Pahaylach havet author meghna bhuskute NH 10 movie conflict anushaka sharma role chaturang article ysh 95 | Loksatta

पाहायलाच हवेत : ‘जो करना था, सो करना था’

लेखक सुदीप शर्मा आणि दिग्दर्शक नवदीप सिंग यांचा ‘एनएच १०’ हा चित्रपट म्हणजे एका बाजूला मूर्तिमंत पितृसत्ता आणि दुसरीकडे आधुनिक-शहरी-मुक्त स्त्री, मीरा यांच्यामधलं द्वंद्व.

nh10 movie anushka sharma
एनएच१० हा चित्रपट यूटय़ूब आणि अ‍ॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.

मेघना भुस्कुटे

लेखक सुदीप शर्मा आणि दिग्दर्शक नवदीप सिंग यांचा ‘एनएच १०’ हा चित्रपट म्हणजे एका बाजूला मूर्तिमंत पितृसत्ता आणि दुसरीकडे आधुनिक-शहरी-मुक्त स्त्री, मीरा यांच्यामधलं द्वंद्व. आधुनिकतेचा बुरखा पांघरलेल्या आजच्या भारतीय समाजाचं रूप हे स्त्रीद्वेष्टं कसं आहे, ते वेगवेगळय़ा पातळय़ांवर उमटलं जातं. ‘जो करना था, सो करना था..’ म्हणत परंपरेच्या आड येणाऱ्या मुलीची हत्या करायला आईचं मन जराही डळमळत नाही, ही यातली शोकांतिका, मात्र तिला त्याच शब्दांनी मिळणारं प्रत्युत्तर हा खरा न्याय. हे द्वंद्व पाहण्यासाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.

‘एनएच १०’ चित्रपटाच्या चौकटीकडे पाहिलं, तर तो कुठल्याही ‘टेक्स्टबुक’ थरारपटासारखा एक थरारपट आहे. नॅशनल हायवे क्रमांक १० वर तो घडतो, म्हणून त्याचं नाव ‘NH10’ थरारपटाचे सगळे घटक त्यात शिगोशिग आहेत – भीती, उत्कंठा, हिंसा, थरार आणि घटनाक्रमाची चढती गती. पण एखाद्या द्विमित चित्रात दडलेलं एखादं पूर्णत: निराळं त्रिमित चित्र असावं आणि नजरेचा कोन जरा बदलताच बघणाऱ्याला ते दिसू लागावं तसं काही तरी त्याच्या या टेक्स्टबुक चौकटीआड दडलेलं आहे.

या दडलेल्या चित्राचे कानेकोपरे हलके- हलके दृगोच्चर होऊ लागतात आणि एकदा ते दिसू लागलं की त्याची भयावहता मूळ चित्रापेक्षाही अधिक व्यापक, अधिक गडद, अधिक अंगावर येणारी भासू लागते. सिनेमा पाहिला नसेल, तर पुढे वाचण्यापूर्वी सावधान. कारण त्यात काही प्रमाणात तरी कथानक उघड होण्याचा धोका आहे. मीरा आणि अर्जुन (अनुष्का शर्मा आणि नील भूपालम) हे गुरगावमध्ये राहणारं एक तरुण, आधुनिक, उच्च मध्यमवर्गीय जोडपं. रात्रीच्या वेळी कामाला जात असताना मीराच्या गाडीवर काही तरुणांनी हल्ला केल्यामुळे ती अंमळ हबकलेली आहे. तिचा मूड सुधारण्यासाठी, रोमँटिक वीकेंडकरिता म्हणून, ते दोघं शहरापासून जरा लांब निघतात; पण इच्छित स्थळी पोहोचण्यापूर्वीच एका अल्पवयीन जोडप्याच्या ऑनर-किलिंगचे साक्षीदार होतात. तिथून सुरू होतो पलायन, हल्ले, पाठलाग आणि रक्तपात यांनी बरबटलेला प्रवास. हा घटनाक्रम कुठेही कंटाळवाणा होत नाही. वेळोवेळी नायक-नायिकेला जाणवणारा धोका, मिळणारा क्षणिक दिलासा आणि पाठोपाठ होणारा अपेक्षाभंग, योगायोगांची विश्वासार्ह मालिका आणि कथानकात अगदी सुरुवातीपासून पेरलेलं पुढच्या वाताहतीचं सूचन, या सगळय़ामुळे कथाभाग अतिशय उत्कंठावर्धक, श्वास रोखून धरायला लावणारा असा झाला आहे. त्या पातळीवरचं त्याचं निखळ रंजनात्मक मूल्य वादातीत असं आहे.  आपल्याला खरा रस आहे तो त्याच्या पलीकडच्या चित्रात.

 एका बाजूला गुरगावसारख्या अत्याधुनिक शहराचं चकचकीत आधुनिक वास्तव आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्या, उच्चशिक्षित कामकरी स्त्री-पुरुष, मद्यपान आणि धूम्रपानासह परिपूर्ण असलेल्या अपरात्रीच्या ‘रंगीन पाटर्य़ा’,  अत्याधुनिक गाडय़ा, रात्रीच्या वेळी चमचमणारे वेगवान महामार्ग, देखणी-सजवलेली आलिशान घरं; पण या आधुनिक, सुखवस्तू शहरातही एकटी स्त्री सुरक्षित नाही, हे आपल्याला पहिल्या काही दृश्यांतच कळतं. ऐन पार्टीतून मीराला कामासाठी कंपनीत जावं लागणार असतं. कामाला जावं लागल्याबद्दलचा तिचा सूर काहीसा क्षमायाचना करणारा आहे, हे नोंद घेण्याजोगं. ती निघते; पण अपरात्रीच्या सुनसान रस्त्यावर गाडीत ती एकटी स्त्री आहेसं बघून काही मोटरसायकलस्वार आणि त्यांना सामील असलेली दुसरी एक चारचाकी असे मिळून तिला रस्त्यात गाठतात. तिच्या गाडीची काच फोडली जाते. पुढे आणखी काही भलतंसलतं होण्यापूर्वी मीराची सुटका होते, पण या प्रसंगाचा तिला चांगलाच धक्का बसतो. अर्जुनच्या ओळखीनं अगदी उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून या प्रसंगाची तक्रार नोंदवल्यावर अधिकाऱ्यांमार्फत मिळालेलं उत्तर मासलेवाईक आहे. ‘तुम्ही बाईंना इतक्या रात्री एकटं जाऊच का दिलंत?’ अशा अर्जुनला विचारलेल्या प्रश्नापासून ते ‘तुम्ही एक पिस्तूल बरोबर बाळगा कसे!’पर्यंतचे सल्ले त्या दोघांना दिले जातात. वर ‘शहर बढता बच्चा हैं, कूद तो लगाएगाही!’ अशी मल्लिनाथी. दिग्दर्शक यातलं काहीच, कुठल्याही प्रकारे अधोरेखित करत नाही, कशालाच अतिरिक्त फूटेज देत नाही. मीराचा धुमसता संताप आणि अस्वस्थता दाखवून तो पुढे जातो. दुसऱ्या बाजूला हरियाणातल्या खेडय़ामधलं शतकानुशतकांपासून चालत आलेलं वास्तव आहे. तिथवर ‘हायवे’ पोहोचला आहे. ‘मोबाइल’ पोहोचला आहे. तंत्रज्ञानाच्या आणि चंगळवादाच्या रूपातली आधुनिकता पोहोचली आहे, पण त्याआड? वेळोवेळी आपल्याला दिसणारी दृश्यं पलीकडच्या कडेकोट पारंपरिक बैठकीचं भेदक दर्शन घडवत राहतात. मीरा आणि अर्जुन जिथं खायला थांबतात, तिथल्या स्वच्छतागृहाच्या दारावर ‘रां७’ असा शब्द खरवडलेला दिसतो. सिगारेट ओढणं अर्जुनला आवडणार नाही, म्हणून तिथे बसून गुपचूप सिगारेट ओढणारी मीरा निघता-निघता ती शिवी पुसायचा आटोकाट प्रयत्न करते. त्याच ढाब्यावर त्यांना ते अल्पवयीन जोडपं भेटतं. भाऊ, घरातले इतर काके-मामे, भावाचे मित्र मिळून त्या पोरीला आणि तिच्या नवऱ्याला अमानुष मारहाण करत असतात, पण आजूबाजूला उभी राहून मुक्यानं हे बघणारी जनता अक्षरश: पापणीसुद्धा लववत नाही. मध्ये पडण्याचा निष्फळ प्रयत्न करणाऱ्या अर्जुनला एक मुस्काटात दिली जाते आणि त्या जोडप्याला गाडीत भरून ते लोक निघून जातात. तोवर रस्ता विचारायलाही बाहेर कुणाशी संवाद न साधणारा अर्जुन आता त्या जोडप्याच्या मागावर निघतो. आपण एकटे आहोत, आपल्याबरोबर तरुण बायको आहे आणि ते साताठ जण आहेत हे दृष्टिआड करून बायकोच्या विरोधाला न जुमानता. कारण आता त्याचा अहंकार फणा काढून उभा आहे.

इथून पुढचं कांड प्रत्यक्ष अनुभवावं असंच. पण त्यातही अनेक जागा अशा आहेत, जिथे कथानकापलीकडच्या कथानकाचे अस्पष्ट कोपरे आपल्याला दाखवले जातात. मनू आणि बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना करणारा, जातिव्यवस्थेचं प्रच्छन्न समर्थन करणारा, मीराच्या जातीची आणि गोत्राची उठाठेव करणारा, ऑनर-किलिंग पाठीशी घालणारा उच्चवर्णीय पोलीस अधिकारी. घरातल्यांच्या इच्छेविरुद्ध जाणाऱ्या बहिणीला जिवे मारायला जराही न कचरणारा भाऊ. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गावकऱ्यांचं गावातल्या शाळेच्या आवारात सावित्री नामक पारंपरिक-पतिव्रता नायिकेमागे अक्षरश: पागल होऊन नाचणं, त्यात लहान मुलांचाही असलेला सहभाग, सुनेला एवढय़ातेवढय़ा कारणावरून मारहाण करणारी सासू आणि एखादा करमणुकीचा कार्यक्रम बघावा तशी ती मारहाण हसत  ‘एन्जॉय’ करणारा नातू, मीराला मारहाण करतानाही तिची धारदार नजर सहन न होऊन ‘नजर नीची कर..’ अशी तंबी देणारा तरुण, अशी क्षणचित्रं या कथानकादरम्यान दिसत राहतात. म्हटलं, तर ती मुख्य कथानकाचा भाग नाहीत, म्हटलं तर ती अत्यंत आतलेपणानं या सगळय़ा कथानकाचं कारणही आहेत. जोवर स्त्री पारंपरिक व्यवस्थेनं नेमून दिलेल्या चौकटीत राहते आहे, तोवर आणि तोवरच तिचा तथाकथित सन्मान करणारा आणि तिनं एक पाऊल बाहेर टाकताक्षणी तिच्यावर सैतानी वृत्तीनं तुटून पडणारा पितृसत्ताक पुरुषी चेहरा, हे आधुनिकतेचा बुरखा पांघरलेल्या आजच्या भारतीय समाजाचं खरं रूप आहे. त्याचा हा स्त्रीद्वेष्टा चेहरा सिनेमात अक्षरश: दर पावलावर सामोरा येऊन आपल्याला दचकवत राहतो. कधी गावातल्या गर्भपात केंद्राच्या स्वरूपात; कधी ‘मीरा स्त्री असल्यामुळे तिला तिच्या पुरुष बॉसकडून समर्थन मिळतं,’ असा आरोप करायला न कचरणाऱ्या मीराच्या सहकाऱ्याच्या रूपात. मीराच्या नवऱ्यावर हल्ला केल्यानंतर तिथल्या भिंतीवर मीरासाठी लिहून ठेवलेले ‘सांX रांX’ हे शब्दही त्याच द्वेषाचं रूप.

  या द्वेषाचं सर्वाधिक विकृत आणि थिजवून टाकणारं रूप आहे ते पोटच्या लेकीचं ऑनर-किलिंग करवून घेणाऱ्या स्त्री-सरपंचाचं (दीप्ती नवल). पितृसत्ताक व्यवस्थेचा पगडा या स्त्रीवर इतका जबरदस्त पकड बसवून आहे, की पळून जाऊन जातिबाह्य लग्न करणाऱ्या आपल्या एकुलत्या पोरीचा जीव घेणं हे तिला स्वत:चं धर्मकर्तव्य वाटतं. तिचं पोरीवर प्रेम नाही असं नाही. मारलेल्या लेकीच्या खोलीतले कपडे, फोटो, ग्रीटिंग कार्डस, पोस्टर्स नाहीशी करण्यासाठी आवराआवर करताना ती कमालीची विषण्ण आहे. ‘कॉलेजला जायचं खूळ होतं तिच्या डोक्यात..’ असं म्हणत ती लेकीच्या आठवणी काढते आहे. पण तिला ठार करण्याबद्दल तिला जराही पश्चात्ताप नाही. ‘‘जो करना था, सो करना था..’’ असे उद्गार तिच्या तोंडी या सगळय़ा प्रकाराबद्दल येतात. व्यवस्थेनं आपली विकृत पकड किती खोलवर पक्की केलेली असावी, ते दिसून हतबुद्ध व्हायला होतं.

एका बाजूला ही अशी जणू मूर्तिमंत पितृसत्ता. दुसरीकडे आधुनिक-शहरी-मुक्त स्त्री असलेली मीरा. द्वंद्व आहे ते या दोघींमधलं. हा या गोष्टीला असलेला अजून एक निराळा पैलू. जखमी वा असहाय नायिका आणि तिला वाचवण्यासाठी पळापळ वा हाणामाऱ्या करणारा नायक, सूड घेणारा नायक, नायिकेला त्रास देणारा खलनायक – हे कथानकामधले पारंपरिक संकेत ‘एन एच १०’ पूर्णत: उलटे करतो. इथे खलनायक नाही, खलनायिका आहे. जखमी झाला आहे तो नायक आणि त्याच्या बचावासाठी धावते आहे ती नायिका. कथानकातले पुरुष जणू या नायिका-खलनायिकांच्या हातची प्यादी आहेत.  सिनेमामध्ये मीरा वेळोवेळी सिगारेट ओढताना दाखवली आहे. तिच्या सिगारेट ओढण्याला तिच्या नवऱ्याचा सूक्ष्म विरोध आहे. तरीही ती सिगारेट ओढते. तिची सिगारेट हे जणू तिनं उभारलेलं बंड आहे. त्यामुळेच क्लायमॅक्सच्या दृश्यामध्ये तिच्या तोंडी असलेली सिगारेट हे व्यवस्थेला दिलेलं आव्हान असल्यासारखं भासतं.

शेवटाकडे येताना मीराचा चेहरा अधिकाधिक दगडी, कणखर, निश्चयी, वेळी भावहीन होत जातो. तिला आता या व्यवस्थेनं निर्माण केलेला असमतोल मिटवायचा आहे जणू. तिच्या हातचं शस्त्र क्रुद्ध देवीच्या हातातल्या त्रिशूळाची आठवण करून देतं. त्या प्रसंगामधलं पार्श्वसंगीत नि ‘माटी का पलंग’ या गाण्याचे शब्दही देहाच्या नश्वरतेची, निर्मितीसाठी विनाशाच्या अपरिहार्यतेची, जन्ममरणाच्या चक्राची आठवण करून देणारे, दुष्टांच्या निर्दालनासाठी संहार आवश्यक असा पारंपरिक भारतीय संकेत जागवणारे आहेत. या हाताळणीमुळे मीरा जे करते आहे, ते चूक की बरोबर हा संभ्रम मुळातूनच पुसला जातो.

 खलनायिकेच्या तोंडी असलेल्या ‘जो करना था, सो करना था..’ या शब्दांना मीराचं प्रत्युत्तरही तेच आहे – ‘जो करना था, सो करना था.’ व्यवस्थेमधला अन्याय उलटवून लावायचा असेल, तर जे पडेल ते करावं लागेलच, असा निश्चय व्यक्त करणारे, कुठल्याही प्रकारच्या पश्चात्तापाला जागा न देणारे, हिंसेचं थैमान असूनही न्याय झाल्याचं किंचित कडवट समाधान देऊ करणारे – ते सिनेमातले अखेरचे शब्द.

    हे कथानक वाचून राजकुमार रावनं ‘नायकाला कमी महत्त्व असल्यामुळे’ ही भूमिका नाकारली वा हा सिनेमा तयार व्हावा म्हणून अनुष्का शर्मानं पदरचे पैसे प्रथमच चित्रपटनिर्मितीमध्ये घातले.. ही अधिकची माहिती मिळाल्यावर त्यातल्या काव्यात्म न्याय जाणवून किंचित हसू येतं. ‘‘मला हा सिनेमा स्त्रीवादी वगैरे करायचा नव्हता. सिनेमात तसं काही आलं असेलच, तर ते माझ्या नकळत, माझ्या नेणिवेतून आलेलं आहे,’’ असं सिनेमाच्या दिग्दर्शकानं (नवदीप सिंग) एका मुलाखतीत म्हटलं होतं. तसा हेतू नसताना, एखाद्या पुरुष दिग्दर्शकाच्या नेणिवेत हे इतक्या ठळकपणे रुतलं असेल, तर परंपरेची पकड किती निर्णायक, किती पोलादी, किती भयंकर असली पाहिजे, असं मनाशी आल्यावाचून राहत नाही. ती पकड अनुभवण्याकरिता ‘एनएच टेन’ बघण्यासारखा आहे.

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 00:04 IST
Next Story
देहभान : हरवलेला ‘व्हॅलेंटाइन डे’