प्रभाकर बोकील
नैसर्गिक ‘वार्धक्य’ कुणालाच चुकत नाही, पण ते कसं असावं हे बहुतांशी आपल्यावर अवलंबून असतं. आपण तरुणपणी कसे वागतो यावर बरेचदा म्हातारपणचे भोग अवलंबून असतात. योग्य वयात सगळय़ाच गोष्टींची गुंतवणूक केली तर ‘पैलतीरा’पर्यंतचा प्रवास निश्चित होतो. त्यासाठी वेळीच सावध व्हायला हवं. अर्थात आज ‘सनाथ’ वृद्धांचे आश्रम मोठय़ा प्रमाणावर वाढत आहेत, त्या मागचं कारण मात्र शोधायलाच हवं. उद्याच्या (२१ ऑगस्ट) जेष्ठ नागरिक दिनानिमित्तानं हा विचार करायला लावणारा प्रश्न..

‘‘खरं सांगू, म्हातारपणी थोडा अहंकार असावा माणसाजवळ. भोवतालची पोकळी भरून काढता येते. त्या पोकळीत अहंकाराची घंटा घणघणते.. सांगते, तूही कुणीतरी आहेस!’’ असं अहंकाराचं समर्थन करताना स्वत:च्या नाटय़कर्तृत्वाविषयी कृतज्ञता बाळगणारे गणपतराव बेलवलकर, नंतर मुलीच्या घरून अपमानित होऊन बाहेर पडताना कावेरीला म्हणतात, ‘‘आपली पोरं चांगली आहेत सरकार.. आपलं म्हातारपण वाईट आहे!’’

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!

वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’ नाटकातील हा प्रसंग. आयुष्याला सुख-दु:खांच्या धाग्यांचं जरतारी वस्त्र मानणाऱ्या ग. दि. माडगूळकरांच्या ‘तीन प्रवेशांच्या’ नाटकातील, ‘जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे..’ ते हे म्हातारपण! शरीराचं वार्धक्य हा निसर्गनेम! आयुष्याचा ‘तिसरा अंक’ नैसर्गिकपणे निभावणं ज्यांना जमलं, त्यांचा ‘पैलतीरा’पर्यंतचा प्रवास नििश्चत होतो. पण ‘आमच्या मुलांना आम्ही वाढवलं, आता त्यांच्या मुलांना आम्ही नाही वाढवणार..’ हा हट्टी दुराग्रह, ‘आमचं आमच्या मुलाशी-सुनेशी पटत नाही’ हा फोल अहंकार, ‘आमचा मुलगा-मुलगी दोघंही ‘स्टेट्स’मध्ये सेटल्ड आहेत’ हा अनाठायी अभिमान, ‘आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या’ अथवा ‘आम्हाला आमची स्पेस नको का?’ अशी मुलगा-सुनेचीच नव्हे, तर आई-बापांचीही स्वत:च्या ‘स्पेस’विषयी अवास्तव कल्पना असते, तिथे माया-जिव्हाळा हे शब्द निर्थक ठरतात, दुराग्रह-अहंकारच जोपासले जातात आणि समाजाच्या सर्वच वर्गाच्या गरजेतून ‘वृद्धाश्रम’ निर्माण होतात. ‘ज्या समाजात वृद्धाश्रम नसतील, तो समाज सर्वार्थानं ‘समृद्ध’ असेल!’ हे सामाजिक सत्य कागदावरच उरतं.

पंचवीसएक वर्षांपूर्वी आडवाटेला निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या एका वृद्धाश्रमात जाण्याचा योग आला होता. त्या आवारात बैठय़ा कौलारू इमारतींतून, एकटय़ा वृद्ध स्त्री-पुरुषांसाठी वेगळय़ा डॉर्मेटरीज, जोडप्यांसाठी छोटय़ा स्वतंत्र खोल्या अशी रचना. कार्यालयातील काम संपताना गाण्याचे सूर आले, ‘कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई..’ गाणं संपल्यावर टाळय़ाही ऐकू आल्या. तिथल्या दुर्गामावशी म्हणाल्या, ‘‘शहराकडची काही तरुण मंडळी आली आहेत. असे गाण्यांचे, करमणुकीचे विनामूल्य कार्यक्रम होतात इथं अधनमधनं. वेळ चांगला जातो इथल्या मंडळींचा. चला.. बघा आमचा आश्रम.’’ छोटेखानी डायिनग हॉलमध्ये गाण्याचा कार्यक्रम चालला होता. तीच तरुणी गात होती.. ‘आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना..’ गाणं संपल्यावर निघताना दुर्गामावशी म्हणाल्या, ‘आज कौसल्या-शबरीचा राम असता, तर अशा वृद्धाश्रमांची गरजच नव्हती. कोण येणार इथं या वृद्धांसाठी! जिवंतपणी नाहीच.. ‘गेल्यावर’ही कुणी नाईलाजानं येतात. व्यवहार संपवून मोकळे होतात! कुणी परस्पर कळवतात अंतिम-क्रिया करण्यासाठी. व्यक्तिगत जाणीव, सामाजिक भान असलेली अशी तरुण पोरं मात्र नि:स्वार्थीपणे येतात.. विनामूल्य करमणूक करून जातात! कशी संगती लावायची?’ दुर्गामावशींचा निरुत्तर करणारा प्रश्न. परतताना डाव्या बाजूच्या ‘स्मृती-उद्याना’च्या झाडांवर नावांच्या पाटय़ा.. महादेव शिंदे, अनसूया ढापरे, अनंत कुलकर्णी, माहजबीन शेख.. आयुष्यभर ‘निर्थक’ मिरवला जाणारा जाती-धर्मवाद अखेर एकाच मातीत गाडला गेला होता! निघताना सूर आले, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला..’ दुर्गामावशी म्हणाल्या, ‘या गाण्यानंतर ती नाही गाणार. गाताच येणार नाही तिला. लहानपणीच तिचे वडील गेले!’

मनात घर केलेली ही घटना आठवायचं कारण, हल्लीच शहरालगतच्या एका ‘ओल्ड-एज होम’मध्ये गेलो होतो. तिथे शिरतानाच तिथल्या ‘समृद्धीचा’ अंदाज आला. सिक्युरिटीनं इंटरकॉमवरून ज्यांना भेटायचं होतं त्यांच्याकडून खात्री केल्यावरच प्रवेश मिळाला. भव्य परिसरात बारा मजली चार टॉवर्स. ज्यांना भेटायचं होतं ते ऐंशीपार आजी-आजोबा. मुलगा-सून, मुलगी-जावई अमेरिकेत न्यू-जर्सी, लॉस-एंजलीस असे दोन टोकांना सेटल झालेले. पुढची पिढी ‘बॉर्न अमेरिकन’! कुणी परतण्याची शक्यताच नाही. शहरातलं घर विकून आजी-आजोबा इथंच राहायला आले.. ‘मुलगा तिकडून हवं-नको पाहातो. टीव्ही, फ्रीज, ओव्हन, वॉशिंग मशीन, हे सारं त्यानंच थेट ऑनलाइन घरपोच पाठवलं. ‘व्हॉटस अॅप’ व्हिडीओ कॉलवर सगळे दिसतात तेव्हा तब्येतीची काळजी घेण्याची ताकीद देतात..’ असं सांगताना आजींचे डोळे पाणावलेले. आजींच्या कानाला श्रवणयंत्र, जोडीला मधुमेह. आजोबांची ‘बायपास’ झालेली. दोघांनाही पथ्य भरपूर.. ‘आमच्या पथ्याचं जेवणखाणदेखील इथं सांभाळलं जातं. खाली कम्युनिटी-किचनमध्ये चहा-कॉफी, नाश्ता-जेवण मिळण्याची सोय आहे. ज्यांना तिथंही जाणं शक्य नाही, त्यांच्यासाठी रूम-सव्र्हिस आहे. क्लब-हाऊसमध्ये कार्डस्-कॅरम टेबल्स आहेत, अॅम्फीथिएटरमध्ये व्याख्यानं-संगीताचे, कथा-कीर्तनाचे, दिवाळी-पहाटसारखे कार्यक्रम होतात. भरपूर ‘मानधन’ घेणारे नावाजलेले कलाकार येतात. दर आठवडय़ाला डॉक्टर्सच्या व्हिजिट्स, इमर्जन्सीला अॅम्ब्युलन्सपासून मेडिकल-सव्र्हिस आहे! घराची स्वच्छता करणारी ‘मेंटेनन्स’ एजन्सी आहे..’ असं कौतुकानं सांगत आजी त्यांचं

‘टू-बीएचके’ घर दाखवू लागल्या. व्हीलचेअर्स वापरता येणारी मोठी टॉयलेट्स, दोन बेडरूम्स.. ‘दुसरी बेडरूम मुलगा-मुलगी कधी आले तर असावी म्हणून..’ या आजीच्या बोलण्यावर आजोबा हसत म्हणाले, ‘हिला उगाचंच आशा.. ते आले तरी सिटीतल्या हॉटेलातच उतरतात!’
‘संध्याछाया भिवविती हृदया..’ हा ‘तिसरा अंक’ सुरळीत चालू असताना कधीही ‘पडदा पडण्याची’ भीती प्रत्येकाच्या मनात कायम सावलीसारखी असते. अचानक कुणी ‘गेलं’ की, त्या दिवशी वातावरण सुन्न होतं. दुसऱ्या दिवशी ‘आता कुणाची विकेट?’ अशा गप्पांतून मनाचा ताण हलका करण्याचा प्रयत्न होतो. विकेट गेलेल्याच्या घरी कुणी भेटायला येण्याची शक्यता कमीच. बहुतेकांचे ‘जवळचे’, दूरस्थ परदेशी.. ताबडतोब येऊ शकत नाहीत. ‘माणूस’ गेल्यावर नाहीतरी जाऊन काय उपयोग?.. त्यातून गेली दोन र्वष ‘करोना’मुळे, नको कुठं जाणं, नको ते ‘क्वारंटाइन’.. वगैरे व्यावहारिक सोयीचा विचार असतो, अगदीच काही नाही तर ‘व्हिसा’चा काहीतरी ‘तिढा’ असतो.. त्यामुळे ‘जवळचे’ येईपर्यंत सूचनेनुसार ‘बॉडी’ परस्पर शवागारात ठेवली जाते वा इतर कुणाच्या ताब्यात दिली जाते. मागे उरलेल्याच्या सोबतीसाठी ‘त्या’ घरी झोपायला जाणं, त्यांना दुसऱ्या दिवसापासून प्रत्येक गोष्टीत सामावून घेणं, हे अगत्यानं होतं.

गेलेला एकटाच असला तर प्रश्नच नसतो. ‘वृद्धपणी देवा आता.. दिसे पैलतीर!’ असा एकाच नावेच्या प्रवाशांचा ‘ठरावीक’ दिशेनं प्रवास चालू असतो. ‘आपल्यामागे काय?’ ही चिंता आता नसते. मग संपत्तीचा उर्वरित आयुष्यात उपभोग घ्यायला काय हरकत आहे? अखेरीस ही ‘समृद्धी’ तरी काय कामाची? श्वास आहे तर सारं आहे, एरवी..’ तर असो.

पूर्वीच्या वृद्धाश्रमाच्या अनुभवावर, ही ‘प्रगती’ पाहून मनात आलं, सामाजिक संदर्भच जिथं बदलत गेले तिथे हे सगळंच अपरिहार्य. कुठचीही शारीरिक व्याधी सहन करण्याला तसाही एरवी पर्याय नसतो, तिथं गरिबी-श्रीमंती हा भेद नसतो. पण भरपूर बँक-बेलन्स असला, मुलामुलींनी डॉलर्समधून वा रुपयांतून पैसे पुरवले की अशा ‘ओल्ड-एज होम’मध्ये परस्पर ‘कुणीतरी कुणासाठी’ काळजी घेतल्यामुळे ‘वृद्धपणीचे दिवस सुखाचे’ जातात, सोसायटीतील ‘सुविधा’ नसलेल्या घरांपेक्षा अशा ‘कॉन्डोमिनियम’मधलं सोशल-लाईफ जवळचं वाटतं.. आता हेच घर! निसटणाऱ्या वाळूचे कण मुठीत घट्ट पकडून धरण्याचे निष्फळ प्रयत्न करत, आयुष्याचे उरलेले क्षण आनंदानं घालवायचे, एवढंच हाती उरतं!

पस्तीसेक वर्षांपूर्वी अमेरिकेच्या ‘अटलांटिक सिटी’ या ‘जुगारी’ शहरात वेगळाच प्रकार पाहिला होता. सकाळी ठरावीक ठिकाणाहून खास बस सिनियर सिटीझन्सना वेगवेगळय़ा ‘कसिनो-क्लब्ज’मध्ये ‘चकटफू’ घेऊन जात. वर काही डॉलर्स तिकडच्या जुगारी मशीन्सवर खेळण्यासाठी देत. पुढे कमावणं-गमावणं हा नशीबाचा भाग. त्यांचा दिवस मजेत जायचा.. अन् कसिनो-मालकांचा भरपूर धंदा व्हायचा! संध्याकाळी बस सर्वाना पुन्हा मूळ ठिकाणी आणून सोडत. इथं अधोरेखित होते वृद्धांची ‘मुठीत क्षण’ धरून जगण्याची धडपड. पस्तीस वर्षांत तिकडे या बाबतीत आणखी ‘प्रगती’ झाली असेलच! आपल्याकडेही हे होईल.. तेव्हा तो ‘ग्लोबलायझेशन’चा एक भाग असेल! हल्ली अशा कुठल्याही विषयातली सामाजिक चर्चा ‘ग्लोबलायझेशन’वर संपते! तेव्हा इथंच थांबलेलं बरं.

साठेक वर्षांपूर्वी शाळेत पाठ केलेल्या शिरवाडकरांच्याच ‘पाचोळा’मधील, ‘तरुवरची हसतात त्यास पाने, हसे मूठभर ते गवतही मजेने..’ असा तरुतळी असणारा जीर्ण पाचोळा वाऱ्यानं उडून गेल्यावर ‘..आणि जागा हो मोकळी तळाशी, पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी!’ ही येणारी अखेरची ओळ आठवते.. मात्र कवितेचा अर्थ आयुष्याच्या तडजोडीत कुठंतरी हरवून गेलेला असतो! हे नैसर्गिक ‘वार्धक्य’ कुणालाच चुकत नाही, हे समजूनही उमगत नाही.. तेव्हा ‘सनाथ’ वृद्धांचे आश्रम का वाढत आहेत, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिकपणे मनाच्या आरशात पाहायचं, आपल्या तारुण्यातल्या भूतकाळात डोकवायचं वा भविष्यात येणाऱ्या ‘वार्धक्या’चा अंदाज घ्यायचा.. बस्स, एवढं पुरेसं आहे!
pbbokil@rediffmail.com