आजी-आजोबा, संगणकाशी मैत्री करण्याच्या उद्देशाने वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या आपल्या या मालिकेतील आजचे हे शेवटचे सदर.
ई-मेल तयार करणे, फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंगवर खाते उघडणे, मराठीत टाइप करणे, पीडीएफ तयार करणे अशा विविध गोष्टी आपण शिकलो. आजच्या भागात आपण विविध ऑनलाइन शब्दकोशांची माहिती घेणार आहोत. तुम्ही कधी विचार तरी केला होतात की, कधीही, कुठेही, तुम्हाला हव्या त्या भाषेतला, हव्या त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला एका ‘क्लिक’वरती मिळू शकेल. एखादा शब्द अडला की डिक्शनरीची पाने उलटण्याला सोपा पर्याय आहे. अर्थात इंटरनेटमुळे हेसुद्धा सहज शक्य झाले आहे. आजघडीला विविध भाषांतील शंभरहून जास्त ऑनलाइन शब्दकोश उपलब्ध आहेत. याचा वापर आपण विविध भाषांतील पुस्तके वाचण्यासाठी, भाषांतर करण्यासाठी, नवीन भाषेतील विविध शब्द शिकण्याकरता करू शकतो.   यामुळे फावल्या वेळेत विविध भाषेतील पुस्तके तुम्हाला वाचता येतील, जर एखादे चांगले साहित्य अनुवादित करायचे असेल, तर तेही करता येईल. गुगल ट्रान्सलेटर, िबग ट्रान्सलेटरच्या मदतीने तर परिच्छेदही भाषांतरित करू शकता. परंतु हे भाषांतर प्रत्येक वेळेस अर्थाच्या दृष्टीने योग्य असेलच असे नाही. परंतु ते तुम्हाला साहाय्यक ठरू शकते. गंमत म्हणजे गुगलची ही भाषांतर सेवा ज्यांच्याकडे स्मार्ट फोन आहेत त्यावरही मोफत उपलब्ध आहे. फक्त गरज आहे ती इंटरनेट सुविधेची! आता आपण अशा काही संकेतस्थळांचे पत्ते येथे देणार आहोत, ज्यावर शब्द टाकल्यानंतर हव्या त्या भाषेतल्या शब्दाचा अर्थ आपल्याला मिळू शकेल. काही काही संकेतस्थळांवर तर आपण दिलेला शब्द कसा उच्चारावा, याची ऑडियो फाइलही जोडलेली असते आणि लिखित स्वरूपात माहितीही दिलेली असते, शिवाय त्या शब्दाचे व्याकरणही उलगडून दाखविलेले असते. उदा. त्या शब्दाला असलेले समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दाच्या जाती, प्रकार. इ.
तर खाली दिलेल्या वेबसाइट्सचा संदर्भासाठी वापर करा आणि आता संगणकाशी झालेली मैत्री यापुढेही कायम ठेवा. http://www.shabdkosh.com/mr/
http://www.khandbahale.org/
translate.google.com/
http://www.bing.com/translator/
http://www.shabdkosh.com/
http://www.oxforddictionaries.com/
http://www.thefreedictionary.com/
http://www.webster-dictionary.org/