आहे, ‘उत्सव स्त्रीशक्तीचा, उत्सव जगण्याचा!’
madhavimasurkar@gmail.com
