डॉ. किशोर अतनूरकर

आजकाल अनेक पालकांचा एकाच अपत्यावर थांबण्याचा कल वाढतो आहे. त्यामागे कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक कारणे नक्कीच आहेत, जी या पिढीची आहेत. मात्र त्यांच्या मुलांचे काय? त्यांचे एकटेपण वाढणार नाही का? या मुलांच्या सुखदु:खात सहभागी व्हायला त्यांचे जवळचे असे घट्ट नात्याचे कुणी असेल का? एवढेच नव्हे तर भारतीय संस्कृतीतल्या त्यांच्या काका, मामा, मावशी, आत्या या नातेवाईकांच्या कौटुंबिक भावविश्वाला यामुळे तडा जात नाही का? याच पैलूंचा ११  जुलैच्या लोकसंख्या दिनानिमित्ताने घेतलेला वेध..

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!

एक काळ असा होता, जेव्हा भरमसाठ वाढणाऱ्या लोकसंख्येचा प्रश्न ऐरणीवर नव्हता. पाळणा लांबवण्याची साधने वापरून, गर्भधारणा टाळून कामजीवनाचा आनंद घेता येऊ शकतो, ही संकल्पना नव्हती. शरीरसंबंध ही एक मूलभूत गरज होती. अपत्यजन्मावर नियंत्रण नसल्यामुळे, स्वाभाविकच इच्छा असो वा नसो, ऐपत असो वा नसो, परिवार मोठा असे. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम अस्तित्वात आला. ‘छोटा परिवार, सुखी परिवार’ ही संकल्पना मांडण्यात आली. ‘बच्चे- दो या तीन बस!’ हा कुटुंबाचा आकार लोक मान्य करू लागले. त्यानंतरच्या काळात तर ‘बच्चे- दोही अच्छे’ ही घोषणा पुढे आली. कुटुंबाचा आकार कमी होत गेला, परंतु त्याचा मुलांच्या भावविश्वावर काय परिणाम झाला, होतो आहे याचाही विचार गांभीर्याने करायला हवा.

साधारणत: गेल्या दोन दशकांत दोन अपत्ये असलेले छोटे कुटुंब आणखी छोटे करून मुलगा असो वा मुलगी, ‘एक संतान, सुखी परिवार’ या तत्त्वावर कुटुंबाचा आकार अगदीच छोटा करण्याकडे अनेक जोडप्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दशकांत मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले. मुली नोकरी, व्यवसाय करून आर्थिक दृष्टीने स्वावलंबी व्हायला लागल्या. मुलींना स्वत:चे करिअर घडवायचे असल्यामुळे, त्यांची लग्ने उशिरा होत आहेत. लग्न झाल्यानंतर लगेच गर्भधारणा नको, एक-दोन वर्ष ‘एन्जॉय’ करू आणि मग नंतर ‘प्रेग्नन्सी’ असा ही जोडपी विचार करताना मुलीच्या वयाच्या तिशीच्या सुमारास पहिल्या अपत्याचे नियोजन होत आहे. त्यानंतर दुसरा ‘चान्स’ घेण्यासाठी अजून किमान तीन-चार वर्षे. वय वाढतेय, मग दुसरे अपत्य होऊ द्यावे की नको, नोकरी आणि घर सांभाळून आपल्याला दुसरे अपत्य सगळय़ा दृष्टिकोनातून ‘जमेल’ ना? ही द्विधा अवस्था. या सर्व परिस्थितीमुळे, मुलगा असो वा नसो, आपल्याला एकच अपत्य पुरे, असा विचार करून अनेक सुशिक्षित जोडपी एकाच अपत्यावर कुटुंब मर्यादित ठेवत आहेत. अशा अतिमर्यादित कुटुंबांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार असे चित्र आहे. या निर्णयाचा देशाच्या लोकसंख्या नियंत्रणाच्या कार्यक्रमाला कळत नकळत हातभार लागतोय हे खरे जरी असले, तरी आपल्या नव्हे, तर आपल्या मुलांच्या वैयक्तिक भावजीवनावर आणि समाजजीवनावर काय दूरगामी परिणाम होतील? यापुढे साधारणत: पन्नास वर्षांनंतर देशाच्या मनुष्यबळावर काय परिणाम होतील? या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध ११ जुलैच्या जागतिक लोकसंख्या नियंत्रणदिनी घेणे महत्त्वाचे आहे.   

पंधरा-वीस वर्षांपूर्वी एका अपत्यावर थांबण्याचा निर्णय घेतलेल्या काही जोडप्यांशी आम्ही बातचीत केली. तेव्हा लक्षात आले की, एका अपत्यावर थांबण्याच्या निर्णय प्रक्रियेचे अनेक पैलू आहेत. एकाने सांगितले, ‘‘पहिला मुलगा आहे ना? बस्स झाले. मुलानंतर एखादी मुलगी असावी असे वाटते, पण नाही झाली तर? उगाच रिस्क नको.’’ आपल्या देशात एक मुलगा असताना कुटुंब मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेणे सोपे आहे. मात्र पहिली मुलगी असताना, दुसरा मुलगा व्हावा या अपेक्षेने ‘चान्स’ घेण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडणे भल्याभल्यांना अवघड जाते. पण तसेही घडायला लागले आहे. पहिली मुलगी असताना, मुलगा होण्याची वाट न बघता, एका अपत्यावर थांबण्याचा निर्णय अनेकांनी घेतला.‘तुम्ही हा निर्णय कसा काय घेतला?’ या प्रश्नाचे उत्तर देताना एक कॉमन गोष्ट लक्षात आली. त्यांचे म्हणणे होते, ‘लग्नानंतर आमचे ठरले होते- मुलगा असो वा मुलगी, आपण फक्त एकाच अपत्यावर थांबायचे.’ एकाच मुलीवर थांबलेली जोडपी आम्हाला अधिक ठाम, अधिक पक्की वाटली. लग्नानंतरच्या एका अपत्यावर थांबण्याचा निर्णय त्यांनी मुलगी झाली म्हणून बदलला नाही.

एका अपत्यावर थांबण्याच्या निर्णयामागे आपल्या आणि अपत्याच्या दृष्टीने योग्य वाटणारे काही मुद्दे पुढे आले. उदा. एक अपत्य झाले ना? बास झाले. त्या अपत्याचे आपण व्यवस्थित करू, आपल्याला जे मिळाले नाही ते त्या अपत्याला देऊ, काही कमी पडणार नाही असे बघू, चांगले करिअर घडवू, वगैरे. एकाऐवजी दोन असतील तर दोघांचे सगळे व्यवस्थित करता येईलच असे नाही, ही भूमिका एका अर्थाने बरोबर वाटते. त्याचे सगळे व्यवस्थित करायचे आणि आपले आयुष्यदेखील ‘एन्जॉय’ करायचे. ‘‘एकाऐवजी दोन अपत्यांचे सगळे करण्यात आपल्याला आयुष्यात जे काही करायचे आहे ते राहून जाईल, या विचारानेदेखील आम्ही एकाच अपत्यावर थांबण्याचा निर्णय घेतला,’’ असे काही जोडप्यांनी सांगितले. एक आणि एकच अपत्य असावे यासंदर्भात आमच्या एका जवळच्या मित्राशी फोनवर प्रदीर्घ चर्चा झाली. त्याने सांगितलेल्या एका घटनेवर तो आणि मी जरा वेळ अस्वस्थ राहिलो. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या आपल्या एकमेव मुलाला एके दिवशी त्याने विचारले, ‘‘कुणाल, तुला काय वाटते, तुला एखादे भावंड असायला पाहिजे होते?’’ त्यावर कुणाल म्हणाला, ‘‘पप्पा, या विषयावर मला तुमच्याशी खूपदा बोलावेसे वाटले, पण मी ते टाळले. आता तुम्ही विचारताय म्हणून सांगतो, मला एखादा भाऊ किंवा बहीण असायला पाहिजे होती.’’

 ‘‘कशासाठी?’’

 ‘‘तुम्ही मला सांगा, तुमच्या माघारी मला कोण आहे? आपले सख्खे असे कुणी तरी शेअर करायला लागते हो!’’

मित्र मला म्हणाला, ‘‘हा विचार मी कधी केलाच नव्हता. कुणालचे बरोबरही असेल, पण मला हे उत्तर त्याच्याकडून अपेक्षित नसल्यामुळे मी अस्वस्थ झालो. कुणाल इतक्या वर्षांपासून असा विचार करत असेल असे मला वाटलेदेखील नाही आणि आता वाटून काय उपयोग म्हणा? कारण वेळ निघून गेली होती. सख्खा भाऊ किंवा बहीण असूनदेखील पुढील आयुष्यात त्यांचे एकमेकांशी जमेलच असे नसते, सख्खे भाऊ पक्के वैरी होत असतानाची किती तरी उदाहरणे आपण समाजात पाहतोच ना, असे मी माझ्या मनाला सांगत स्वत:चीच समजूत घातली.’’ 

भावनांची देवाणघेवाण, सुखदु:खांत सोबत असणे, यासंदर्भात अपत्याच्या बाजूने आलेली ही प्रतिक्रिया एका अपत्यावर थांबण्याच्या ठाम निर्णयाला हादरा देऊन जाते. आमच्या एका मित्राच्या डेन्टल सर्जन पत्नीने सांगितले, ‘‘खूप प्रयत्न करूनदेखील मला माझ्या मुलीशी मैत्री करताच आली नाही. त्यांना त्यांच्याच वयाचे मित्रमैत्रिणी लागतात. आपण भावंड होऊ दिले नाही म्हणून त्याच्या किंवा तिच्यासोबत ‘ठरवून’ असे मित्रासारखे वागणे कितीही नाही म्हटले तरी कृत्रिमच वाटते. मैत्रीतील सहजपणासाठी त्यांना त्यांच्याच वयाची मुलेमुली लागतात. ती बारावीला असताना आम्हाला जाणवले, की आपल्या सानवीला एखादे भावंड असायला हवे होते- पण पुन्हा तेच- वेळ निघून गेली होती.’’

एकच मुलगी असणाऱ्या, फार्मसी महाविद्यालयातल्या प्राध्यापिका सीमा पटवारी यांनी सांगितले, ‘‘मी लेकीला, निमाला सांगितलेय, तू आमच्यासारखे करू नकोस, दोन मुले होऊ देत. आमची गोष्ट वेगळी होती, आमचे करायला कुणी नव्हते, पण आम्ही आहोत ना तुझे करायला.’’ एखादे अपत्य आपले आणि दुसरे स्वत:चे होऊ देण्यापेक्षा दत्तक घ्यावे, असाही विचार काही जोडपी करतात. या बाबतीत छायाताई म्हणाल्या, ‘‘मला तरी दत्तक घेणे इतके सोपे वाटत नाही. दत्तक घेतलेल्या मुलांच्या वाढीचे वेगळे टेन्शन असते. आपण आपल्या परीने त्याला चांगलेच वाढवणार, पण समजा, ते मूल पुढे चांगली प्रगती करू शकले नाही, तर आपणच कुठे तरी सापत्न वागणूक दिली की काय, ही टोचणी आयुष्यभर लागणार. शिवाय लोक बोलणार ते वेगळेच.’’ अर्थात सगळ्यांच्याच बाबतीत तसे होईल असे नाही.

आमच्या एका मित्राला क्रिकेटमध्ये भारी इंटरेस्ट! या संदर्भात तो त्याचीच उपमा देत म्हणाला, ‘‘एक अपत्य सांभाळायचे म्हणजे कसरत. चुका करायला वाव नाही. चूक झालीच, तर दुरुस्त करायला वाव नाही. एकापेक्षा जास्त अपत्ये म्हणजे कसोटी सामना आणि एक अपत्य म्हणजे एकदिवसीय सामना. कसोटी सामन्यात पहिल्या डावात लवकर बाद झालो, तर दुसऱ्या डावात शतक ठोकून सामना जिंकता किंवा किमान अनिर्णित राखता येतो, पण ‘वन डे’मध्ये तसे नसते. एकदा बाद झाले की बाद!’’

नवरा-बायको दोघेही ‘वर्किंग’ असतील तर ‘दुसरे अपत्य की आपले करिअर’ अशी द्विधा अवस्था अनेकांची होते आणि मग अपत्याचा निर्णय लांबणीवर पडतो. काही वर्षे अशीच जातात, मग आता जाऊ द्या, दोन अपत्यांत खूप ‘गॅप’ होईल, अशी भीती निर्णय घेऊ देत नाही. त्यापेक्षा दुसरे अपत्य नकोच हा निर्णय होऊन कुटुंब एकाच अपत्यावर मर्यादित राहते. सर्व काही एकाच अपत्याला व्यवस्थित देऊ, असे म्हणताना त्या अपत्याकडून अपेक्षा वाढतात. त्या अपेक्षा पूर्ण होतानाची लक्षणे दिसली तर ठीक, नाही तर त्या अपेक्षांचे ओझे कळत नकळत त्या एकमेव अपत्यावर लादले जाऊ शकते. त्या तणावाचा दूरगामी परिणाम मुलावर होऊ शकतो.

काही वेळा मात्र आपल्याला एकच अपत्य आहे आणि काही कारणांनी ते म्हातारपणी आपल्याजवळ राहिले नाही तर? असा विचार करून एका अपत्यावर थांबायचे असे मनात असूनदेखील दुसरे अपत्य होऊ दिले जाते; पण दोन अपत्ये असूनदेखील म्हातारपणी आई-वडिलांजवळ राहून ती त्यांची ‘सेवा’ करतील याची काय खात्री? असा प्रतिसवाल येणारच. त्यामुळे अनेकदा एकाच अपत्यावर थांबण्याचा निर्णय घेतला जातो.

एका अपत्यावर कुटुंब मर्यादित ठेवायचे की नाही हा निर्णय सोपा नाही. कधी आपल्याला आपले सुख महत्त्वाचे वाटते, तर कधी अपत्याचे करियर, तर कधी अपत्याच्या भावनिक सुखाचा प्रश्न भेडसावतो. जगात अनेक प्रकारची उदाहरणे आढळतात. एकापेक्षा जास्त अपत्य असलेल्या कुटुंबातील सगळीच भविष्यात चमकतील, एकत्रितपणे राहून गुण्यागोविंदाने नांदतील आणि म्हातारपणी आई-वडिलांची सेवा करतील असे नाही. तसेच एकच एक असलेले अपत्य लाडोबा, हट्टी आणि दुराग्रहीच निघेल असेही नाही.

ज्या जोडप्याने एका अपत्यावर आपले कुटुंब मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला, कदाचित त्यांचे आयुष्य त्यांनी ठरवल्याप्रमाणे सुखकर होईल. त्यांचे राहणीमान उंचावेल, आर्थिक परिस्थिती सुधारेल, अपत्यसुखाचा आनंद घेत, करिअरशीसुद्धा तडजोड करण्याची गरज पडणार नाही. म्हातारपणीदेखील पाहिजे तो आधार मिळेल; पण फक्त एवढाच विचार करून हा विषय संपवण्यासारखा नाही. एका अपत्यावर कुटुंब मर्यादित ठेवण्याऱ्या जोडप्यांची वाढणारी संख्या भारतीय संस्कृतीचा कणा असणाऱ्या कुटुंबव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. हे असेच वेगाने चालू राहिल्यास पाश्चिमात्य देशांप्रमाणे आपल्या देशातही आपण एकाच अपत्यावर थांबल्यामुळे ते अपत्य भावी जीवनात एकटे पडण्याची शक्यता जास्त आहे. त्याला किंवा तिला आपल्या सुखदु:खात सहभागी करायला रक्ताचे नाते उरणार नाही. एवढेच नव्हे, तर त्यांना आणि त्यांच्या अपत्यांना काका, मामा, मावशी, आत्या या नातेवाईकांचे भावविश्व उरणार नाही. सणासमारंभाच्या निमित्ताने का होईना, आज तरी भावंडे एकत्र येतात, नाती जोडली जातात. तो आनंद शेजारीपाजारी वा मित्रमंडळींच्या उपस्थितीत पूर्णत्वास जाईलच असे नाही.

    आज जी जोडपी जननक्षम वयात आहेत, आपण एकाच अपत्यावर थांबायचे, की अजून एखादे होऊ द्यायचे, या विचारांच्या सीमारेषेवर आहेत, त्यांच्यासाठी हा विषय ‘इकडे आड, तिकडे विहीर’ असा होऊन बसला आहे. हा गुंता सोडवून एक सुवर्णमध्य साधायचा असेल, तर केवळ त्या जोडप्यानेच नव्हे, तर त्या घरातल्या आजी-आजोबांनीदेखील गांभीर्याने या परिस्थितीकडे बघून त्यांना मनुष्यरूपी ‘बळ’ दिले पाहिजे. एका अपत्यावर कुटुंब मर्यादित ठेवून स्वत:साठी तात्कालिक सुखाची व्यवस्था करायची, की किमान दोन अपत्यांना जन्म देऊन, त्यांना लहानाचे मोठे करण्यात आपल्या जीवनातील काही गोष्टींशी तडजोड करून भविष्यातील त्यांचे भावविश्व सुरक्षित करायचे, कुटुंबव्यवस्था अबाधित ठेवण्याचा समतोल साधायचा, हा विचार ११ जुलैच्या जागतिक लोकसंख्यादिनी झाला पाहिजे.

atnurkarkishore@gmail.com