नीलिमा लेले
दिवाळी छान पार पडली. पहाटे थोडासा गारवा जाणवला आणि जीव सुखावला. वाटलं, आता जरा शाल-स्वेटर बाहेर काढून ठेवले पाहिजेत. दुपारी कपाट उघडलं आणि माझी आवडीची मऊसूत शाल बाहेर काढली. त्यावर प्रेमाने हात फिरवला. मनात आठवणींचं विणकाम सुरू झालं आणि चितळे काकूंची तीव्रतेने आठवण आली. ही शाल मला सांगली सोडताना काकूंनी दिली होती.
किती वर्षं झाली सांगली सोडून, पण दरवर्षी शाल बाहेर काढली की काकूंची आठवण येते. यांची बँकेची नोकरी. चार-पाच वर्षांनी बदली ठरलेली. या वेळेस गावही छान होतं. बदलीच्या नवीन गावी गेले. जागाही छान मिळाली. तरुण वय. सगळ्याचीच हौस. त्यामुळे मनाप्रमाणे जरा घर लागलं आणि ठरवलं, आता शेजारी-पाजार्यांची ओळख करून घ्यायची. संसाराचा अजून फार अनुभव नव्हता. रोज बाहेर जाता-येता शेजारच्या बंगल्यात एक काकू अंगणात बर्याचदा खुर्चीवर बसून विणकाम करताना दिसायच्या. छान अटकर बांध्याच्या, हसर्या चेहर्यावरचा गोडवा लक्ष वेधून घ्यायचा.
मनात आलं, एकदा बोलू या. विणकाम शिकायच्या नादाने ओळख करून घेता येईल असा विचार करून एका संध्याकाळी डब्यात कोथिंबीर वडी घेऊन मी त्यांच्याकडे गेले. त्या म्हणाल्या, ‘‘ये गं, रुळलीस का नवीन जागेत? कळलं मला तुम्ही नवीन आलात इथे ते. नाव काय तुझं ?’’ गोल गोरा चेहरा, त्यांच्या चेहर्यावर घरंदाजपणाचं तेज होतं, आपलेपणाने बोलल्या आणि मला काकू एकदम आवडून गेल्या. मग छान गप्पा झाल्या. असं रोज थोडं काकूंशी बोलणं व्हायचं. पण कधी काका मात्र बाहेर आले नाहीत.
असंच एकदा काकूंना विचारून मी विणकामासाठी लोकर, सुया घेऊन आले आणि सुरुवात करून घ्यावी म्हणून काकूंकडे गेले. तेवढ्यात, आतून काका बाहेर आले. लाल गोरा करारी चेहरा, रोखून पाहणारे डोळे. बाहेर निघाले होते बहुतेक.‘‘अहो त्या प्लंबरला बोलावले आहे, त्याच्याशी बोलून घ्याल का एकदा? बरंच काम आहे घरात…’’ काकूंनी विचारलं. ‘‘असल्या गोष्टीत मला अडकवू नका, तुम्ही असताना घरातच ‘उलटसुलट’ करत बसलेल्या. मदत लागली तर बाबूला बोलवा, तो येईल.’’ इति काका.
मला हसूच आलं. तेवढं कसं काकूंच्या विणकामावरून उलटसुलट करता म्हणून खोचक बोलता आलं? ‘‘अगं बाई मी सहज म्हटलं, मी घेईन हो करून,’’ म्हणत काकूंनी त्यांना निरोप दिला. मी त्यांना गमतीने म्हटलं, ‘‘काकू, फार कडक दिसतंय काम?’’ ‘‘हो गं आहेत खरे, पण मला सवय झालीय इतक्या वर्षात. हं …तसे चांगले आहेत गं, फक्त घरात लक्ष घालायला आवडत नाही. तो तुझा प्रांत असं म्हणतात. आपल्याला काही कमी करत नाहीत ना? बास झालं. आपल्यालाच हौस गं संसाराची. तो मनापासून जपते आणि हा माझा छंद आहे ना विणकामाचा, तो मला मदत करतो शांतपणे विचार करायला.
लग्न करून आले. मोठे कुटुंब, सासू-सासरे, दीर-नणंदा सगळे चांगले आहेत. पण त्या वेळेस सोपं नव्हतं हो. काळच वेगळा गं तो. सगळ्यांची मर्जी सांभाळून हसतमुखाने राहायचं हेच बाळकडू मिळालं गं आजी, आई यांच्याकडून. आता सगळं छान पार पाडलंय. सासू-सासरेही शांतपणे गेले. बाकी प्रत्येक जण आपापल्या घरी सुखी आहे. आणखी काय हवं? मुलं उडाली परदेशी कामानिमित्ताने. क्वचित जातो त्यांच्याकडे. त्यांना वेळ मिळाला की ती येतात इतर वेळेस. आता आम्ही एकमेकांना सांभाळून राहतो. तसे कडक असले तरी सहवासाने थोडा मऊपणा आलाय गं स्वभावात.’’ गालात हसत काकू म्हणाल्या. काकू पुढे बोलत राहिल्या आणि मी लक्ष देऊन ऐकत होते. सुखी संसाराचं गुपित उलगडत होत्या त्या.
‘‘नव्या घरी रुळताना आपल्याला थोडं मागं-पुढं करावंच लागतं ना, पण हे विणकाम शिकले आणि मला एक गुपित कळलं संसाराचं. हे विणकाम शिकवतं बघ, मला नात्यांची वीण कशी घालायची. वाद नको म्हणून गप्प बसायचं असेल तेव्हा दोन टाके एकत्र करायचे ओठ घट्ट मिटून. समजावून सांगायचे असेल तर जास्तीचे चार टाके वाढवायचे. जरा चुकलंय असं वाटलं तर लगेच उसवायचं आणि ‘जैसे थे’ करायचा प्रयत्न करायचा. अगं, विणकाम म्हणजे तरी काय? सुलट बाजूने सुंदर नक्षी तयार करत जायचं तर सुबक नक्षी करणारी मागची उलटसुलट वीण सरळ घालावीच लागते. ती आपण घालत राहायचं. नक्षीप्रमाणे दोनाचा एक एकाचे दोन लागतील तसे टाके आपण विणत जातो ना तसं आपणही संसारात करावं लागतं. मागचं उलटसुलट विणकाम घडत जातं. संसारात हे महत्त्वाचं.
टाके घालायला फारच चुकले तर परत सगळं उसवा. नीट करा. कशाला ना? एक वेळ ते लोकरीच्या विणीत जमेल, पण ते नात्यांच्या विणीत सोपं जाईल असं नाही. म्हणूनच असा एखादा छंद हवाच गं. आपण तो जोपासताना शांतपणे विचार करू शकतो. कुठलीही कला ही फक्त कला नसतेच, ती आपल्याला आयुष्यातील कोडी सोडवायलाही मदत करते. संगीत, चित्रकला, भरतकाम, विणकाम, वाचन, खेळ, अगदी स्वयंपाकात रमण्याची आवड असू दे. खरंच सांगते, आपल्याला शहाणं करतात या कला. विचार करायला शिकवतात. म्हणूनच बहुतेक त्या कला निर्माण झाल्या असतील. कुठलीही कला बघ, त्याचे नियम आपल्याला दैनंदिन जीवनात कसं वागायचं हेच शिकवतात. त्यांना छंद म्हणून स्वीकारलं की मन मोकळेपणाने विचार करायला लागतं. परिस्थिती समजून घेतं आणि ते मनावरचा ताण कमी करतात हे महत्त्वाचं…’’
किती छान सांगितलं काकूंनी. हे अनुभवातलं शहाणपण त्यांच्या चेहर्यावर दिसतं होतं. मी एकटक त्यांच्याकडे पाहत राहायची. वाटायचं, मला जमेल का असं विणकाम? मला अगदी योग्य वेळी काकू भेटल्या. नक्कीच प्रयत्न करेन मी नात्यांची वीण सुबकपणे घालायला. आज इतक्या वर्षांनंतरही सारं जसंच्या तसं आठवतंय. चार वर्षांपूर्वी त्या आजारी झाल्या तेव्हा मी सांगलीला जाऊन त्यांना भेटून आले होते. किती वेळ माझ्या हातावरून हात फिरवत होत्या. मलाही भरून आलं होतं. या त्यांच्या हातांनीच मला जीवनाचंही सुबक विणकाम शिकवलं होतं.
आता त्या नाहीत, पण त्यांनी विणून मला दिलेली शाल त्यांच्या प्रेमाच्या उबेची आठवण करून देते.
neelimalele62 @gmail.com
