अमृता सोमण
‘एन.आर.’ म्हणजे निर्मला रामचंद्र जोशी. ठाण्यातल्या राम मारुती रोडवरच्या न्यू इंग्लिश स्कूलमधल्या आमच्या मराठीच्या बाई, ज्या आमच्या तीन वर्ष वर्गशिक्षिका होत्या. नववी ते अकरावी त्यांनी आम्हाला मराठी शिकवलं. बोलणं अतिशय सौम्य, मोजूनमापून आणि अत्यंत सुसंस्कृत. त्या जेव्हा शिकवायच्या, तेव्हा आमचा ६०-७० मुलांचा वर्ग शांतपणे, मनापासून ऐकायचा. अर्थात कधीतरी मस्तीखोर मुलं बडबड करायची, पण तेव्हा त्या मस्तीखोर मुलांचंही लक्ष वेधून घ्यायच्या. आधी सौम्य शब्दांत बोलून मुलांनी नाहीच ऐकलं तर त्यांचा संताप व्हायचा, पण तरीही रागाचे कमीत कमी शब्द वापरून त्या तो व्यक्त करायच्या. त्यांचा राग, त्यांचा चेहरा लाल झाला की स्पष्ट दिसायचा. पण हे रागावणं कधीकधीच व्हायचं. त्या काळात, म्हणजे १९७० च्या सुमारास आमच्या शाळेत चार-पाच तरी जोशी नावाचे शिक्षक होते. त्यामुळे मराठीच्या जोशी बाईंचा उल्लेख ‘एन.आर. जोशी’ असा व्हायचा. त्या डावखुऱ्या होत्या. व्याकरण शिकवताना फळाभर लिहायच्या, मोत्याच्या दाण्याप्रमाणे सुंदर अक्षरात! त्यांच्या तासानंतर जे शिक्षक यायचे, त्यांना तो सुंदर अक्षरांनी नटलेला फळा पुसणं अगदी जीवावर यायचं! सडसडीत बांध्याच्या बाईंचे केसही लांबसडक होते. सैल, लांब वेणीच्या शेपटय़ावर बऱ्याचदा त्या सोनटक्का, अनंत, गुलाब अशी फुलं घालायच्या. राहणी अत्यंत साधी, पण नीटनेटकी.
ज्ञानेश्वरांचं पसायदान, बालकवींच्या, केशवसुतांच्या कविता अत्यंत सहजपणे, परंतु प्रासादिक शैलीत त्यांनी शिकवल्या. साहित्यातला कविता हा प्रकार त्यांचा विशेष लाडका. मराठी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आणि साहित्य शिकवण्याची हातोटीही होती. त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला रसग्रहण करायला शिकवलं, त्याला तोड नाही. कवितेचं रसग्रहण आणि पसायदान केवळ जोशी बाईंनीच शिकवावं असं माझं ठाम मत होतं. ही अतिशयोक्ती नाही, तर त्यांच्या सर्वच विद्यार्थ्यांना कदाचित असंच वाटत असेल!
त्यांनी आम्हाला पुस्तकातले धडे नाही शिकवले, तर त्या धडय़ांचे लेखक शिकवले! धडा शिकवायला सुरू करताना जवळजवळ दोन तासिका, तो लेखक काय प्रकारचं लिखाण करतो, त्या धडय़ातल्या लिखाणामागे लेखकाची काय भूमिका आहे, त्या लेखकाच्या आयुष्याची जडणघडण कशी झाली, या गोष्टी त्या अत्यंत रंजकपणे सांगायच्या आणि नंतरच धडा शिकवायला सुरुवात व्हायची! आम्ही मुलं या सर्व प्रक्रियेत अगदी रंगून जायचो. धडा शिकवून पूर्ण झाला, की त्या लेखकाची कोणती पुस्तकं शाळेतल्या लायब्ररीमध्ये आहेत, तेही सांगायच्या. आम्ही मग लायब्ररीतून पुस्तकं घेऊन वाचायचो. वाचनाचे संस्कार त्या वयात असे प्रभावीपणे आणि जाणीवपूर्वक आमच्यावर झाले. साहित्य कसं जाणून घ्यायचं, त्यातलं काय चांगलं ते कसं निवडायचं, याचे निकष आमच्या मनात आपोआप तयार झाले. हे संस्कार करताना बाईंचा स्वत:चा व्यासंग, अभ्यास किती खोल आणि उत्तम होता याची जाणीव होऊन त्यांच्याबद्दल आदर, प्रेम आणि आपुलकी वृद्धिंगत झाली.
बाईंनी आम्हालाही लिहिण्यासाठी खूप प्रेरित केलं. तुम्ही कविता, कादंबरी, लेख, कथा, नाटक, कोणताही साहित्य प्रकार निवडा, पण सुचेल तसं स्वतंत्रपणे लिहा, असं नेहमी सांगायच्या. फक्त सांगून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी दरवर्षी आमचं हस्तलिखित मासिक सुरू केलं. त्यातलं लेखन, संपादन सर्व विद्यार्थ्यांनी करायचं आणि हे मासिक दरवर्षी प्रकाशित व्हायचं. हस्ताक्षर ज्यांचं सुंदर आहे, त्यांनी पूर्ण मासिक लिहायचं, चित्रकला ज्यांची चांगली आहे त्यांनी त्या त्या लेख-कथा-कवितेला अनुरूप अशी चित्रं काढायची, सजावट करायची, अशा प्रकारे संपूर्णपणे विद्यार्थ्यांनी केलेली निर्मिती, तीसुद्धा दरवर्षी! यातूनच नवीन निर्माण करण्याची क्षमता आपल्याकडे आहे असा आत्मविश्वास आम्हाला मिळाला. स्वतंत्र लिखाण करायचं असेल तर प्रथम विविध लेखकांचं, विविध प्रकारचं भरपूर वाचन करायला हवं. त्या वाचनाचे संस्कार घेऊन मगच स्वत:ची अशी लेखनसंपदा तयार करा, असं त्यांचं म्हणणं होतं. ते किती योग्य आहे! काहीही लिहिताना ते दर्जेदारच असलं पाहिजे असा आग्रह आपण धरावा, ही किती मोठी गोष्ट आहे हे सतत जाणवत राहिलं. फक्त वाचन, लेखन नाही, तर वक्तृत्व, वादविवाद स्पर्धासाठीही त्या विद्यार्थ्यांना तयार करायच्या. तीन वर्ष वर्गशिक्षिका असल्यामुळे आमच्या वर्गाशी त्यांचा विशेष जिव्हाळा होता. अकरावीत असताना त्यांच्याच पुढाकारानं आमच्या वर्गाची सर्व मुलामुलींसह खंडाळा, लोणावळा इथे सहल काढली होती. सगळय़ा वर्गातल्या मुलामुलींबरोबर बाईही खळखळून हसत, आमची चेष्टा करत होत्या. बाईंना निसर्ग पर्यटन करण्याची खूप आवड होती. नेरळहून माथेरानला चालत, रस्त्यानं, त्यांनी आम्हाला नेलं होतं. वाटेत तऱ्हेतऱ्हेच्या कविता, वाचलेले किस्से, विनोद सांगत होत्या. वेळ कसा गेला आणि माथेरानला कसे पोहोचलो ते कळलंच नाही. शाळा सोडताना आम्हा मुलींना रडू आलं होतं, निरोप समारंभाच्या वेळी. तेव्हा स्वत:च्या डोळय़ातले अश्रू लपवत, हसत हसत बाई म्हणाल्या होत्या, ‘‘तुम्ही सगळय़ा सासरी जाताना किती रडाल गं?.. शाळा सोडताना इतक्या रडताय त्या!’’ बाईंनी मोठय़ा प्रेमानं, हौसेनं स्वत:च्या घरी आम्हाला ‘सेन्ड ऑफ’ दिला होता. आम्ही वर्गातले सर्वजण त्यांच्या घरी जमलो. त्यांच्या बंगल्यातल्या गच्चीत, त्या झोपाळय़ावर बसून आमच्याशी गप्पा मारत होत्या. तेव्हा आमच्या वर्गाकडून आम्ही त्यांना एक ‘फिशपॉण्ड’सुद्धा दिला होता- ‘शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी’! त्यांच्या सहवासात आमची मनं समृद्ध झाली. शाळेतले दिवस सुंदर, सोनेरी झाले. पण हे सगळं कसं पटकन सरलं! अजूनही वाटतं, पुन्हा ‘अकरावी अ’च्या वर्गात आपल्या बाकावर बसावं, जोशी बाई आपल्या संथ चालीत वर्गावर याव्यात, त्यांनी नेहमीचं स्मितहास्य करून धीम्या आवाजात हजेरी घ्यावी आणि मग सुरू करावं शिकवणं! आम्ही सर्वानी पुन्हा भान विसरून त्यांचे शब्द, नक्षत्रांचं देणं आमच्या कानात साठवून ठेवावं! व्याख्यात्या धनश्री लेले एका भाषणात असं म्हणाल्या होत्या, ‘गुणांना रुजवणारा आणि रुजवलेल्या गुणांचं वर्धन करणारा तो गुरू’. गुरूची किती अप्रतिम व्याख्या! ती ऐकून मला आमच्या ‘एन.आर.’च आठवल्या होत्या. त्यांच्या बाबतीत ही व्याख्या चपखल बसते.