-डॉ. नागेश टेकाळे ओडिशातील कोरापूट जिल्ह्यातील ‘पद्माश्री’ पुरस्कारप्राप्त अदिवासी शेतकरी कमला पुजारी यांच्यामुळे सेंद्रिय शेती आणि शेकडो पारंपरिक भात वाणांच्या संवर्धनासाठी कोरापूटला जागतिक कृषी वारसा स्थळाचा मान मिळाला आहे. सेंद्रिय शेतीमुळे जैवविविधतेची श्रीमंती वाढते आणि शेती शाश्वत होते, असा संदेश देणाऱ्या येथील तांदळाचा सुगंध जगभर पसरवणाऱ्या कमला पुजारी या अल्पभूधार आदिवासी स्त्रीचे नुकतेचनिधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या शाश्वत कार्याविषयी… सेंद्रिय शेती तसेच पारंपरिक भात वाणांचे संवर्धन करण्यासाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या आणि त्यासाठी भारताला जागतिक स्तरावर पोहोचवणाऱ्या अदिवासी शेतकरी पद्माश्री कमला पुजारी यांचं निधन(२० जुलै) झाल्याची बातमी वाचली आणि नकळत मला २०१२ मध्ये त्यांची ओडिशामधील ‘पत्रपूट’ या लहानशा अदिवासी पाड्यात घेतलेली भेट आठवली. त्यावेळी त्यांनी साठी ओलांडलेली होती. मोडक्या-तोडक्या हिंदी भाषेत त्यांच्याशी संभाषण करताना, त्यांची सेंद्रिय शेती पाहताना, भात वाणांचे संवर्धन अनुभवताना आणि त्यांनीच शेतात पिकविलेला हजारो वर्षांची परंपरा असलेल्या, आधुनिक कृषि संशोधनाची साथ लाभलेल्या औषधी ‘काळ्या भाता’ची चव चाखताना त्यांचा दूरगामी दृष्टिकोन आणि कामाविषयी आदर दाटून येत होता. ओडिशातील कोरापूट हा जिल्हा आणि त्यातील पत्रपूट हे छोटे गाव. हे कमला यांचे जन्मस्थान. माता-पित्याची गरिबी, जोडीला थोडी शेती. त्यामध्ये पारंपरिक भात वाणांची लागवड, गावात रासायनिक खते आणि कीटकनाशकास बंदी. त्यामुळे परिसरात कायम सेंद्रिय शेतीचाच सुगंध आणि हाच सुगंध कमला पुजारी यांना त्यांच्या लहान गावासह कोरापूट जिल्ह्यास ‘युनेस्को’ आणि ‘जागतिक अन्न संघटने’च्या (FAO) प्रवेशद्वारामधून सन्मानाने जागतिक स्तरावर घेऊन गेला. ओडिशामधील कोरापूट गावाची सेंद्रिय शेती आणि शेकडो पारंपरिक भात वाणांच्या संवर्धनासाठी जागतिक वारसा यादीत नोंद झाली आहे. आणखी वाचा-‘आईची जात, ती मुलांची का नाही?’ कोरापूटमधील स्त्रियांना एकत्रित करून कमला यांनी अनेक स्थानिक तांदूळ बियाणांची फक्त ‘बीज बँक’च तयार केली नाही, तर प्रत्येकाच्या शेतात त्यांचे सेंद्रिय पद्धतीने यशस्वी उत्पादन घेऊन कोरापूट जिल्ह्याच्या पंचक्रोशीमध्ये या वाणांचा सुगंध पसरवला. त्यांच्या कृषी क्षेत्रामधील या महत्त्वपूर्ण कार्याची दखल तत्कालीन मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी घेऊन त्यांना राज्याच्या नियोजन मंडळावर मार्च २०१८मध्ये प्रतिनिधित्व दिले आणि राज्याला विशेषत: अदिवासींना वातावरण बदलाच्या दाहापासून संरक्षित करण्यासाठी पुढील पाच वर्षांचा कृषी आराखडा त्यांच्याकडून करून घेतला. त्या ज्यावेळी अदिवासी वेशामध्ये बैठकीस जात तेव्हा मुख्यमंत्र्यांसह सर्वजण उभे राहून त्यांना अभिवादन करत असे म्हटले जाते. त्या म्हणत, ‘तांदळाचा सुगंध हा आपल्यासाठी नसून परिसरामधील जैवविविधतेच्या समृद्धीसाठी आहे. त्यामुळेच तर जैवविविधतेची श्रीमंती वाढते आणि शेती शाश्वत होते.’ सुगंधाचा हा खरा अर्थ शास्त्रज्ञांना तरी उमगला असेल का? कमला यांनी गावपातळीवर निर्माण केलेल्या शेकडो भात वाणांच्या सुगंधी उत्पादनाची गावातूनच विक्री होत असे. ज्यांना कुणाला हा सेंद्रिय, सुगंधी, चवदार आणि औषधी तांदूळ पाहिजे त्यांनी गावात येऊनच तो खरेदी करावा ही त्यांची विनंती असे आणि त्यानुसार, अनेक जण शहरामधून येत आणि त्यांना हवा तो तांदूळ खरेदी करत. शेतकऱ्यांच्या खऱ्या सन्मानाची यापेक्षा वेगळी व्याख्या ती कोणती असू शकते? असे भाग्य आपल्याकडील शेतकऱ्यांना कधी लाभेल? आजचा अल्पभूधारक शेतकरी खऱ्या अर्थाने परावलंबी झाल्याचे दिसतो आहे तो विक्री समस्येमुळेच. कमला यांनी जोपसलेला पारंपरिक भात वाणांचा सुगंध फक्त ओडिशामध्येच दरवळला नाही, तर तो चेन्नईस्थित ‘डॉ. स्वामिनाथन संशोधन संस्थे’पर्यंतसुद्धा पोहोचला. भारतरत्न डॉ. स्वामिनाथन स्वत: कमला पुजारी यांना भेटले आणि तांदळाच्या जास्त उत्पादन देणाऱ्या संकरित वाण निर्मितीसाठी त्यांनी कोरापूट या जिल्ह्यात १९९४ मध्ये संशोधन केंद्र सुरू केले. कमला पुजारी या संशोधन केंद्राच्या स्थापने-पासूनच त्याच्याशी जोडल्या गेल्या होत्या. आणखी वाचा-सांदीत सापडलेले: भांडण २०१२ मध्ये कमलाताईंच्या झालेल्या भेटीमध्ये त्यांनी माझ्या जेवणाच्या ताटामध्ये वाढलेला ‘काळा जिरा’ हा भरपूर उत्पादन देणारा तरीही सुगंध कायम ठेवलेला भात म्हणजे ‘एम एस स्वामिनाथन संस्थे’चे (MSSRF)आधुनिक तंत्रज्ञान आणि अदिवासींचे पारंपरिक ज्ञान याचे उत्कृष्ट मनोमीलन होते. कमला पुजारी यांनी अनेक दुर्मीळ भात वाणांबरोबरच भरडधान्य, डाळवर्गीय पिकांचेसुद्धा जतन केले. गावामधील, पाड्यामधील हजारो अदिवासी स्त्रियांना एकत्र करून त्यांनी रासायनिक खतांना गावात कायमची बंदी घातली. भात उत्पादनात कोरापूट गावाला फक्त स्वावलंबीच केले नाही, तर तांदळाचे हे उत्पादन गावातल्या प्रत्येकाला पोटभर मिळून, वर्षभरासाठी घरात साठवून नंतर ते गावपातळीवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले. त्यांच्या या यशोगाथेची नोंद ‘जागतिक अन्न संघटने’ने २०१२मध्ये घेऊन कोरापूटला जागतिक स्तरावर महत्त्वाच्या कृषी वारसा स्थळाचा (Globally Important Agricultural Heritage Site- GIAHS) दर्जा दिला. कोरापूटचा संयुक्त राष्ट्रातर्फे २००२ मध्ये दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग येथे भरलेल्या ‘Earth Summit’ मध्ये ‘इक्वेटर इनिशिएटिव्ह’ पुरस्कार (Equator Initative Award) देऊन त्यांचा जागतिक पातळीवरसुद्धा सन्मान करण्यात आला. भारतात २००४ मध्ये ओडिशा राज्याच्या सर्वोत्कृष्ट स्त्री शेतकरी म्हणून त्यांचे नाव घोषित करण्यात आले तर २०१९ मध्ये त्यांना ‘पद्माश्री पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. आणखी वाचा-मनातलं कागदावर: कोरडी साय! भारतामधील स्त्री शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या मोजक्या कृषी विद्यापीठांपैकी ‘ओडिशा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ’ हे एक आहे. येथे कृषी शिक्षणासाठी मुलग्यांची संख्या ४८ टक्के, तर मुलींची संख्या तब्बल ५२ टक्के आहे. याच विद्यापीठामधील मुलींच्या अत्याधुनिक वसतिगृहाचे नाव कमला पुजारी असे आहे. हा त्यांचा खरं तर केवढा मोठा सन्मान. अशा वसतिगृहात राहणाऱ्या मुलींनाही आपण कमला पुजारी यांच्याप्रमाणेच कृषी क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर नोंद घेण्याइतपत योगदान करावे, असे का नाही वाटणार? कमला पुजारी यांच्या मागील ५० वर्षांच्या प्रयत्नांमधून आज कोरापूट आणि परिसरामधील अनेक गावांमध्ये तांदळाच्या ३४०, भरड धान्याच्या आठ, डाळवर्गीय पिकांच्या ९ प्रजाती या वातावरण बदलाच्या तडाख्यातही स्थानिक अदिवासींना खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि शाश्वत उत्पादन देत आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात अन्न सुरक्षेसह शाश्वत शेती करणाऱ्या या अदिवासींच्या आजूबाजूच्या जंगलात तब्बल २५०० सपुष्प वनस्पती त्यातही १२०० औषधी जाती आज आनंदाने डोलताना आढळतात. तांदळाच्या ३४० प्रजाती संवर्धन आणि संरक्षित कशा केल्या? या पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना कमला म्हणाल्या होत्या, ‘‘आमच्या मागील तीन पिढ्यांनी येथे १८००पेक्षा जास्त तांदळाच्या जाती पाहिल्या होत्या. जंगलावर झालेल्या आक्रमणातून त्यांची संख्या ६०वर आली होती. आज मी माझ्या सहकारी स्त्रियांच्या साहाय्याने येथील जंगलाचे संवर्धन करून ही संख्या ३४०वर नेली आहे.’’ जागतिक अन्न संघटना आणि संयुक्त राष्ट्राने कोरापूटला कृषी क्षेत्रामधील जागतिक वारसा हक्काचा दर्जा दिला आहे ते याचमुळे. आणखी वाचा-माझी मैत्रीण: मैत्रीचं देणं! आज जगात अशी कृषी वारसा स्थळे पेरु, चिली, फिलीपाइन्स, ट्युनिशिया, चीन, केनिया, टांझानिया, जपान येथे आहेत. याच यादीत कोरापूटचे नाव असणे हे आपल्या देशासाठी निश्चितच अभिमानाचे आहे. हा अभिमान आणि गर्व आपणास एका गरीब, अशिक्षित, पणखऱ्याखुऱ्या अभ्यासकाचं कार्य करणाऱ्या कमला पुजारी या आदिवासी अल्पभूधार स्त्रीने दिला आहे. कमला पुजारी आज आपल्यामध्ये नसल्या, तरी त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या हजारो अदिवासी स्त्रिया ओडिशामध्ये निसर्ग, घनदाट जंगल, तेथील समृद्ध जैवविविधता आणि त्यास जोडून पारंपरिक पद्धतीने शेती करून स्वत:ची संस्कृती जपत शाश्वत अन्नसुरक्षा प्राप्त करत आहेत. कमला पुजारींचे कालाहंडी या दुष्काळग्रस्त भागामधील पत्रपूट हे गाव खरंच स्वप्नवत आहे. अजूनही मला त्या त्यांच्या लहानशा घराच्या ओसरीवर त्यांच्या पांरपरिक अदिवासी पोषाखात १२ वर्षांपूर्वी पाहिलेल्या होत्या तशाच आठवतात आणि आठवत राहते ते त्यांनी भारताला कृषी क्षेत्रात मिळवून दिलेले जागतिक स्तरावरचे उच्च स्थान आणि मनात दरवळत राहातो तो तेथील सेंद्रिय तांदळाचा सुगंध. nstekale@gmail.com