नेहमीच चतुरंग पुरवणी वाचत असल्यानं नवीन वर्षांत कुठली सदरे असतील याचे कुतूहल होतेच. ७ जानेवारीची पुरवणी वाचली अन् ‘दिल खुश’! कारण सगळी सदरे ‘एक से बढकर एक’!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिनेमा कुणाला आवडत नाही? रशियात ‘पुष्पा’ सिनेमाने धुमाकूळ घातला. म्हणजे कलाकृतीत भाषेचा अडसर नसतोच. म्हणूनच संवेदनशील अभिनेत्री व लेखिका असणारी अमृता सुभाषसारखी व्यक्ती स्वीडिश सिनेमाचे परीक्षण करते अन् तेही पडदयावर कविता कोरणारा दिग्दर्शक इंगमार बर्गमनचा चित्रपट त्यासाठी निवडते, तोही ‘ऑटम सोनाटा’, असे वाटते, क्या बात हैं!

   ‘प्रवास चवींचा’ हे स्त्रियांच्या आवडीचे सदर, पण तमाम खवय्ये पुणेकर खूश होणार ही खात्री. ‘देहभान’ या अत्यावश्यक व वास्तव विषयावरील सदराबद्दल ‘चतुरंग’चे मनापासून आभार. अतुल पेठेंचे पर्यटन नवीन पर्यटकांची त्रेधातिरपीट व उशिरा आलेले शहाणपण दाखवते. ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून त्यांच्यासाठी एखादे सदर दरवर्षी असतेच. यंदा ‘आणि आम्ही शिकलो’ सुरू करून त्यांनाच लिहिते केले हे खूप छान झाले. यामुळेच शिकण्यास वय हा मुद्दाच गौण आहे. आपण आयुष्यभर शिकू शकतो अन् काळाबरोबर राहू शकतो ही भावना खूप छान आहेच, पण अनेकांना प्रेरणा देणारीही आहे.

  अन् या सगळय़ात कडी करणारा लेख म्हणजे आरती कदम यांचा ‘बाई तुझं चुकलंच?!’ किती प्रकारे आपली कानउघडणी करतो, वर पुरुषांनाही कानपिचक्या देतो. शिवाय पुढच्या पिढीतील मुली या अवास्तव अपेक्षा सहन करणार नाहीत हेही सांगतो. म्हणूनच ‘हॅट्स ऑफ टू लोकसत्ता’!     

– उमा मोकाशी, पुणे</p>

जवळचे वाटणारे पर्यटन अनुभव

ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांचा ‘आमी अ‍ॅक जाजाबॉर’ हा प्रवास अनुभव वाचून छान वाटले. लहानपणीची सहल आठवली की त्यावर लिहायला लागणारा निबंध हे एक मोठं दिव्यच असायचं. आखाती देशातल्या नातेवाईकाविषयी वाचूनही वाटलं, की असा अनुभव बऱ्याच ठिकाणी येतो. त्यातलं ‘जग हिंडले तरी प्रगल्भता आली नाही’ हेही महत्त्वाचं.

   माथेरानच्या सहलीत जीपमध्ये राहिलेले जाकीट हा अनुभवही जवळचा आहे. शेवटी प्रवासात काही विसरलं नाही तर तो प्रवास कसला! परदेशी फिरायला गेले तरी लोकांना महाराष्ट्रीय पदार्थच का खायचे असतात, हा मलासुद्धा पडलेला प्रश्न. अ‍ॅमस्टरडॅममधील अ‍ॅन फ्रँकचं घर बघतानाचा नवरा-बायकोचा संवाद वाचून वाटलं, की यांना अ‍ॅन फ्रँक माहिती आहे का आणि असेल तर कळली का? एकंदरीतच अतुल सरांचे प्रवासाचे अनुभव वाचून वाटलं, चला आपण एकटेच नाही आहोत! बाकी जाता जाता गुलजारसाहेबांच्या ओळींत सांगावंसं वाटतं,

उडम्ते पैरों के तले जब बहती हैं ज़्‍ामीं

मुडम् के हमने कोई मंज़िल देखी ही नहीं

रात-दिन राहों पे हम

शाम-ओ-सहर करते हैं

अतुल सरांचा प्रवास असाच चालू राहो, अनुभवांची शिदोरी अशीच भरत राहो. 

– मयूर कोठावळे, मुंबई</p>

दोन पिढय़ांतला समन्वय स्वागतार्ह!

आधीची पिढी व नंतरची पिढी यांच्यात कायम मतभेद असतात, परंतु आजची बदलती जीवनशैली ही पूर्वीपेक्षा अतिवेगाने बदलती असल्याने, दोन पिढय़ांत मोठे अंतर निर्माण होत आहे, यामुळे अनेकदा कुटुंबव्यवस्था व कुटुंबवात्सल्य हेही धोक्यात येत आहे. या दृष्टीने ‘वळणबिंदू’ ही लेखमाला, दोन पिढय़ांतील संघर्ष टाळण्यासाठी उपयुक्त ठरून, समाजमनांत अनुकूल परिवर्तन घडवणारी व सुरळीत समाजव्यवस्था निर्माण करणारी ठरणार आहे.

 डॉ. अंजली जोशी यांनीच पूर्वी लिहिलेली ‘चतुरंग’मधील ‘सायकोस्क्रोप’ ही लेखमाला दिशादर्शक असल्याने वाचनीय ठरली होती, परंतु आताची लेखमाला ही वाचकांनाच चिकित्सा व मीमांसा करण्याचे आवाहन करणारी, विचारांना चालना देणारी असल्यानं आव्हानात्मक ठरणारी आहे व आनंदाची गोष्ट म्हणजे वाचक त्यासाठी तयार आहेत.

– प्रदीप करमरकर, ठाणे</p>

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padsad loksatta readers response letter ysh 95
First published on: 04-02-2023 at 00:07 IST