८ जानेवारीच्या अंकातील डॉ. किशोर अतनूरकर यांच्या ‘जनजागृती हा मोठा उपाय’ या लेखात म्हटल्याप्रमाणे गर्भवतींच्या लसीकरणासाठी जनजागृती करण्यात आली पाहिजे. हे काम सरकारच्या बरोबरीने डॉक्टरांनी करायला हवे. गर्भवती राहिल्यावर स्त्रिया प्रथम तपासणीसाठी डॉक्टरांकडेच जातात. त्या वेळी अशा स्त्रियांना ठरावीक महिन्यात टी.टी.चे इंजेक्शन घेण्यास डॉक्टर सांगतात. त्याप्रमाणे त्यांनी करोना लशीविषयी सांगायला हवे. त्यासाठी शासकीय पातळीवर परिसरातील सर्व स्त्रीरोगतज्ज्ञांची माहिती मिळवून त्यांच्यावर ही जबाबदारी टाकायला हवी. त्यांच्या दवाखान्यात नियमितपणे तपासणी करून किती स्त्रियांनी लस घेतली याची खातरजमा करून घेतली तर हे काम सुलभ होईल. ज्याप्रमाणे स्त्री भ्रूणहत्याविरोधी फलक दवाखान्यांत लावण्याचे बंधन घातलेले आहे, तसेच सरकारने करोना लशीसंदर्भात मार्गदर्शक फलक सर्व प्रसूतिगृहांत लावणे बंधनकारक करावे, म्हणजे हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात निकाली निघेल. – नितीन गांगल, रसायनी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृदुला भाटकर यांचा ‘पारा’ भावला!

निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी ‘चतुरंग’मध्येच गतवर्षी लिहिलेली ‘गद्धेपंचविशी’ अजून लक्षात आहे. त्या नेहमीच सुरेख लिहितात आणि आता दर पंधरवडय़ात एकदा त्या अंकात भेटणार याचा आनंद वाटतो. या वर्षांच्या पहिल्याच दिवशी ‘गेले लिहायचे राहून’ या सदरात ‘पारा’ हे रूपक वापरून त्यांनी अगदी छान लेखन केले आहे. त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा.  – वंदना करंबेळकर, सावंतवाडी

अजूनही स्त्रिया स्वत:कडे  दुय्यमपणा घेतात

८ जानेवारीच्या अंकातील ‘वाचायलाच हवीत’ या सदरात ‘भारतीय स्त्रीवादाचा पहिला आवाज’ हा नीरजा यांचा लेख वाचला. पुरातन काळापासून स्त्रियांवर झालेल्या अन्यायाबद्दल त्यात विवेचन केले आहे. तरी स्त्रियांच्या प्रगतीसाठी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक पुरुषांनी प्रयत्न केले होते हे नाकारून चालणार नाही. नाना शंकरशेठ, महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा जोतिबा फुले यांसारख्या पुरुषांच्या प्रयत्नांमुळेच स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली गेली हे मान्य करावे लागेल. त्यानंतर स्त्रियांनी जी घोडदौड केली त्याला जवाब नाही! आज स्त्रियांनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. खास पुरुषांसाठी समजल्या जाणाऱ्या क्षेत्रांतसुद्धा आपला ठसा उमटवला आहे. नोकरी करू लागल्याने त्या आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी झाल्या आहेत. कंपन्यांत उच्च पदावर धडाडीने कार्यरत आहेत; पण तरीही अनेकदा कुटुंबात कोणताही निर्णय स्वत: न घेता ती जबाबदारी पतीवर सोपवताना दिसतात, स्वत:कडे दुय्यमपणा घेताना दिसतात.– रमेश नारायण वेदक, चेंबूर

आत्महत्या हा विषय महत्त्वाचा

‘मागे राहिलेल्याच्या कथा-व्यथा!’ या सदरातील डॉ. शुभांगी पारकर यांचा लेख (१ जानेवारी) वाचला. सद्य:स्थितीत आत्महत्या हा विषय गंभीर होत असून कोणत्याही वयोगटात होणाऱ्या आत्महत्यांमागे काय कारणे असतील याचा थांगपत्ता लागत नाही. मानसिक गुंते सोडवणे कठीण होताना यासंदर्भात मार्गदर्शक व सकारात्मक लिखाण आवश्यक होतं. हे सदर ही गरज पूर्ण करेल असे वाटते.  – प्र. मु. काळे, सातपूर, नाशिक

‘गेले लिहायचे राहून’  वकिलांसाठीही मार्गदर्शक ठरेल

निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांचे ‘गेले लिहायचे राहून’ हे सदर जसे सामान्य माणसांसाठी वाचनीय असेल, तसेच ते वकिलांसाठी खूपच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार आहे. ही एक पर्वणीच आहे असे मला वाटते. लेखमालेतील पहिल्या दोन लेखांनी वर्षभर अप्रतिम लेख वाचायला मिळतील हे सांगितले. प्रत्येक लेखाची आतुरतेने वाट पाहत आहे.  – अ‍ॅड. स्वाती कांबळे, चिंचवड

नवी सदरे आवडली

मी मागील बरीच वर्ष ‘चतुरंग’ पुरवणी वाचते आहे. दरवर्षी वेगवेगळय़ा मान्यवरांच्या विविध विषयांवरील उत्तम लिखाणाने अतिशय सुंदर असा वाचनानुभव दिला आहे. या वर्षीच्या मान्यवरांची नावे वाचूनच नव्या वर्षांतील लेखांबाबत खूप उत्कंठा होती. पहिल्याच पुरवणीतील सर्व लेखांच्या वाचनाने नेहमीप्रमाणेच भरपूर वाचनानंद दिला! – अरुणा गोलटकर, प्रभादेवी

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opinion reader doctor should accept responsibility akp
First published on: 29-01-2022 at 00:00 IST