आरती कदम arati.kadam@expressindia.com

पडद्यावर दिसणाऱ्या कथेच्या पलीकडे जात आर्थिक संकटामुळे जगण्याची दिशाच बदललेल्या माणसाच्या जीवनाचा गंभीर पट मांडणारा ‘नोमॅडलँड ’ हा चित्रपट. माणसामधल्या ‘भटक्या’ वृत्तीची ओळख करून देतानाच जगण्यातल्या रितेपणाचीही जाणीव करून देतो. या चित्रपटाची कथा ज्यावर बेतली आहे त्या पुस्तकाची लेखिका जेसिका ब्रुडर, अभिनयासाठी ऑस्कर मिळवणारी फ्रान्सिस मॅक्डॉरमंड आणि लेखिका, संकलक, निर्माती, दिग्दर्शिका सबकुछ असणारी क्लोई झाओ, या तिघींनी या विषयाला योग्य न्याय दिला असल्यानेच या चित्रपटाला तीन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. जगाला अधिकाधिक आर्थिक संकटाकडे नेणाऱ्या आजच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर म्हणूनच हा चित्रपट महत्त्वाचा ठरतो.

आयुष्य तुम्हाला हवं तसं जगण्याचा पर्याय नेहमी देतंच असं नाही, उलट तुम्हाला नको असलेलंच आयुष्य लादतं बेमुर्वतपणे तुमच्यावर आणि सांगतं, ‘जगा कसे जगताय ते..’ माणूस त्यातूनही त्याला हवा तसा मार्ग शोधत राहातो. जगत राहातो, आणि त्यालाच नाव देत राहातो.. माणूसपण, शहाणपण, आणखी कसलं कसलं..

यंदाच्या ऑस्करविजेत्या ‘नोमॅडलँड’ चित्रपटाची ही काही ओळींतली गोष्ट. एकविसाव्या शतकातल्या अमेरिकेतल्या आधुनिक ‘नोमॅड’ची, भटके पण लादलेल्यांची  गोष्ट. पूर्वी दरमजल करत चालत राहाणाऱ्यांचं विंचवाचं बिऱ्हाड खांद्यावर असायचं. इथलं आयुष्य चार चाकांवर चाललेलं. ‘यूँ ही चला चल राही’ म्हणत आपल्या व्हॅनिटीवजा व्हॅनमध्ये संसार मांडत, वाढवत, मोडत, जोडत, वाटत निघालेले असंख्य, लाखो नोमॅडस्.. कुठे जायचंय? काय करायचंय? पुढे काय होणार?.. याविषयी बहुतांशी अनभिज्ञच.

खरं तर हा माहितीपटच व्हायचा, परंतु क्लोई झाओच्या सर्जनशीलतेनं त्यातला सुवर्णमध्य साधत त्याचा सुंदर देखणा कथापट तयार केलाय. जो चिंतनशील तर आहेच, परंतु प्रेक्षणीयही झाला आहे. खरं तर हा ‘टिपिकल’ चित्रपट नाहीच, उलट यातली नायिका आहे ती ६१ वर्षीय फर्न. तिचा सारा संसार एकवटलेली, तिचं घरच झालेली तिची व्हॅन आणि समोर मैलोन्मैल पसरलेला निर्मनुष्य रस्ता..

तरीही हा चित्रपट आपण बघतो, कारण ती आहे माणसाची गोष्ट. पराभवातून, सगळं संपलेलं असतानाही उठून उभं राहाणाऱ्या माणसाची गोष्ट. या चित्रपटाला पार्श्वभूमी आहे ती अमेरिकेतल्या २००८ मधल्या ‘ग्रेट रेसेशन’ची. मंदीचा असा काही तडाखा त्या वेळी बसला होता की अमेरिकेची पूर्ण अर्थव्यवस्थाच पणाला लागली होती. असंख्य लोकांच्या नोकऱ्या तर गेल्याच, पण अनेकांना घरदार सोडावं लागलं, अक्षरश: रस्त्यावर यावं लागलं. विजेची बिलं, मेंटेनन्स भरायला पैसे नाहीत, भाडं भरण्यासाठी पैसे नाही, वाढत जाणाऱ्या कि मती आणि वाढत्या वयामुळे नोकऱ्यांना नकार, यात अडकलेल्यांचे रोजच्या खाण्याचेही वांदे झालेले. अशा वेळी अनेक जणांनी आपलं घर विकलं. जे काही पैसे आले त्याची राहाता येईल अशी व्हॅन खरेदी केली आणि निघाले. जमेल तसं जगत..

हा चित्रपट मात्र बोलतो तो एकांडय़ा शिलेदारांबद्दल, जे वयाच्या उतरत्या टप्प्यावर एकेकटे निघाले आहेत. आयुष्यालाच आव्हान देत, मिळेल त्या मार्गानं स्वत:ला जगवत.. या चित्रपटातली फर्नही अशीच. नवाडा, एम्पायर इथली जिप्सम कॉर्पोरेशन बंद पडल्याने बेकार झालेली, नवराही नुकताच वारला आहे. मुलं नाहीत. जगायचं तर आहेच. जे आहे ते विकून तिही आपल्या ‘व्हॅनगार्ड’मधून निघते. वाटेत लागणारं अ‍ॅमेझॉन वर्कहाऊस असो, शुगर बीट फॅक्टरी असो, नॅशनल पार्कमधलं सफाईचं,  अगदी टॉयलेट सफाईचं असो, की अगदी फास्ट फू डमधल्या किचनमधलं मदतनीसाचं काम असो. ते करत पैसा कमवत. स्वत:ला जगवत पुढे जात राहाते..

माहितीपट होता होता हा सर्वागसुंदर चित्रपट झाला तो याच तिच्या प्रवासादरम्यानच्या अनुभवांमुळे. त्याअर्थी तो ‘रोड मूव्ही’आहे.  हा चित्रपट फर्नची एका वर्षांची कहाणी सांगतो. त्यामुळे या वर्षभरातल्या बदलत्या निसर्गाचा अप्रतिम वापर करत सिनेमॅटोग्राफर जोशुआ जेम्स रिचर्डनं निसर्गातल्या रंगांची जी अप्रतिम उधळण फ्रेमबद्ध केलीय त्याला तोड नाही. ती इतकी चपखल आहे की (क्रिएटिव्हिटी आणि क्राफ्टमनशिप यांचा अप्रतिम संयोग) फर्नच्या आयुष्यातल्या चढउतारांचा अर्थ लागत जातो. या एका वर्षांत तिला आलेले अनुभव, नवीन वर्षांचं एकटीनं केलेलं सेलिब्रेशन असो की कधी स्नो फॉलमुळे कुडकुडणाऱ्या थंडीत स्वत:च स्वत:ला सावरायला लावणं असो, कधी कोसळलेला पाऊस, तर कधी तांबूसलाल सूर्यप्रकाशानं नटलेल्या पर्वतरांगा, तर कधी उंच उभ्या कातळानं वेढलेला गूढ परिसर, सूर्योदयाचे विविध विभ्रम तर कधी कातर संध्याछाया. जगण्यातल्या भल्या-बुऱ्या आठवणी, मागे सोडलेल्या नात्यांचे चांगले-वाईट अनुभव, मृत्यूच्या आभासातही जगण्याचा लागलेला सखोल अर्थ.. खूप काही ती गाठीशी बांधत जाते. माणसाचं पाण्याशी आदिम नातं मानलं जातं. एका क्षणी आपले सारे ताणेबाणे, आनंद, शोक, आठवणी निवून द्यायला तिला निवांत एकांत सापडतो तो पाण्याच्या बाहुपाशात. निसर्गावस्थेत पहुडलेली फर्न, सोबतीला हिरवीगार वनश्री आणि त्या नितळ पाण्यात सुखावत, शांतवत जाणारी फर्न.. आयुष्य हेही देतच असतं मधून मधून.. हा तिचा सारा प्रवास तिच्यातले सारे नकार, बंध, दु:ख, वेदना हळूहळू सैलावत नेतो..

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ही कथा आहे ती अमेरिकेतल्या आधुनिक नोमॅडची. फर्नच्या माध्यमातून ती आपल्याला कळत जाते. या चित्रपटात दिग्दर्शिका क्लोईनं आरव्हींना (रिक्रिएशनल व्हॅन्स)- घराचं रूप देत त्यातच  प्रत्यक्ष जगणाऱ्या नोमॅडस्ना सहभागी करून घेतलं आहे आणि त्यामुळे हा चित्रपट  वास्तवाच्या अधिक जवळ जाणारा तर आहेच, पण त्या जगण्यातली अस्थिरता आपल्यालाही अधिक स्पर्शून जाते. फर्नसारखे अनेक भटके, वय वर्ष ५५ च्या पुढचेच, आपापल्या व्हॅन घेऊन जगायला बाहेर पडलेले..  प्रत्येकाचा एक भूतकाळ आहे. प्रत्येकाची स्वत:ची अशी कहाणी आहे. कुणी तो भूतकाळ विसरू पाहातो, कुणी त्यातच जगू पाहातो तर कुणी त्यालाच गुरू मानून पुढचा मार्ग शोधतो आहे.

बॉब वेल्सच्या ‘आरटीआर’च्या (रबर ट्रँप राँदेव्हूज- भटक्यांचा मोठा मेळावा) ठिकाणी  हे सगळे भटके काही काळासाठी एकत्र येतात. रात्रीच्या चांदण्यात शेकोटीसमोर गोलाकार बसून आपापले अनुभव सांगतात. वस्तूंची देवाणघेवाण करतात, एकमेकांना शिकवतात, शिकतात.. आणि गुडबाय न म्हणता, ‘सी यू डाऊन द रोड’ म्हणत पुन्हा भेटीचं आश्वासन देत एकमेकांचा निरोप घेतात.. पुन्हा भेटणार का माहीत नाही, पण जगण्याची चिवट विजिगीषु वृत्ती असतेच आत प्रत्येकाच्या.. एकेक गाडी मार्गस्थ होत जात राहाते आणि मागे राहातो दिग्दर्शिका क्लोईला दाखवायचा असतो तो, अर्थहीन रितेपणा..

या प्रवासात फर्नला भेटलेल्या आणि तिच्या जगण्याचा अर्थ समजून देणाऱ्या चार महत्त्वाच्या व्यक्तींच्या उल्लेखाशिवाय ‘नोमॅडलँड’ची कथा पूर्ण होऊच शकणार नाही. वर म्हटल्याप्रमाणे या चित्रपटात फ्रान्सिस मॅक्डॉरमंड आणि डेव्हिड स्ट्रॅथेर्न या व्यावसायिक कलाकारांव्यतिरिक्त क्लोईनं इतर पात्रांची निवड केलीय ते आहेत खरेखुरे नोमॅड्स, पण पडद्यावर ते कलाकार म्हणून कुठेही कमी पडलेले नाहीत. यातली लिंडा मे ही ६२ वयाची बाई. आयुष्यभर काम करूनही पुरेसे पैसे गाठीशी बांधू न शकलेली. आत्महत्या करायची तर आपल्यावर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांचं काय, असं म्हणून तिनं तोही विचार सोडून दिलाय. आता या वयात पैसे कमवत जगते आहे. पण त्याही परिस्थितीत तिचं स्वप्न आहे ते नातवंडांसाठी ‘अर्थशिप’ तयार करण्याचं. निसर्गातल्याच गोष्टी वापरून. लिंडा आणि फर्न भेटतात त्या वेगवेगळ्या कामाच्या ठिकाणी. काम करायचं, पैसे मिळवायचे, पथारी पसरायची की दुसऱ्या दिवशी दोन दिशेला दोघी आपण.. आयुष्य मोलाचं आहे, याचं भान फर्नला तिच्याच सहवासात मिळतं. याच प्रवासात फर्नला भेटतो डेव्ह. खरं तर त्याच्या मुलांचं आगत्यशील कुटुंब आहे. पण तो घराबाहेर आहे, ‘एकला चालो रे’ म्हणत, स्वत:ला अपयशी मानत. ‘मी मुलांचा कधीच चांगला बाप बनू शकलो नाही’, ही खंत बाळगत. फर्न त्याला आवडते. त्याच्या आजारपणात ती त्याची काळजीही घेते. फर्नची सोबत तो मागतो, पण फर्नच्या मनात अढळपणे आहे तो तिचा नवरा बो. एके दिवशी डेव्हचा मुलगा तो आजोबा होणार असल्याचं  सांगत त्याला घरी न्यायला येतो, तेव्हा पुन्हा तो नकारच देतो. त्यावर ती सहजपणे त्याला सांगते, ‘फार विचार करू नकोस. जा. आजोबा हो.’ लेखिका क्लोई अशी जाणवत राहाते, छोटय़ा छोटय़ा प्रसंगातून भावनांची, नात्यांची घट्ट वीण बांधत जाणारी. काही दिवसांनी फर्न डेव्हच्या घरी जाते. पुन्हा एकदा तो तिला तिथे राहाण्याची गळ घालतो. मुलांना सांभाळायची सवय नसल्यानं बाळ हातात घेताना अवघडलेली फर्न नंतर

मात्र तळहातावर त्या बाळाचा नाजूक हात घेत अंगाई गुणगुणत राहाते, मोहाचा क्षण कदाचित.. रात्री मात्र तिला आधार घ्यावासा वाटतो तो त्याच्या घराबाहेर उभ्या असलेल्या आपल्या व्हॅनचाच. गुपचूप येऊन ती आपल्या बिछान्यात गाढ झोपून जाते. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा ती घरभर वावरते. प्रत्येक गोष्टीवर हात फिरवत अंदाज घेत राहाते बहुधा. आदल्या दिवशी

डेव्ह बसलेल्या खुर्चीत काही काळ बसते.

त्या खोलीत ती एकटीच आहे. काही क्षण स्तब्धता आणि ती उठते. खुर्ची आधी जशी होती तशीच पुढे ढकलून ठेवते, तिचा निर्धार स्पष्ट होतो.. पुढचं दृश्य, थेट रस्त्यावर. सगळ्या मोहांपासून अलिप्त होत जाणारी फर्न आपल्या व्हॅनमध्ये आहे आणि  समोर आहे भरगच्च पावसाने न्हायलेला रस्ता.. अबोल.. क्लोईचं दिग्दर्शन आणि फ्रान्सिसचा बोलका चेहरा, डोळे.. शब्दांवाचून कळले सारे अशी आपली अवस्था होते.

आणखी दोन माणसं म्हणजे स्वॅन्की आणि बॉब. मृत्यूला सामोरं जाताना जगण्याचा अर्थ समजून देणारी. स्वॅन्की, कर्करोग झालेली. फक्त आठ महिने हातात असलेली पंचाहत्तरी पार केलेली वृद्धा. ती सांगते, ‘‘माझं उरलेलं आयुष्य मला कुठल्याशा हॉस्पिटलमध्ये काढायचं नाहीए तर ज्यानं मला भरभरून जगणं शिकवलं त्या निसर्गाला यथेच्छ उपभोगायचंय.’’ ती निघून जाते एकटीच आपल्या व्हॅनसह. काही काळानं तिचा एक व्हिडीओ फर्नच्या मोबाइलवर येतो. तो बघत असताना, स्वॅन्कीला जे हवं होतं ते तिला मिळाल्याचा आनंद फर्नच्या डोळ्यात आपल्यालाही दिसतो. काही काळाने अर्थातच स्वॅन्कीच्या मृत्यूची बातमी येतेच. सगळे नोमॅड एकत्र येतात. तिला श्रद्धांजली वाहातात, तिथे बॉब वेल्स भेटतो. हाही

खराखुरा नोमॅड आहे. इतर नोमॅड लोकांना योग्य त्या गोष्टी मिळाव्यात यासाठी तो धडपडतो आहे. त्याच्या ‘रबर ट्रँम्प राँन्देव्हूज’ (आरटीआर) या कार्यक्रमाद्वारे अनेकांना मार्गदर्शन करतो आहे. आपल्या आयुष्याचं सार फर्नला सांगताना तो म्हणतो, ‘‘माझ्या तरुण मुलाने आत्महत्या केली. तेव्हा मी हादरलो होतो. मी रोज स्वत:ला विचारायचो, तो नसलेल्या जगात मी जगून काय करतोय. पण एके दिवशी मला त्याचं उत्तर मिळालं आणि माझं सारं आयुष्य मी नोमॅडसाठी वाहून टाकलं. आपण असे भेटतो, वेगळे होतो, पुन्हा भेटतो. कारण खरं तर तो निरोप नसतोच. पुन्हा कधी तरी कुणाच्या ना कुणाच्या रुपाने माणसं भेटतच असतात. मला माझा मुलगा भेटेल. तुलाही तुझा बो असाच सापडेल.’’ तेव्हाचा सारं काही समजल्याचा फर्नचा चेहरा आपल्याला विसरता येत नाही.

‘आय एम हाऊसलेस, नॉट होमलेस’ म्हणणाऱ्या फर्नचा प्रवास आता वेगळ्याच्या टप्प्यावर आलाय. वर्षभर प्रवास करता करता तिच्यातला ‘भटक्या’ तिला भेटलाय. ती घरी परतते. नवऱ्याच्या, संसाराच्या आठवणींना उजाळा देते. उरलं सुरलेलं सारं काही देऊन टाकते आणि खऱ्या अर्थाने रिती होऊन जाते.. घरातून बाहेर पडताना तिने दाराकडे के लेली पाठ.. आणि पुढचं दृश्य थेट रस्त्यावर व्हॅनमध्ये.. समोर  मैलोन्मैल अखंडपणे पसरलेला रस्ता आणि दूरवर पर्वतांवर उतरलेलं आकाश.. बस्स .. फर्न खऱ्या अर्थाने नोमॅड होते..

क्लोईने आणि फ्रान्सिसने चितारलेली फर्न अशी अप्रतिम आहे.

आजही अशा अनेक नोमॅडचा प्रवास सुरुच आहे.  त्यांचं पुढे काय, हा मात्र चित्रपटाला पुरुन उरणारा प्रश्न.  पंचावन्न-साठीचे हे सगळे एकाकी लोक आपापल्या गाडय़ा घेऊन फिरताहेत, पुरेसा पैसा गाठीशी नसतोच अनेकदा, मग अशा वेळी गाडी बंद पडली तर काय, एखादेवेळी कामच मिळालं नाही तर काय, मध्ये आजारी पडले तर काय आणि सर्वात महत्त्वाचं मृत्यूच आला अकस्मात तर काय. अर्थात बॉब वेल्ससारख्यांच्या संस्था एकमेकांशी संपर्क साधून असतात. आज अनेक वेबसाइटसही आहेत. तरीही त्याला मर्यादा येतच असणार. त्यांचं आयुष्य शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्टय़ाही सोपं नसणार.

हा चित्रपट ज्यावर आधारित आहे ते  जेसिका ब्रूडर हिचं ‘नोमॅडलँड -सव्‍‌र्हायव्हिंग अमेरिका इन ट्वेण्टी फर्स्ट सेच्युरी’ हे पुस्तक  २०१७ मध्ये प्रकाशित झालं होतं. एका नोमॅडची माहिती मिळाल्यानंतर ही पत्रकार जेसिका स्वत:च ‘हेलेना’ या आपल्या आरव्हीसह निघाली फिरतीवर. आणि वाटेत तिला जे जे अनुभव आले ते ते तिने यात शब्दबद्ध केले. लिंडा मे, स्वॅन्की, बॉब हे तिलाच भेटलेले ‘भटके’. अमेरिकेतल्या एका वेगळ्याच जगण्याचा तिने मांडलेल्या या पटाचा वास्तववादी चित्रपट तयार झाला. या पुस्तकालाही पुरस्कार मिळाले आहेतच, पण आता चित्रपटाला मिळालेल्या ‘ऑस्कर’मुळे या विषयाचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. कारण या भटक्यांचं हे आयुष्य सोपं नाही. छंद ,चैन,आनंद म्हणून अनेक जण अशा सफरींना निघतात ते हे जगणं नाही. त्यांच्या व्हॅन्स , कॅ राव्हॅन्स अत्याधुनिक गोष्टींनी सुसज्ज असतात. इथे मात्र या लोकांची ही जगण्यासाठीची पायपीट नव्हे, चाकपीट आहे, कसलीच शाश्वती नसलेलं अधांतरी आयुष्य जगणं सोपं नसतंच. कारण हे आहे त्यांच्यावर लादलेलं भटके पण. या पुस्तकाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत जेसिकाने म्हटलं आहे, की सुरुवातीला जेव्हा मी या नोमॅड्सचा शोध घेत होते तेव्हा त्यांची अशी चारच प्रमुख लोकेशन्स मला सापडली होती, परंतु आता २०२१ मध्ये त्याची संख्या २४ झाली आहे. जवळजवळ ३० लाख लोक रस्त्यावर आले आहेत.  यातली गांभीर्याची गोष्ट म्हणजे मंदीचा फटका बसलेल्यांमध्ये आता करोनामुळे बेघर झालेल्यांचीही भरती झाली आहे. आज अमेरिके तच नाही तर जगभरात असे आधुनिक नोमॅड आहेत.

पुढे ही संख्या वाढेल का? या लोकांचं भवितव्य काय? या प्रश्नांची उत्तरं आत्ता या घडीला तरी मिळणं कठीण आहे. आता फक्त चार चाकी गाडी हाकत काम मिळेल त्या दिशेला जात राहाणं एवढंच त्यांचं प्राक्तन आहे.. भविष्यकालीन संकटांचं हे सूतोवाच तर नव्हे?..