‘अंनिस’चे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी आपल्या विधवा आईला बाजारातून मंगळसूत्र, जोडवी आणून देऊन ते घालण्यास सांगितले, कारण त्यांचे असे म्हणणे आहे, की स्त्रियांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. म्हणून अशा विधायक उपक्रमाची सुरुवात त्यांनी स्वत:पासून केली, असा उल्लेख १८ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘बदलाच्या दिशेने’ या दयानंद लिपारे यांनी लिहिलेल्या लेखात वाचला. पण मुळात प्रश्न असा आहे, की मंगळसूत्र आणि जोडवी घालणे, कुंकू लावणे, हिरवा चुडा भरणे, ही सगळी लक्षणे पुरुषसत्ताक संस्कृतीची आहेत, जी स्त्रीला दुय्यम स्थान देणारी आहेत. स्त्रीसाठी ‘पती परमेश्वर’ मानणारी आहेत. मग यात स्त्रीला कुठला अधिकार मिळतो असे त्यांना वाटते? खरे तर विधवा काय, की सधवा काय, कुणीही स्त्रियांना दुय्यम स्थान देणारी आणि पुरुषांच्या पायाची दासी समजणारी ही आभूषणे वापरता कामा नयेत. हौसमौज, नटणे-मुरडणे यासाठी दागिने घालणे वेगळे आणि पुरुषसत्ताक संस्कृतीच्या रक्षणासाठी ही आभूषणे घालणे वेगळे! हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. कारण विधवा होण्यात स्त्रीचा काय दोष असतो? विधुर पुरुषाचे जर पुन:पुन्हा लग्न होऊ शकते, तर विधवेचा पुनर्विवाह होण्यात अडचण काय?

खरेतर विधवांना घरीदारी होणाऱ्या कुठल्याही कौटुंबिक वा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सधवा स्त्रियांच्या बरोबरीचे स्थान देऊन त्यांच्याशी सन्मानाने वागणे, हे अशी कोणतीही आभूषणे घालण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. जसा हेरवाड गावच्या सरपंचांनी विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव पास केला, तसेच गावागावात प्रबोधन करून विधवा स्त्रियांना ‘पांढऱ्या कपाळाची’, ‘पांढऱ्या पायाची’, ‘अपशकुनी अवदसा’ असे कठोर शब्द वापरून त्यांना हीन लेखणे चुकीचे आहे, हे लोकांना समजावून दिले पाहिजे. याबाबत समाजाचे मनपरिवर्तन करण्यावर कार्यकर्त्यांनी भर द्यायला हवा. अन्यथा ‘अंनिस’चे कार्यकर्तेही भावनेच्या भरात चुकीचा पायंडा पाडतील, अशी साधार भीती वाटते.

या बाबतीत याच लेखात उल्लेख केलेले कृतिशील कार्यकर्ता कसा असावा त्याचे उदाहरण करमाळा येथील ‘महात्मा फुले सामाजिक सेवा संस्थे’चे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी ही अन्याय्य विधवा प्रथा बंदी मोहीम सुरू केली ती स्वत:पासूनच. त्यासाठी त्यांनी शंभर रुपयांचे प्रतिज्ञापत्र तयार केले आणि त्यात तहसीलदार यांच्या नावाने लिहून दिले, की ‘माझे निधन झाल्यावर पत्नीला विधवांसाठीच्या अनिष्ट प्रथा लागू करू नयेत. त्यासाठी कोणीही दबाव आणू नये. उलट असे कृत्य करण्यास कोणी भाग पाडले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी.’ अशा प्रकारे कृतिशील कार्य केले, तर ते समाजात चांगला परिणाम ठसवते.

    – जगदीश काबरे, सांगली</p>