नीला कचोळे
‘देवाचा स्पर्श’ ही भावना आहे. त्याची अनुभूती येण्यासाठी तशाच निरागस जाणिवेचं मन असावं लागतं. जीवनातल्या काही कटू अनुभवानं जीवनाशी थेट डोळे भिडवायचं धाडस दिलेलं नसताना तेच दु:ख जेव्हा मनात सहवेदना घट्ट रुजवतं, तेव्हा येणारे अनुभव हे देवत्वाचे असतात. ‘आधार’मध्ये मुलींबरोबर वावरताना लेखिकेला त्याचीच प्रचीती आली… त्यातलेच हे काही अनुभव.
असं म्हणतात की, कोणत्याही देवस्थानाला जायचं असेल तर, ‘बुलावा’ यावा लागतो. मला त्याचा अनुभव नाही आणि मी त्याबद्दल कधी विचारही केला नाही, पण आयुष्यातल्या काही गोष्टी आपल्याला त्यांच्याकडे ओढून नेतात, बोलावून घेतातच, यावर मात्र माझा विश्वास आहे. एक वेळ अशी होती जेव्हा जीवनाशी थेट डोळे भिडवायचं धाडस माझ्यात नव्हतं. मी धडपडत होते, चुकलेल्या कोकरासारखी सैरभैर झाले होते. पण त्या दु:खाने माझ्यात सहवेदना (एम्पथी) घट्ट रुजवली. कोणाच्याही दु:खाला ओलांडून जाणं माझ्या स्वभावात नव्हतंच. त्याला आता प्रत्यक्ष कृतीतून निवारण्याचा ठोस मार्ग मिळाला. ही वाट होती ‘आधार’ आश्रमाची! मला त्या वाटेचा ‘बुलावा’ आला म्हणा ना… आणि माझ्या दु:खाबरोबरच प्रेमाच्या, मायेच्या परिभाषा बदलल्या.
वेश्या व्यवसायात असलेल्या आईची मुलगी सोनी. सुरुवातीला तिच्या काळ्याभोर चमकणार्या डोळ्यात काठोकाठ पाणी भरलेलं असायचं. मला इथे राहायचं नाही, हाच धोशा..! पण हळूहळू तीही इतरांसारखीच तिथे रुळली. माझी वाट बघत राहायची, भेटले की माझा हात धरून सतत माझ्या मागे मागे चालायची. एकदा सुट्ट्या जवळ आलेल्या. आम्ही मामा /काका /आजीच्या घरी जाणार हे काही जणी मला उत्साहाने सांगत होत्या. खरंतर आठवण यावी असं घरच कोणाकडे नसतं ही इथली वस्तूस्थिती!
सोनी जोरजोरात मान हलवून मला म्हणाली, ‘‘पण मी घरी नाही जाणार.’’
‘‘का बरं?’’
‘‘ तो काका लई तरास देतो.’’ असं म्हणत तिनं तिची मान माझ्या खांद्यावर टाकली, तिच्या डोळ्यातले दोन कढत अश्रू माझ्या खांद्यावर टपटपले. माझ्याही डोळ्यात पाणी आलं आणि अंगावर हलका थरथर शहारा. देवाच्या दु:खाश्रूंचा स्पर्श एवढा दाहक असतो?
‘‘त्या वेडीकडे काय लक्ष देताय.’’ असं ऐकत सतत तुच्छतेच्या नजरेने घायाळ होणारी ती! निसर्गाचं चक्र चालू होतं. हळूहळू वयात येत होती! तारुण्यसुलभ भावना तिच्या ओढाळ नजरेत उमलू लागल्या होत्या. मग तिला छान दिसावंसं वाटू लागलं आणि मी भेटले की माझ्याकडे एकच हट्ट, ‘‘मला बांगड्या आण.’’ मी तिला एकदा छान हिरव्यागार चमचमत्या बांगड्या आणून दिल्या. ती एवढी खूश झाली की सगळीकडे बांगड्या घेऊन फिरली. दुसर्या दिवशी मी गेले तर रडवेलं तोंड करून माझ्याकडे आली. ‘‘आता काय झालं?’’ मी विचारलं. ती म्हणाली, ‘‘मला सगळ्या हसताहेत. म्हणतात, ‘लग्न झाल्यावरच हिरव्या बांगड्या घालायच्या असतात.’ माझं कुठे लग्न झालंय?’’ तिचा तो भाबडा, उदास चेहरा… मी तिची कशीबशी समजूत घातली. थोडे दिवस मी बाहेरगावी गेले होते त्यामुळे काही दिवसानंतर मी आश्रमात गेले तेव्हा ती धावत धावत माझ्याकडे त्या बांगड्या घेऊन आली. माझ्या हातात त्या बांगड्या ठेवल्या. म्हणाली, ‘‘तूच घाल माझ्या हातात.’’ आणि मला एकदम मिठीच मारली. माझ्या डोळ्यात पाणी आलं. खरंच देवाच्या मिठीचा स्पर्श एवढा वेडा असतो का?
वडिलांनी कष्टाने पैसे वाचवून थंडीच्या काळात खाण्यासाठी दिलेल्या खास मेथीच्या लाडवातला एक लाडू माझ्यासाठी धावत धावत घेऊन येणारी आणखी एक ‘ती’ मला आठवते. ‘‘खा ना गं ताई.’’ म्हणून माझ्या तोंडात प्रेमाने लाडूचा घास भरवणारी. देवाचा प्रसाद याहून काही वेगळा असतो?
‘आधार’आश्रमात पोहोचल्यावर वरच्या मजल्यावरच्या बाळांच्या खोलीत मी आधी चक्कर मारते. तिथे एका पाळण्यात अगदी चिमुकली मुलगी असायची. मी जायचे तेव्हा ती छान आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून झोपायच्या तयारीत असायची. गळ्यापर्यंत पांघरुणात गुरफुटून! स्वमग्नतेच्या किंचित काठावर रेंगाळणारं तिचं मन तिच्या चेहर्यावर काही वेळा अचानक चमकून जायचं. मी तिच्याजवळ जायचे माझा हात अलगद तिच्या छातीवर ठेवून तिच्याशी गप्पा मारायचे. कधी तिच्या काळ्याभोर जावळावर हात फिरवायचे. मग तिच्या चेहर्यावर हळूच हसू उमलायला लागायचं… झाडांच्या फांद्यांमधून उन्हाचे कवडसे चमचम चमकल्यासारखं… पहिल्यांदा तिचे ओठ हसायला लागायचे. हळूहळू ते हसू आधी सहज गुणगुणत आणि नंतर स्वच्छंद लकेर घेतलेल्या गाण्यासारखं चेहर्यावर निर्मळ पसरायचं. माझ्या हात तिच्यावर विसावलेला असायचा. मग ती थोडीशी चुळबुळ करत पांघरुणातून तिचे हात बाहेर काढायची. आणि किंचितसा कंप असलेले तिचे अगदी चिमुकले हात माझ्या त्या हातावर ठेवायची. तिचा तो कोवळा निरागस स्पर्श… क्वचित कधीतरी माझ्या मनातल्या हाकेला ‘ओ’ दिल्यासारखे तिचे हरवलेले डोळे माझ्या डोळ्यांकडे एखाद दुसरा क्षण थेट हसत बघायचे- सुद्धा! माझ्या डोळ्यात पाणी यायचं आणि अंगावर हलका आनंदी शहारा! देवाचं हास्य असंच असतं का?
मी प्रवेशदारातून आत गेले की, डावीकडच्या पसरट मोकळ्या चौथर्यावर – ती मुलगी बसलेली असायची. शेजारी दप्तर ठेवलेलं असायचं. तिच्या ‘स्पेशल’ शाळेच्या बसची ती वाट बघत असायची. तिच्यावर लक्ष ठेवून तिला बसमध्ये सोडायची जबाबदारी घेतलेली मावशी किंवा ताई काही अंतरावर रेंगाळत असायची. मी आत गेल्या गेल्या तिच्या शेजारी बसायचे. तिच्याशी गप्पा सुरू करायचे. गप्पा म्हणजे काय… तर, ‘शाळेत मज्जा येते ना, तुझ्या फ्रॉक वरची पिवळी फुलं किती छान आहेत गं! तुझं दप्तर बघू, आज डब्यात काय खाऊ घेतलास…’ असंच काही बाही मी बोलत राहायचे. ती क्वचित माझ्याकडे मान वळून बघायची. तिचे तिरके डोळे आणखीनच तिरके तिरके करायची. चेहर्यावर छापल्यासारखं एक भाबडं वेडगळ हसू असायचं. दप्तर, डबा हाताने माझ्यासमोर दाखवायचा प्रयत्न चालू करायची. हे आमचं अगदी नेहमीचं रुटीन. पण माझ्या मनात नेहमी एक उदास कढ यायचा. मी इतकी तिच्या मनाजवळ जायचा आटोकाट प्रयत्न करते आहे खरी, पण तिचा काहीच प्रतिसाद नाही म्हणजे नाहीच. काय करू? काय केल्यानं ती साद देईल?
एकदा आश्रमातला जिना चढत होते तर वरून पोरींचा एक लोंढा जिन्यावरून धावत खाली येत होता. मी जिन्याच्या मध्येच एका बाजूला थांबले. त्या लोंढ्यांमधली ती मुलगीही थांबली होती…चेहर्यावरच्या गोंदलेल्या वेड्या हास्याला सोबत घेऊन! आडवीतिडवी वेडीबागडी पावलं टाकत जिना उतरत होती. बरोबरीच्या मुलींसोबत धावण्याचा आटोकाट दुखरा प्रयत्न करत होती. मी थोडी आनंदानं, काळजीनं तिच्याकडे बघत होते. ती माझ्यापुढून खाली तीन-चार पायर्या उतरली आणि एकदम थांबली. तिनं कसंबसं वळून माझ्याकडे पाहिलं, आणि उलट वळून धडपडत माझ्याजवळ आली. एकदम माझा हात पकडला. एक दोन क्षण तसाच धरून ठेवला. मग हात हलकेच सोडून तिरक्या डोळ्यांनी तिरकं हसत वेडेवाकडे पाय टाकत खाली निघून गेली. मी स्तंभित होऊन खिळल्यासारखी उभी होते. तिचा हात घामाने ओला सर्द झाला होता. चिकट… मलिन… पण तिच्या स्पर्शात माझं मन ओळखल्याची मायाळू खूण होती. माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर हलका आनंदी शहरा…! देवाचा स्पर्श असाच असतो?
त्या दिवशी मुलींना सुट्टी होती. मी अभ्यासात मागे पडलेल्या मुलींना शिकवते. थोडा अभ्यास झाल्यावर, ‘‘गोष्ट सांग, गोष्ट सांग,’’ म्हणून एकच कल्ला… आमच्याकडे जलपरी आणि सिंड्रेलाच्या गोष्टी खूपच लाडक्या आहेत. त्या दिवशी सिंड्रेलाची फर्माईश झाली. माझ्या समोरच्या मुलीत नेहमी दोन बहिणी बसलेल्या असतात. धाकटी नेहमीच थोडासा उदास चेहरा करून असते. त्या दिवशी तर ती जरा जास्तच दु:खी वाटली. मी विचारलं तर नाक सुं सुं करून तिनं पुन्हा मान खाली घातली. कोणीतरी म्हणालं, तिला सर्दी झालीय वाटतं… तर तिची मोठी बहीण पोक्त चेहरा करून म्हणाली, ‘‘ताई, तिला पप्पांची आठवण येतेय. काल पप्पा इथे येऊन गेले ना. आता एकदम दिवाळीला आम्हाला घरी नेणारेत…’’ मनात तुटत होतं तरी मी, दिवाळीत मज्जा येणार वगैरे वगैरे सांगत गोष्ट सांगायला सुरू केली. आता आमच्या सिंड्रेलाच्या गोष्टीत तिचे पप्पा आले. ‘‘सिंड्रेला का बरं दुखी होती? तिला घरी खूप खूप काम तर करावं लागतच होतं, पण तिचे पप्पा दूर कोणत्यातरी गावी गेले होते ना म्हणून!’’ गोष्टीतल्या सारखे सिंड्रेलाचे पप्पा ये-जा करत होते. मी धाकटीच्या चेहर्यावरून हात फिरवला. तिचे डोळे पुसले. तिच्या रडव्या चेहर्यावर हसू आणण्यासाठी खूप खटपट केली. हळूहळू तिचं सुं सुं कमी झालं. माझ्याकडे बघून गोष्ट ऐकायला लागली. तर आता गोष्टीत सिंड्रेलाला घरात सोडून आई आणि बहिणी राजवाड्यात गेल्या. सिंड्रेला धाकटीसारखीच गालावर हात ठेवून दु:खी चेहर्याने बसली.
मी विचारलं, ‘‘मग सिंड्रेलाला आनंदी करायला कोण आलं?’’ मोठी हसर्या चेहर्याने पुढे झुकून म्हणाली, ‘‘ तू आलीस…..!’’ तिनं एक भली मोठी पेन्सिल माझ्यासमोर केली. ‘‘ही घे’’ म्हणाली. ती होती सिंड्रेलाच्या परीराणीची जादूची छडी!
प्रत्येक वेळी स्पर्श शरीराला पुलकित करतो असं नाही… तिच्या हसर्या डोळ्यांनी, पेन्सिल धरलेल्या तिच्या छोट्या छोट्या हातानं माझ्या मनाला, आत गाभ्याला स्पर्श केला.. माझ्या माणूसपणाचा सन्मान केला. दु:खी कष्टी सिंड्रेलाच्या चेहर्यावर आनंदाची फुलं फुलवणारी ही परीराणी! माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि अंगावर हलका आनंदी शहारा…! देवाचा स्पर्श असाच असतो का?
प्रत्येक वेळी स्पर्श शरीराला पुलकित करतो असं नाही, तिच्या हसर्या डोळ्यांनी, पेन्सिल धरलेल्या तिच्या छोट्या छोट्या हाताने माझ्या मनाला, आत गाभ्याला स्पर्श केला. माझ्या माणूसपणाचा सन्मान केला. दु:खीकष्टी सिंड्रेलाच्या चेहर्यावर आनंदाची फुलं फुलवणारी ही परीराणी! माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि अंगावर हलका आनंदी शहारा…!
देवाचा स्पर्श असाच असतो ना?
kachole.neela@gmail.com
