उष:प्रभा पागे ushaprabhapage@gmail.com

अरुंधती वर्तक स्वतंत्र आणि स्वायत्त प्रतिभेची वृक्ष चित्रकार. अरुंधतींच्या वृक्षचित्रांना जगभर प्रसिद्धी मिळाली. जागतिक स्तराच्या कलापत्रिकांमधून त्यावर प्रशस्तीचा वर्षांव झाला. भारतीय वृक्षांची विविधता आणि त्यांचे समृद्ध सौंदर्यचित्रातून जगभर पोचवण्यात त्यांचा असा सहभाग आहे. निसर्ग, भारतीय विद्या आणि अभिजात वाङ्मय याचा एकत्र परिपाक म्हणजे अरुंधती यांची चित्रे.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान
country has to be saved from leftist thinkers says All India Member of RSS Suresh Soni
“डाव्या विचारवंतांपासून देशाला वाचवावे लागेल, अन्यथा हे लोक…” संघाचे अखिल भारतीय सदस्य सुरेश सोनी यांचा इशारा

अरुंधती वर्तक यांचे नाव वृक्षचित्रांशी अभिन्नपणे जोडले गेले आहे. सुप्रसिद्ध ‘हंट इन्स्टिटय़ूट फॉर बोटनिकल डॉक्युमेंटेशन’ या संस्थेने पिट्सबर्ग येथे त्यांच्या एकटीच्या भारतीय वृक्षचित्रांचे- ‘पोट्र्रेट्स ऑफ इंडियन ट्रीज’ या नावाने ६ महिन्यांच्या प्रदीर्घ अवधीचे प्रदर्शन भरविले. त्यांनी त्यांच्या वृक्षचित्रांचा ४० पानी रंगीत कॅटलॉगही काढला आहे.

क्यू गार्डन्स या लंडनच्या जगप्रसिद्ध वनस्पती उद्यानाच्या डॉ.शर्ली शेरवूड या मान्यवर ट्रस्टी आहेत. हंट संग्रहालयातील अरुंधतींचे कडूनिंबाचे चित्र पाहून बाईनी त्यांची दोन चित्रे त्यांच्या वैयक्तिक संग्रहासाठी मागवून घेतली. त्यांच्या संग्रहाचे प्रदर्शन त्या बोटनिकल आर्टच्या प्रसारासाठी जगभर भरवत असतात. त्यामुळे अरुंधतींच्या वृक्षचित्रांना जगभर प्रसिद्धी मिळाली. जागतिक स्तराच्या कलापत्रिकांमधून त्यावर प्रशस्तीचा वर्षांव झाला. भारतीय वृक्षांची विविधता आणि त्यांचे समृद्ध सौंदर्य चित्रातून जगभर पोचवण्यात त्यांचा असा सहभाग आहे.

अरुंधती मूळच्या मुंबईच्या. अगदी लहान असताना जेव्हा त्यांना गमभनही येत नव्हते तेव्हा मंत्रालयाची इमारत बघून पाटीवर त्यांनी त्याचे चित्र काढले होते, अगदी उत्स्फूर्तपणे, साध्या सोप्या रेषांमध्ये. ते पाहून वडिलांनी ओळखले की हिच्यात काही निराळी उपजत बुद्धी आहे, चित्रकलेची प्रतिभा आहे, त्या प्रतिभेला फुलवायला हवे. घरात कुणी व्यावसायिक चित्रकार नव्हते, पण आईवडिलांना कलेची आवड होती. कुठेही चांगले चित्र प्रदर्शन असले की संपूर्ण कुटुंब ते मुद्दाम पाहायला जायचे. यांची चित्रे ते चित्रकारांना दाखवायचे. त्यावर मोकळी चर्चा व्हायची, त्यातून चित्रांविषयी बरंवाईट त्यांना उमजायचे. मात्र अरुंधतींना चित्रकलेच्या क्लासमध्ये त्यांनी अडकविले नाही हे विशेष. अरुंधती स्वभावाने मनस्वी त्यामुळे पुस्तकात पाहून आपल्याला हवं तेव्हा, हवे तेवढे आणि हवे तसे शिकण्याची मुक्तता त्यांना आवडायची. स्वत:च्या कुवतीनुसार, गरजेनुसार हाताला वळण लावण्याच्या सवयीमुळे त्यांना चित्रकला तंत्रातील काही गोष्टी मुळापासून समजून घेता आल्या. वडीलही या भावंडांसाठी (त्यांना एक थोरला भाऊ आहे) उत्तम उत्तम पुस्तकं आणायचे. कालांतराने उत्तम चित्रातील लालित्य त्यांना अधिक भावू लागले. गवयाला जसे सूर दिसतात तसे रंग त्यांना खुणावू लागले आणि मनातली ती अस्पष्ट संवेदना कागदावर लहान चौकटीत त्या टिपायला लागल्या. स्वत:साठी काढलेली ही पहिली चित्रे. त्यांना वाटायचे की मोठय़ा चित्रांचा विषय होऊ शकतील असे काही आपल्याला गवसतंय आणि ते मूल्यवान आहे. एसएससी झाल्यानंतर त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सला जायचे सोडून महाविद्यालयामध्ये कलाशाखेला प्रवेश घेतला. याचे कारण त्यांना अभिजात कलेची आवड होती. चित्रकला व्यवसाय म्हणून घेण्यापेक्षा तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार होणे हे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. त्यांचे आजोबा समाजात प्रतिष्ठित होते. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या संग्रहात प्राचीन, भारतीय परंपरा, संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान, राजकारण यावर उत्तम ग्रंथसंग्रह होता. या ग्रंथांशी अरुंधतींचा परिचय झाला. चित्रमहर्ष िएम.आर. आचरेकर यांच्याकडून अल्पकाळ का होईना त्या व्यक्तिचित्रे शिकल्या. महाविद्यालयीन दिवसांत मोहम्मद अलींच्या मुंबई भेटीत अरुंधतींनी त्यांचे व्यक्तिचित्र त्यांना भेट दिले. ‘आय अ‍ॅम द ग्रेटेस्ट’ मानणाऱ्या मोहम्मद अलींनां ते अतिशय आवडले आणि तो उस्फूर्तपणे अरुंधतींना म्हणाले, ‘यू आर द ग्रेटेस्ट’.

बी.ए. झाल्यावर जे.जे.मध्ये अरुंधती यांनी फाऊंडेशन कोर्स घेतला. पण या संथ, रूढ वाटेवर आपली कलेची ऊर्मी नष्ट होईल या भीतीने त्यांनी जे.जे.ला रामराम ठोकला. याचा त्यांना कधीच खेद वाटला नाही. या सुमारासच आपल्या प्राचीन कला आणि संस्कृतीबद्दलचे त्यांचे कुतूहल जागे झाले होते. आणि प्राचीन वाङ्मयाचा त्यांचा व्यासंग सुरू झाला होता. काही काळ अरुंधती संगीतही शिकल्या. त्यामुळे त्यांचा गाण्याचा कान तयार झाला. एकीकडे जलरंगातील निसर्गचित्रे काढायचा छंद त्यांना जडला होता. चिंचणीला त्यांच्या मातुल आजोबांचे घर होते. गाव निसर्गरम्य होते. पावसाळा आवडता ऋतू असल्याने या काळात कितीतरी निसर्गदृश्ये त्यांनी तिथे रेखाटली, रंगविली. प्रसिद्ध चित्रकार हळदणकर यांची जलरंगावर मोठीच हुकूमत होती. त्यांच्याकडे पाण्यात लदबदलेला ब्रश अलगद रंगांत बुडवून कागदावर ऊन-सावलीचा पारदर्शीपणा आणि रंगांची किमया त्यांनी पाहिली आणि ती स्वत:त मुरवली. नात्यातील दादा ठाकूरांकडून मेघदूतविषयी ऐकून त्यांनी ते वाचले आणि त्यांच्या कारकीर्दीला वेगळे वळण मिळाले. त्या मेघदूताच्या, त्यातील निसर्गाच्या इतक्या प्रेमात पडल्या की त्यांनी त्यावर चित्र काढले. ते सुंदर चित्र पाहून वडिलांनी उत्तेजन दिले आणि त्यांनी त्यावर चित्रमालिकाच तयार केली. वडिलांना वाटले की याचे प्रदर्शन भरवायला हवे. अवघ्या २६व्या वर्षी, १९८४ मध्ये मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांचे २४ चित्रांचे पहिले प्रदर्शन झाले. मोठमोठे साहित्यिक, चित्रकार यांनी त्यांच्या कलेचे खूप कौतुक केले.

रंगांचे विश्व निर्माण करणाऱ्या अरुंधतींना शब्दकळाही वश आहे. प्राचीन संस्कृत साहित्यातील निसर्ग दर्शनाचा तसेच कालिदास, भवभूती, बाणाभट्ट यांच्या रचनातील निसर्गाचा त्यांनी अभ्यास केला. त्यावर त्यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिले आहेत. स्वत:च्या भटकंतीमधून त्यांनी वनसृष्टीचा, पशू-पक्ष्यांचा अभ्यास केला. त्यामुळे त्यांच्या लेखनात आणि चित्रात सखोलता आहे, कारण त्या त्या विषयाचे ऐतिहासिक सांस्कृतिक संदर्भ त्यासोबत आहेत. अरुंधतीने अतिशय जिव्हाळ्याने आणि तितक्याच चिकित्सेने कालिदासाच्या साहित्यातील निसर्गाविषयी लिहिले आहे.

निसर्ग, भारतीय विद्या आणि अभिजात वाङ्मय याचा एकत्र परिपाक म्हणजे अरुंधतींची चित्रे. चित्रकला शिक्षणाच्या ठरावीक पठडीबाहेर राहूनही, किंबहुना त्यामुळेच त्यांच्या चित्रांना प्रतिभेचा स्पर्श झाला, ती स्वयंपूर्ण, स्वयंस्फूर्त आणि कोणत्याही ‘इजम’ (ism) पासून मुक्त आहे. त्यांना आवश्यक वाटले ते त्यांनी अभ्यासले, आत्मसात केले, मुरवले. मेघदूताच्या चित्रप्रदर्शनासाठी त्यांनी भारतीय लघुचित्र शैलीचा अभ्यास केला. त्यातून झाडांकडे पाहण्याचे, अभ्यासाचे अनेक आयाम तिला मिळाले. चित्रांच्या जोडीला अरुंधती लिहितातही छान, चित्रमय. मेघदूतावरील प्रदर्शनानंतर लोकसत्तेच्याच ‘चतुरंग’साठी १९९२ मध्ये ‘वईवाट’ ही सचित्र लेखमाला त्यांनी चिंचणी या खेडेगावात कुंपणालगत आढळणाऱ्या विविध रानफुलांवर लिहिली.. त्यांची शास्त्रीय माहिती अत्यंत रंजकरीत्या बोलीभाषेत लिहिली होती. वहिवाटऐवजी गावरान ‘वईवाट’ हे शीर्षक तसेच ठेवले, त्यात परिसर वर्णन होते, लोक श्रद्धा, लोकगीते आणि कालिदासाचाही संदर्भ होता. दुर्गाबाई भागवतांनी त्यांना यासाठी लिहिते केले. अरुण टिकेकरांनी त्यांचे ‘लोकसत्ता’मध्ये स्वागत केले. वनस्पती प्रेमींनाही लेखमाला आवडली.

भारतीय प्राचीन कलेत झाडे आहेत ती पाश्र्वभूमीला, पण तरीही त्यांची आवश्यक ती वैशिष्टय़े शक्यता बारकाईने त्यात दाखवल्या आहेत. अरुंधतींच्या चित्रांचा मुख्य विषय झाडे हाच असतो, (तसा तो लघुचित्र शैलीत मुख्य विषय नसतो). झाडांच्या वाढीच्या विविध अवस्था, ऋतुमानांनुसार त्यांचे बदलते रूप, झाडांचे विशिष्ट प्राणी-पक्ष्यांशी असलेले साहचर्य, झाडांशी निगडित सामाजिक रूढी, परंपरा, सांस्कृतिक संदर्भ असे सगळे त्यांच्या चित्राला आशयपूर्ण बनवते. त्यांच्या काही चित्रातून लघुचित्र शैलीतील कथन तंत्राचाही आविष्कार दिसतो, घटनाक्रम त्यातील नाटय़ासह उलगडत जातो. छोटय़ा कागदांवर रेखाटणे करून त्यावरून एकाच चित्रात हा घटनाक्रम व्यक्त करण्याची किमया त्यांनी केली आहे.

त्यांच्या कलेतील निसर्ग आविष्कार प्रगट झाले त्याला कारण ठरला निसर्गकवी कालिदास. त्यांच्या माहितीप्रमाणे मेघदूताचे एकच लघुचित्र उपलब्ध आहे आणि ते सध्या पाकिस्तानात आहे. मेघदूतावरील चित्रमालिका त्यांनी तरुणपणी केली. मेघदूत जसे त्यांना भावले तसे त्यांनी चितारले. सामाजिक चित्रकला किंवा अमूर्त चित्रकला हीच खरी चित्रकला असा समकालीन चित्रकलेचा प्रवाह होता. तेव्हा त्यांनी स्वत:शी प्रामाणिक राहून प्रवाहाबाहेरचे हे धाडस केले. त्यांच्या कलेतील कारकीर्दीचे दालन भारतीय विषय घेऊन उघडले होते. नंतरचे आव्हान होते ते आपला स्वतंत्र ठसा उमटवण्याचे, त्यासाठी वर्तमानाशी जुळेल आणि भारतीय शैलीशी नाते सांगेल अशी शैली आत्मसात करण्याची. त्यात त्या यशस्वी झाल्या, जगात त्यांच्या वृक्षचित्रांची प्रदर्शने झाली.. पण कालिदास त्या पुन्हा वाचतात तेव्हा तो त्यांना नव्याने सापडतो आहे. त्यामुळे पुन्हा त्यावर त्यांना चित्रमालिका करायची आहे. ती अधिक सखोल असेल असे त्यांना वाटते. कारण कलेचा शोध कधी संपत नाही. सध्या त्यांनी हातात दोन मोठे प्रकल्प घेतले आहेत- ‘प्राचीन साहित्यातील वनस्पतीसृष्टी- वृक्षांची नावे, त्यांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक संदर्भासह’ आणि दुसरा मोठा प्रकल्प सातवाहन काळातील बृहत ग्रंथ ‘गाथा सप्तशती’ याचे इंग्लिश भाषांतर आणि त्यावरील चित्रे. इ.स.पूर्व २ रे शतक ते इ.स. ३ रे शतक या दरम्यानचा याचा कालखंड. या सगळ्याचा अभ्यास आणि त्यावरील चित्रे हा मोठाच प्रकल्प आहे. अरुंधती म्हणतात, ‘‘माझी स्वप्ने खूप आहेत आणि हात दोनच.’’ पण तरीही आपले काम रसिकांपुढे आणण्याचा प्रयत्न करीन, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. निसर्ग प्रेमींना आणि रसिकांना या आश्वासन पूर्तीची खात्री आहे, आणि उत्सुक प्रतीक्षाही.

chaturang@expressindia.com