संसारातील आपली कामं यथायोग्य रीतीने पार पडल्यावर मग मात्र वाटतं, आता आपण आपल्याकरिता काही तरी केलं पाहिजे. काय बरं करावं? आता या वयात म्हणजे ४०-५०शी उलटून गेल्यावर जमेल का आपल्याला हे? लोक नावं तर ठेवणार नाहीत ना? पण आपली खरीखुरी इच्छा असली, तर कुठलीही कला शिकायला वय आड येत नाही, आणि हे सगळं आपण आपल्या मनाच्या समाधानाकरिता करतो आहोत ना? मग लोकांकडे कशाला लक्ष द्यायचं?
आ पल्यापैकी बहुतेकांना आयुष्यात काही तरी शिकायचे असते. म्हणजे शाळा-कॉलेजचे शिक्षण तर आहेच त्याशिवाय काही तरी वेगळे म्हणजे एखादी कला-गायन, नृत्य, वादन, चित्रकला, शिल्पकला, भरतकाम, विणकाम वगैरे वगैरे. पण प्रत्येकाची ती इच्छा पूर्ण होतेच असे नाही. काही वेळा घरच्या परिस्थितीमुळे किंवा आपण जिथे राहतो तिथे ती सोय नसते म्हणून! अर्थात शाळा-कॉलेजचे शिक्षण तरी सगळ्यांना कुठे मिळते?
मग मिळेल ती नोकरी, लग्न, मुलेबाळे हे सगळे चालू होते. अर्थात मधून मधून ‘ती’ इच्छा डोके वर काढतेच. पण वेळ नाही, म्हणून ती तशीच दाबून टाकावी लागते.
संसारातील आपली कामे यथायोग्य रीतीने पार पडल्यावर मग मात्र वाटते. आता आपण आपल्याकरिता काही तरी केले पाहिजे. काय बरे करावे? आता या वयात म्हणजे ४०-५०शी उलटून गेल्यावर जमेल का आपल्याला हे? लोक नावे तर ठेवणार नाहीत ना? पण आपली खरीखुरी इच्छा असली, तर कुठलीही कला शिकायला वय आड येत नाही, आणि हे सगळे आपण आपल्या मनाच्या समाधानाकरिता करतो आहोत ना? मग लोकांकडे कशाला लक्ष द्यायचे?
एका बाईंना गाणे शिकायची खूप इच्छा होती, पण संसारातल्या जबाबदाऱ्यांमुळे ते जमले नाही. ४०व्या वर्षी वेळ मिळाला. आता आवाज लागेल की नाही म्हणून त्या वाद्यवादन शिकल्या. त्या तर शिकल्याच पण आजूबाजूच्या २५-३० मुलींनाही जमेल तेवढे शिकवले. त्यातून त्यांना जो आनंद मिळाला त्याचे मोल केवढे मोठे!
आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि शेवटी संन्यासाश्रम असा मानवी जीवनाचा आलेख मांडला गेला आहे. यातले पहिले दोन तर आपण पाळतोच. पण वानप्रस्थाश्रम म्हणजे संसार सोडून वनात जाणे हे सध्याच्या काळात जमणे सगळ्यांना शक्य होईल असे दिसत नाही. त्यासाठी रानावनातच कशाला जायला पाहिजे? मुलांचा संसार सुरू झाल्यावर आपण संसारातले लक्ष काढून घेणे म्हणजेच वानप्रस्थाश्रम नव्हे का? आता काही वेळा घरातल्या आजी-आजोबांना घरात लक्ष द्यावे लागते, एखाद्या कामाची जबाबदारी घ्यावी लागते. मात्र तेवढेच करावे. मुलांच्या संसारात लुडबुड करू नये.
माझ्या ओळखीच्या एक बाई (वय ८८) त्यांना झेपेल तेवढे समाजकार्य करतात. घरी बसल्या बसल्या आपल्या नातवंडांबरोबर शेजारच्या मुलांना त्यांचे आईवडील येईस्तोवर सांभाळतात. दुसऱ्या एक जण छोटे स्वेटर विणून, झबली, टोपली, दुपटी शिवून अनाथाश्रमातल्या मुलांना देतात. एक आजोबा आपल्या नातवंडांबरोबर आजूबाजूच्या २-४ मुलांचा गृहपाठ करून घेतात. कुणी संस्कार वर्ग घेतात, तर कुणी वृद्धाश्रमात जाऊन पुस्तक वाचून दाखवितात. पाळणाघर चालविणे, घरगुती चक्की आणून आजूबाजूच्या लोकांची धान्ये दळून देणे असे किती तरी उद्योग करणारेही आहेत. मुले, सुना नोकरीवर गेल्यावर, आल्या-गेल्याचे आदरातिथ्य, दार उघडणे, निरोप घेणे, घरातले उरले सुरले बघणे, कामवाल्यांकडून कामे करून घेणे हेही आजचे अनेक ज्येष्ठ नागरिक करताहेत.
नोकरी करणारे निवृत्त झाल्यावर आणि गृहिणींची मुले स्थिरस्थावर झाल्यावर त्यांच्याकडे वेळच वेळ असतो. त्या वेळेचे काय करायचे, या विचाराने ते हैराण होतात, पण करायला किती तरी गोष्टी आहेत. वाचक क्लब, सकाळचे फिरणे, थोडे बागकाम, भिशी मंडळ, आवड असल्यास देवाची मन लावून पूजा, प्राणायाम, योगासन ही न संपणारी यादी आहे. यातले आपल्या जमेल ते करावे.
मध्यंतरी मी एका वृद्धाश्रमात गेले होते. त्यांची जेवायची वेळ होती दुपारी १२ वाजताची. एक सुखवस्तू दिसणाऱ्या बाई बरोबर पावणे बाराला आल्या. झालेल्या स्वयंपाकातले वाढायला भांडय़ात काढून घेतले. मंडळी पानावर आल्यावर भराभरा वाढायला लागल्या. त्या रोज न चुकता हेच काम करतात. दोन्ही वेळच्या जेवणात वाढणे. कारण त्यांना तेवढा वेळ रिकामा असतो. आता बघा इच्छा असली की मार्ग सापडतो की नाही?
तेव्हा आता ‘गेले करायचे राहून’ची खंत न बाळगता – ‘राहून गेलेले करायचेच’. खरे ना?