नीट-यूजी’ परीक्षांच्या गोंधळामुळे गेल्या सहा-सात आठवड्यांत १२ मुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या आणि एकूणच मुलांच्या ताणाची कल्पना येऊ लागली. खरं तर अतिताणाच्या अवस्थेत त्यांची आत्महत्येची इच्छा ही मृत्यूची नसते, तर त्या असह्य भावनिक वेदनेतून सुटका मिळवण्याची असते. मुलांनी घेतलेला हा निर्णय मात्र अनेक प्रश्न निर्माण करतो आणि त्यांची उत्तरं फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर मानसिक, कौटुंबिक, आर्थिक आणि शासकीय क्षेत्रातही शोधायला हवीत. मानसशास्त्र विषयात पीएच.डी.प्राप्त वनिता पटवर्धन यांनी या विषयाचा केलेला हा ऊहापोह.
मार्च महिन्यापासून जगभरातील शाळांमध्ये परीक्षांची मांदियाळी असते. विशेषत: बारावी आणि त्यानंतरच्या विशिष्ट अभ्यासक्रमांसाठी असलेल्या प्रवेश पात्रतेच्या परीक्षांनी सगळं शिक्षण क्षेत्र गजबजून गेलेलं असतं. त्याचा विलक्षण ताण या विद्यार्थ्यांवर आलेला असतो. कारण त्यानंतर शिक्षणाच्या वाटा आणि कारकीर्दीची वळणं साकार होत असतात. या अतीव स्पर्धेमध्ये, ‘विशिष्ट अभ्यासक्रमाला, हव्या त्या ठिकाणी प्रवेश मिळण्यासाठी आपण पात्र ठरू का?’ याचं प्रचंड दडपण आलेलं असतं. दोन-चार किंवा त्याहूनही जास्त वर्षं केलेला अभ्यास आणि त्यासाठी ओतलेला पैसा हे कामी येणार की नाही, अशी चिंता वेढलेली असते. त्या चिंतेच्या पलीकडे त्यांना सांभाळणार्या या विद्यार्थांचे पालक, नातेवाईक, अध्यापक म्हणत असतात, ‘बाळांनो, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी.’
हे विचार आत्ताच मनात पिंगा घालण्याचं कारण म्हणजे पेपरफुटीच्या प्रकरणामुळे ठएएळ- वॅ परीक्षा रद्द होणं, त्याविषयीचा गदारोळ, नंतर नुकतीच झालेली फेरपरीक्षा! त्यातही काही मिनिटं उशिरा परीक्षा केंद्रात गेलेल्या मुलांना प्रवेश न मिळणं, सहा-सात आठवड्यांच्या कालावधीत देशभरातील किमान १२ मुलांनी आत्महत्या केल्याच्या पोलीस नोंदी, हे सारं कुटुंबीयांची माहिती आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवरून समोर आलं आहे. अशा वेळी कुटुंबीयांवर आकाश कोसळतं. आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकतो. जो जीव या जगात आणला, न्हाऊ-माखू घातला, तो मोठा होऊन आपलाच आरसा बनला, डॉक्टरकीच्या स्वप्नांत उमटू लागला, त्याच जीवाचं कलेवर समोर आल्यावर आईची अवस्था कशी होत असणार? जे घडलंय त्यावर प्रथम ना तिचा विश्वास बसतो, ना इतरांचा! ‘माझ्या लेकराला जीव का जड झाला?’, ‘ मी वाचवू शकले असते ना?’, ‘काय कमी पडलं?’ असे अनेक प्रश्न पडतात, की ज्यांची उत्तरं आता कदाचित कधीच मिळणार नाहीत. आईच्या मनात अमाप आणि कधीही न शमणार्या दु:खाबरोबर भावनांचा कल्लोळ उठतो. कधीही भरून न येणार्या हानीला सामोरं जावं लागल्यामुळे कुटुंबीय हतबल होतात. आपण आता काही करू शकत नाही, याची चीड येते. देवाचा, दैवाचा राग येतो. अपराधीभाव आणि पश्चात्ताप दाटून येतात. मात्र मुलांच्या आत्महत्येनंतर पालक अनेकदा स्वत:लाच दोष देतात. अर्थात पालकांनी सर्व काही योग्य करूनही मूल आत्महत्या करतं तेव्हा पालक म्हणून स्वत:ला दोष देऊन काहीही साध्य होत नाही, हे उघड आहे. अशा अतिशय दु:खी आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या पालकांशी आस्थेनं आणि प्रामाणिकपणे बोलण्याची गरज असते. त्यांच्या गोंधळलेल्या मनाला अनेक प्रश्न विचारून आणि शंकाकुशंका काढून आणखी अस्वस्थ करायचं नसतं. अशी स्थिती फार काळ राहत असेल तर मात्र मानसशास्त्रीय समुपदेशनाचा निश्चित उपयोग होतो.
सध्याच्या या विशिष्ट परीक्षार्थींविषयी सखोल अभ्यास (Case Studies) झाल्यावर बरीच तथ्यं समजतील. या संदर्भात, जगभरातल्या आत्महत्यांच्या वेळोवेळी केलेल्या विश्लेषणांमधून एकमुखाने एक महत्त्वाचा निष्कर्ष नोंदलेला आढळतो, तो म्हणजे नवतरुण म्हणजे साधारण १७ ते २० या वयोगटातील मुलगे व मुली यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही मुलींपेक्षा मुलग्यांचं प्रमाण जास्त आहे. पुढचा सर्वांना अस्वस्थ करणारा मुद्दा म्हणजे गेल्या दोन-तीन दशकांमध्ये हे प्रमाण जगभरामध्ये वाढतं राहिलेलं आहे. ‘राष्ट्रीय गुन्हा नोंदणी ब्युरो’च्या (NCRB) आकडेवारीनुसार, शैक्षणिक अपयश हे नवतरुणांच्या आत्मघाताच्या कारणांपैकी एक प्रमुख कारण आहे. विशेषत: वैद्यकशास्त्र व अभियांत्रिकी यांसारख्या प्रतिष्ठेमुळे आकर्षक मानल्या जाणार्या क्षेत्रांबाबत ते नोंदवलं गेलेलं आहे. यंदा २०२६ च्या पहिल्या NEET- वॅ परीक्षेला सुमारे २२ लक्ष विद्यार्थी बसले आणि त्या तुलनेत उपलब्ध जागा खूपच कमी असल्यावर त्यांना प्रचंड ताण येणार याचा विचार मुलं, पालक करतात का? या परीक्षांची तयारीही २-४ वर्षं चालू असते. शिवाय ज्या लक्षावधींना प्रवेश न मिळाल्यामुळे सर्व दरवाजे बंद होतील आणि ते नैराश्याच्या गर्तेत फेकले जातील, याला जबाबदार कोण? त्यांच्यासाठी आधीच अन्य पर्यायांचा विचार केलेला असतो का? असेल तर ते असा आत्मघात का करतील? त्यामुळे हा प्रवेश मिळाला नाही तर काय करायचं, त्याचंही नियोजन मुलांनी आणि पालकांनी परीक्षेच्या आधीच जरूर करायला हवं.
नवतरुण म्हणजे साधारण १७ ते २० या वयोगटातील मुलं आणि मुली यांच्या आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही मुलींपेक्षा मुलग्यांचं प्रमाण जास्त आहे. त्यातही सर्वांना अस्वस्थ करणारा मुद्दा म्हणजे गेल्या दोन-तीन दशकांमध्ये हे प्रमाण जगभरामध्ये वाढतं राहिलेलं आहे. ‘राष्ट्रीय गुन्हा नोंदणी ब्युरो’च्या आकडेवारीनुसार, शैक्षणिक अपयश हे नवतरुणांच्या आत्मघाताच्या कारणांपैकी एक प्रमुख कारण आहे. विशेषत: वैद्यकशास्त्र व अभियांत्रिकी यांसारख्या प्रतिष्ठेमुळे आकर्षक मानल्या जाणार्या क्षेत्रांबाबत ते नोंदवलं गेलेलं आहे.
इथं एक उदाहरण आवर्जून नोंदवण्यासारखं आहे. एका डॉक्टरांनी आपला एकुलता एक मुलगा वैभव याच्याशी दहावी आणि बारावीनंतरच्या अभ्यासक्रम निवडीसाठी चर्चा केली. स्वाभाविकच त्यांचा आग्रह होता की, मुलाने वैद्यकीय अभ्यासक्रमालाच जावं. तसं बोलणं वेळोवेळी आधीपासून चालू होतंच, पण मुलाचा मात्र स्पष्ट नकार होता. त्याला धीटपणे आणि विचारपूर्वक त्याची कारणं देता आली. मग या सुज्ञ वडिलांनी मानसशास्त्रीय मार्गदर्शनाची मदत घेतली. तिथं सिद्ध मानसशास्त्रीय कसोट्यांच्या मदतीने वैभवच्या बुद्धिमत्ता, आवड, अभिक्षमता किंवा कल, ताण व्यवस्थापन, व्यक्तित्व गुण यांविषयीचं रूपचित्र (Profile) हाती आलं. त्या आधारे केलेल्या अभ्यासक्रम आणि कारकीर्द मार्गदर्शनावरून ध्यानात आलं की, त्याला वैद्यकीय क्षेत्र प्रतिकूल आहे. मग डॉक्टरांनी दुराग्रह, जबरदस्ती, सामाजिक प्रतिष्ठा हे सर्व बाजूला ठेवून वैभवला पाठिंबा दिला आणि त्याची वेगळी कारकीर्द सुरळीत चालू राहिली. त्यामुळे या विद्यार्थ्यांबाबत केवळ परीक्षेतील गुण, यश, कारकीर्द यांऐवजी त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करावा, हे अधिक मोलाचं. या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणांच्या पलीकडे आणखी कोणकोणते विशेष गुण आहेत, त्यांना आणखी काय जमतं, काय खास करायला आवडतं, ती मुलं कशात रमतात? हे सर्व जर अजमावलं तर त्या दृष्टीने शिक्षण घेणं, पुढे कारकीर्द आखणं, हे नक्कीच श्रेयस्कर असतं. अवघड परीक्षांच्या वेळी त्यांना ‘बाळा, मी आहे तुझ्या पाठीशी!’ हे वाक्य त्यांना नक्कीच दिलासा देईल.
मात्र इथंच पालकांची कसोटी लागते. ते आपल्या मुलांना तसं खरंच म्हणतात ना? त्या वेळी ते त्यांना आश्वस्त करतात ना? आपली मुलं ते ऐकतात ना? त्यांनी ऐकलं आहे, याची खात्री ते करतात का? या विद्यार्थ्यांना त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून असं काही सांगितलं जातं, की काही उलटं घडतं? प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांना ‘यशस्वी व्हायलाच पाहिजे’ हा संदेश घरी-दारी लहानपणापासून दिला जातो. परीक्षांचं दडपण वाढत जातं. परिणामी अपयश आलं की त्यांना ते स्वत:चं संपूर्ण अपयश वाटतं. स्वत:ला दोष देण्याचा – self blaming – घातक खेळ सुरू होतो! तो टाळणं हे आई-वडिलांच्या हातात आहे ना? की जाहिराती, विशिष्ट अभ्यासक्रमांच्या लाटा, निराधार व पोकळ स्वप्नं, भ्रामक प्रतिष्ठा यांमध्ये वाहून जाऊन आपल्या बाळांना चिंतेच्या गुंत्यात सोडायचं? वास्तविक त्यांची आत्महत्या ही पेपरफुटीसारख्या एकाच एक घटनेचा परिणाम नसते, तर स्वत:ला दोष देण्याबरोबरच प्रचंड
ताण, आत्मविश्वास व सुरक्षितताभाव यांची त्रुटी, उदासीनता, भीती, चिंता, चीड अशा आधीपासून साचलेल्या अनेक त्रासदायक भावनांचा एकत्रित उद्रेक असतो.
नवतरुण मुलांच्या मेंदूची झलक या मुलांच्या बाबत मेंदूतील ‘प्रीफ्रंटल कॉर्टेक्स’ (prefrontal cortex) हा भाग पूर्णपणे विकसित झालेला नसतो. तर्क, निर्णयक्षमता, समस्या परिहार यासारख्या उच्च बौद्धिक प्रक्रियांची जबाबदारी मेंदूच्या या भागावर असते. परिणामी, त्यांना ही कौशल्यं नीट साधत नाहीत. मग विचार बाजूला राहून केवळ भावनावेगामध्ये मुले घाईघाईने भलतंच काही करून बसतात. ते आत्महत्येचा प्रयत्न करण्याला बळी पडण्याजोगे
(Vulnerable) असतात. शिवाय सोबत्यांचा प्रभाव आणि दबाव (Peer Impact Peer Pressure) असतो. जोडीला अन्य मानसिक कमकुवतपणही असू शकतं. अतिताणाच्या अवस्थेत त्यांची आत्महत्येची इच्छा ही मृत्यूची नसते, तर त्या असह्य भावनिक वेदनेतून सुटका मिळवण्याची असते. त्या वेळी जर आपण सतत शांतपणे ऐकणारे, समजून घेणारे असलो तर हे टोकाचं पाऊल उचललं जात नाही!
पालकत्व शैलीचा प्रभाव
पालकत्व हे एक गुंतागुंतीचं नातं आहे. तथापि, अलीकडील अभ्यासकांनी पालकत्वाच्या पद्धती आणि मुलांमधील आत्महत्येच्या प्रवृत्तीचं प्रमाण यांच्यातील चिंताजनक संबंधावर प्रकाश टाकला आहे. पालकत्वाच्या चार प्रमुख शैली मानल्या जातात –
हुकूमशाही ( Authoritarian Parenting Style ), अनिर्बंध (Permissive), दुर्लक्षित किंवा अलिप्त (Neglecting) )आणि अधिकारयुक्त (Authoritative). हुकूमशाही पालकत्व शैली – ही प्रामुख्यानं कठोर नियम, शिस्त आणि आज्ञाधारकतेवर भर देण्यावर अवलंबून असते. अति हुकूमशाही, पालकांचे अतिरेकी नियंत्रण, अवास्तव मागण्या यामुळे मुलांमध्ये अपुरेपणाची, असहायतेची भावना आणि अपयशाची भीती निर्माण होऊ शकते. न्यूनता, कमी आत्मसन्मान आणि उच्च अपेक्षा पूर्ण करण्याचा अतिरिक्त दबाव जाणवू शकतो. त्यामुळे संवेदनशील, हळव्या मुलांमध्ये आत्महत्येचे विचार घोळू शकतात. अनिर्बंध पालकत्व शैलीमध्ये हे पालक अनेकदा सौम्य स्वभावाचे, अति लाड करणारे असल्याने मुलं बेशिस्त बनतात. त्यांना मार्गदर्शनच मिळत नाही. मुलांना भावनिक नियमनामध्ये अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्यामध्ये आत्महत्येचे विचार येण्याची शक्यता वाढते.
दुर्लक्षित पालकत्व शैली – यात मुलांमध्ये आपुलकी, प्रेम, शिस्त यांना थाराच नसतो. ‘आपण नकोसे’ असल्यानं किंवा तसं वाटण्यानं मुलांचं वागणं स्वैर होऊ शकतं. परिणामस्वरूप एकटेपणाची भावना निर्माण होऊन आत्महत्येच्या प्रयत्नांची शक्यता वाढते.
अधिकारयुक्त पालकत्व शैली – ही शैली अपेक्षा निश्चित करणं आणि भावनिक आधार देणं यांमध्ये संतुलन साधते. प्रेम, आधार आणि वयानुसार योग्य नियम यांमुळे सातत्याने सकारात्मक परिणाम होतात. मुलांची मानसिक लवचीकता वाढवते, आत्मसन्मान दृढ होत जातो आणि त्यांच्यामध्ये आत्महत्येचा धोका अतिशय कमी आढळतो.
एकंदरीत, आपल्या पालकत्वाच्या सुजाण पद्धती मुलांमधील आत्महत्येचा धोका कमी करू शकतात, हे ठळकपणे ध्यानात येतं. शालेय पातळीवरच ‘भावनिक बुद्धिमत्ता’, ‘समस्या परिहार’, ‘तणाव व्यवस्थापन’ याविषयी शिक्षण द्यायला हवं. विविध अभ्यासक्रम आणि कारकीर्द मार्गदर्शन सहज उपलब्ध असावं. त्यातील निवड विद्याथ्र्याच्या क्षमता, आवड-निवड, कल जोखून केली तर ते आनंदाने नक्की पुढे जातील. अवाढव्य लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांव्यातिरिक्त जे शेकडो पर्याय उपलब्ध आहेत, ते निवडले पाहिजेत. मग आईचं पाठीशी असणं बाळाला उमगेल आणि ते हसेल, फुलेल!
आपल्या मुलांच्या भावनिक आरोग्याला प्राधान्य देणं, ही पालक आणि समाज म्हणून आपली सामूहिक जबाबदारी आहे. आपल्याला असं पोषक वातावरण निर्माण करायचं आहे, जिथं मुलं बहरतील आणि त्यांना उज्ज्वल भविष्याची वाट दिसेल.
uvanita.patwardhan@gmail.com
