scorecardresearch

जुनाट आकृतिबंध मोडायला हवेत

स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद, फेमिनिझम हे शब्द आपण सगळय़ांनी ऐकलेले असतात, पण दैनंदिन आयुष्यात या विषयाचा कुणी सहसा वेगळा असा विचार करत नाही.

संपदा सोवनी

स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद, फेमिनिझम हे शब्द आपण सगळय़ांनी ऐकलेले असतात, पण दैनंदिन आयुष्यात या विषयाचा कुणी सहसा वेगळा असा विचार करत नाही. या व्याख्यांचे विविध पैलू आहेत आणि ते आपल्या जगण्या-वागण्यात मिसळून गेले आहेत. या चौकटीत जर आपण या संकल्पना पडताळून पाहायला गेलो, तर कदाचित असं लक्षात येईल, की लहानपणापासून मनावर बिंबवल्या गेलेल्या किंवा आजूबाजूच्या वातावरणातून आपण घेतलेल्या शिकवणींनुसारच आपलं आचरण आहे. प्रत्येकाला स्वत:च्या स्त्री-पुरुष समानतेच्या अनुभवाशी याचा संबंध जोडता येईल. ‘लोकसत्ता-चतुरंग’तर्फे या विषयाचा अभ्यास करण्यासाठी तरुण आणि मध्यमवयीन वयोगटात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून आणि सर्वेक्षणाव्यतिरिक्त त्यातील काहींशी केलेल्या संवादातूनही हीच बाब अधोरेखित झाली.

आपल्याकडे स्त्रीमुक्तीची चळवळ सुरू होऊन जवळपास ४७ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आताचा काळ त्यापेक्षा निश्चित वेगळा असून आता अनेक संदर्भ बदलले आहेत. त्या अनुषंगाने नवीन पिढीपर्यंत स्त्रीमुक्तीतील विचार कितपत झिरपले आहेत, त्यांचे स्त्री-पुरुषांतील लिंगभेद किंवा समानता या बाबतीतले अनुभव काय आहेत, हे जाणून घेताना अनेक जणांनी ‘स्त्री-मुक्ती’ या संकल्पनेत काय अर्थ अभिप्रेत आहे हेच पुरेसे स्पष्ट नसल्याचे प्रांजळपणे सांगितले. तसेच ‘स्त्री-पुरुष समानता’ आली असे केव्हा म्हणावे, याबद्दलही वेगवेगळी मते ऐकायला मिळत असल्यामुळे त्यातील काय प्रमाण मानावे हे ठरवताना विचारांचा गोंधळ होतो, हेही समोर आले. विरारच्या ‘विवा महाविद्यालया’त सहाय्यक प्राध्यापक आराधना जोशी यांच्या मते स्त्रीमुक्ती किंवा स्त्री मुक्त असणं म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न व्यक्तीसापेक्ष आहे. त्या म्हणतात, ‘कमावत्या स्त्रीला तिच्याच पैशांवर हक्क सांगता येतो का, हा मुद्दा अभ्यसनीय आहे. आर्थिक गुंतवणूक कुठे, कशी करावी याचे निर्णय अनेक घरांत आजही नवरा घेताना दिसतो. निर्णयस्वातंत्र्य नसणे म्हणजेसुद्धा स्त्रीमुक्तीच्या मार्गातला मोठा अडसर आहे. अनेक सुशिक्षित, सुसंस्कृत वाटणाऱ्या कुटुंबांमध्येही महत्त्वाचे निर्णय घेताना घरातल्या बाईचे मत विचारात घेतले जात नाही. स्वयंपाकघर हे आजही स्त्रीनेच सांभाळायचे अशी सगळय़ांचीच अपेक्षा असते. त्यात नवऱ्याने हातभार लावण्याचा प्रयत्न केलाच, तर बायको किंवा आईकडूनच त्याला विरोध होतो.’ कायद्याची विद्यार्थिर्नी असलेल्या दीपाली भोसले यांच्या मतेही स्त्रीमुक्ती तेव्हाच होईल, जेव्हा स्त्री आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र, स्वावलंबी होईल आणि तिला निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य प्राप्त होईल.

‘लोकसत्ता-चतुरंग’च्या सर्वेक्षणात पुरुषही घरातील कामे करत आहेत आणि घर स्त्री-पुरुष दोघांनी सांभाळावे व स्त्रियांनी अर्थार्जन करायलाच हवे ही सकारात्मक मते जशी समोर आली, तसेच पुरुषाने घरकाम किंवा स्वयंपाक करणे ही अजूनही अनेकांच्या मते कौतुकाची गोष्ट आहे, हेही दिसले. याचा अर्थ घरकाम किंवा स्वयंपाक हे खरे तर पुरुषाचे काम नाहीच, असे आपल्या मनात घट्ट बसले आहे का? हा कदाचित वर म्हटल्याप्रमाणे लहानपणापासून आपल्याला कळत-नकळत मिळालेल्या शिकवणीचा परिणाम असावा. स्त्रियांचा आणि गृहिणींचाही घरकामांचा अतिभार हलका व्हावा यासाठी किती घरांत खरोखरचे सजग प्रयत्न होत आहेत, हे जाणून घ्यायला वाव आहे हे प्रकट झाले.

‘सीए’ म्हणून व्यवसाय करणाऱ्या स्नेहा नायकोडे यांच्या मते ‘स्त्रीमुक्ती’ ही संज्ञा वापरताना मुळात स्त्री बंधनात आहे हे आपण स्वीकारतो. ती बंधने हळूहळू, एकेक करून कमी होत आहेत हे जरी खरे असले, तरी त्याबरोबरीने कोणते तरी नवे बंधन तयार होत असतेच. त्यामुळे बंधनांमधून स्त्री पूर्णपणे मुक्त होत नाही. त्या म्हणतात, ‘स्त्रीला समाज पुरुषाच्याच बरोबरीने माणूस म्हणून वागवतो का, हा स्त्रीमुक्तीचा अर्थ असायला हवा. आणि ते अद्याप झालेले नाही हे स्पष्ट आहे. अगदी साध्या, बेसिक गोष्टींपासून वैचारिक बदल गरजेचा आहे. लहान मुलांसाठी खेळणी घेताना अजूनही आपण मुलींसाठी भातुकली आणि मुलांसाठी चेंडू, गाडय़ाच खरेदी करतो. इतक्या सूक्ष्म पातळीवर बदल घडावा लागेल.

या सर्वेक्षणात ६७ टक्के जणांनी आजही स्त्रीमुक्ती चळवळीची गरज आहे, असेच म्हटले आहे. पण त्याच वेळी या चळवळीची गरज नाही, असे म्हणणारेही २३ टक्के लोक होते, तर १० टक्के लोकांना याबाबत स्पष्टता नव्हती. तसेच १४ टक्के व्यक्तींनी स्त्रीमुक्ती, फेमिनिझम, स्त्रीवाद हे शब्द आपल्या मनात नकारात्मक भावना निर्माण करतात असे नमूद केले होते. नव्वदच्या दशकातील पिढीच्या प्रतिनिधी असलेल्या आणि ‘कंटेंट क्रिएशन’मध्ये काम करणाऱ्या धात्री देशपांडे म्हणतात, ‘आमच्यापर्यंत ‘स्त्रीमुक्ती’ ही संकल्पना चित्रपटांमधूनच पोहोचली. आमच्या आणि आमच्या पुढच्याही पिढीतल्या फार कमी जणांनी या विषयावर वाचन केले आहे. कदाचित त्यामुळे या संकल्पनांबद्दल बराच गोंधळ आहे. आजही ‘स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय’ हे वाक्य सकारात्मक वाटत असले, तरी त्यात एक प्रकारे पुरुषाचे वर्चस्वच गृहीत धरले आहे, हे चटकन जाणवत नाही. चित्रपटांमधली ‘मुक्त’ स्त्रीची प्रतिमा अजूनसुद्धा पुरुषासारखे कपडे घालून मोटारसायकल चालवणारी, धडाडीने पुरुषी कामे करणारी, अशीच असते. ‘स्त्रीमुक्ती’ला ‘स्टिरिओटाइप्स’मधून बाहेर काढून साध्या दैनंदिन आचरणात स्त्री-पुरुष कसे समान पातळीवर, एकमेकांचा आदर राखून काम करणारे, परस्परपूरक होऊ शकतात, असा प्रचार आता गरजेचा वाटतो.’

आराधना जोशी यांच्याही मते, ‘स्त्रीमुक्ती चळवळीमुळे वैयक्तिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर बदल जाणवायला लागले आहेत. मुलगाच हवा ही मानसिकता बदलायला लागली आहे, मुलींच्या शिक्षणाला पाठिंबा मिळायला लागला आहे. पण त्याचबरोबर स्त्रीमुक्ती, स्वातंत्र्य आणि अहंगंड, स्वकेंद्रितपणा यातला सूक्ष्म फरक न जाणवल्याने या चळवळीचा दुरुपयोग करून घेतला जात असल्याचेही जाणवते. या चळवळीबद्दल अनेकांना किंवा अनेकींना फार वरवरची माहिती आहे. अनेकदा स्त्री चळवळीविषयीचे आकलन हे वैयक्तिक जीवनात आलेले अनुभव, समाजमाध्यमे, चित्रपट किंवा साहित्यातून व्यक्त करण्यात आलेली स्त्री-पुरुष समतेच्या प्रयत्नांची जाण एवढय़ापुरतेच मर्यादित असते.’

स्त्रीने कसे वागावे/ कोणती कामे करावीत आणि पुरुषाने कसे वागावे/ कोणती कामे करावीत, याचे आपल्याला लहानपणापासून कळत-नकळत शिक्षण मिळत गेले, हे सर्वेक्षणातील ७७ टक्के व्यक्तींनी मान्य केले. तसेच ४० टक्के व्यक्तींच्या मते त्यांनी घरातच मुलगा-मुलगी भेद प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात केलेला अनुभवला आहे. हे दोन्ही आकडे बोलके आहेत. स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत सकारात्मक बदलांची पावले पडत असतानाच जुने झालेले अनेक आकृतिबंधही अद्याप तसेच शिल्लक आहेत, हेच या सर्वेक्षणावरून स्पष्ट झाले. त्यामुळे या विषयातील व्यापक अभ्यासासाठी या छोटय़ा सर्वेक्षणाची निश्चित मदत होऊ शकेल. आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेषांकामुळे आजच्या अंकात नेहमीची सदरे प्रसिद्ध होऊ शकलेली नाहीत.

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Old pattern broken feminism daily life aspect experience gender equality ysh