ताज्या ‘स्टेट ऑफ इंडिया गेम रिपोर्ट’नुसार देशातल्या एकूण गेमर्सपैकी ४२ टक्के गेमर्स स्त्रिया आहेत. भारतातली पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सची बाजारपेठ १३,५९६ कोटी रुपयांची असताना ती वाढवण्यासाठी कशा प्रकारची प्रलोभनं भविष्यात समोर येतील, याचा विचार सर्वांनीच करणं आवश्यक आहे. अल्प माहितीवर कर्जाऊ रक्कम पुरवणाऱ्या कंपन्या आणि गेमिंगच्या व्यसनात लाखो रुपये गमावल्यावरच अनेकांना त्याची जाणीव होणं, हे चित्र पाहता आपल्या घरात या व्यसनाचा व्हायरस शिरला आहे का, याकडे लक्ष द्यावं लागेल…

अनेक वर्षं आमच्या घरी काम करणाऱ्या मावशी परवा संध्याकाळी अचानक घरी आल्या. नेहमी हसतमुख असणाऱ्या मावशी तोंडाला पदर लावून हुंदके देत होत्या. नेमकं काय झालं आहे हे समजेना. हळूहळू त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्यानंतर जे काही समोर आलं ते माझ्या तरी कल्पनेच्या पलीकडचं होतं…

customer set an Ola showroom in Kalaburagi on fire
OLA Showroom Fire : दोन आठवड्यांपूर्वी घेतलेली ओला इलेक्ट्रिक स्कूटर बिघडली, संतप्त तरुणाने शोरूम पेटवलं; पाहा VIDEO
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
record demand for ganesh idols from pen in abroad
विश्लेषण : पेणच्या गणेशमूर्तींना यंदा परदेशातून विक्रमी मागणी… कारणे काय? आव्हाने कोणती?
maharashtra government not give concession to wine from fruits other than grapes
द्राक्षांव्यतिरिक्त अन्य फळांचे वाइन उद्योग मरणपंथाला
Skoda Kylaq spotted testing: New details revealed Know Features & Design Details
Skoda Kylaq: टेस्टिंगदरम्यान स्पॉट झाली स्कोडा Kylaq; मिळणार अनेक नवीन बदल, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत
gold loan market projected to double in 5 years pwc india
सोने तारण कर्ज बाजारपेठेत दुपटीने वाढ! ‘पीडब्ल्यूसी इंडिया’चा भविष्यवेध
Job Opportunities Opportunities through Staff Selection Commission
नोकरीची संधी:स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत संधी
Mumbai, Mutual Funds, Assets Under Management, Passive Funds, Active Funds, Motilal Oswal, Equity Schemes, Debt Schemes, Hybrid Funds, Investment Flows,
म्युच्युअल फंड मालमत्तेत दशकभरात सात पटींनी वाढ, ‘पॅसिव्ह’ फंडात गुंतवणूक वाढल्याचा अहवालाचा निष्कर्ष

मावशींची थोरली मुलगी तिच्या सासरहून बेपत्ता झाली होती. घरात तिच्या मनाविरुद्ध काहीही घडलेलं नसताना, कोणतेही वाद नसताना असं अचानक घर सोडून जाण्याचं काय कारण असेल हेच सुरुवातीला लक्षात येत नव्हतं. पण जेव्हा काही लाख रुपयांच्या कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपनीचे लोक दारात उभे राहिले, तेव्हा सगळा उलगडा झाला. मोबाइलवर पैसे लावून गेम्स खेळत राहिल्यामुळे मावशींच्या मुलीवर लाखो रुपयांचं कर्ज झालं होतं आणि त्याच्या वसुलीसाठी तिला फोन येऊ लागले होते. त्या मानसिक तणावातून कोणालाही काहीही न सांगता त्या मुलीनं घर सोडलं होतं.

हेही वाचा – सांधा बदलताना : सोबतीचे बळ!

ऑनलाइन गेमिंग, त्यामुळे होणारी कर्जं आणि उद्ध्वस्त होणारी माणसं, हे मी कधीही थेट न अनुभवल्यामुळे हा किती गंभीर प्रश्न आहे याची मला पहिल्यांदाच जाणीव झाली. आणखी एक गोष्ट म्हणजे इतके दिवस गेमिंग आणि त्या अनुषंगानं होणाऱ्या जुगारात मुख्यत्वे पुरुष मंडळी असतात अशी माझी समजूत होती. पण पुरुषांच्या बरोबरीनं गेमिंगच्या आहारी गेलेल्या स्त्रिया आणि फक्त मोजक्या कागदपत्रांची पडताळणी करून कर्ज देणाऱ्या कंपन्या हे अनपेक्षित चित्र पाहून अंगावर काटा आला. पण मावशींच्या धडपडीला आणि इतर अनेकांच्या प्रयत्नांना यश आलं. घर सोडून निघून गेलेली ती तरुणी सुखरूप तिच्याच एका मैत्रिणीच्या घरी सापडली. अर्थात कर्जाची परतफेड कशी करायची हा प्रश्न अजून शिल्लक आहेच. त्याचबरोबर पैसे लावून खेळण्याच्या व्यसनातून तिला बाहेर काढणंही गरजेचं आहे.

नुकत्याच घडलेल्या या प्रसंगामुळे मी ऑनलाइन गेम्सबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. सर्वच ऑनलाइन गेम्स हे पैसे गुंतवून खेळावे लागत नाहीत. पैसे गुंतवून खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सना ‘आरएमजी’ अर्थात ‘रियल मनी गेम्स’ म्हणतात. या गेमिंगच्या नादी लागलेल्या, त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या लोकांची संख्या बरीच मोठी आहे आणि दिवसागणिक वाढते आहे. तसंच आता हा प्रश्न कोणत्या तरी विशिष्ट आर्थिक वर्गापुरता, प्रदेशापुरता किंवा वयोगटापुरता मर्यादित राहिलेला नाही. झटपट श्रीमंत होण्याच्या अमिषानं किंवा आर्थिक गरजा पूर्ण करण्याचं माध्यम म्हणून गेम्सकडे बघणाऱ्या असंख्य स्त्री-पुरुषांना ऑनलाइन गेमिंगनं आपल्या कवेत घेतलं आहे.

‘रियल मनी गेम्स’चं ढोबळ मानानं गणित हे आजवर आपल्याला माहिती असलेल्या जुगारांसारखंच आहे. खेळायला सुरुवात केल्यावर गुंतवलेल्या पैशांतले थोडे जरी पैसे परत मिळाले, की जिंकण्याची तल्लफ मनाचा ताबा घेते. पैसे गेले की त्वेषानं खेळणाऱ्याला अधिकाधिक पैसे गुंतवायला भाग पाडते. त्यातूनच खेळत राहण्यासाठी, स्वत:साठी जिंकण्याच्या संधी उपलब्ध करण्यासाठी कर्ज काढायला सुरुवात होते. थोडक्यात, वर्षानुवर्षं प्रचलित असणाऱ्या जुगाराच्या प्रकारात जे काही होतं ते सगळं इथेही होतं. मात्र त्यातही हादरवून टाकणारी गोष्ट म्हणजे सहजपणे उपलब्ध होणारी कर्जं आणि त्याचा जीवघेणा व्याजदर.

खेळणारा जिंकण्यासाठी इतका आतुर झालेला असतो, की त्याचं या गोष्टींकडे लक्षच जात नाही. एकवीस वर्षांच्या तरुणानं सदुसष्ट लाख रुपये गमावणं आणि मध्यमवयीन माणसानं चार कोटी रुपये गमावणं, हे यातूनच घडतं. जेव्हा झालेलं नुकसान लक्षात येतं तेव्हा सगळं संपलेलं असतं. त्यातूनच अनेक जण आत्महत्येचा पर्याय स्वीकारतात. गेल्या काही महिन्यांतली वर्तमानपत्रं बघितली तर गेमिंगच्या व्यसनामुळे कर्जबाजारी झालेल्या लोकांनी आयुष्य संपवल्याच्या बातम्या ठळकपणे दिसून येतील. आत्महत्या करणाऱ्या या लोकांमध्ये विद्यार्थी, कामगार, उच्चशिक्षित तंत्रज्ञ, व्यापारी असे समाजाच्या सर्व स्तरांतील लोक आहेत.

करोनाकाळातील टाळेबंदीच्या दिवसांत ऑनलाइन गेमिंगचं व्यसन संपूर्ण जगातच मोठ्या प्रमाणावर पसरलं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बहुतेकांपाशी असणारे स्वत:चे मोबाइल फोन. मोबाइल फोन ही प्रत्येकाची खासगी बाब आहे. आपल्या मोबाइलवर आपण काय करतो, यावर इतर कोणाचंही नियंत्रण नसतं. शिवाय हे गेम खेळण्यासाठी, त्यात पैसे लावण्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागत नाही, घराच्या बाहेर पडावं लागत नाही. दिवसातल्या कोणत्याही वेळी खेळण्याची मुभा मोबाइलमुळे मिळते. कदाचित हे सगळं कमीच म्हणून अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी या गेम्सची सातत्यानं जाहिरात करताना दिसतात. त्यांच्या जोडीला ‘खेळात भरपूर पैसे जिंकलेला विजेता’ म्हणून काही सामान्य स्त्री-पुरुषांनाही जाहिरातींचा चेहरा बनवलं जातं. मोठ्या इव्हेंट्सचं प्रायोजकत्व स्वीकारून गेम्सना चर्चेत ठेवलं जातं. अशा प्रकारे गेम्सचे निर्माते या खेळांबद्दलचं आकर्षण वाढवण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करत राहतात.

या सगळ्याच्या जोडीला गेम्सची निर्मिती करताना स्वस्तातल्या स्वस्त स्मार्टफोनवर, कमीत कमी डेटा पॅक वापरून हे गेम्स खेळता येतील, खेळण्याची पद्धत कोणालाही खेळता येईल इतकी सोपी असेल, याची खबरदारी सर्वच गेम निर्मात्यांनी घेतलेली असते. असं प्रलोभनाचं जाळं चहूबाजूंनी विणल्यामुळे, हातात स्मार्टफोन असताना या गेम्सपासून स्वत:ला दूर ठेवणं, अनेकांना शक्य होत नाही.

आज ऑनलाइन गेमिंगमध्ये सहभागी असणाऱ्यांचे आकडे चक्रावणारे आहेत. २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेले विविध अहवाल हीच गोष्ट ठळकपणे अधोरेखित करतात. गूगलच्या मदतीनं प्रकाशित झालेल्या ‘स्टेट ऑफ इंडिया गेम रिपोर्ट’नुसार आज देशातल्या एकूण गेमर्सपैकी ४२ टक्के गेमर्स या स्त्रिया आहेत. प्रत्येक गेम खेळणारी व्यक्ती दर आठवड्याला सरासरी दहा ते बारा तास गेम खेळण्यावर खर्च करते. यातही स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त वेळ खेळण्यात खर्च करतात असं निरीक्षण आहे. त्याचबरोबर ६६ टक्के गेमर्स हे ‘नॉन मेट्रो’ अर्थात छोट्या शहरांतले आहेत. ‘अर्न्सट् अँड यंग’च्या अहवालानुसार आपल्या देशात ४२.५ कोटी गेमर्स आहेत. त्यातल्या जवळजवळ ७० टक्के गेमर्सचं वय ३४ वर्षं किंवा त्यापेक्षा कमी आहे. संख्येचा विचार केला, तर चीननंतर आपण संपूर्ण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. आज भारतीय गेमिंगची बाजारपेठ १६,४२८ कोटी रुपयांची आहे. तर वर्षं २०२८ पर्यंत हाच आकडा ३३,२४३ कोटी रुपये इतका होईल असा अंदाज आहे.

हेही वाचा – सांधा बदलताना : सोबतीचे बळ!

‘ऑनलाइन गेमिंगमध्ये सहभागी होणारा प्रत्येक जण पैसे लावून कुठे खेळतो?’ असं म्हटलं जातं. पण हा बचाव किती तोकडा आहे हेही या अहवालातून समजतं. ‘आरएमजी’ अर्थात ‘रियल मनी गेम्स’ची बाजारपेठ १३,५९६ कोटी रुपये- म्हणजे एकूण बाजारपेठेच्या ८३ टक्के आहे. पण असं असूनही जागतिक ऑनलाइन गेमिंगच्या एकूण महसुलात भारतातून मिळणाऱ्या महसुलाचा वाटा अवघा १.१ टक्के आहे. थोडक्यात, भविष्यात तरुण पिढी आणि भारतातील स्त्रिया या गेमिंग निर्मात्यांचं ‘सॉफ्ट टारगेट’ असणार आणि त्यांच्यासाठी नवनवीन गेम्सची निर्मिती होणार. तसंच खेळण्यासाठी त्यांना प्रलोभनं दाखवली जाणार हे उघड आहे.

ही सर्व माहिती गोळा करत असताना कायदा नेमका कोणत्या गोष्टी नियंत्रित करतो, असा प्रश्न स्वाभाविकपणे मनात येत होता. कायदेशीर गोष्टींचा अभ्यास केल्यावर गेमिंगच्या नावाखाली चालणाऱ्या जुगाराला कशी पळवाट मिळाली आहे हेही लक्षात आलं. आपल्याकडे ‘सार्वजनिक जुगार कायदा १८६७’ नुसार अशा प्रकारच्या खेळांचं- अर्थात गेम्सचं दोन भागांत वर्गीकरण होतं. पहिला भाग म्हणजे संधीचा खेळ. यात खेळणारा खेळात पैसे गुंतवत असेल आणि खेळाचा निकाल, नफा-तोटा हे नशिबावर अवलंबून असेल, तर त्याला ‘गेम ऑफ चान्स’ म्हणतात. भारतात असे खेळ आयोजित करणं किंवा त्यात सहभागी होणं बेकायदेशीर आहे. दुसरा भाग म्हणजे कौशल्याचा खेळ. यात खेळ खेळणारा त्याच्या कौशल्याचा वापर करत असेल आणि त्यामुळे पैसे कमवत असेल, तर त्याला ‘गेम ऑफ स्किल’ म्हणतात. असे गेम्स आपल्याकडे कायदेशीर आहेत. आपण ज्या विविध ‘फॅन्टसी गेम्स’च्या जाहिराती बघतो, त्या ‘गेम ऑफ स्किल’ या गटात मोडत असल्याचं गेम्सचे निर्माते सांगतात आणि स्वत:चा कायदेशीर बचाव करतात. गेममध्ये पैसे गुंतवणाऱ्याला कौशल्यावर परतावा देण्याचं प्रलोभन दाखवलं जातंच… पण त्याच्या कौशल्याला आव्हान देऊन खेळण्यासाठी भरीस पाडलं जातं. आपलं बुद्धिचातुर्य सिद्ध करण्याच्या नादात लोकांची बुद्धी कधी गहाण पडते हे त्यांचं त्यांनाही समजत नाही हेच खरं.

आज बहुतेक घरांत अत्यंत काटेकोरपणे आपली ‘पर्सनल स्पेस’ जपली जाते. अनेक बाबतींत त्याचा उपयोगही होतो. मात्र त्याचा अतिरेक झाला की दोन गोष्टी घडण्याची शक्यता कमालीची वाढते. एक म्हणजे घरातला संवाद कमी होणं आणि कुटुंबातला एखादा सदस्य त्याच्या किंवा तिच्या खासगी आयुष्यात एखाद्या प्रश्नात अडकला असेल, तर त्याबद्दल काहीही न समजणं. गेमिंगच्या व्यसनाबाबत, पैसे लावून खेळण्याबाबत नेमकं हेच घडतं आहे. ‘तो किंवा ती दिवसभर आपल्या फोनमध्येच असायचे. पण फोनवर नेमकं काय करायचे, हे कधी समजलंच नाही!’ हे घरातल्या मंडळींचं वाक्य व्यसन समोर आल्यावर, खेळणाऱ्यानं कर्ज करून ठेवल्यावर हमखास ऐकू येतं. म्हटलं तर त्यात त्यांचीही काही चूक नाही. खेळणारा कोणालाही समजणार नाही याची दक्षता घेत खेळत राहतो. खेळणाऱ्याच्या घरातल्यांना आणि त्याला रोज भेटणाऱ्या इतर लोकांनाही त्याच्या व्यसनाबद्दल कल्पना येत नाही, हा खरा मोठा धोका आहे.

हे असं घडू नये यासाठी कोणताही खात्रीशीर उपाय नाही. मात्र तरीही काही गोष्टी आपल्या हातात नक्कीच आहेत. त्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कितीही धावपळ असली तरीही घरातल्या सर्वांशी संवाद साधत राहणं. कित्येकदा पैसे गमावलेली व्यक्ती वैतागते, अस्वस्थ होते… जाणवेल इतकी चिडचिडी होते. त्या व्यक्तीशी घरातले लोक नियमित संवाद साधत असतील तर वागण्यातला हा बदल जाणवू शकतो आणि कारण शोधण्याचा किमान प्रयत्न तरी केला जाऊ शकतो.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागरूकता आणि अर्थसाक्षरता. बँकेच्या खात्यात कोणतेही व्यवहार झाले की त्याचे मेसेज मोबाइलवर येत असतात. अनेकदा खेळणारी व्यक्ती आपल्याकडचे पैसे संपले की घरातल्या इतरांची बँकेची खाती वापरायला सुरुवात करते. किमान आपल्या मोबाइलवर येणाऱ्या मेसेजबाबत जागरूक राहिलं, बँकेच्या खात्यांची स्टेटमेंट नियमित तपासली आणि आर्थिक व्यवहारांबद्दल साक्षरता वाढवली, तरी अनेक नको असलेल्या घटना टाळता येऊ शकतात… निदान तशी शक्यता नक्कीच वाढते.

तिसरी गोष्ट- आपल्याला हे समजलं की घरातल्या मंडळींपैकी किंवा ओळखीत कोणीही फॅन्टसी गेम पैसे लावून खेळत आहे (मग यात ‘आयपीएल’च्या प्रभावामुळे क्रिकेटची टीम बनवणारेही लोक आलेच.) तर त्या त्या व्यक्तीला दोष देत गप्प बसू नका. संवाद साधा, त्या व्यक्तीला सावध करायचा प्रयत्न तरी करा. अर्थात असं सावध केल्यामुळे आपल्यालाच वाईटपणा येऊ शकतो. पण कर्जाच्या बोजामुळे भविष्यात काही भयंकर घडणार असेल, कोणाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त होणार असेल, त्याच्या कुटुंबावर कायमस्वरूपी आघात होणार असेल आणि या सगळ्याची बोच आयुष्यभर आपल्याला राहणार असेल, तर थोडा वाईटपणा घेऊन, पण अशा व्यक्तीशी संवाद साधायला हवा.

सुदैवानं गेमिंगच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रांचा पर्याय आहे. अशा ठिकाणी समुपदेशन केलं जातंच, पण त्याचबरोबर औषधांच्या मदतीनं व्यसनाधीन व्यक्तीचं वागणं आणि विचार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर ‘गॅम्बलर्स अॅनॉनिमस इंडिया’सारखं व्यासपीठही उपलब्ध आहे, जिथे ओळख गुप्त ठेवून व्यसनाच्या अनिष्ट चक्रातून व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. चांगली गोष्ट अशी, की यामध्ये ऑनलाइनही सहभागी होण्याचा पर्याय आहे.

व्यसन हे शेवटी व्यसन असतं. त्यात ‘कमी व्यसन’, ‘मध्यम व्यसन’, ‘जास्त व्यसन’ अशी कोणतीही श्रेणी नसते, असं ‘डब्ल्यूएचओ’ म्हणजे ‘जागतिक आरोग्य संघटने’चं स्पष्ट म्हणणं आहे. तेव्हा पैसे लावून ‘नेहमी नाही, कधीतरीच खेळतो’, ‘जिंकण्याची तल्लफ येते तेव्हाच खेळतो’, ‘फक्त वर्षातल्या ठरावीक मुहूर्तावर खेळतो,’ असं म्हणणारे सगळेच त्या मोहाच्या आणि कसंही करून पैसे मिळवायचेच या मानसिक विकृतीच्या आहारी गेलेले असतात.
तेव्हा हा प्रश्न हाताळण्यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची. गेमिंगच्या गोंडस नावाखाली मोबाइलमध्ये हळूच शिरलेला जुगाराचा व्हायरस ओळखण्याची आणि ‘वाईटपणा येईल’ या दडपणाखाली न येता आपल्या माणसांना मदत करण्याची.

एका एरोनॉटिकल इंजिनीअरिंगच्या वीस वर्षांच्या विद्यार्थ्यानं गंमत म्हणून ऑनलाइन गेम्स खेळायला सुरुवात केली. हळूहळू त्याला गेमिंगची चटक लागली. इतकी, की अक्षरश: मिळेल तिथून त्यानं पैसे उधार घ्यायला सुरुवात गेली. कर्जाचा बोजा आणि कर्ज परत करण्यासाठीचा दबाव वाढू लागला. खूप उशिरा त्याच्या घरातल्या मंडळींना या गोष्टी लक्षात आल्या. पण तोपर्यंत गोष्टी हाताबाहेर गेल्या. कर्जाचा ताण असह्य होऊन तिसऱ्या वर्षाची इंजिनीअरिंगची परीक्षा सुरू असतानाच या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली.

yogeshshejwalkar@gmail.com