उर्जिता कुलकर्णी
एरिआना हिफग्टन- ‘द हिफग्टन पोस्ट’ (द हफ पोस्ट) या सुप्रसिद्ध ऑनलाइन पोर्टलची संस्थापक. स्वत:चं वैयक्तिक लिखाण आणि ‘द हफ पोस्ट’ इथला भार, खासगी आयुष्यातले अनेक चढउतार, शिवाय स्वत:साठी म्हणून मिळणारा नगण्य वेळ, यातून एरिआना एका विचित्र स्थितीला पोहोचते. काम करताना एके दिवशी ती अचानक तिच्याच टेबलावर चक्कर येऊन पडते. तिला जाग येते तेव्हा खऱ्या अर्थानं तिचे डोळे उघडतात.. आणि एरिआना ‘थांबायचं’ ठरवते! २००७ मध्ये घडलेल्या या प्रसंगानं तिला आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावंसं वाटतं, ते म्हणजे आवश्यक झोप!
लिली सिंग- सुप्रसिद्ध यूटय़ूबर. तिच्या जवळपास १४ लक्ष सभासदांसमोर व्हिडीओद्वारे सांगते, की ती आता अशा एका स्थितीला पोहोचलीय, की आपल्या चाहत्यांसाठी एकही पोस्ट चॅनलवर टाकणं या स्थितीत तिला शक्यच नाहीये. ती काही काळ चक्क ‘थांबतेय’.
रोहित- वय ३८. नामवंत चित्रकार. एके दिवशी स्टुडिओत काम करत असताना अचानक त्याला त्या सगळय़ाचा तिटकारा येतो. आपल्याला सर्वात प्रिय असणाऱ्या कामाविषयी हे कसं डोक्यात आलं, म्हणून त्याला वाईट वाटतं. तरीही काही दिवस तो तसाच काम पूर्ण करू पाहतो. ते शल्य बोचत राहतं. प्रचंड अस्वस्थ वाटत राहातं. आपल्याकडून कलेचा अपमान होतोय असं वाटून तो स्टुडिओतून तडक बाहेर पडतो. हे का झालं या प्रश्नानं तो पोखरला जातो.
मोहनराव – निष्णात स्त्रीरोगतज्ज्ञ. वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी एका क्लिष्ट, परंतु यशस्वी शस्त्रक्रियेनंतर अचानक संतापानं आपल्या हाताखालची डॉक्टर मंडळी, परिचारिका यांना फैलावर घेऊन तोंडसुख घेतात. कायम शांत, सुस्मित, मितभाषी असणाऱ्या आपल्या सरांना काय झालं, हा प्रश्न सगळय़ांनाच पडतो तसाच त्यांना स्वत:लाही. यानंतर फार उत्तम प्रॅक्टिस असतानाही आपलं रुग्णालय आपल्याच एका हुशार विद्यार्थ्यांच्या हवाली करून सहा महिने ते निव्वळ स्वस्थ बसून राहतात.
धात्री- ३३ वर्षांची टीव्ही रिपोर्टर. प्रचंड कष्टानं इथपर्यंत पोहोचून दिवसरात्र काम करणारी. एक मुलाखत घेत असताना ती दोन-तीनदा शब्द, वाक्य चुकते. वरिष्ठ मंडळी लगेच तिच्याऐवजी उपलब्ध असणारे इतर पर्याय निवडून, तिला ‘कामाकडे लक्ष दे’ बजावतात. काम हेच ध्येय असणारी धात्री अवाक होते. दुसऱ्या दिवशी ती चॅनलमधून ‘बाहेर’ पडते.
जान्हवी- चाळिशीची गृहिणी. स्वत: वकील असलेली जान्हवी आनंदानं पूर्णवेळ गृहिणीपद स्वीकारते. १७ वर्षांचा संसार, दोन मुलं. नवरा-बायकोत भांडणं ही असणारच या सामंजस्यानं जान्हवी बहुतेक वेळा पडती बाजू घेते. नवऱ्याला कामात मिळालेल्या बढतीच्या निमित्तानं ती स्वत: मित्रमंडळी, आप्तेष्ट यांना बोलावून मोठा समारंभ करते. ऐन समारंभात इतक्या मंडळींत तिला एकटेपणा गाठून येतो. ‘आपण इथे का आहोत’ हा प्रश्न पडतो आणि जान्हवी नवऱ्यापासून वेगळं व्हायचा निर्णय घेते.
या सगळय़ा प्रसंगांत ज्या स्थितीला या व्यक्ती पोहोचल्या त्या स्थितीचं नाव- ‘बर्न-आऊट’! म्हणजे नेमकं काय?
साध्या, कळेल अशा भाषेत सांगायचं, तर ‘आम्हाला बास!’. लहानपणी खेळताना कोणत्याही कारणानं खेळ नकोसा वाटला, तर आपण कसं ‘आम्हाला बास’ म्हणत त्या खेळातून बाहेर पडत होतो, तसंच. मात्र हे लक्षात येणंच मोठेपणी अवघड होऊन बसतं. लक्षात आलं, तरीही असं सहजासहजी थांबता येणार नाही अशी भीती, शंका आणि बरेच विचार असतात. जिथे ‘आम्हाला बास’ असं वाटलं, तिथेच मजा संपली, म्हणजेच खेळाचा उद्देश संपला! काम, व्यवसाय डोईजड होऊन त्याबाबत सतत एक ताण असणं, कामाविषयी ओढ न वाटता तिटकारा वाटायला लागणं, महत्त्वाचं म्हणजे त्यातला आनंद, समाधान, कर्तव्यपूर्तीची जाणीव इत्यादी हरवून केवळ एक रितेपणा, फोलपणा वाटत राहणं, आता इथून पुढे काम होणं शक्य नाही ही तीव्र जाणीव, तशीच लक्षणं म्हणजे बर्न-आऊट!
कंटाळवाणं, निरस म्हणून सोडलेलं काम किंवा जमत नाहीये म्हणून मध्येच सोडून दिलेला एखादा शैक्षणिक अभ्यासक्रम, नावीन्याच्या हौसेपोटी ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अनेक कामं, जबाबदाऱ्या यांची सुरुवात करून तडीस काहीच न्यायचं नाही, हे म्हणजे ‘बर्न-आऊट’ नव्हे. काम, व्यवसाय याचप्रमाणे नात्यांमध्येही ही अवस्था येते. सध्या अनेक नाती इथे पोहोचलेली आहेतच; पण यात आणि
‘बर्न आऊट’मध्ये फरक आहे.
आपण ‘बर्न आऊट’पर्यंत कसे पोहोचलो/ पोहोचतो –
१. सवयी तयार होणं, राहणं, पुढे त्याचं रूपांतर स्वयंचलित यंत्रणेत होणं-
(autopilot mode!) आपण रोजच जवळपास ४० ते ५० टक्के गोष्टी केवळ सवयीनं करत असतो. एखादी सवय लागणं/ तयार होणं, यासाठी एक प्रक्रिया किंवा पद्धत म्हणू, मेंदूकडून राबवली जाते. मिळणारे संकेत- त्यानुसार वागणूक- आणि त्याचं प्रतिफळ. यातून सवय तयार होते, वाढीस लागते. प्रतिफळ किंवा ‘रिवॉर्डस’ हा यातला महत्त्वाचा घटक. सवयी तयार होण्यातून मेंदूचा फायदा असा, की नेहमीच्या, त्याच त्याच कार्यासाठी मेंदूचा प्रवाह ठरवून घेता येतो. त्याची ऊर्जा तिथे खर्ची पडत नाही. अशानं मेंदूला इतर रचनात्मक किंवा नवीन/ हवं ते करण्यासाठी मोकळीक मिळते.
रोजच्या सवयींची काही उदाहरणं-ठरलेल्या मार्गानं रोज ठरलेल्या ठिकाणी जाणं, रोजची आन्हिकं उरकणं इत्यादी. हे मेंदूमध्ये इतकं जसंच्या तसं कोरलं जातं, की त्यासाठी विचार करायची गरजच नसते. आपण हळूहळू नकळत अनेक गोष्टी अशा सवयींमध्ये परावर्तित करत असतो. यात एक मेख अशी, की आपलं काम, व्यवसाय, पेशा याबाबतही अशा ‘सवयी’ कधी जडतात, हे आपल्याला कळतही नाही. स्वयंचलित यंत्रणेसारखं आपलं काम, आयुष्यही होऊन जातं. यात मजाच उरत नाही. आव्हानं संपतात. सुरुवातीचा आनंद, समाधान, सगळंच हरवून बसतं. सगळं एकसुरी झालंय हे कळायलाही वेळ लागतो. त्याचं कारण या सवयींचं असणारं प्रतिफळ. अर्थात प्रचंड सांपत्तिक, सामाजिक, मानसिक मोबदला. त्यातून येणाऱ्या सुखसुविधा. एकंदर आरामदायक, सुखवस्तू आयुष्य. आयुष्याला प्राप्त झालेला अर्थ, मिळालेला उद्देश. त्यानुसार समाजमनानुसार आपली ठरणारी पातळी/स्तर. त्यातून स्वत:च्या असण्याला प्राप्त होणारा अर्थ इत्यादी. इथे प्रश्न पडतो, की इतकं सगळं असूनही आनंदी का वाटत नाही? दुसरं, या स्वयंचलित प्रक्रियेनं आपण ज्या विशिष्ट पद्धतीनं काम करत राहतो, त्यात आपली स्वत:ची मानसिक, शारीरिक, सामाजिक किती झीज होतेय हे पाहण्यासाठी फुरसतच नसते. इथे अनेकदा काम, त्याची पद्धत प्रवाहीपणे होतही असते. हा तयार होणारा प्रवाह (flow) तारक-मारक दोन्हीही! तारक यासाठी की एकदा का तो नाद निर्माण झाला की आपण त्यात मग्न होऊन आपापलं काम अत्यंत काटेकोरपणे, बिनचूक करत राहतो. त्याच्या शेवटी मिळणारं प्रतिफळ म्हणजे कर्तव्यपूर्ती किंवा उद्देश साध्य झाल्याचं किंवा त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न घडल्याचं समाधान. कोणत्याही व्यवसायात, नोकरीत, हे आपण नेमकं का करतोय हा उद्देश ठळक असेल, आपल्या मेंदूत त्याच्या एकंदर मोबदल्याविषयीचे ठोकताळे तयार असतील आणि बराच काळ ते थोडय़ाफार फरकानं तसंच घडत राहिलं, तर मात्र, आपल्यातच कधी त्याची स्वयंचलित यंत्रणा तयार झाली हे कळणं कठीण; पण नंतर त्याचे दुष्परिणाम ‘बर्न-आऊट’ च्या स्वरूपात पुढे येतात. नेहमी समोर येणारे काही संवाद बघू या-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मी प्रचंड कामसू आहे. कामाशिवाय मला काहीच सुचत नाही.’ (वर्कहोलिक)

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need wait a bit ariana hifgton hifgutton post lily singh well known youtuber ariana amy
First published on: 21-05-2022 at 00:07 IST