तीन अपत्यांची आई आणि एक सर्वसाधारण गृहिणी म्हणून जगणार्‍या ओडेत सन्समनं ब्रिटिश गुप्तचर म्हणून देशासाठी इतकं असामान्य धैर्य दाखवलं की, त्याला तोडच नाही. त्यांना पकडल्यानंतरही ‘‘तुम्ही माझे तुकडे केले तरी मी एक अक्षरही सांगणार नाही.’’ असं त्यांनी सांगितलं. मग तापलेल्या सळईचे पाठीवर चटके देणं, बर्फाच्या लादीवर उघडं झोपवणं असे त्यांचे हाल सुरू झाले. इतकंच नाही तर एका क्षणी चिडलेल्या अधिकार्‍यानं आपलं हत्यार त्वेषाने ओडेत यांच्या बोटात खुपसून त्यांचं नख उपसलं. ओडेत यांच्या पार मेंदूपर्यंत वेदना गेल्या. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, पण त्यांनी तोंड उघडलं नाही. त्यामुळे किती तरी सैनिक, गुप्तहेर वाचले.

फ्रान्समधील पेरीग्यू इथल्या क्लांडेस्टाइन या गुप्त विमान धावपट्टीच्या आजुबाजूच्या परिसरात प्रचंड थंडी आणि दाट धुकं पसरलं होतं. वेळ असेल रात्री दहाची. जर्मन व्याप्त फ्रान्समध्ये सगळीकडे ‘स्पेशल ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह’ त्यांच्या प्रतिरोध गटासाठी सक्रिय असण्याचा काळ. १९४३ची जानेवारीची थंडी. सगळीकडे प्रचंड धुकं.

दाट गवत असलेल्या जागेत कुंपणाजवळ काही जण लपून बसले होते. ‘‘ओडेत, तू सरपटत पुढे कुंपणापर्यंत जा. तिथं कुणी गस्त घालणारे सैनिक आहेत का बघ,’’ जॅक्स म्हणाला. ओडेत आडवं सरपटत काही मीटर पुढे गेल्या. काही अंतरावर सैनिक उभे असल्याचा संकेत त्यांनी जॅकना दिला. जर्मनांना चकवा देऊन येणार्‍या ब्रिटिश विमानाची सगळेजण अधीरपणे वाट बघत होते. त्या विमानातून काही सहकारी गुप्तहेर, पैसे आणि साधन सामग्री येणार होती. त्या गटाचे म्होरके होते, ओडेत सन्सम आणि पीटर चर्चिल. विमान कुठं उतरायचं हे संकेताद्वारे सांगण्यात येणार होतं. आकाशातून आवाज येऊ लागला. विमान आलं, पण पीटरच्या संकेतास उत्तर न देता विमान पुढं निघून गेलं. ओडेत ओरडल्या, ‘‘जर्मन सापळा! पळा!’’ त्या अंधारात सगळे उलट दिशेने धावू लागले. प्रतिरोध चळवळ पूर्णपणे मोडून काढण्यासाठी जर्मन सैनिक त्यांच्या पाळतीवरच होते. काही सेकंदात कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला. ओडेत म्हणाल्या, ‘‘त्यांनी आपल्या मागे जर्मन शेफर्ड लावले आहेत. मी सांगते त्या पद्धतीने चला, पण एकत्र नको, विखरून चला.’’ जवळपास वीस मिनिटं सगळे जिवाच्या आकांतानं धावत होते. ओडेत यांनी त्यांच्या पिशवीतील एक दोन खासगी वस्तू मुद्दाम उलट दिशेनं दूरवर आवाज येईल अशा फेकल्या. त्यामुळं पाठलाग करणार्‍या सैनिकांची थोडी दिशाभूल झाली. शेवटी कसाबसा जीव वाचवत ते तिथून निसटले. लेखक लॅरी लॉफ्टीस यांच्या ‘कोड नेम : लिझ’ या ओडेत सन्सम यांच्यावरील पुस्तकाची सुरुवातच या थरारक सत्य प्रसंगापासून होते.

ओडेत सन्सम यांचा गुप्तहेर म्हणून कार्यकाळ थोडा असला तरी अत्यंत नाट्यमय आणि थरारक प्रसंगांनी भरलेला होता. अल्प काळात त्यांनी बर्‍याच मोहिमांसाठी जिवाची बाजी लावली होती. तीन अपत्यांची आई आणि एक साधारण गृहिणी म्हणून जगणार्‍या स्त्रीनं देशासाठी इतकं असामान्य धैर्य दाखवलं, की त्याला तोडच नाही. म्हणून त्यांच्या जीवनावर अनेक पुस्तकं लिहिली गेली. जेरार्ड टिकल यांचं ‘ओडेत: द स्टोरी ऑफ अ ब्रिटिश एजंट’ हे पुस्तक शिवाय १९५० मध्ये त्यांच्यावर बनलेला चरित्रपट ‘ओडेत’ यातून आपल्याला त्यांच्या अद्वितीय शौर्याची गाथा वाचायला आणि बघायला मिळते.

ओडेत मारी ब्रेली (Odette Marie Braily) यांचा जन्म २८ एप्रिल, १९१२ ला फ्रान्समधील एमिन्स येथे झाला. वडील गॅस्टन ब्रेली हे फ्रेंच सैन्यात अधिकारी होते. त्यांना पहिल्या महायुद्धात मित्राचा जीव वाचवताना वीरगती प्राप्त झाली होती. आई गृहिणी होती. ओडेत यांचं बालपण फार त्रासात गेलं. एका गंभीर आजारात त्यांना काही काळ दृष्टी गमवावी लागली होती. बराच काळ अंथरुणावर असलेल्या ओडेत यांनी अत्यंत जिद्दीनं आणि चिकाटीनं त्या आजाराचा सामना केला. त्यावेळी त्यांनी दाखवलेला संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन बघून आपली मुलगी असामान्य आहे हे त्यांच्या पालकांच्या लक्षात आलं होतं. तरुणपणी (१९३१ मध्ये) देखण्या ओडेत या रॉय सन्सम या ब्रिटिश व्यक्तीच्या प्रेमात पडल्या आणि दोघांनी लग्न केलं. त्यांनी इंग्लंडमध्ये संसार थाटला.

पुढे दुसर्‍या महायुद्धाला तोंड फुटलं. १९४२ मध्ये ‘बीबीसी’ रेडिओवरून ब्रिटिश नौदल विभागानं मित्र राष्ट्रांच्या नागरिकांना एक आवाहन केलं की, कुणाकडे फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्यावरील फोटो काढलेले असल्यास सरकारकडे पाठवावेत. ओडेत यांच्याकडे तसे बरेच फोटो होते. ते त्यांनी ब्रिटिश सरकारकडे पाठवले.(अशा अनेक फोटोंचा उपयोग पुढे बहुचर्चित ‘नॉर्मंडी लँडिंग’साठी करण्यात आला. आपण आगामी लेखात त्याबद्दल माहिती घेणार आहोत) त्या फोटोंमुळे ओडेत यांना ब्रिटिश गुप्तचर संस्थेनं बोलावून घेतलं. ओडेत यांची एकूण बुद्धिमत्ता, प्रभावी बोलणं, फ्रेंच भाषेचं सखोल ज्ञान यामुळे अधिकार्‍यांनी त्यांच्यापुढे Special Operations Executive म्हणून काम करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी ओडेत यांना तीनही मुली लहान होत्या. त्यांना आजीच्या हवाली करून एक गुप्तहेर म्हणून देशासाठी काम करणं हा निर्णय त्यांच्यासाठी किती कठीण गेला असेल, पण त्यांनी तो निर्णय घेतला. त्यानंतर सुरू झालं त्यांचं अत्यंत कठोर प्रशिक्षण. त्यातील वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही शारीरिक अवस्थेत असतानाही क्षणात बंदूक काढून एकाच हातानं निशाण साधणं. पकडलं जाण्याची आणि छळ होण्याची दाट शक्यता असल्यानं वेदना सहन करण्याची शक्ती वाढवण्याचं प्रशिक्षणही त्यांनी घेतलं. त्यासाठी लागणार्‍या मानसिक ताकदीचा आपण अंदाजच नाही लावू शकत.

२ नोव्हेंबर १९४२ या दिवशी मध्यरात्रीच्या काळोखात गुप्तपणे ब्रिटिश विमानानं पॅराशूटद्वारे त्यांना फ्रान्समध्ये उतरवण्यात आलं. तिथं पीटर चर्चिल या ब्रिटिश गुप्तहेरासोबत त्यांना पुढील मोहिमा पार पाडायच्या होत्या. तिथं मोर्सेई शहरातल्या एका प्रतिनिधीला, माँसीयर व्हायडलला दोन लाख फ्रँक्स पोचवण्याची कामगिरी होती. वरवर दिसतं तितकं हे सोपं नव्हतं. व्हायडल मागे विशी पोलीस (जर्मन व्याप्त विशी प्रांतातील पोलीस) हात धुवून मागे लागले होते. त्यांचा ठावठिकाणा शोधून, पैशांची बॅग सुपूर्द करून परत दुसर्‍या शहरात जायचं होतं. पीटर आणि ओडेत, आपण पतिपत्नी असल्याचं भासवत रेल्वे प्रवास करून मोर्सेई येथे पोहोचले. पीटर त्यांच्या कामाला निघून गेले आणि एकट्या ओडेत एका छोट्या खेड्यात पोहोचल्या. तिथं एका गॅरेजमध्ये ठेवलेली एक छोटी सुटकेस त्यांनी ताब्यात घेतली. प्रसाधनगृहात जाऊन अंगावर सगळीकडे बांधलेल्या नोटा सोडवल्या आणि बॅगेत भरल्या. व्हायडल यांना भेटण्यासाठी त्या एका गलिच्छ वस्तीतील हॉटेलमध्ये गेल्या पण व्हायडल तिथं नव्हतेच. अशा वेळी तिथं थांबणं धोक्याचं होतं. त्या परतल्या पण व्हायडल यांना भेटण्यासाठी पुन्हा त्याच गलिच्छ वस्तीत गेल्या. यावेळी लपतछपत व्हायडल तिथं पोहोचले. परवलीचे शब्द वापरून बॅग ताब्यात घेऊन ते निघाले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. संचार बंदी सुरू झाली. ओडेतचं परतणं शक्य नव्हतं. सायरन वाजवत जर्मन गाड्या फिरू लागल्या. जोरात धरपकड सुरू झाली. व्हायडल त्यांना एका गल्लीत घेऊन गेले.

‘‘ मी बाहेर थांबतो. तुम्ही पाच मिनिटांत परत नाही आलात तर समजेन सोय झाली,’’ असं म्हणत ते बाहेर थांबले. ओडेत त्या पडक्या इमारतीत गेल्या. ते जर्मन सैनिकांसाठी असलेलं एक वेश्यागृह होतं. माँसीयर व्हायडलचं नाव सांगितल्यावर तिथल्या मालकिणीनं वरच्या मजल्यावरच्या एका छोट्याशा खोलीत ओडेत यांना ठेवून बाहेरून दार बंद केलं. मध्यरात्री जर्मन पोलिसांची धाड तिथं पडली. एक परागंदा जर्मन सैनिक तिथं लपल्याच्या संशयावरून पोलीस तिथं आले होते. वरच्या छोट्याशा खोलीत ओडेत जीव मुठीत धरून बसल्या होत्या. त्या मालकीणबाई म्हणाल्या, ‘‘वरती एका चिंचोळ्या जागेत देवीचा रोग झालेल्या माझ्या भाचीला बंद करून ठेवलं आहे. तुम्ही अजिबात जाऊ नका.’’ त्यावेळी खरोखरच देवीच्या रोगाची साथ होती म्हणून पोलीस वर गेले नाहीत आणि ओडेत वाचल्या.

पुढे एप्रिल १९४३ मध्ये ह्युगो ब्लायशर (Hugo Bleicher) या जर्मन अधिकार्‍याच्या सतत पाठपुराव्यामुळं आंद्रे हा फ्रेंच गुप्तहेर पकडला गेला. त्याच्या फितुरीमुळे १६ एप्रिल १९४३ या दिवशी ओडेत आणि पीटर चर्चिल यांना पकडण्यात आलं. त्याच क्षणी दोघांनी आपण पती-पत्नी आहोत आणि इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांंचे नातेवाईक आहोत अशी दुहेरी थाप मारली. त्या कारणामुळं जर्मनांनी त्यांना पकडून नेताना फरफटत न नेता ‘किंचित’ नरमाईची वागणूक दिली. दोघांना पॅरिसमधील तुरुंगात टाकलं तेव्हाच ओडेत यांनी पीटर यांच्या रक्षणार्थ सगळा आरोप स्वत:वर घेतला. फ्रेंच प्रतिरोध चळवळीत आणि निर्णय प्रक्रियेत माझे पती पीटर यांचा अजिबात सहभाग नाही, सगळा दोष माझ्यावर लावा अशी धाडसी थाप मारली.

आपल्याला तर देहान्ताची शिक्षा होणारच, पण पीटर यांंची चळवळीला जास्त गरज आहे या थोर भावनेनं त्या खोटं बोलल्या. त्यामुळं पीटर यांच्यावर माफक अत्याचार झाले, पण ओडेत यांची रोज कसून तपासणी सुरू झाली. त्यांच्या सगळ्या ‘नेटवर्क’ ची माहिती सांगावी यासाठी त्यांचा अनन्वित छळ सुरू झाला. ‘‘तुम्ही माझे तुकडे केले तरी मी एक अक्षरही सांगणार नाही.’’ असं त्या ठामपणे म्हणाल्या. मग तापलेल्या सळईचे पाठीवर चटके देणं, बर्फाच्या लादीवर उघडं झोपवणं असे हाल सुरू झाले. उपासमारी मुळं त्या अर्धमेल्या झाल्या तेव्हा एक अधिकारी त्यांच्याकडे आला. ‘‘हे बघ, तुला फासावर चढवण्याआधी आम्ही तुझ्याकडून माहिती मिळवणार आहोतच. तुमच्या जहाज बंदरांचे नकाशे कुठे आहेत? तुम्हाला रसद कोण पोचवतं? आता पटकन बोल, नाहीतर एक एक करून तुझी नखे उपटली जातील.’’ ओडेत त्याही अवस्थेत क्षीण हसल्या. त्यावर चिडून त्या अधिकार्‍यानं हातातील हत्यार उघडलं आणि त्वेषात त्यांच्या बोटात खुपसून त्यांचं नख उपसलं. ओडेत यांच्या पार मेंदूपर्यंत सणकून वेदना गेल्या. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, पण त्यांनी तोंड उघडलं नाही. यातनांनी तडफडत राहिल्या.

काही दिवसांनी त्यांना लष्करी न्यायालयात नेण्यात आलं. त्या स्वत:ला बजावत राहिल्या, ‘‘मी काहीही सांगणार नाही!’’ अधिकारी म्हणाले, ‘‘चर्चिल मॅडम, एक फ्रेंच स्त्री आणि ब्रिटिश गुप्तहेर म्हणून काम करताना तुमच्यावर दोन आरोप आहेत.’’

‘‘महोदय, आरोप कितीही असले तरी तुम्ही मला एकदाच ठार करू शकता, तीनदा नाही.’’ त्या ठामपणे म्हणाल्या. त्यानंतर तुरुंगात कैदेत असलेल्या त्यांच्या इतर कार्यकर्त्यांना फाशी देण्यात आली किंवा गोळ्या घालण्यात आल्या. पीटर आणि ओडेत हे चर्चिल आडनावामुळं अजून जिवंत होते. एक वर्ष झाल्यावर त्यांना जर्मनीच्या तुरुंगात हलवण्यात आलं कारण फ्रान्समध्ये जर्मनांची ताकद कमी होऊ लागली होती. तिथल्या तुरुंगात ओडेत यांच्यावर वेगवेगळ्या अमानुष पद्धतीनं अत्याचार करण्यात आले. तिथं त्यांच्या खोलीत युक्रेन, पोलंड मधल्या अनेक स्त्री कैदी मरणासन्न अवस्थेत पडून होत्या.

१८ जुलै १९४४ त्यांना रेव्हेन्सब्रूक इथल्या छळछावणीत हलवण्यात आलं. तिथं हजारो स्त्री कैदी होत्या. बर्‍याच जणींची पुढे कत्तल करण्यात आली. ओडेत यांची प्रकृती खूपच खालावली म्हणून त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं. त्यांना केवळ चर्चिल नावामुळं जीवदान मिळालं होतं. युद्धात जर्मनांची पीछेहाट होत होती. युद्ध समाप्तीनंतर त्या इंग्लंडला परतल्या. फार मोठ्या काळानंतर त्यांची त्यांच्या मुलींशी गाठभेट झाली, पण त्यांचा पहिला विवाह संपुष्टात आला होता. त्यांनी एस.ओ.ई सहकारी पीटर चर्चिल यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यांनी यातना सहन करूनही माहिती न दिल्यानं कित्येक कार्यकर्ते आणि गुप्तहेरांचा जीव वाचला होता आणि अनेक प्रतिकार चळवळी मोहिमा यशस्वी झाल्या होत्या. त्यांच्या एकूण कार्यासाठी ब्रिटिश सरकारकडून त्यांना ‘जॉर्ज क्रॉस’ हा बहुमान मिळाला. फ्रान्स ने Legion d’ honneur सहित अनेक सन्मान दिले. त्यांचे युद्ध काळातील अनुभव कथन ऐकणार्‍यांच्या अंगावर शहारा आणत. त्या सांगत की, मुलींना भेटण्याच्या तीव्र ओढीमुळं मी जिवंत राहू शकले.

१३ मार्च १९९५ या दिवशी वॉल्टन ऑन थेम्स इथं ८२ व्या वर्षी मागे मोठा कुटुंब परिवार सोडून या महान गुप्तहेराने जगाचा निरोप घेतला.

adaparnadeshpande@gmail.com