scorecardresearch

मस्त चाललंय आमचं!

माझी पहिली नोकरी डोंगर-दऱ्या भटकण्याची, शेताचे बांध तुडवण्याची होती. दुर्गम भागात गरिबांच्या झोपडय़ांत जावं लागे.

विलास वि. फडके

माझी पहिली नोकरी डोंगर-दऱ्या भटकण्याची, शेताचे बांध तुडवण्याची होती. दुर्गम भागात गरिबांच्या झोपडय़ांत जावं लागे. मला खाण्यापिण्याच्या कसल्याही खोडय़ा नव्हत्या, पण प्रत्येकाकडे जेवण घेणं शक्य नसे. मग चहाचा आग्रह होई. मी घरी कधीही चहा घेतला नव्हता, पण या लोकांकडे कॉफी किंवा दूध मागण्याची सोय नव्हती; मग चहा या नावाखाली समोर येईल ते पेय प्यायला शिकलो. चुलाण्यावरचा, बिनदुधाचा, न गाळलेला, असा सर्व प्रकारचा चहा पितळय़ाच्या कपबशीतून घ्यायला शिकलो. आणखी एक गोष्ट समजली, ती म्हणजे आपल्या सवयी दुसऱ्याच्या अडचणीच्या होऊ नयेत. मग प्रसंगी मांसाहार करायला शिकलो. त्यामुळे पुढे देशभर केलेल्या भटकंतीत खाण्याचे कधीही वांधे झाले नाहीत. उलट ज्या प्रांतात जाऊ, तिथले पदार्थ आवर्जून मागून खात असे.

 पुढे नोकरी बदलली.  इथं संघटनेचं काम करताना आमच्या नेत्यांनी ‘नोकरी म्हणजे सेवेची संधी आहे. वरती नजर ठेवताना पायाखालीही बघायला शिका,’ अशी शिकवण दिली. एखाद्याला आपल्या मदतीची गरज आहे आणि आपण ती करू शकतो हे लक्षात आलं, तर मी स्वत:ला रोखू शकलो नाही. ऑफिसचं काम -संघटना- व्यक्तिगत संबंध यांची सरमिसळ केली नाही. आपली बाजू योग्य आहे, ही खात्री झाल्यावर इतरांविरुद्ध उभं राहाण्याची तयारी ठेवली. त्यामुळे काही शत्रू निर्माण झाले, पण असंख्य मित्रही मिळाले.

आपण केलं यापेक्षा आपल्या हातून झालं, असं मानल्यामुळे अनेकांचा विश्वास संपादन करू शकलो. कुठेतरी, कुणाकडून तरी माझं नाव ऐकून अनोळखी माणसं सल्ला विचारतात, मैत्रीसाठी हात पुढे करतात. असे असंख्य मित्र जोडले गेले. लेखणीचा उपयोगही मनोरंजनाबरोबर इतरांसाठीही केला. कोणत्याही महाराज-माताजींच्याच काय, देवाच्याही मागे लागलो नाही. भूतकाळ उगाळायचा नाही, भविष्याची चिंता करायची नाही, वर्तमानात जगायचं, मिळेल ते आपल्या कर्माचं फळ, हे शिकलो. आणि तोच माझ्या आयुष्याचा अर्थ झाला. मुख्य म्हणजे  इथे आपलं काहीही नाही, याची खात्री झाली. त्यामुळे गुंतणं कमी झालं. ‘जीवन मजला कळले हो’ असा दावा नाही, पण त्याविषयी काही तक्रारही नाही. म्हणूनच मी माझ्या एकूणच आयुष्याबद्दल बोलतो, मस्त चाललंय आमचं!

phadakevilas1946@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ours going well job wander difficulty organization work job service opportunity ysh

ताज्या बातम्या