मृदुला भाटकर
‘‘आजवर खूप तुरुंगांचं दर्शन झालं.. खऱ्याखुऱ्या आणि मनातल्याही! यातले खऱ्या तुरुंगाचे गज हा माणसांनी स्वीकारलेल्या न्याययंत्रणेचा अविभाज्य भाग असला आणि अनेक प्रकरणांत न्यायदान करताना मी अनेकांना कारावासाची शिक्षा ठोठावली असली, तरी गजाआडचा माणूस कायम आणि अंतर्बाह्य वाईटच असतो, असं मी म्हणणार नाही. या तुरुंगांनी मला गज आणि जग यातील अंतर शिकवलं.’’

‘‘काय हे तुरुंगात असल्यासारखं झालंय..’’
‘‘किती दिवस डांबलो गेलोय घरातच!
बोअर होतंय.’’

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!

हे सगळे संवाद आपणच उच्चारलेले, करोनाच्या काळात! त्यादरम्यान सगळय़ा जगानंच तुरुंगवास भोगला, पण घरात! दाराभिंतींआड. त्या काळात मला सारखी मी शिक्षा दिलेल्या अनेक गुन्हेगारांची आठवण येत होती. कुठे असतील ते? बापरे! काय ही तुरुंगवासाची शिक्षा.. त्या वेळी शारीरिक स्वातंत्र्याचा खराखुरा अर्थ अनुभवला. केवढं मौल्यवान असतं स्वातंत्र्य! ते ज्याच्या त्याच्या हातात असतं.

गजांबद्दल मला लहानपणापासून खूप राग. बंद गोष्टी नकोच. मनंसुद्धा! जे लहानपणी वाचतो, शिकतो त्याचा ठसा आपण खूप दूर नेतो. मी तेव्हा वाचलेलं लोकमान्य टिळकांचं चरित्र, त्यातला त्यांचा मंडालेचा कारावास, तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ‘माझी जन्मठेप’, ‘काळं पाणी’ या पुस्तकांचा खोलवर परिणाम झालेला. अर्थात् ते तुरुंगवास दुर्दैवी असले, तरी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या थोर व्यक्तींनी दिलेली ती किंमत होती. तेव्हा हेही जास्त अधोरेखित झालं, की लोकमान्यांचे ‘गीतारहस्य’ आणि ‘द आक्र्टिक होम इन द वेदाज्’ हे ग्रंथ किंवा ‘कमला’सारखं स्वातंत्र्यवीरांचं काव्य तुरुंगात लिहिलं गेलं. शरीर गजाआड असलं, तरी बुद्धी आणि मन विजिगीषू असतं. ते कुठेही देदीप्यमान भरारी घेऊ शकतं. आता स्वातंत्र्य मिळालं आहे, पण तुरुंगाचा विचार करताना एक वाक्य माझ्या मनात नेहमी उमटतं- आपल्या राष्ट्रपती भवनावर, जे आधी व्हॉइसरॉयचं निवासस्थान होतं, तिथे प्रवेशद्वारावर दगडात एक फार महत्त्वाचं वाक्य इंग्रजांनी कोरलंय- Liberty will not descend to a people, a people must raise themselves to liberty. It is a blessing that must be earned before enjoyed. मी जेव्हा मुंबई शहर दिवाणी कोर्टात न्यायाधीश म्हणून काम करत होते, त्या वेळी दोन वर्ष माझ्यावर आर्थर रोड तुरुंगाची पाहणी करून त्याचा अहवाल देण्याचं काम सोपवलं होतं. तुरुंगात जाणं आणि तिथे कैद्यांना भेटणं काही मला नवं नव्हतं. प्रत्येक वेळेस वेगळय़ा अनुभवाची नोंद मनात व्हायची. आर्थर रोडची तेव्हा क्षमता होती ८०० ते ८५० कैद्यांची. तिथे एकत्र कच्चे कैदी म्हणजे Under Trial Prisoners ( UTP) ठेवलेले असतात. एकदा का शिक्षा झाली, की मग ते येरवडा, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, सेंट्रल जेलमध्ये बदली केले जातात. तिथे त्यांच्या शिक्षेप्रमाणे, कुवतीप्रमाणे त्यांना कामं सांगितली जातात.

माझ्या पहिल्या तुरुंग भेटीच्या वेळेस जाण्याचा मुख्य उद्देश होता, आर्थर रोडमध्ये तुरुंगाच्या क्षमतेपेक्षा किती जास्त कैदी ठेवले आहेत. असं समजलं होतं, की सुमारे अडीच हजार कैदी तिथे आहेत. मी तुरुंगात गेले, तर सगळय़ाच भेटींत जसं दाखवतात तसंच होतं- सर्व ठीक! पण थोडे कैदी जास्त म्हणून जरा गैरसोय होते वगैरे. मी ‘कलम ३०२’चे(भारतीय दंड विधान) कैदी ठेवतात तिथल्या वेगळय़ा बरॅकमध्ये गेले. कैदी तसे बऱ्यापैकी जास्त दिसत होते. मला कुठेही गेलं, की तपासणीचा भाग म्हणून प्रथम न्हाणीघर आणि शौचालय उघडून बघायची सवय आहे. तशी मी पटकन् तिथे बाजूला असलेलं शौचालय उघडलं, तर आत चार-चार कैदी दाटीवाटीनं बसलेले. कुणालाही अपेक्षा नव्हती की मी शौचालय उघडून बघेन. मी विचारल्यावर कैद्यांपैकी कुणीतरी म्हणालं, ‘आमच्यापैकी दोघं रोज आलटून पालटून तिथे झोपतात’. तुरुंगाधिकाऱ्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नव्हता. ते काय करणार बिचारे? त्यानंतर काही वर्षांनी तळोजा इथे कच्च्या कैद्यांसाठी मोठा तुरुंग बांधला गेला. प्रश्न खुनी माणसांचा नाही, तर माणुसकीचा होता. असो!
मी माणुसकीबद्दल सांगते आहे, तेही खूनी माणसांविषयी लिहिताना, ते अनेकांना विचित्र वाटेल. पण गुन्हेगारी जगाकडे एका वेगळय़ा दृष्टीनं पाहाताना माझी धारणा हीच आहे, की एक खून केलेला माणूस दोन वेळा खून क्वचित करतो. ती कृती त्या माणसाच्या मनातलं मूळचं जनावर जागृत झाल्यामुळे किंवा मनावरचा, शरीरावरचा ताबा गेल्यामुळे होते. पण लाच स्वीकारणारी, पैसे खाणारी व्यक्ती मला खुनी माणसाइतकीच गुन्हेगार वाटते. कारण तो माणूस देश पोखरणारा तोच गुन्हा अनेकदा निर्लज्जपणे करतो.

तुरुंगात गैरवागणूक केल्याबद्दल एका जेलरला शिक्षा झाली होती. उच्च न्यायालयात त्याचं प्रकरण माझ्यासमोर आलं. त्यातून लक्षात आलं, की कोणकोणत्या गोष्टी कैद्यांना गैरमार्गानं मिळतात ते. मला तेव्हा ‘Papillon Henri Charriere’ यांच्या शाळेत असताना वाचलेल्या पुस्तकाची आठवण झाली. न केलेल्या खुनाबद्दल वीस वर्ष शिक्षा झालेला कैदी सुटकेचा ध्यास घेऊन समुद्रात उडी मारून कशी सुटका करून घेतो, हे मला फार आवडलं होतं. पैशांनी गोष्टी विकत घेता येतात. त्याला दुर्दैवानं तुरुंगातले काही कर्मचारी अपवाद नाहीत. आत प्रत्येक बरॅकमध्ये छोटे छोटे कैद्यांचे गट होतात. त्यातला ‘दादा’ कैदी पैसे देऊ शकणाऱ्या कैद्याकडून पैसे घेऊन साबण, उशी, वेगळी तेल-मसाल्याची भाजी, तसंच एखादा मदतनीसही त्या कैद्याला मिळवून देतो. तो मदतनीस जेवणाच्या, आंघोळीच्या रांगांमध्ये त्या कैद्याचा ‘डमी’ म्हणून उभा राहतो. काही कर्मचारी, अधिकारी निश्चितच प्रामाणिक असतात. पण सगळेच तसे नसतात. सत्य कितीही अप्रिय असलं, तरी न्यायाधिशाला त्या सत्याला सामोरं जावं लागतं. त्या जेलरनं गांजा, चरससुद्धा आत नेऊ दिलं होतं.

आर्थर रोडमध्येच एका स्वतंत्र बरॅकमध्ये नायजेरियन, घाना, युगांडा इथल्या मुख्यत: अमली पदार्थाच्या तस्करीसाठी पकडलेल्या कैदी स्त्रिया होत्या. मी आल्यावर त्यांनी त्यांच्या भाषांमध्ये एकच गोंगाट सुरु केला. शेवटी खाणाखुणा करून त्यांनी ‘जेवणात टोमॅटो हवे आहेत’ असं सांगितलं! त्याच वेळी मला आठवण झाली ती ‘रिझले’ या ब्रिटनमधल्या तुरुंगाची. मी जेव्हा तिथे रीतसर भेटीसाठी गेले होते, तेव्हा पुरुष कैद्यांसाठी स्त्री वॉर्डन्स सर्रास होत्या. आम्ही स्त्रियांच्या वॉर्डमध्ये गेलो, तेव्हा दुपारचा एक वाजत होता. तुरुंग दाखवणाऱ्या गोऱ्या स्त्री अधिकाऱ्यानं मला सांगितलं, ‘‘तिथे आता नेतोय याचं कारण म्हणजे दुपारी एक वाजण्याच्या आधीची त्या कैद्यांची वागणूक आणि नंतरची तुम्ही पाहा. एक वाजता त्या कैद्यांचा ‘स्मोक टाइम’ असतो.’’ खरंच एक वाजण्याआधी तिथे फिरताना स्त्री कैद्यांमध्ये एक प्रकारचा हिंस्त्रपणा मला सतत जाणवत होता. शत्रुत्व जाणवत होतं. एक वाजता त्या एका ठिकाणी जमून सिगारेट्स ओढत बसल्या, तेव्हा मात्र सर्वजणी अत्यंत आनंदी आणि हसतखेळत होत्या. दहा मिनिटांतला हा बदल पाहून मी अवाक झाले. त्यानंतर त्यांनी ‘नमस्कार, इंडिया, ताजमहाल, बॉम्बे’ वगैरे बोलून माझं स्वागतही केलं! ती स्त्री अधिकारी म्हणाली, ‘‘स्त्री कैदी पुरुष कैद्यांपेक्षा इथे अधिक कठीण, हिंस्र असतात..’’

गजाआड म्हणजे सगळय़ा जगापासून तुटणं. जग आणि गज हे उलटापालट केलेले शब्द अगदी विरुद्ध अर्थ घेऊन एकमेकांसमोर उभे असतात. या गजांआड मात्र आरोप सिद्ध झालेल्या म्हणजेच पक्क्या कैदेच्या कैद्यांना विविध कामं पुरवली जातात, करवून घेतली जातात. सुतारकाम करणारे कैदी दणकट अशा खुच्र्या, बाक, टेबलं इत्यादी बनवतात. मी नेहमी ठाणे, नाशिक, येरवडा, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी गेल्यावर सतरंज्या आणि वेगवेगळी बिस्किटं आणते. तेवढंच कैद्यांना त्यांचं उत्पन्न!


=आर्थर रोड तुरुंग भेटीच्या वेळेस तुरुंग अधिकाऱ्यांना मी विचारलं, ‘‘तुरुंगात गणपती बसवता की नाही?’’
‘‘नाही मॅडम. कोणत्याही एकाच धर्माचा उत्सव आम्ही करू शकत नाही. आपल्या राज्यघटनेनुसार तुरुंग धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) आहेत. फक्त राष्ट्रीय सण- म्हणजे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी साजरे करतो.’’
‘‘मग कैद्यांच्या धार्मिक भावनांचं काय?’’
‘‘प्रत्येक कैदी स्वत:पुरता धर्म पाळू शकतो. ज्याला वाटेल त्यानं स्वत:पुरती देवावर श्रद्धा, त्याचा फोटो ठेवावा, आरती म्हणावी, रोझरी ठेवावी, नमाज पढावेत. पण त्याच्यापुरतंच. सार्वजनिकरीत्या काही नाही.’’
मला वाटतं, धर्म ही वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे राज्यघटनेचा आदर करणाऱ्या, धर्मनिरपेक्षता जपणाऱ्या या गोष्टीचं कौतुकच नाही, तर अभिमान वाटला.

येरवडय़ाचे पूर्वीचे तुरुंगाधिकारी धनाजीराव चौधरी यांनी सांगितलेली गोष्ट माझ्या स्मरणात आहे. ते नागपूरचे तुरुंगाधिकारी असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी नागपूरला येणार होत्या. प्रत्येक खात्याच्या प्रमुखांना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याबरोबर चहापानाचं आमंत्रण दिलं होतं, म्हणून चौधरींनाही ते मिळालं. जाताना त्यांनी जेलमध्ये फुलवलेल्या गुलाबांचा गुच्छ नेला. खुनाबद्दल जन्मठेपेची शिक्षा झालेला एक कैदी व्यवसायानं माळी होता आणि त्यांनं इतर कैद्यांना बरोबर घेऊन उत्कृष्ट गुलाब लावले होते. अतिशय मोहक दिसणारे, सुवासिक. त्या गुलाबांचा गुच्छ त्यांनी पंतप्रधानांना भेट दिला आणि सांगितलं, की हे कैद्यांनी फुलवलेले गुलाब आहेत. इंदिरा गांधी चटकन उद्गारल्या, ‘‘kkOh, these are guilty roses! I will take these to Delhill आणि खरंच तो Guilty Rosesl चा गुच्छ पंतप्रधानांच्या सोबत दिल्लीत गेला!
थोडक्यात, गुलाब कुठेही बहरतो.. गजाबाहेर, गजाआड, मनात.. फक्त रोपं लावणारी बोटं आणि निगराणी करणारी मनं हवीत!
chaturang@expressindia.com