नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ‘आझाद हिंद सेने’तील त्या एक लढवय्या. नेताजींना ठार करायला आलेल्या आपल्या पतीची संगीन भोसकून हत्या करणार्या झुंजार सेनानी, ब्रिटिशांच्या तळांवर वेशांतर करून जाऊन महत्त्वाची माहिती गोळा करणार्या गुप्तहेर, ब्रिटिशांच्या कैदेत असताना स्तन कापून घेण्यासारखे अन्वनित अत्याचार सोसणार्या खंबीर धुरंधर… देशासाठी सर्वस्व बलिदान करणार्या ‘नागीण’ नीरा आर्य यांची कहाणी म्हणजे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातला न विसरता येणारा इतिहास…
मध्यरात्रीची वेळ… भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी सशस्त्र सेना उभी करणार्या ‘इंडियन नॅशनल आर्मी’ अर्थात ‘आझाद हिंद सेने’चा तळ असलेलं जंगलातील ठिकाण. सेनेचे सर्वेसर्वा खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांच्या अधिकार्यांशी चर्चा- विनिमय करून विश्रामासाठी त्यांच्या तंबूत रवाना झाले होते. त्या दिवशी त्यांच्या तंबूच्या सुरक्षेची जबाबदारी आझाद हिंद सेनेच्या ‘राणी झाशी रेजिमेंट’कडे होती. देशासाठी सर्वस्व बलिदान करणार्या बालिका आणि युवती यांची ती रेजिमेंट! त्या दिवशी रात्री एक युवती तंबूच्या मागील बाजूस पहारा देत असताना कुणी तरी तिथं असल्याचं तिला जाणवलं. तो आवाज जंगली श्वापदांचा नव्हता. तिनं बंदूक सरसावली. आवाजाच्या दिशेनं हलकेच सरकायला सुरुवात केली. सावली जवळ येताच ही तरुणी जरब दाखवत म्हणाली, ‘‘कोण आहे? आधी आपला संकेत शब्द सांगा…!’’
‘‘मी नेताजींचा गुप्तहेर. खूप महत्त्वाचं काम आहे.’’ तिकडून आलेला आवाज तरुणीनं ओळखला. तो तर तिच्या पतीचा, श्रीकांत जयरंजन दास यांचा आवाज…!’’ पती श्रीकांतने नेताजींची हत्या करण्याचा विचार आधीही बोलून दाखवला होता. ‘शेवटी त्याने ही वेळ आणलीच तर! त्याच्या याच देशद्रोही वृत्तीमुळेच आपण संसाराचा त्याग करून तिथून निघून आलो. आता प्राण गेला तरी बेहत्तर, पण या व्यक्तीस नेतांजींपर्यंत पोहोचू देणार नाही…!’ असा विचार करत त्या तरुणीनं अंधारातच रायफल सरसावली. ते बघताच श्रीकांत जयरंजनने एक गोळी झाडली. ती नेताजींच्या वाहनचालकास निजामुद्दीन यांना लागली.
दुसरी गोळी तरुणीच्या मानेला चाटून गेली. त्या तरुणीनं संपूर्ण ताकदीनं पुढे येत रायफलची संगीन पतीच्या शरीरात भोसकली. श्रीकांत जागीच कोसळला. गोळी चाटून गेल्यानं तिच्या मानेतून रक्त वाहत असताना ती भोवळ येऊन खाली पडली. ब्रिटिश सरकारच्या आधिपत्याखाली गुप्तचर विभागात अधिकारी असलेल्या तिच्या पतीची तिनं तिच्या देशासाठी हत्या केली होती. (ही घटना भारत-बर्मा (आताचं म्यानमार) सरहद्दीजवळ जवळच्या जंगलात घडली, असे उल्लेख आहेत.) असं असाधारण धाडस करणारी ती तरुणी कोण होती? त्या होत्या, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील अत्यंत नि:स्पृह आणि धाडसी गुप्तहेर, नीरा आर्य…!
नेताजींच्या जिवाला जीव देण्याची तयारी असणार्या चपळ अशा नीरा यांना नेताजींनी ‘नीरा नागीण’ म्हणून गौरवलं. नीरा यांच्यावरील त्यांचा विश्वास आणखीनच दृढ झाला होता. नीरा यांचे बंधू वसंत हेदेखील ‘आझाद हिंद सेने’चे निष्ठावान सैनिक होते. नीराजी आणि नेताजी यांची पहिली भेट हा नाट्यमय योगायोग होता. बालपणी नीरा तलावात पोहत असताना पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्या पाण्याच्या प्रवाहात वाहत जात असताना एका युवकानं वाहत्या पाण्यात उडी घेतली आणि नीरा यांना वाचवलं. ते युवक म्हणजे थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस होते. तेव्हापासून नीराजींनी नेताजींना आपला ‘रक्षक बंधू’ मानलं होतं.
‘आझाद हिंद सेने’ने ऑगस्ट १९४३ मध्ये ५०० युवतींची सैनिकी प्रशिक्षणासाठी निवड केली. त्यातून १५० निवडक मुलींना ‘झाशी राणी रेजिमेंट’मध्ये घेण्यात आलं. २२ ऑक्टोबर १९४३ रोजी या रेजिमेंटची घोषणा करण्यात आली होती. नंतर रेजिमेंटमधील स्त्रियांच्या भरतीत लक्षणीय वाढ झाली. ‘झाशी राणी रेजिमेंट’च्या शूर मुली नेहमीच हेरगिरीत अग्रेसर होत्या. नीरा आर्य, मानवती आर्य, जानकी, सरस्वती राजमणी, रजनी आणि इतर मुलींवर नेहमीच इंग्रजी अधिकार्यांवर लक्ष ठेवून माहिती काढण्याचं काम सोपवण्यात येई. इंग्रजांच्या बंगल्यात किंवा छावणीत पुरुषांच्या वेशात सफाई कामगार म्हणून काम करताना किती तरी महत्त्वाच्या बातम्या आणि माहिती गोळा करण्याचं काम नीरा करत असत.
‘कधी पकडल्या गेलात तर विष पिऊन किंवा स्वत:ला गोळ्या घालून संपवायचं…’ अशी त्यांना ताकीद दिली गेली होती. त्यांचं धाडस इतकं की, ‘आझाद हिंद सेने’चे गुप्तहेर डॅनियल काले यांच्यासोबत त्यांनी अनेकदा जोखमीची कामं केली होती. त्यातलंच एक इंग्रजांच्या सैन्य तळावर जाऊन त्यांच्या गोटात शिरून माहिती काढण्याचं काम. डॅनियल आणि नीरा यांनी शेतकरी दाम्पत्याचा वेश घेतला आणि चारा भरलेली गाडी घेऊन निघाले. बरोबर इंग्रजी छावणीसमोरच त्यांच्या बैलगाडीचं चाक तुटलं.
मदत मागण्याच्या बहाण्यानं ते छावणीत शिरले. स्वत:ला असहाय दाखवत तिथं वेळ काढला आणि तिथली माहिती काढली. पण गंमत म्हणजे ब्रिटिशांनीच उलट या दोघांना ‘आझाद हिंद सेने’ची हेरगिरी करण्याचा प्रस्ताव दिला. मग काय, छावणीत त्यांचा वावर राजरोसपणे सुरू झाला. सेनेबद्दल खोट्या बातम्या पुरवत इंग्रजी सेनेच्या तळाचे नकाशे, त्यांचे साठे अशी महत्त्वाची माहिती मिळवू लागले. त्या माहितीच्या आधारेच ‘आझाद हिंद सेने’ला मलायातून (मलाया (आताचं मलेशिया) थायलंड- बर्मा (आताचं म्यानमार) मार्गे भारतात प्रवेश करणं सोपं झालं.
१९४४ मध्ये जानेवारी महिन्यातील तब्बल पंधरा दिवस नीरा यांनी बर्मामधील अराकान इथल्या इंग्रजी छावणीत चक्क पर्यवेक्षक म्हणून काम केलं होतं. त्या वेळी इंग्रजी अधिकारी रॉबर्ट अल्बर्ट यांच्या तंबूत सफाईच्या बहाण्यानं घुसून काही कागदपत्रे गुपचूप तपासताना त्या पकडल्या गेल्या होत्या. जंगलातील मार्गानं त्यांची तुरुंगात रवानगी करत असताना ‘आझाद हिंद सेने’च्या साथीदारांनी हल्ला करून गोळीबार करत त्यांची मुक्तता केली होती. त्याच सुमारास नीरा यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ‘आझाद हिंद सेने’स ब्रिटिश सेनेशी युद्ध जिंकत भारतात प्रवेश मिळवण्यात यश मिळालं होतं, ही फार मोठी बाब होती. त्यांच्या धरपकडीसाठी सगळीकडे ब्रिटिश सैन्यानं सापळे लावले होते.
परिस्थिती बिकट असताना नीरा आणि साथीदार यांनी वनवासी स्त्री-पुरुषांचे वेश धारण करून मणिपूरच्या जंगलात प्रवेश मिळवला. तिथं इंग्रजी सैन्य नेमकं कुठं आहे, ही माहिती हवी होती आणि अचानक गोळीबार सुरू झाला. साथीदार रजनी यांना वीरगती प्राप्त झाली होती, पण त्यांच्या पार्थिवास तिथं न सोडता खांद्यावर वाहून सगळे सुखरूप सेनेच्या छावणीत परतले. ‘आम्हाला या मातृभूमीची शपथ…शेवटच्या श्वासापर्यंत लढू…!’ म्हणत जिवावर उदार झालेल्या अशा सेनानींमुळं आज आपण मोकळा श्वास घेत आहोत, याचं भान प्रत्येक भारतीयांस हवं. कोण होत्या या नीरा आर्य…?
५ मार्च १९०२ या दिवशी उत्तर प्रदेशमधील मेरठजवळील खेकडा या गावी नीरा आर्य यांचा जन्म झाला. लहान वयातच त्या आणि छोटा भाऊ वसंत यांच्या डोक्यावरचे आईवडिलांचे छत्र हरवले. श्रीमंत व्यापारी शेठ छज्जुमल यांनी दोन्ही मुलांना आपल्या छत्रछायेखाली घेतलं. शेठजी कलकत्त्यावरून (आताचं कोलकाता) खास ‘आर्य समाज संमेलना’साठी खेकडा इथं आले होते. राष्ट्रवादी विचारांच्या शेठजींनी दोन्ही मुलांना आपल्या सोबत कलकत्त्याला नेलं आणि एका पित्याप्रमाणे त्यांच्या संपूर्ण पालनपोषणाची जबाबदारी निभावली.
शेठ छज्जुमल यांच्या संस्कारांमुळे नीरा आर्य यांच्यावर महर्षी दयानंद सरस्वती यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांना बंगाली आणि इंग्रजीसमवेत इतरही अनेक भाषा अवगत होत्या. शेठजींच्या घरी मोठमोठे क्रांतिकारी, देशभक्त नेहमी येत-जात असत. राष्ट्रभक्तीनं प्रेरित त्यांचे विचार नीरा यांना प्रचंड प्रभावित करत असत. तरुण वयात त्यांचा विवाह इंग्रजी आधिपत्याखालील भारतीय गुप्तचर विभागात वरिष्ठ अधिकारी असलेल्या श्रीकांत जयरंजन यांच्याशी झाला; पण श्रीकांत यांची इंग्रजांप्रति असलेली निष्ठा नीरा यांना कायम अस्वस्थ करत असे. शेवटी देशाच्या सुरक्षेसाठी नीरा यांना श्रीकांत यांची हत्या करावी लागली. तेव्हापासून नीरा यांच्या अटकेसाठी इंग्रज त्यांचा शोध घेत होते. अखेर त्यांच्या अटकेची वेळ आलीच…!
‘आझाद हिंद सेने’तर्फे प्रत्यक्ष युद्धात सहभागी झालेल्या ‘राणी झाशी रेजिमेंट’च्या युवतींनी १९४४ च्या कोहिमा आणि इम्फाळच्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. सेनेने जपानी सैन्यासोबत भारताच्या पूर्व सीमेवर आणि बर्मामधून युद्ध लढलं. दुसर्या महायुद्धात जपानचा पराभव झाला आणि इंग्रजांनी सेनेच्या सैनिकांची मोठ्या प्रमाणात धरपकड केली. ३ मे १९४४ रोजी नीरा आर्य यांना अटक करण्यात आली. त्यांच्या तुरुंगवासातील भयानक यातनांचे वर्णन नीरा आर्य यांनी ‘मेरा जीवनसंघर्ष’या आत्मकथेत केलेले आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी आणि लेखक मन्मथनाथ गुप्त यांनी नीरा आर्य यांचे अनुभव संपादित केले आहेत, ज्याचे पुनर्प्रकाशन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात करण्यात आलं. प्रसिद्ध लेखक नरेंद्र गोळे यांनी हिंदी भाषेतील त्या आत्मकथनाचा मराठी अनुवादही केलेला आहे.
नीरा आर्य कलकत्ता कारागृहात असताना त्यांच्याकडून नेताजींची आणि साथीदारांची माहिती काढण्यासाठी त्यांच्यावर अतोनात अत्याचार करण्यात आले. नेताजी कुठं आहेत, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘‘ते माझ्या हृदयात जिवंत आहेत…!’’ तेव्हा त्या निर्लज्ज जेलरनं बागेत झाडं कापायचं बोथट अवजार उचललं आणि नीराजींच्या वस्त्रावर हात टाकला. ‘‘थांब तुझं हृदयच काढून टाकतो म्हणत त्यांचं स्तन कापण्याचा प्रयत्न केला. धार नसलेल्या त्या अवजारानं दिलेल्या मरणप्राय यातना सहन केल्या; पण त्यांनी तोंडातून अवाक्षरही काढलं नाही. नीरा यांना त्यांच्या पतीच्या हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यासाठी अंदमान बेटांवर नेताना जहाजावरही त्यांच्यावर आणि ‘राणी झाशी रेजिमेंट’च्या इतर युवतींवर अमानुष अत्याचार करण्यात आले. अंदमानमधील त्यांच्या छळ यातनांची वर्णनं वाचवत नाहीत, इतकी भीषण आहेत. कैदी स्त्रियांच्या हक्कासाठी आवाज उठवला, म्हणून नीरा यांना यातनागृहात नेऊन एका हातावर लटकावून धारदार टोकदार चक्रीवर बांधून अत्याचार करण्यात आले. अत्याचार करणारे हात थकले; पण नीरा यांनी तोंडातून ‘ब्र’ उच्चारला नाही.
ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी नीरा यांनी आयुष्य खर्ची घातलं, त्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र त्यांचं उत्तरआयुष्य अत्यंत हलाखीत गेलं. हैदराबाद इथं (तिथं त्यांना लोक पेदम्मा म्हणून ओळखत) एका छोट्याशा झोपडीत राहून फुलं विकून आपला उदरनिर्वाह करणार्या या महान स्वातंत्र्य सैनिकाने २६ जुलै १९९८ या दिवशी अखेरचा श्वास घेतला.
त्यांनी सांगितलेल्या आठवणी त्यांच्या जिवंतपणीच ‘दक्षिण भारत समाचारपत्र’ आणि ‘स्वतंत्र वार्ता’ दैनिकात प्रकाशित झालेल्या आहेत. नीरा यांच्या अतुलनीय कार्याची किमान आठवण तरी राहावी यासाठी सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक तेजपाल सिंह धामा आणि मधु धामा यांच्या प्रयत्नानं त्यांच्या जन्मगावी त्यांचे एक स्मारक उभं करण्यात आलं आहे. ‘नीराजी, तुमच्या असीम त्यागाची उतराई होऊ शकणार नाही… हा देश कायम तुमच्या ऋणात राहील…!’’
या सदरात गुप्तहेर ्त्रर्यिांचीच माहिती द्यायची असल्याने फक्त नीरा आर्य यांच्यावर लेख केंद्रित केलेला आहे.
‘वाचक पत्र’ तुमच्यासाठी
‘चतुरंग’ ने यंदाही तुमच्यासाठी वाचनाचा भरघोस ठेवा आणला आहे. विविध कंगोरे मांडणारे वेगवेगळे विषय, नामवंतांचे अनुभव, त्यांच्या मुलाखती या सगळ्यांमुळे तुमच्याही विचारांत, अनुभवांत नक्कीच भर पडत असेलच. काय आहे तुमचा अनुभव या सदरांविषयी आणि पान १ वरच्या लेखांविषयी. आम्हाला नक्की कळवत राहा. ‘पडसाद’ हे सदर याचसाठी आहे. तुम्ही मोकळेपणाने आम्हाला कळवू शकता तुमची मते. अगदी मतभेदही मुक्तपणे नोंदवा. ठोस विचार मांडणारी पत्रे नक्कीच प्रसिद्ध केली जातील. फक्त आणि फक्त मराठीमध्ये पाठवलेलीच पत्रे प्रसिद्ध केली जातील. ई-मेल करताना सब्जेक्टमध्ये ‘चतुरंग वाचक पत्र’ असा उल्लेख करावा. आमचा पत्ता – इ एल १३८, टीटीसी इंड्ट्रिरयल एरिया, महापे, नवी मुंबई – ४००७१० किंवा chaturang@expressindia.com अथवा chaturang.loksatta@gmail.com यापैकी फक्त एकाच ई-मेलवर पाठवावीत.
