गिरिजा ओक यांच्या ‘चाहते असेही तसेही’ (७ फेब्रुवारी) या लेखात त्यांना तुळजापूर येथे महिलांच्या कार्यक्रमात आलेला अत्यंत त्रासदायक अनुभव वाचून मन अस्वस्थ झाले. चाहत्यांच्या उत्साहातूनच कधी कधी अनियंत्रित गर्दी, ढकलाढकली आणि असुरक्षित परिस्थिती निर्माण होते. त्या प्रसंगात त्यांना शारीरिक दुखापत होण्याइतकी चेंगराचेंगरी झाली, ही बाब केवळ एका कलाकारापुरती मर्यादित नसून आपल्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या व्यवस्थापनातील गंभीर त्रुटी दाखवते. आज मंदिरांमध्ये, राजकीय कार्यक्रमांत, सांस्कृतिक सोहळ्यांत किंवा सार्वजनिक भेटीत गर्दीचा अतिरेक हा मोठा प्रश्न बनला आहे. कोणतीही व्यक्ती कलाकार, लोकप्रतिनिधी किंवा सामान्य नागरिक गर्दीत सुरक्षित राहील याची जबाबदारी आयोजक आणि प्रशासनाची असते. पण प्रत्यक्षात सुरक्षा व शिस्त यांचा अभाव दिसून येतो. अनियंत्रित गर्दीतून अपघात, जखमा आणि मानसिक भीती निर्माण होते; कधी कधी जीवितहानीही होते. या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक कार्यक्रमांसाठी गर्दी व्यवस्थापनाची सक्तीची मानके ठरवणे, मान्यवर व्यक्तीभोवती किमान सुरक्षित अंतर राखण्याची स्पष्ट नियमावली असणे, आयोजक, स्वयंसेवक व पोलीस यांचे समन्वयित नियोजन बंधनकारक करणे, मंदिर, यात्रा, राजकीय सभा अशा ठिकाणी लोकांनीही संयम आणि शिस्त पाळावे, यासाठी जनजागृती करणे, अशा काही ठोस उपायांची गरज आहे. कला, सार्वजनिक जीवन आणि श्रद्धा या सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षित वातावरण असणे आवश्यक आहे. उत्साह आणि आदर यांच्यातील सीमारेषा पाळणे हे समाज म्हणून आपले कर्तव्य आहे. अशा घटनांवर गंभीर चर्चा होऊन प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, ही अपेक्षा.

– म.न. ढोकळे, डोंबिवली

सामाजिक परिस्थितीवर भाष्य

वंदना कुलकर्णी यांचा ‘गुंतुनी गुंत्यात सार्‍या’ (७ फेब्रुवारी) हा लेख वाचला. भारतीय संस्कृतीतील चार आश्रमावरील कर्तव्यावर आधारित हा लेख अतिशय सुंदर वाटला. आपल्या प्राचीन संस्कृतीत चार आश्रम सांगितले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी ही आश्रम व्यवस्था आवश्यक होती; परंतु आजच्या काळात ही व्यवस्था आपण विसरत गेल्यामुळे आपली कुटुंबव्यवस्था भरकटत चालली आहे. ज्याप्रमाणे भगवतगीतेमध्ये कर्मसंन्यास योग सांगितला आहे. त्याप्रमाणे ज्येष्ठ मंडळींनी ‘सुखदु:खे समेकृत्वा’ असे मानून नवीन पिढीला त्यांचा अवकाश देणे महत्त्वाचे आहे. मोठ्या झाडाच्या सावलीखाली लहान झाडे खुरटी होतात. त्याप्रमाणे त्यांनी सल्लागाराच्या भूमिकेत राहणे आवश्यक आहे, पण आत्ता दोन पिढ्यांमधला वैचारिक संघर्ष वाढला असून कुटुंबे ही रणभूमी बनत आहेत. त्यापेक्षा दोन पिढ्यांनी सुसंवादावर भर देऊन सहजीवन फुलवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हा लेख आजच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करत आहे.

– प्रा. धनंजय वाघदरे, पंढरपूर</strong>

जिद्द आणि चिकाटीची गोष्ट…

‘जीपीएसचा पाया घालणारी गणितज्ञ’ (७ फेब्रुवारी) हा रुचिरा सावंत यांचा लेख वाचला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, कृष्णवर्णीय कुटुंबात जन्मलेल्या डॉ. ग्लॅडिस वेस्ट यांनी लहानपणीच मोठे स्वप्न पाहिले आणि आपल्या चिकाटीच्या, जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर जीपीएस तंत्रज्ञानाचा पाया घातला. जीपीएस प्रणाली शोधल्यावर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. आपण आज घरबसल्या खरेदी करू शकतो, एखाद्याचे लोकेशन शोधू शकतो, एखादा पुरावा म्हणून ‘जिओटॅग फोटो’पाठवू शकतो ते सर्व डॉ. ग्लॅडिस वेस्ट यांच्या या शोधामुळेच. यावरून आपण हे लक्षात घ्यावयास हवे की, एखादे अभ्यासपूर्ण काम करण्यासाठी व त्यात यशस्वी होण्यासाठी आनुवंशिकता, अनुकूल परिस्थिती, कोणी मार्गदर्शक गुरू किंवा पुरुषच असणे जरुरी नाही तर, आपण आपल्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि सर्वांची जबाबदारी म्हणून झपाटलेपणाने काम केल्याने कोणालाही यश मिळणे सहज शक्य आहे. गणितज्ञ डॉ.ग्लॅडिस वेस्ट यांची कहाणी निम्न स्तरातील सर्वांसाठीच अत्यंत प्रेरणादायी आहे. तसेच त्यातून शिक्षणाचेही अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित होते. मोठी स्वप्नं कोणीही पाहू शकतो आणि त्यांचा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पाठलाग करून ते सत्यातही उतरवू शकतो हा संदेश त्यांच्या कार्यप्रणालीतून आणि व्यक्तिमत्त्वातून आपल्याला मिळतो.

– उर्मिला पाटील, कल्याण.