|| उष:प्रभा पागे

वाघांना आणि गावकऱ्यांना निश्चित भविष्य देण्यासाठी मध्य प्रदेशमधील पन्ना जंगलामध्ये विद्या वेंकटेश काम करते आहे. वाघांना संरक्षण हा तर तिचा आणि ‘एलडब्ल्यूएफ’ संस्थेचा उद्देश आहेच, पण भविष्याचा विचार करून येथील पारधी समाजातील लहान मुलांना जंगलाच्या संवर्धनाचे धडे देणे सुरू झाले आहे. मुलांना जंगलाचा नव्याने परिचय घडत असल्याने संवर्धनाची पहाट तिथेही उजाडणार यात शंका नाही.

मध्य प्रदेशातील जंगल भागातील पारधी जमातीचा पिढय़ान्पिढय़ांचा व्यवसाय होता शिकारीचा. एक पारधी बोलता बोलता म्हणून गेला, ‘‘आम्ही इतके वाघ मारले आहेत की ते मोजायला तुमच्या डोक्यावरचे केसही पुरे पडणार नाहीत.’’ लोखंडी फासे लावून हे लोक शिकार करतात. त्यात प्राण्यांचे पाय अडकून ते जखमी होतात. पारधी त्यांना लगेच मारतही नाहीत, कारण रात्रभर जंगलात अनेक ठिकाणी फासे लावत हे लोक पुढे जातात आणि सकाळी एक एक करत ते गोळा करतात, यात प्राण्यांचे अगदी हालहाल होतात. प्राणी पकडायला सोपे जावे म्हणून हे लोक जंगलांना आगी लावतात त्यातही प्राणी होरपळून मरतात.

भारतात एके काळी वाघांची संख्या ४० हजार होती, ती आता जेमतेम ४ हजार इतकी कमी झाली आहे, याचे कारण पारधी लोकांचा शिकारीचा व्यवसाय. शिकार हे त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन होते. स्वातंत्र्यकाळानंतर वन्यप्राण्यांच्या शिकारीवर कायद्याने बंदी आल्यावर पर्यायी उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे पारध्यांनी चोरटी शिकार आणि तस्करी सुरू केली. एके काळी त्यांच्यावर गुन्हेगार जमात असा शिक्का बसला होता. तो शिक्का काही अजून पुसला गेला नव्हता, त्यामुळे त्यांना काम द्यायला कोणी धजावत नसत. त्यामुळे परंपरेने चालत आलेला शिकारीचा व्यवसायच – पण आता चोरून सुरू करण्याशिवाय त्यांच्यापुढे अन्य उपाय नव्हता. खालपासून वपर्यंत या चोरटय़ा शिकारीचे मोठे जाळेच देशविदेशात निर्माण झाले आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या भागांत ही पारधी जमात विखुरलेली आहे. देशभर आता वाघ वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक अभयारण्यांतून ‘टायगर प्रोजेक्ट’ सुरू झाले आहेत. वाघ वाचवायचा तर जंगलही वाचले पाहिजे. जंगलाभोवती मानवी वस्ती असतेच. जंगलात लाकूडफाटा आणायला जाणारा एखादा गावकरी वाघाच्या हल्ल्याला बळी पडतो. त्यामुळे मनुष्य वाघाशी वैर धरतो.

वाघ संवर्धनातील अडथळ्यांची अशी ही शर्यत आहे. मनुष्य आणि वाघ हा संघर्ष उभा राहिला आहे. वन खाते म्हणजे सरकार, निसर्गप्रेमी, पर्यावरणाचे कैवारी सगळ्यांचे प्रयत्न या दिशेने चालले आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था यात काम करत आहेत. यापकी एक संस्था आहे मुंबईस्थित ‘लास्ट वाइल्डरनेस फाऊंडेशन’(‘एलडब्ल्यूएफ’). मूलगामी, सर्वागीण विचार आणि त्यानुसार उपक्रमाची आखणी आणि निष्ठेने कामाचा पाठपुरावा हे या संस्थेचे वैशिष्टय़ आणि वेगळेपणही आहे. मध्य प्रदेशातील वन्यप्राण्यांचे महत्त्वाचे आवास म्हणजे पन्नाची निसर्गसंपन्न रत्नभूमी,(एके काळी पन्नाचे अरण्य वाघांसाठी प्रसिद्ध होते. गेल्या शतकाअखेरीस तेथील वाघ संपून गेले. आता वाघ बाहेरून आणून तिथे सोडले आहेत.) बांधवगड आणि कान्हा या अभयारण्याचा प्रदेश. नेमक्या याच ठिकाणी कामाची जास्त गरज आहे हे ओळखून ‘एलडब्ल्यूएफ’ने इथे काम सुरू केले आहे, तेही तळागाळापासून. ‘एलडब्ल्यूएफ’ची सुरुवातच वाघाच्या प्रेमातून झाली. बडय़ा बहुराष्ट्रीय उद्योगात कार्यरत असलेल्या उच्चविद्याभूषित निखिल नागले यांना १९९७ मध्ये अभयारण्यात वाघ दिसला आणि ते त्यांच्या प्रेमात पडले. त्यांनी पूर्वतयारीसाठी काही वर्षे घेतली आणि नोकरी सोडून २००९ मध्ये ‘लास्ट वाइल्डरनेस फाऊंडेशन’ सुरू केले. आता याच संस्थेची २०११ पासून एक संचालक आहे विद्या वेंकटेश. वाणिज्य शाखेची मुंबई निवासी विद्या वाणिज्य व्यवहारात मोठय़ा हुद्दय़ावर काम करीत होती. फायदा-तोटय़ाची समीकरणे सोडवत असली तरी मन निसर्गात, फुलपाखरांच्या अभ्यासात गुंतलेले, संर्वधनाच्या कामात मनापासून रस असणारी आणि या कामाची आंतरदृष्टी असणाऱ्या विद्याला संवर्धनाची गरज त्या कामाकडे खेचत होती. विद्याने मोठय़ा पदाची मुंबईची नोकरी सोडली आणि आता पन्ना, बांधवगड आणि कान्हा हीच तिची कर्मभूमी (आणि युद्धभूमीही) झाली आहे. सरकारी वनखाते आणि गावकरी यांच्या मधील दुव्याचे, मध्यस्थाचे काम ही संस्था सातत्याने करीत आहे. उद्देश आहे वन्यप्राणी आणि मानव यामधील संघर्षांवर उपाय शोधणे आणि संवर्धनाच्या प्रयत्नात सातत्य राखणे.

मध्य प्रदेशातील या जंगल आणि वन्यप्राणीबहुल गावांमधून काम करताना काही पूर्वाभ्यास गरजेचा होता. यांच्या टीमने या अभयारण्याच्या परिसरातील लोकांच्या जीवनाचा, त्यांच्या गरजांचा, त्यांच्या उपजीविकेच्या साधनांचा, असा अभ्यास वृत्तान्त तयार केला. त्यांचे जंगलाशी असलेले नाते अभ्यासले. विद्याच्या टीमने लोकांना एकत्र करून त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. या बाहेरून आलेल्या लोकांचा सद्भाव लोकांपर्यंत पोहोचल्यावर टीमचे काम सोपे झाले. मग जाणीव जागृती कार्यक्रम सुरू केले. माहितीपट दाखविले. जीवसृष्टीतील निसर्गचक्रातील वाघाचे स्थान कसे महत्त्वाचे आहे आणि वाघ टिकला तर आपण टिकणार, हा संदेश त्यांच्यापर्यंत जाणे महत्त्वाचे होते.

स्थानिक लोकांसाठी या टीमने जंगल सफारी सुरू केली. पारधींना जंगल माहीत होते, गरज होती ती त्यांची जंगलाकडे बघायची दृष्टी बदलण्याची. संवर्धन कामाचे महत्त्व त्यांना पटले तर चोरटय़ा शिकारीला आळा बसणे शक्य होते. विद्याच्या टीमच्या सतत संपर्काचा एक परिणाम असा झाला की, हे लोक आता या परिसरात शिकार करत नाहीत. त्यांच्या पर्यायी उपजीविकेची सोय करणे मात्र फार महत्त्वाचे आहे. त्या लोकांनी विद्याच्या संस्थेकडे मागणी केली की, आम्हाला वाहन चालवायचे शिक्षण द्या. संवर्धन कामातील हा टप्पा चांगल्या बदलाचे चिन्ह नक्कीच आहे. संवर्धनाच्या कामात स्थानिकांचा सहभाग हवा म्हणून पारधी मुलांसाठी उन्हाळी शिबिराचा उपक्रम फार महत्त्वाचा ठरला, असे विद्या म्हणाली. लहान मुलांची पाटी कोरी असते, माती ओली असते, त्यांना आकार देणे सोपे जाते. त्या मुलांसाठी जंगल सफारीचा अनुभव अत्यंत आनंददायी होता. त्यांच्या माहितीला प्रशिक्षकांनी शास्त्रीय माहितीची जोड दिली. एकमेकांकडून माहितीची देवाणघेवाण झाली. मुलांना जंगलाकडे पाहण्याची दृष्टी मिळाली. हीच मुले उद्या जंगलाच्या संवर्धनाची धुरा घेणार आहेत, नव्हे ते घेतील, असा विश्वास टीमला वाटतो आहे. खात्यालाही तशी खात्री वाटते आहे. वन खात्याचे अधिकारी विद्याच्या टीमला सर्व सहकार्य देत आहेत, कारण त्यांच्याकडून अपेक्षित परिणाम मिळतो आहे. जोडीला या मुलांना इलेक्ट्रिक फिटिंग, मुलींना शिवणकाम शिकविणे असे चालू आहे. मुलांसाठी नाटिका, गाणी, नाच अशा कार्यक्रमांतून निसर्गाचे, पर्यावरणाचे शिक्षण मुलांना सहजपणे मिळते आहे. शिबिरांमधून या मुलांना स्वच्छतेचे धडे मिळाले. सुरुवातीला दात घासणे, रोज आंघोळ करणे हे मुलांना नवीन होते, पण एकूणच मुलांची ग्रहणशक्ती तीव्र असल्यामुळे ती यात रमू लागली. त्यांच्याकडेही माहितीचा खजिना होता. कोणत्या प्राण्याच्या मांसाची, हाडांची, कातडय़ाची काय किंमत आहे, कोणता पक्षी कशी शीळ घालतो- ताईला सांगायला आपल्याकडेही खूप आहे म्हणून मुले आनंदाने मोहरून जातात. मुलांना जंगल सफरीवर नेऊन आणल्यावर त्यांची प्रतिक्रिया होती ‘जंगल किती सुंदर आहे’. पारधी जमातीचे लोक त्यांच्या मुलांसाठीच्या या उपक्रमावर खूश आहेत.

पन्नाच्या परिसरात या मुलांसाठी वसतिगृह आणि शाळा आहे. थोडे काही मनाविरुद्ध झाले, की मुले पालकांकडे पळून जातात. त्यांना परत आणणे, त्यांना आनंदी ठेवणे, नवनवीन उपक्रमांत त्यांना गुंतविणे अशी सारखी कार्यकर्त्यांची परीक्षा असते; पण बदल होतो आहे. वन्यप्राणी आणि मानव यांच्या संघर्षांचे अनेक पलू आहेत. ‘एलडब्ल्यूएफ’च्या विद्या आणि तिचे सहकारी हा संघर्ष कमी करण्यासाठी नवनव्या उपायांच्या शोधात आहेत. मार्ग खडतर आहे, पण येथे संवर्धनाची पहाट उगवणार आहे.

ushaprabhapage@gmail.com