विजयालक्ष्मी शिंदे
‘नीट’ आणि एकूणच परीक्षेतील गोंधळाला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी झालेल्या ‘जेन झी’ आंदोलनाच्या यशाने सारा देश अवाक् झाला; परंतु या आंदोलनात सहभागी झालेल्या मुलींना या यशाच्या पलीकडे एक बाब सुखावतेय ती म्हणजे वर्षानुवर्ष ‘पापा की परी’, राजकीय भान नसलेल्या आणि केवळ बाह्यरूप व सौंदर्यात रस असलेल्या अशी ज्यांची खिल्ली उडवली गेली त्यांची छबी अचानक ‘वुमन विथ स्पाइन’, ‘धाकड छोरियाँ’ अशी होऊ लागली. हे आंदोलन म्हणजे एका पिढीच्या अस्वस्थतेचा आवाज होता. त्या आवाजांमध्ये प्रश्न होते. आक्रोश होता आणि बदलाची ठाम मागणी होती. सार्वजनिक अवकाशात स्वत:ची जागा निर्माण करण्याच्या निर्धारातून एका नव्या पिढीची चाहूल अनेक जणी देत होत्या. काय अनुभव होते या आंदोलनात सहभागी झालेल्या दोन जेन-झी मुलींचे? ते त्यांच्याच शब्दांत.
‘जेन झी’ पिढीने देशभरात उभारलेल्या आंदोलनाने शिक्षणमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले, पण या आंदोलनाचा खरा आणि दीर्घकालीन विजय सत्तेच्या निर्णयात नाही तर तो आहे त्या तरुणींच्या धैर्यात, ज्यांनी सत्तेने उभे केलेले लोखंडी बॅरिकेड्स मोडून तर काढलेच परंतु समाजाने त्यांच्याभोवती वर्षांनुवर्षे उभे केलेले अदृश्य ‘बॅरिकेड्स’ अर्थात कुंपणेही मोडून काढली.
६ जूनपासून सुरू झालेल्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून ‘वंदे मातरम’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘जय भीम’च्या घोषणा ‘जंतर मंतर’च्या अवकाशात घुमत होत्या. या घोषणा सत्ता, अन्याय आणि दडपशाहीविरोधात उभ्या राहिलेल्या एका पिढीच्या अस्वस्थतेचा आवाज होत्या. त्या आवाजांमध्ये प्रश्न होते. आक्रोश होता आणि बदलाची ठाम मागणी होती. ‘सावित्री तेरे सपनों को, हम मंजिल तक पहुंचाएंगे!’, ‘पितृसत्ता से आजादी! धर्मेंद्र प्रधान गद्दी छोड़ो!’ या घोषणांचे प्रतिध्वनी तिथे उमटत होते. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याने या आंदोलनाला केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक अर्थही प्राप्त झाला आहे. अनेक वर्षांपासून ‘जेन झी’ला राजकारणापासून अलिप्त, केवळ समाजमाध्यमांच्या आभासी जगात रमणारी आणि प्रत्यक्ष संघर्षापासून दूर असलेली पिढी म्हणून पाहिले गेले. विशेषत: तरुणींना ‘पापा की परी’ या उपहासात्मक चौकटीत बंदिस्त केले गेले. लाडावलेल्या, राजकीय भान नसलेल्या आणि केवळ बाह्यरूप व सौंदर्यात रस असलेल्या, अशी त्यांची खिल्ली उडवली गेली.
सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा गांधी यांनी एकदा म्हटल्याप्रमाणे, ‘‘जोपर्यंत समाज स्त्रियांकडे केवळ शांत, निष्क्रिय आणि संरचनात्मक संघर्षांपासून दूर ठेवावी अशी व्यक्ती म्हणून पाहतो, तोपर्यंत त्यांची खरी मुक्ती शक्य नाही.’’ पण ‘जंतर मंतर’वर उभी असलेली एक तरुणी म्हणून मला या समजुतींचा पोकळपणा ठाऊक होता. या गैरसमजांना उत्तर आम्ही केवळ ‘रील्स’मधून दिले नाही; ते दिले रस्त्यावर उभे राहून, उन्हातान्हात, पावसात, डोळ्यांतून पाणी काढणार्या, अश्रुधुराच्या जळजळवणार्या धुरात पोलिसांच्या लाठ्यांना सामोरे जात! २० जुलैच्या ‘संसद चलो’मोर्चाच्या ध्वनिचित्रफिती जेव्हा समाजमाध्यमांवर पसरल्या तेव्हा जणू ‘अल्गोरिदम’च बदलला. ज्या इंटरनेटने आम्हाला ‘नि्क्रिरय’ म्हणून हिणवले होते, त्याच इंटरनेटवर अचानक ‘वुमन विथ स्पाइन’, ‘धाकड छोरियाँ आणि ‘क्रांतिकारी मुली (Baddies) अशा शब्दांत आमचे कौतुक होऊ लागले. बदल आमच्यात झाला नव्हता; ते धैर्य आमच्यात आधीपासूनच होते. बदल हा झाला की, समाजाने ते पहिल्यांदा पाहिले.
२० जुलै रोजी आकाशात काळे ढग दाटून आले असतानाच जागोजागी पोलिसांच्या शेकड़ो तुकड्या तैनात होत्या. लाठीमार आणि अश्रुधुरामुळे श्वास कोंडवणार्या ‘जंतर मंतर’वर जमलेल्या हजारो तरुणांनी विजेचे करंट असलेले बॅरिकेड्स ओलांडले आणि संसदेकडे कूच केले. हा क्षण या आंदोलनाच्या इतिहासातील एक निर्णायक टप्पा ठरला. पण मी ओलांडलेले पहिले बॅरिकेड्स शासनाने उभारलेले नव्हते. ते होते समाजाने बालपणापासूनच आमच्या भोवती विणलेले अदृश्य कुंपण, ‘सातच्या आत घरात या’, ‘राजकारणापासून दूर राहा’, ‘रस्ते तुमच्यासाठी नाहीत’ अशा पिढ्या न् पिढ्या रुजवलेल्या मर्यादांचे. या आंदोलनाने या रोजच्या बंधनांविरोधातच बंड पुकारले. काही मुलींनी आंदोलनासाठी त्या दिवशी महाविद्यालय बुडवले, काहींनी आई-वडिलांना त्या शैक्षणिक सहलीला किंवा इंटर्नशिपसाठी जात असल्याचे सांगितले. एका तरुणीने खिशात अवघे वीस रुपये घेऊन आंदोलनात सहभाग घेतला. अनेक मुली, स्त्रिया एकट्या आल्या आणि पहिल्यांदाच स्त्रियांनी रात्री बेरात्री बाहेर, रस्त्यावर राहू नये, या अलिखित नियमाला छेद दिला. वर्षानुवर्षे दाबून ठेवलेला आक्रोश अखेर प्रतीकात्मक रूपात बाहेर पडला.
या ‘जेन झी’ तरुणींच्या उपस्थितीने आधीच स्पष्ट केलेली गोष्ट त्यांच्या हातातील पोस्टर्सने अधोरेखित केली. ‘बॅडीज आर नॉट अपॉलिटिकल’, आणि ‘बॅडीज, लीड द केऑस’ अशा संदेशांनी केवळ नवे विचार मांडले नाहीत, तर बदलत्या पिढीच्या प्रतिकाराची भाषा व्यक्त केली. नेतृत्वासाठी परवानगीची वाट पाहणारी ही पिढी नव्हती, ती आधीपासूनच नेतृत्व करत होती. या आंदोलनाने सर्वांना सर्वाधिक आश्चर्यचकित केले ते उपस्थितांच्या संख्येने नव्हे, तर त्यातून निर्माण झालेल्या विश्वासाच्या नात्याने. प्रचंड मोठ्या गर्दीत स्त्रियांना पुरुषांच्या गैरवर्तवणुकीपासून नेहमी सावध राहायला शिकवले जाते. पण ‘जंतर मंतर’वर आमच्यापैकी अनेकींनी याच्या अगदी उलट अनुभव घेतला तो होता एकमेकांच्या उपस्थितीतून निर्माण झालेल्या सामूहिक सुरक्षिततेचा. कदाचित याच सामूहिक धैर्याचा अर्थ माया अँजेलो यांच्या शब्दांत अधिक स्पष्ट होतो, ‘नथिंग कॅन डिम द लाइट दॅट शाइन्स फ्रॉम विदिन’ अर्थात ‘अंर्तमनातून उजळणारा प्रकाश कोणतीही बाह्य शक्ती मंद करू शकत नाही.’
या आंदोलनाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आंदोलक तरुणांनी मुलींना, स्त्रियांना ‘संरक्षणाची गरज असणारी बाई’ अशा सहानुभूतीच्या नजरेतून पाहिलं नाही. उलट आपल्यासारखीच एक समान आंदोलक या भूमिकेतून वागवले आणि तरुणी, मुलींनीही स्वत:ला केवळ सहभागी म्हणून मर्यादित ठेवले नाही तर आम्हीही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलो, अनेकदा दोन पावले पुढे जाऊन आंदोलनाच्या मैदानावर घुमणार्या घोषणांचे आवाज झालो, त्याचे नेतृत्व केले. त्याचमुळे असेल कदाचित पण माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदाच दिल्ली मला रात्रीच्या वेळीही अधिक सुरक्षित वाटली. त्या रस्त्यांवर भीती नव्हती, एकजुटीची भावना होती. उशिरापर्यंत मुली, तरुणी आंदोलनस्थळांदरम्यान बिनधास्त फिरत होत्या. एकमेकींची विचारपूस करत होत्या. अगदी अनोळखी व्यक्तींचीही आपुलकीने काळजी घेत होत्या. ज्या शहरात स्त्रियांना ‘सातच्या आत घरात’ची अट घातली जाते त्या शहराने काही काळासाठी का होईना, सार्वजनिक अवकाश खरोखर सर्वांचा असल्याची जाणीव करून दिली.
या आंदोलनाने काही सामाजिक संकोचांनाही आव्हान दिले. पुरुष आंदोलक कोणताही संकोच न बाळगता सॅनिटरी पॅड्स, पी सेफसारखी उत्पादने, आणि औषधे वाटत होते. स्त्रियांनीही आपल्या गरजा कोणत्याही संकोचाशिवाय मुलांकडे व्यक्त केल्या. मासिक पाळीसारखे विषय, जे नेहमीच मौनाच्या चौकटीत बंद केले जातात, ते या आंदोलनात काळजी आणि सहकार्याच्या साध्या कृतींचा भाग बनले. जेव्हा अश्रुधूर आणि लाठीमारामुळे लोकांना श्वास घ्यायला त्रास होत होता तेव्हा खूप जणींनी स्वत:च्या ओढण्या फाडून अनेक मुलांना तोंडावर बांधण्यासाठी दिल्या तर दोनतीन मुलांनीसुद्धा स्वत:चे शर्ट फाडून स्त्रियांच्या जखमा बांधल्या.
शैक्षणिक हक्कांसाठी सुरू झालेले हे आंदोलन नकळतपणे अशा नव्या विचारांत बदलले, जिथे स्त्रियांच्या शरीराशी जोडलेली वर्षांनुवर्षांची लाज आणि त्याबाबतीतील मौन हळूहळू कमी होत गेले. मात्र, या आंदोलनाच्या दृश्य भाषेत काही विरोधाभासही दिसून आले. अनेक पोस्टर्स आणि फलकांवर सरकार आणि सत्तेतील व्यक्तींवर टीका करण्यासाठी धारदार उपरोधाचा वापर करण्यात आला. काही पोस्टर्स आणि घोषणांमध्ये समाजात खोलवर रुजलेल्या स्त्रीद्वेषाची झलकही दिसली. राजकीय विरोधकांची खिल्ली उडवण्यासाठी स्त्रिया किंवा स्त्रीत्वाचा अपमान म्हणून वापर केला गेला.
उदाहरणार्थ, पुरुष नेत्यांच्या फोटोमध्ये त्यांना लिपस्टिक लावलेली किंवा साडी नेसलेली दाखवणे, जणू स्त्रीसदृश दिसणे हीच त्यांची कमजोरी किंवा अपमानाची गोष्ट आहे, असा संदेश दिला जातो. ही मांडणी केवळ त्या व्यक्तीवर टीका करत नाही, तर स्त्रीत्वालाच कमीपणाचे प्रतीक मानते. यातून एक गोष्ट जाणवली की, लोकशाही मूल्यांसाठी लढणारे आंदोलनही त्या समाजापासून पूर्णपणे वेगळे नसते. एखादी चळवळ सत्तेला प्रश्न विचारू शकते, पण त्याच वेळी तिच्या स्वत:च्या पूर्वग्रहांकडेही तिला प्रामाणिकपणे पाहावे लागते.
या विरोधाभासांची जाणीव ठेवणे आंदोलनाला कमकुवत करत नाही. उलट समानतेचा संघर्ष अधिक प्रामाणिक बनतो. कारण सत्तेविरोधात ठाम उभे राहाताना स्वत:मधील अन्यायालाही सामोरे जाण्याचे धैर्य आवश्यक असते. हाच प्रामाणिकपणा आंदोलनाचा झालेला एकूण प्रभाव, आणि त्यातल्या परिणामाची मागणी करते. या संपूर्ण आंदोलनाचा कणा स्त्रिया होत्या. त्यांनी तळ उभारले, व्यवस्था सांभाळली, जखमींची काळजी घेतली आणि पोलिसांचा दबाव वाढला तेव्हा आघाडीवर उभ्याही राहिल्या. मात्र, आंदोलनाच्या सार्वजनिक व्यासपीठावर मोठ्या प्रमाणात पुरुष वक्त्यांचाच प्रभाव दिसून आला.
आंदोलन टिकवून ठेवण्याच्या कामात स्त्रिया अधिक दृश्यमान होत्या, पण आंदोलनाचा सार्वजनिक आवाज घडवण्याच्या प्रक्रियेत त्यांना तुलनेने कमी जागा मिळाली. नंतर अधिकाधिक स्त्रियांनी व्यासपीठावर येऊन आपले विचार मांडण्यास सुरुवात केली, तरी सुरुवातीचा हा असमतोल होताच हे नोंदवणे आवश्यक आहे. कारण राजव्यवस्थेकडून समानतेची मागणी करणार्या कोणत्याही आंदोलनाने स्वत:मध्येही समानता रुजवायला हवी. अन्यथा, ज्या विषमतेविरोधात ते लढत आहेत, त्याच विषमतेच्या छोट्या प्रतिकृती स्वत:मध्ये निर्माण होण्याचा धोका असतो.
अर्थात इथे समानता दिसली ती एका बाबतीत. पोलिसांच्या लाठ्यांनी ना वयाचा भेद केला ना लिंगाचा. तरुण असोत किंवा वृद्ध, सर्वांनाच लाठीमाराला सामोरे जावे लागले. आपल्या कायद्यानुसार स्त्रियांना रोखण्यासाठी स्त्री पोलीस असणे गरजेचे असते. मात्र इथे तो कायदा, नियम ही विस्मरणात गेला होता. २० जुलैच्या मोर्चातील एका दृश्यफितीत एका पोलीस अधिकार्याने एका तरुणीला थप्पड मारल्याचे दिसून आले, तर दुसर्या दृश्यफितीत एका स्त्री आंदोलकाच्या पार्श्वभागी लाठी मारल्याचे दिसले.
या घटना केवळ गर्दी पांगवण्यासाठी केलेल्या कारवाईपुरत्या मर्यादित नव्हत्या. विरोधाचा घटनात्मक अधिकार बजावत असतानाही स्त्रियांच्या शरीराला दडपशाहीचे साधन बनवण्याची मानसिकता यातून दिसून आली. मात्र, या दडपशाहीचा अपेक्षित परिणाम झाला नाही. ज्या स्त्रियांना त्या दिवशी मारहाण सहन करावी लागली, त्या दुसर्या दिवशी त्याच निर्धाराने पुन्हा रस्त्यावर उतरल्या. प्रत्येक आघाताने त्यांचा निर्धार कमी होण्याऐवजी अधिक मजबूत होत गेला. अँजेला डेव्हिस यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘स्वातंत्र्य हा सतत चालणारा संघर्ष आहे.’’ या आंदोलनामुळे एक गोष्ट नक्की घडली ती म्हणजे केवळ पोलिसांनी उभारलेल्या लोखंडी बॅरिकेड्सवर स्त्रियांनी मात केली नाही, तर पितृसत्ता आणि स्त्रीद्वेषाने उभ्या केलेल्या अदृश्य भिंतींनाही आव्हान दिले.
या आंदोलनातील बदलत जाणारे स्वरूपही बरेच काही सांगून जात होते. सुरुवातीला या आंदोलनातील स्त्रियांची संख्या कमी होती. मात्र, १८जुलैनंतर आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळू लागला त्यात ्त्रिरयांची संख्या लक्षणीय वाढली आणि त्या गर्दीचा जवळपास अर्धा भाग बनल्या. धाडस संसर्गजन्य असते, याची जाणीव या आंदोलनाने करून दिली. एका स्त्रीने रस्त्यावर उतरण्याचा घेतलेला निर्णय दुसरीसाठी प्रेरणा ठरला आणि अशा असंख्य वैयक्तिक धैर्यकथांचे रूपांतर एका सामूहिक शक्तीत झाले, जिच्याकडे सत्तेलाही आणि समाजालाही दुर्लक्ष करता आले नाही. या सामूहिक शक्तीचे वैशिष्ट्य एवढ्यावरच थांबले नाही. तर आत्तापर्यंत धर्म, जात, लिंग, भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर बहुसंख्य विद्यार्थी, कामगार, स्त्रिरया, दलित, आदिवासी आणि मुस्लीम समाजाला एकमेकांपासून दूर ठेवले होते. या आंदोलनाने या विभाजनाच्या रेषा काही काळासाठी का होईना, धूसर केल्या आणि ऐक्य, सहकार्य व सामूहिक संघर्षावर आधारलेल्या वेगळ्या राजकारणाची शक्यता दाखवून दिली.
हे आंदोलन जेन-झीचं आहे हे जाणवून देणारी आणखी एक घटना म्हणजे, ही एकजूट केवळ रस्त्यावर दिसली नाही, तर ती डिजिटल अवकाशातही आकार घेत गेली. समाजमाध्यमांकडे बहुतांशी केवळ करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जाते. पण या आंदोलनाने त्यांची दुसरी बाजू समोर आणली. समाजमाध्यमाने लोकांना जोडण्याबरोबरच संघटन, प्रतिकार आणि राजकीय जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम केले. ‘सीजेपी’ (कॉकरोच जनता पार्टी ) नेतृत्वाने आंदोलकांना ‘आझादी’चा नारा देऊ नये, असे आवाहन केले असले तरी अनेकांच्या आवाजातून तो नारा उमटत राहिला, ‘‘पेपर लिक से आझादी!’’ ‘पढने लिखने की आझादी!’ हा नारा या आंदोलनात केवळ घोषणांचा भाग नव्हता.
‘जंतर मंतर’वरच्या या घोषणांचा अर्थ देशाविरुद्धचा नव्हता, तर एका स्वतंत्र देशात अजूनही अस्तित्वात असलेल्या अन्यायाविरुद्धचा होता. पेपरफुटी, भ्रष्टाचार, जातीय भेदभाव, स्त्रीद्वेष आणि दडपशाहीच्या विविध रूपांपासून मुक्तीची ती मागणी होती. या घोषणेमागे केवळ वर्तमानातील असंतोष नव्हता, तर त्यामागे समानता, शिक्षण आणि न्यायासाठी भारतात दीर्घकाळ चाललेल्या संघर्षांची परंपराही होती. याच संदर्भात सावित्रीबाई फुले यांचे वारंवार घेतले गेलेले नाव महत्त्वाचे ठरते. कारण भारतातील शिक्षणाचा संघर्ष कधीही केवळ शिक्षण मिळवण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तो स्त्रियांच्या समानतेच्या, स्वातंत्र्याच्या आणि सामाजिक न्यायाच्या संघर्षाशी कायम जोडलेला आहे.
सावित्रीबाईंचा वारसा या आंदोलनातील तरुण स्त्रियांच्या आवाजातून पुन्हा एकदा जिवंत होताना दिसला. म्हणूनच या आंदोलनाचा परिणाम केवळ शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्यापुरता मर्यादित ठेवता येणार नाही. एवढं म्हणता येईल की, राजीनामा झाला आणि सत्तेने उभारलेल्या ‘बॅरिकेड्स’ची एक रांग कोसळली. अर्थात अनेक अडथळे शिल्लक आहेत. काही सत्तेने उभे केलेले आहेत, तर काही समाजाच्या मानसिकतेत खोलवर रुजलेले आहेत. हे ‘बॅरिकेड्स’ लोखंडाचे नसतात, ते पूर्वग्रह, भीती आणि असमानतेतून तयार होतात. ते काहीसे ढासळले. त्याने एका वेगळ्या भविष्याची चुणूक दाखवली आहे.
‘जंतर मंतर’वरील तरुणी जणू त्या भविष्याचा पहिला मसुदा लिहीत होत्या. घोषणांच्या आवाजातून, उंचावलेल्या मुठीतून आणि सार्वजनिक अवकाशात स्वत:ची जागा निर्माण करण्याच्या निर्धारातून त्या एका नव्या राजकीय पिढीची चाहूल देत होत्या. माल्कम एक्स यांनी म्हटले होते, ‘‘भविष्य त्यांचे असते, जे वर्तमानात त्यासाठी तयारी करतात.’’ दिल्लीच्या रस्त्यांवर उभ्या असलेल्या या मुली, तरुणी, स्त्रियांकडे पाहताना जाणवले की, त्या केवळ भविष्याची स्वप्ने पाहत नाहीएत, तर त्या भविष्याची सुरुवात आजच करत आहेत. कारण अखेरीस, मोडलेले बॅरिकेड्स केवळ पोलिसांनी उभारलेले नव्हते. त्यापूर्वीपासूनच उभे असलेले खरे अडथळे होते, पितृसत्तेचे, मौनाचे आणि शरणागतीचे. आणि कदाचित, हेच बॅरिकेड्स मोडण्याची सर्वात मोठी ताकद या पिढीच्या हातात आहे, हे या आंदोलनातून दिसून आले.
vijayashinde6112@gmail.com
