रागाला बाहेर काढा

रागाचा एक भाग समजून घेण्याजोगा असतो, कारण तो लोकांशी, परिस्थितीशी निगडित असतो.

राग असतो; एवढं माहीत असणं पुरेसं आहे. आणि तो बाहेर फेकला पाहिजे, कारण हा राग तुमच्या आत राहिला तर तुम्हाला कधीच शांत आणि स्थिर वाटणार नाही; तो आत आगीसारखा जळत राहील. तो बाहेर पडण्यासाठी सबबी शोधत राहील आणि तुम्ही तो कोणत्याही कारणाशिवाय बाहेर काढला नाही, तुम्ही तो दुसऱ्या कोणावर तरी काढलात, तर तुमचा त्रास जास्तच गुंतागुंतीचा होऊन बसेल.

मी आतून कधीच शांत नसतो. मला अजूनही समजू शकलेला नाही असा काही तरी राग आजही माझ्या आतमध्ये आहे. शांत राहा, बोलू नकोस असा आवाज मला आतून कुठून तरी येत असतो पण तो आवाज ऐकणं मला खूप कठीण जातं. मला त्याची भीती वाटते. यापुढेही कधीही क्रोधाला दडपून ठेवू नका. जे काही आतमध्ये राहिलंय ते बाहेर आणलं पाहिजे, कारण, खरोखरीच शांत होण्याचा तेवढा एकच मार्ग आहे.

तुम्ही स्वत:ला जबरदस्तीने शांत बसवू शकाल पण हा शांतपणा आत्ता नाही तर नंतर विचलित होणारच आहे. कारण, त्याला अगदी लागून क्रोध उकळतोय आणि एका संधीची, एका क्षणाची वाट बघतोय उद्रेकासाठी. अशा प्रकारे काही जण सतत ज्वालामुखीवर बसलेले राहतात. या ज्वालामुखीचा उद्रेक होत नाही, तो सुप्त आहे तोपर्यंत सगळं काही शांत असल्यासारखं वाटतं पण आतमध्ये तो उद्रेकाची तयारीच करत असतो. थोडा राग बाहेर पडला आहे, थोडा अजूनही आत आहे आणि जो राग बाहेर पडला तो काहीसा उथळ होता. खोल जाऊन बसला आहे तो राग बाहेर टाकण्याची गरज आहे. म्हणूनच ते समजून घेणं कठीण आहे.

रागाचा एक भाग समजून घेण्याजोगा असतो, कारण तो लोकांशी, परिस्थितीशी निगडित असतो. तुम्हाला राग का आलाय हे तुम्हाला कळत असतं; रागामागचं कारण स्पष्ट असतं. मात्र, रागाचा हा स्तर, हा वरचा स्तर, बाहेर फेकला जातो आणि अचानक तुमचा सामना या क्रोधाच्या स्रोताशी होतो तेव्हा तुम्हाला तो समजत नाही. या रागाचा बाहेरच्या जगाशी काही संबंधच नसतो. हा राग तुमचा भागच असतो. कोणीच तुमचा अपमान केलेला नसतो, खरं तर राग येण्यामागे कोणतं कारणच नसतं आणि तरीही तो येत असतो. हा राग समजून घेणं खूपच कठीण जातं, कारण, त्याची जबाबदारी तुम्ही दुसऱ्या कोणावर टाकू शकत नाही. आता हा राग तुमच्या आतच असतो, हा तुमचा भाग असतो. राग फक्त तणावाच्या परिस्थितीतच येतो असं आपल्याला कायम शिकवलं गेलंय. ते खरं नाही.

आपण रागासह जन्माला येतो, तो आपलाच भाग आहे. काही विशिष्ट परिस्थितींत तो वर येतो; काही विशिष्ट परिस्थितींत तो सुप्त असतो, पण तो असतो कायमच. त्यामुळे व्यक्तीला प्रथम जगासंबंधित राग बाहेर फेकावा लागतो आणि मग ती व्यक्ती या कोणाशीही संबंध नसलेल्या क्रोधाच्या खोल स्रोताशी पोहोचते. हा राग घेऊनच ती जन्माला आलेली असते. त्याच्याकडे कोणी बघितलेलंच नसतं आणि तो समजून घेण्यातली अडचण हीच असते. मात्र, तो समजून घेण्याची गरजही नाही. केवळ तो बाहेर फेकून द्या, कोणावर काढू नका, एखाद्या उशीवर, आकाशावर, देवावर किंवा माझ्यावर काढा! तो काढून फेकणं महत्त्वाचं आहे.

आणि या रागाचा कोणाशीही संबंध नाही, त्यामुळे तो खुळचटच असणार. तो कुठे फेकून द्यावा, कसा फेकून द्यावा, कोणावर त्याचा वर्षांव करावा काहीच तुम्हाला माहीत नसतं. तुम्ही तो कोणावर तरी काढलात, तर तुम्हाला अपराधी वाटत राहील. कारण, त्या व्यक्तीवर तो अन्याय होता. हेच तर या रागाचं रहस्य आहे. हा राग प्रत्येकाला खूप अस्वस्थ करून सोडतो. हे प्रत्येक भावनेबाबत होतं. प्रेमाचाही एक भाग कोणाशी तरी जोडलेला असतो. पण जेव्हा तुम्ही खोलवर जाता, तेव्हा एक दिवस तुम्हाला प्रेमाचा कशाशीही संबंध नसलेला स्रोत दिसतो. हे प्रेम कोणाकडेही जाणारं नाही; ते केवळ तिथे आहे, आतमध्ये आहे. आणि हेच तुम्हाला वाटणाऱ्या प्रत्येक भावनेला लागू पडतं. प्रत्येक भावनेला या दोन बाजू असतात.

यातली अजाणती बाजू, सखोल बाजू केवळ तुमच्यासोबत राहते आणि या सखोल भावनेचा वरचा स्तर सर्व प्रकारच्या नातेसंबंधामध्ये भूमिका बजावत असतो. आपल्या आतल्या मौल्यवान खजिन्याबद्दल पूर्णपणे विसरून गेलेले लोक कायम उथळच राहतात. जेव्हा तुम्ही आतला राग बाहेर फेकता, तेव्हा आतल्या प्रेमाची, अनुकंपेची ओळख तुम्हाला पटते. तुम्हाला स्वत:च्या आतमध्ये असलेल्या शुद्ध सोन्याच्या जवळ जायचं असेल, तर अर्थशून्य गोष्टी फेकून द्याव्या लागतील.

तेव्हा हा मुद्दा लक्षात घ्या- राग समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. संपूर्ण पाश्चिमात्य जगाला, आधुनिक मनाला भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांपैकी ही एक आहे : आपण सगळं काही समजून घेण्याचा प्रयत्न करत राहतो आणि मुळात आयुष्य हे एक रहस्य आहे.

तुम्ही ते जगू शकता पण तुम्ही ते समजून घेऊन शकत नाही. आणि तुम्ही ते समजून घेण्याचा आग्रह धराल, तर कायम उथळच राहाल.

बुद्धी केवळ पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकते, केवळ एका मर्यादेपर्यंत जाऊ शकते, त्यानंतर अधिक खोलवर जाऊ शकत नाही. खोली हा बुद्धिमत्तेचा आयामच नाही; बुद्धिमत्तेचा आयाम आहे लांबी. त्यामुळे तुम्हाला तपशील हवे असतील, तर तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला ते खूप देईल, पण ती खोलवर जाऊ शकत नाही; बुद्धिमत्ता कोणत्याही तथ्याच्या खोलात जाऊ शकत नाही. तेव्हा ते विसरून जा. समजून घेण्याची काही गरजच नाही.

राग असतो; एवढं माहीत असणं पुरेसं आहे. आणि तो बाहेर फेकला पाहिजे, कारण हा राग तुमच्या आत राहिला तर तुम्हाला कधीच शांत आणि स्थिर वाटणार नाही; तो आत आगीसारखा जळत राहील. तो बाहेर पडण्यासाठी सबबी शोधत राहील आणि तुम्ही तो कोणत्याही कारणाशिवाय बाहेर काढला नाही, तुम्ही तो दुसऱ्या कोणावर तरी काढलात, तर तुमचा त्रास जास्तच गुंतागुंतीचा होऊन बसेल. तुम्ही जर हा राग बायकोवर, मुलांवर, मित्रावर किंवा अन्य कोणावर काढत असाल, तर तुम्ही स्वत:साठी आणखी जटिल अडचणी उभ्या करून ठेवत आहात, कारण असं करताना तुम्ही यातली मेखच विसरत आहात. तेव्हा आत्ता तुम्हाला मिळालेली माहिती चांगली आहे. आत्ताच तिचा उपयोग करा.

ओशो, अबॉव्ह ऑल, डोण्ट वॉबल,

टॉक #२२

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

http://www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article from osho book above all do not wobble