उर्जिता कुलकर्णी
एरिआना हिफग्टन- ‘द हिफग्टन पोस्ट’ (द हफ पोस्ट) या सुप्रसिद्ध ऑनलाइन पोर्टलची संस्थापक. स्वत:चं वैयक्तिक लिखाण आणि ‘द हफ पोस्ट’ इथला भार, खासगी आयुष्यातले अनेक चढउतार, शिवाय स्वत:साठी म्हणून मिळणारा नगण्य वेळ, यातून एरिआना एका विचित्र स्थितीला पोहोचते. काम करताना एके दिवशी ती अचानक तिच्याच टेबलावर चक्कर येऊन पडते. तिला जाग येते तेव्हा खऱ्या अर्थानं तिचे डोळे उघडतात.. आणि एरिआना ‘थांबायचं’ ठरवते! २००७ मध्ये घडलेल्या या प्रसंगानं तिला आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावंसं वाटतं, ते म्हणजे आवश्यक झोप!
लिली सिंग- सुप्रसिद्ध यूटय़ूबर. तिच्या जवळपास १४ लक्ष सभासदांसमोर व्हिडीओद्वारे सांगते, की ती आता अशा एका स्थितीला पोहोचलीय, की आपल्या चाहत्यांसाठी एकही पोस्ट चॅनलवर टाकणं या स्थितीत तिला शक्यच नाहीये. ती काही काळ चक्क ‘थांबतेय’.
रोहित- वय ३८. नामवंत चित्रकार. एके दिवशी स्टुडिओत काम करत असताना अचानक त्याला त्या सगळय़ाचा तिटकारा येतो. आपल्याला सर्वात प्रिय असणाऱ्या कामाविषयी हे कसं डोक्यात आलं, म्हणून त्याला वाईट वाटतं. तरीही काही दिवस तो तसाच काम पूर्ण करू पाहतो. ते शल्य बोचत राहतं. प्रचंड अस्वस्थ वाटत राहातं. आपल्याकडून कलेचा अपमान होतोय असं वाटून तो स्टुडिओतून तडक बाहेर पडतो. हे का झालं या प्रश्नानं तो पोखरला जातो.
मोहनराव – निष्णात स्त्रीरोगतज्ज्ञ. वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी एका क्लिष्ट, परंतु यशस्वी शस्त्रक्रियेनंतर अचानक संतापानं आपल्या हाताखालची डॉक्टर मंडळी, परिचारिका यांना फैलावर घेऊन तोंडसुख घेतात. कायम शांत, सुस्मित, मितभाषी असणाऱ्या आपल्या सरांना काय झालं, हा प्रश्न सगळय़ांनाच पडतो तसाच त्यांना स्वत:लाही. यानंतर फार उत्तम प्रॅक्टिस असतानाही आपलं रुग्णालय आपल्याच एका हुशार विद्यार्थ्यांच्या हवाली करून सहा महिने ते निव्वळ स्वस्थ बसून राहतात.
धात्री- ३३ वर्षांची टीव्ही रिपोर्टर. प्रचंड कष्टानं इथपर्यंत पोहोचून दिवसरात्र काम करणारी. एक मुलाखत घेत असताना ती दोन-तीनदा शब्द, वाक्य चुकते. वरिष्ठ मंडळी लगेच तिच्याऐवजी उपलब्ध असणारे इतर पर्याय निवडून, तिला ‘कामाकडे लक्ष दे’ बजावतात. काम हेच ध्येय असणारी धात्री अवाक होते. दुसऱ्या दिवशी ती चॅनलमधून ‘बाहेर’ पडते.
जान्हवी- चाळिशीची गृहिणी. स्वत: वकील असलेली जान्हवी आनंदानं पूर्णवेळ गृहिणीपद स्वीकारते. १७ वर्षांचा संसार, दोन मुलं. नवरा-बायकोत भांडणं ही असणारच या सामंजस्यानं जान्हवी बहुतेक वेळा पडती बाजू घेते. नवऱ्याला कामात मिळालेल्या बढतीच्या निमित्तानं ती स्वत: मित्रमंडळी, आप्तेष्ट यांना बोलावून मोठा समारंभ करते. ऐन समारंभात इतक्या मंडळींत तिला एकटेपणा गाठून येतो. ‘आपण इथे का आहोत’ हा प्रश्न पडतो आणि जान्हवी नवऱ्यापासून वेगळं व्हायचा निर्णय घेते.
या सगळय़ा प्रसंगांत ज्या स्थितीला या व्यक्ती पोहोचल्या त्या स्थितीचं नाव- ‘बर्न-आऊट’! म्हणजे नेमकं काय?
साध्या, कळेल अशा भाषेत सांगायचं, तर ‘आम्हाला बास!’. लहानपणी खेळताना कोणत्याही कारणानं खेळ नकोसा वाटला, तर आपण कसं ‘आम्हाला बास’ म्हणत त्या खेळातून बाहेर पडत होतो, तसंच. मात्र हे लक्षात येणंच मोठेपणी अवघड होऊन बसतं. लक्षात आलं, तरीही असं सहजासहजी थांबता येणार नाही अशी भीती, शंका आणि बरेच विचार असतात. जिथे ‘आम्हाला बास’ असं वाटलं, तिथेच मजा संपली, म्हणजेच खेळाचा उद्देश संपला! काम, व्यवसाय डोईजड होऊन त्याबाबत सतत एक ताण असणं, कामाविषयी ओढ न वाटता तिटकारा वाटायला लागणं, महत्त्वाचं म्हणजे त्यातला आनंद, समाधान, कर्तव्यपूर्तीची जाणीव इत्यादी हरवून केवळ एक रितेपणा, फोलपणा वाटत राहणं, आता इथून पुढे काम होणं शक्य नाही ही तीव्र जाणीव, तशीच लक्षणं म्हणजे बर्न-आऊट!
कंटाळवाणं, निरस म्हणून सोडलेलं काम किंवा जमत नाहीये म्हणून मध्येच सोडून दिलेला एखादा शैक्षणिक अभ्यासक्रम, नावीन्याच्या हौसेपोटी ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अनेक कामं, जबाबदाऱ्या यांची सुरुवात करून तडीस काहीच न्यायचं नाही, हे म्हणजे ‘बर्न-आऊट’ नव्हे. काम, व्यवसाय याचप्रमाणे नात्यांमध्येही ही अवस्था येते. सध्या अनेक नाती इथे पोहोचलेली आहेतच; पण यात आणि
‘बर्न आऊट’मध्ये फरक आहे.
आपण ‘बर्न आऊट’पर्यंत कसे पोहोचलो/ पोहोचतो –
१. सवयी तयार होणं, राहणं, पुढे त्याचं रूपांतर स्वयंचलित यंत्रणेत होणं-
(autopilot mode!) आपण रोजच जवळपास ४० ते ५० टक्के गोष्टी केवळ सवयीनं करत असतो. एखादी सवय लागणं/ तयार होणं, यासाठी एक प्रक्रिया किंवा पद्धत म्हणू, मेंदूकडून राबवली जाते. मिळणारे संकेत- त्यानुसार वागणूक- आणि त्याचं प्रतिफळ. यातून सवय तयार होते, वाढीस लागते. प्रतिफळ किंवा ‘रिवॉर्डस’ हा यातला महत्त्वाचा घटक. सवयी तयार होण्यातून मेंदूचा फायदा असा, की नेहमीच्या, त्याच त्याच कार्यासाठी मेंदूचा प्रवाह ठरवून घेता येतो. त्याची ऊर्जा तिथे खर्ची पडत नाही. अशानं मेंदूला इतर रचनात्मक किंवा नवीन/ हवं ते करण्यासाठी मोकळीक मिळते.
रोजच्या सवयींची काही उदाहरणं-ठरलेल्या मार्गानं रोज ठरलेल्या ठिकाणी जाणं, रोजची आन्हिकं उरकणं इत्यादी. हे मेंदूमध्ये इतकं जसंच्या तसं कोरलं जातं, की त्यासाठी विचार करायची गरजच नसते. आपण हळूहळू नकळत अनेक गोष्टी अशा सवयींमध्ये परावर्तित करत असतो. यात एक मेख अशी, की आपलं काम, व्यवसाय, पेशा याबाबतही अशा ‘सवयी’ कधी जडतात, हे आपल्याला कळतही नाही. स्वयंचलित यंत्रणेसारखं आपलं काम, आयुष्यही होऊन जातं. यात मजाच उरत नाही. आव्हानं संपतात. सुरुवातीचा आनंद, समाधान, सगळंच हरवून बसतं. सगळं एकसुरी झालंय हे कळायलाही वेळ लागतो. त्याचं कारण या सवयींचं असणारं प्रतिफळ. अर्थात प्रचंड सांपत्तिक, सामाजिक, मानसिक मोबदला. त्यातून येणाऱ्या सुखसुविधा. एकंदर आरामदायक, सुखवस्तू आयुष्य. आयुष्याला प्राप्त झालेला अर्थ, मिळालेला उद्देश. त्यानुसार समाजमनानुसार आपली ठरणारी पातळी/स्तर. त्यातून स्वत:च्या असण्याला प्राप्त होणारा अर्थ इत्यादी. इथे प्रश्न पडतो, की इतकं सगळं असूनही आनंदी का वाटत नाही? दुसरं, या स्वयंचलित प्रक्रियेनं आपण ज्या विशिष्ट पद्धतीनं काम करत राहतो, त्यात आपली स्वत:ची मानसिक, शारीरिक, सामाजिक किती झीज होतेय हे पाहण्यासाठी फुरसतच नसते. इथे अनेकदा काम, त्याची पद्धत प्रवाहीपणे होतही असते. हा तयार होणारा प्रवाह (flow) तारक-मारक दोन्हीही! तारक यासाठी की एकदा का तो नाद निर्माण झाला की आपण त्यात मग्न होऊन आपापलं काम अत्यंत काटेकोरपणे, बिनचूक करत राहतो. त्याच्या शेवटी मिळणारं प्रतिफळ म्हणजे कर्तव्यपूर्ती किंवा उद्देश साध्य झाल्याचं किंवा त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न घडल्याचं समाधान. कोणत्याही व्यवसायात, नोकरीत, हे आपण नेमकं का करतोय हा उद्देश ठळक असेल, आपल्या मेंदूत त्याच्या एकंदर मोबदल्याविषयीचे ठोकताळे तयार असतील आणि बराच काळ ते थोडय़ाफार फरकानं तसंच घडत राहिलं, तर मात्र, आपल्यातच कधी त्याची स्वयंचलित यंत्रणा तयार झाली हे कळणं कठीण; पण नंतर त्याचे दुष्परिणाम ‘बर्न-आऊट’ च्या स्वरूपात पुढे येतात. नेहमी समोर येणारे काही संवाद बघू या-

‘मी प्रचंड कामसू आहे. कामाशिवाय मला काहीच सुचत नाही.’ (वर्कहोलिक)

How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

‘गरज पडली तर मी रात्री जागूनसुद्धा ‘हे’ पूर्ण करीन.’ (इथे ‘हे’च्या जागी काहीही ठेवा. काम, लिखाण, पुस्तक, सिनेमा, खाद्यपदार्थ, कपडे इत्यादी.)

‘मला २४ ताससुद्धा कमी पडतात. सतत बिझी राहिलेलं उत्तम.’

‘एका दिवसात सगळं बसवायचं असतं. व्यायाम, माझे क्लास, काम, लोकांना भेटणं’.

‘गोष्टी हाताबाहेर चालल्या की चिडचिड होतेच. सगळं सांभाळणं किती क्लिष्ट आहे; पण करावं लागतंच.’

‘माझं काम किंवा ‘या’ गोष्टी माझ्याशिवाय कोणीच करू शकत नाही.’ ही वाक्यं पौगंडावस्थेतल्या मुलांपासून ते प्रौढांपर्यंत कोणाच्याही तोंडी ऐकू येतील. असं बोलणाऱ्याविषयी त्या क्षणी एक प्रचंड आदर दिसतो. त्याचं कारण ‘ सतत कार्यमग्न राहिलं पाहिजे’ किंवा ‘कामात बदल हीच विश्रांती!’ यांसारखे आपल्यावर बिंबवलेले आणि आपल्यात संपूर्ण भिनलेले सुविचार. मॅक्स वेबर या लेखकानं आपल्या ‘The Protestant Ethic and the Spirit of Capitalism’ या पुस्तकात एकंदर संगपरित्यागी वृत्ती, ज्यामध्ये आनंद, समाधान याहीपेक्षा नैतिकता हा मध्यिबदू धरून त्यानुसारची वागणूक प्रमाण मानून समाजाची संरचना कशी होत गेली, हे लिहिलं आहे. राग, उद्वेग, इत्यादी भावना व्यक्त करण्याऐवजी त्यांचा निचरा ‘नैतिकदृष्टय़ा योग्य’ अशा कृतीतून व्हायला हवा, या विचारानं मूळ धरत भांडवलशाहीला प्रोत्साहन कसं दिलं गेलं, या संदर्भात त्यांनी विस्तारानं लिहिलं आहे. आता लक्षात येईल, की ‘कार्यमग्नता’ इथेच आपल्या सगळय़ांची आयुष्यं का अडकून आहेत ते. भांडवलशाहीशी याची नाळ कशी जुळलेली आहे, हे तर सुस्पष्ट आहेच. मूल जन्माला आल्यापासून उत्तम शिक्षणासाठी नावाजलेली शाळा, त्याला सर्वगुणसंपन्न बनवण्यासाठी वेगवेगळे छंद, खेळ, व्यायाम, कला इत्यादींची बळजबरीची जोड. त्याहीसाठी सर्वोत्तम ‘शिक्षण’ देण्याचा प्रयत्न. तेच देशात-परदेशातल्या उच्च शिक्षणाबाबत. पुढे नोकरी, कामधंदा, व्यवसाय, पेशा याबाबत. जोडीदार निवडतानाही हेच निकष. यातून वर म्हटल्याप्रमाणे समाजात प्रतिष्ठित, सर्वोच्च स्तरात स्थान मिळवत स्वत:ला सिद्ध केल्याचं सततचं तकलादू समाधान. नंतर हे टिकवण्यासाठी याच जीवनशैलीपाठीमागे सतत धावत राहणं. त्यातली जीवघेणी स्पर्धा. त्यात मागे पडणं म्हणजे गुन्हा. त्यातून इहवादामागे जात प्रचंड मालमत्ता तयार होत जाते किंवा केली जाते. २-३ घरं, एखादं ‘वीकेण्ड-होम’, शेतजमीन, पैसे, दागिने, कपडे, गाडय़ा, उपकरणं, सगळंच! मोठी दमवणारी यादी. शिवाय ही सगळी स्वप्नं लीलया पूर्ण करता येतील असं फसवं वचन देत, क्रेडिट कार्ड किंवा विविध र्कज आपल्या उंबऱ्यापाशी. अर्थात ते फेडण्याची तुमची पात्रता आहे ना, हा एक खोचक प्रश्न विचारत, आपल्या अहंगंडाला हात घालत, आपल्याद्वारे आपल्याच समोर प्रचंड कर्जाचे डोंगर उभे केले जातात. त्यासाठीही पळत राहा. यातून आपसूक आपल्या मुलांनाही किती तरी तयार बाबी मिळतील, हाही विचार. शिवाय ‘अजून काही वर्ष पळून नंतर मस्त मजा करूयात’ यात ‘नंतर’ म्हणजे नेमकं कधी हे ठरलेलं नसतं. या सगळय़ा साखळीत तुटपुंज्या बाबींवर समाधान मानणाऱ्या व्यक्ती म्हणजे केवळ नाकर्त्यां, अशी भलामण करत आपण मात्र अक्षरश: आंधळे, बहिरे आणि संवेदनाशून्य होत होत होईल तितकं करत राहतो. याचा परिणाम- ‘बर्न-आऊट’.

नाती आणि बर्न-आऊट
या सगळय़ात स्वत:चं स्वत:बरोबरचं नातं संपायला सुरुवात होते. तसंच ते इतर नात्यांतही होतंच. कुटुंब म्हणजे केवळ एकत्र राहणारी माणसं असं चित्र सगळीकडे दिसू लागलं आहे, हे खेदानं मान्य करावंच लागतं. प्रत्येकाच्या धावण्यात संवाद संपतात. इथे गृहिणी म्हणून काम करणाऱ्या स्त्रियाही यातून वाचत नाहीत. कारण त्यांची यात इतरांबरोबर निरिच्छेनं कुतरओढ होते. शिवाय प्रत्येकाला एका मोठय़ा समस्येला तोंड द्यायला लागतं, ते म्हणजे एकाकीपण. यातून घर ही केवळ आपल्यातल्या नकोशा बाबी, पसरून ठेवायची जागा होऊन जाते. म्हणूनच सतत चिडचिड, बेबनाव, संताप, मानसिक-शारीरिक हिंसाचार, असं घडायला सुरुवात होते. घराशिवाय इतर ठिकाणी आपल्याला राग येतोय, मनस्ताप होतोय, उदास वाटतंय हे सांगणं, दाखवणं शक्य नाही. कारण समाजानं प्रत्येकाच्या कार्यपद्धतीनुसार एक प्रतिमा ठरवलेली असते आणि काहीही झालं तरीही त्याला तडा न जाऊ देता, आपलं स्थान अबाधित ठेवणं हे सततचं आव्हान असतं. संतापानं किंवा योग्य बाबतीत चीड आली म्हणून त्राग्यानं बोलणं, प्रसंगी स्वत:ला वाचवण्यासाठी दोन हात करणं, याकडेही वक्रदृष्टीनंच पाहिलं जातं. तेच आणि तसंच पारंपरिक विचारसरणीनं घरात, समाजात आखून दिलेल्या ज्येष्ठ-श्रेष्ठ या मानपानाबाबत. उदा. मोठय़ांच्या चुका मुलांनी दाखवणं वाईट किंवा स्त्रियांनी मतप्रदर्शन करणं हास्यास्पद. पस्तिशीपासून पन्नास-पंचावन्न वयात सर्वाधिक दिसणारं आकस्मिक मृत्यूंचं प्रमाण, यामागे हे एकाकीपण, कुचंबणा यांच्या परिणामांचा निश्चितपणे मोठा वाटा आहे, यात शंका नाही. स्त्री-पुरुष नातेबंधांमध्ये तर एखादा जोडीदार आत्यंतिक ताणातून जात शेवटी या स्थितीला येतो. त्यामुळे प्रेम-लग्न-एकत्र राहणं, हे सगळंच अचानक तकलादू झालंय की काय, असं त्या व्यक्तीला वाटू लागतं. ‘बर्न-आऊट’ ओळखायचा कसा?
विनाकारण सतत चिडचिड. रागाचा अचानक स्फोट होऊन अनेकदा तारतम्य सोडून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणं. टोकाच्या प्रतिक्रिया बाहेर पडणं.

सतत उदास, निराश, अवस्था, अस्वस्थता. – साध्या-सोप्या गोष्टींचं विस्मरण. उदा. व्यक्तींची नावं, आज कोणता वार आहे, हे विसरणं. नेहमीचे रस्ते विसरणं. बोलताना अचानक मुद्दे विसरून जाणं. नेहमीच्या वस्तू- मोबाइल, चाव्या इत्यादी सतत शोधत राहणं.
निद्रानाश किंवा झोपेच्या तक्रारी.
एकाग्रतेचा अभाव. लोकांमध्ये असताना विषयांचा संबंध न लागणं किंवा आपल्याच विचारांची तंद्री लागणं. काम करताना प्रचंड गोंधळ उडणं.
व्यसनाधीनता, आत्महत्येचे विचार, आयुष्याला उद्देश नाही, इतिकर्तव्यता नाही, असं वाटून त्याचं शल्य बोचत राहणं.
आत्मविश्वास गमावणं, हतबलता, काम वेळेत पूर्ण न होणं.
कामातून आनंद, समाधान न मिळणं.

प्रचंड मानसिक, शारीरिक थकवा, काहीही करण्याची निरिच्छा. अंगदुखी, पाठदुखी, डोकेदुखी इत्यादी. श्वास घ्यायला त्रास.
लवकर ओळखून थांबता आलं नाही, तर त्याची तीव्रता वाढून अंधारी, चक्कर येणं.
सगळय़ा नातेसंबंधांमध्ये प्रचंड अस्थिरता. जवळच्या लोकांना आपल्या वागण्यानं सतत दुखावणं. यातून आपण सतत कमी पडतोय, हवं त्या पद्धतीनं काम करत नाहीये, आपण आपल्या क्षमतांचा वापर करत नाहीये ही भावना वाढीस लागते आणि त्यामुळे कामाचे तास अधिक वाढवले जातात. शिवाय यातून निर्माण होणारी अनामिक भीती घालवण्यासाठी नाती आणि त्यातला ताण टाळण्यासाठीसुद्धा काम हाच एक उपाय केला जातो. त्यातून हे चक्र सुरूच राहतं. महत्त्वाची गोष्ट ही, की ‘बर्न-आऊट’ म्हणजे नैराश्य, डिप्रेशन नाही. नैराश्य नेमकं कशामुळे आलंय हे ठरवणं अवघड असतं, मात्र‘बर्न-आऊट’मध्ये त्यासाठीची कारणं माहिती असतात. अनेकदा ती कामासंदर्भात असतात. ‘बर्न-आऊट’ला पुढे जाऊन नैराश्याचा एक भाग असं म्हणता येईल.

यावर उपाय काय?
अत्यंत सोपा उपाय म्हणजे ‘थांबणं’. परिणामांची चिंता न करता चक्क थांबणं. कामाच्या वेळा ठरवून त्या काटेकोरपणे पाळणं. यात कामासंदर्भातले फोन, ई-मेल्स किंवा इतर काहीही कटाक्षानं बाजूला सारून उरलेला वेळ स्वत:साठी वापरणं. काही पेशांबाबत हे अगदी तंतोतंत पाळता आलं नाही, तरीही ही आपली महत्त्वाची गरज आहे हे ओळखून काम करणं.
केवळ आपणच हे करू शकतो, हे डोक्यातून काढून, योग्य पद्धतीनं कामांची, त्यांच्या जबाबदाऱ्यांची विभागणी करून, ते पूर्ण विसरून जाणं.- आपण, आपल्या क्षमता इत्यादी कुठेही, कोणासमोरही- स्वत:लाही सिद्ध करून दाखवायची गरजच नाही हे मनावर ठसवून घेणं.
कार्यमग्नता, महत्त्वाकांक्षा हे कितीही आव्हानात्मक असलं, तरीही त्यापाठी न धावणं. आपण स्वत: आपल्याला आवडणाऱ्या बाबींशी फारकत न घेणं.
व्यवस्थित आहार, वेळच्या वेळी खाणं, पुरेशी झोप, हलका व्यायाम ही चतु:सूत्री पाळत राहणं. काही वेळेस ते शक्य झालं नाही तर त्यावर फार विचार न करता दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न करणं.स्वत:बाबत फार काटेकोर राहात उगाच अवाजवी, अवास्तव निकष बनवून ते पाळले गेलेच पाहिजेत या मानसिकतेतून बाहेर पडणं.
स्वत:ला काय झेपतंय याचा विचार करत अनेक बाबतींत थेट नाही म्हणणं. लोकांचं मन राखण्यासाठी किंवा अनावश्यक कर्तव्यनिष्ठता दाखवत रात्रीची झोप कमी करणं वा निरिच्छेनं एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावणं नकोच.
काही बाबतींत मला येत नाही, जमत नाही, हे स्वीकारून त्याबाबत निवांत असणं.
कोणतंही काम करताना त्यात मजा येतेय इथपर्यंतच ते करत राहणं. सरधोपट नोकरी करणाऱ्यांसाठी तर फारच सोपं आहे. कारण तिथे मजा नसली, तरी महिन्याअखेरीस असणारं अर्थार्जन इतकंच बघितलं जातं. तिथे तर कामाचा ताण घेण्याची, त्याला वाहून घेण्याची गरजच नाही.
गरज आणि चैन यातला फरक ओळखून, सुखासीन आयुष्य करण्याच्या, पैसे कमावण्याच्या नादात छोटय़ा-मोठय़ा आनंदांना न गमावणं.
काहीही न करता, म्हणजे मोबाइल, टीव्ही, पुस्तक वाचन, कोणाशी बोलणं, याशिवायही निवांतपणे आपल्या स्वत:सोबत सहजतेनं राहायला शिकणं.
यासाठी सगळय़ांत मोठं औषध म्हणजे आजूबाजूचा निसर्ग. त्यासाठी फार कुठे लांब हिमालयात किंवा जंगलातच जाण्याची गरज नसते. घरात लावलेल्या चार कुंडय़ा, फुलवलेली छोटी बाग, डोक्यावर असणारं आकाश, रस्त्यावरची झाडी, प्राणी-पक्षी हे सगळंच कायम अवतीभवती असतं. ते कोणत्याही निरीक्षणाशिवाय नुसतं पाहता, अनुभवता आलं पाहिजे.
ज्या वेळेस जे करतोय, ती एकच गोष्ट मनोभावे करणं. म्हणजे खात असताना केवळ त्याचा आस्वाद घेणं. कार्यबाहुल्याची किंवा सतत अष्टावधानी असण्याची गरज नसते.
‘बर्न-आऊट’ ही काही तात्पुरती अवस्था नसते. ती एक धोक्याची घंटा आहे. त्यामुळे एखादी १० दिवसांची सुट्टी किंवा थोडा काळ कामापासून, एखाद्या विशिष्ट नात्यातून दूर राहाणं, हा त्यावर उपाय असू शकत नाही. त्यासाठी ठोस पावलं उचलत, आपल्या मेंदूला नव्या सवयी सावकाश, हळुवार शिकवायला लागतात. मेंदू आणि आपली गट्टी जमवून त्याला या ताणातून कायमचं बाहेर काढावं लागतं. ‘आम्हाला बास’ हे सूत्र लक्षात ठेवून, खेळातून वेळीच बाजूला व्हायला हवं.
ताण वा स्ट्रेस हे आज परवलीचे शब्द झाले आहेत. आजच्या स्पर्धेच्या जगात तो असतोच प्रत्येकाला. काही वेळा तो असणंही काम चांगलं होण्यासाठी गरजेचं असतं, पण जेव्हा सगळय़ाच गोष्टींचा उबग यायला लागतो, तोचतोचपणा अंगभर वेढून राहतो, कंटाळवाणेपणामुळे काही करण्याची इच्छाच मरून जाते, सगळं सोडून कुठे तरी पळून जावंसं वाटतं.. ती लक्षणं मात्र धोकादायक असतात.. तुमच्यातल्या ताणाची पातळी ओलांडून तुम्ही घातक दिशेनं निघाला आहात हेच ती लक्षणं सांगत असतात. तो
बर्न-आऊट! थांबायला हवं हे सांगणारा.. काय करायला हवं ती वेळ येऊ नये यासाठी?..
(लेखिका होमिओपॅथिक तज्ज्ञ असून मानसोपचार आणि लैंगिक समस्यांवर समुपदेशन करतात.)
urjita.kulkarni@gmail.com