सुनीती देव
बलात्कार आणि गुन्हेगारांना शिक्षा हा विषय चित्रपटांसाठी नवीन नाही. ‘द अॅक्युज्ड्’ हा चित्रपट इथेच वेगळा ठरतो. बलात्कार करणाऱ्यांबरोबरच त्याला प्रोत्साहन देणारेही तितकेच गुन्हेगार असल्याने त्यांना शिक्षा व्हायला हवी, हे सांगत त्यासाठी लढा उभारणाऱ्या आणि त्यात जिंकणाऱ्या वकील कॅथरिन मर्फी आणि सारा टोबायस यांची ही कथा आहे. बलात्कारित साराची भूमिका साकारणाऱ्या ज्यूडी फॉस्टरला उत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. तिची भूमिका आणि अन्यायाविरुद्धचा सर्वंकष लढा दाखवणारा ‘द अॅक्युज्ड्’ हा चित्रपट पाहायलाच हवा.
ए काने बलात्कार करणे किंवा सामूहिक बलात्कार करणे आणि त्यांचा त्यांना पश्चात्तापही नसणे किंवा तो करून तिचा खून करणे, तिच्या शरीराचे तुकडे करणे, पुरावा नष्ट करून नामानिराळे राहणे.. हे आहे स्त्रीच्या जगण्यातले एक कटू सत्य! याला कोणताही देश, जात, धर्म, वर्ण अपवाद नाहीत. फक्त ‘स्त्री’ असणे एवढेच पुरेसे आहे. आज एकीकडे पुरुषप्रधान व्यवस्थेचे जोरकसपणे समर्थन केले जातेय, तर दुसरीकडे समाजात संवेदनशील व्यक्तीही आहेत, ज्या या वास्तवाने प्रचंड हादरून गेल्या आहेत. आपापल्या माध्यमातून त्या या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करताहेत. कुणी चित्राच्या, कुणी साहित्याच्या, कुणी नाटकाच्या, कुणी सामाजिक चळवळींच्या, तर कुणी चित्रपटांच्या माध्यमातून!
असेच एक संवेदनशील अमेरिकी चित्रपट दिग्दर्शक जोनाथन कॅप्लन. त्यांच्या ‘द अॅक्युज्ड्’ या चित्रपटातून ते सामूहिक अत्याचाराला बळी पाडल्या गेलेल्या तरुणीची, सारा टोबायसची कथा आणि व्यथा सांगताहेत. तीन दशकांपूर्वीचा, १९८८ चा हा चित्रपट आजही तेवढाच प्रस्तुत (रीलेव्हन्ट) आहे. मनात विचार येतो, खरेच समाज म्हणून आपण बदललोय का? अनेक स्त्रिया, स्वत:च्या कर्तृत्वाने वेगवेगळय़ा क्षेत्रांत ठामपणे पाय रोवून उभ्या आहेत ही गोष्ट वेगळी, परंतु सर्वसामान्य स्त्रीचे समाजातील स्थान दुय्यमच आहे. तिच्या शरीरावर नाही, तरी मनावर अनेक प्रकारे बलात्कार होतच असतात.
सारा वेट्रेस आहे. तिचे आईवडील दहा वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले आहेत. सारा एकटीच राहते. ती अविवाहित आहे. तिची राहणी अत्याधुनिक आहे. ती ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहतेय. एक दिवस तिचे तिच्या बॉयफ्रेंडशी कडाक्याचे भांडण होते, ते सांगण्यासाठी ती मैत्रीण सॅलीकडे येते. सॅली, ‘दि मिल’ बारमध्ये वेट्रेस आहे. सॅलीशी गप्पा मारता मारता तेथे असणाऱ्या एकाशी तिची थोडी सलगी होते. हळूहळू तो एकेक पाऊल पुढे जातो. तिला खेळाच्या खोलीत घेऊन जातो. तेथे नेऊन तिची अंतर्वस्त्रे फेडतो. हे सर्व त्याचे मित्र पाहताहेत. त्यातले काही एकेक करून एकमेकांना प्रोत्साहन देत, सारावर बलात्कार करतात. साराचे विव्हळणे, सुटका करून घेण्यासाठी सुरू असलेले निष्फळ प्रयत्न पडद्यावरदेखील पाहवत नाहीत. दरम्यान, त्या बारमध्ये एक मुलगा- केनेथ जॉईस- संगणकावर काम करीत बसलेला असतो. हा सर्व किळसवाणा, हिंस्र प्रकार पाहणे त्याला असह्य होते. तो बाहेर जाऊन ‘बर्चफिल्ड् काऊंटी’ या अत्यावश्यक सेवा केंद्राला फोन करून सर्व हकीकत सांगतो. त्याचा आवाज ध्वनिमुद्रित केला जातो.
इथे सारा सर्व बळ एकवटून, लाथा मारून त्या नराधमांना दूर ढकलते. अर्धनग्न अवस्थेत पळत पळत रस्त्यावर येते. एका वाहनातून तिला दवाखान्यात दाखल केले जाते. पण दाखल करून घेण्यापूर्वीच तिच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू होतो. तोही ऐकवत नाही. तुझी मासिक पाळी केव्हा झाली? शेवटचा शरीरसंबंध केव्हा झाला? गर्भनिरोधक म्हणून काय वापरतेस? गुप्तरोग आहे का? कुठे कुठे जखमा झाल्यात ते गाऊन वर करून दाखव.. सारे प्रश्न बाईलाच. बलात्कार करणाऱ्या पुरुषाला कधी जाब विचारणारे प्रश्न विचारले जातात का? की त्याला तो ‘पुरुष’ आहे म्हणून बलात्कार करण्याचा अलिखित परवानाच बहाल केलेला आहे समाजव्यवस्थेने?.. या सामूहिक बलात्काराच्या हादरवून टाकणाऱ्या अनुभवातून गेल्यावर सारा मानसिकदृष्टय़ा विकल होते. तिला आईची तीव्रतेने आठवण येते. म्हणून आईला फोन करते. फार अल्प काळचे हे संभाषण आहे, परंतु त्यातून सारा व तिची आई यांच्या संबंधावर प्रकाश पडतो. ते फार तणावपूर्ण नसले, तरी जिव्हाळय़ाचेही नाहीत, हे त्यातून दिसते.
सारा – हॅलो
आई – खूप उशिरा फोन केलास?
सारा – हो, तुला हॅलो करावेसे वाटले.
आई – नोकरी गेली का? पैशांसाठी केलायस का फोन? अडचणीत आहेस का?
सारा – नाही. नाही. गाडी घेऊन तुझ्याकडे एक-दोन आठवडे राहायला येईन म्हणते.
आई – मी फ्लोरिडाला जातेय.
सारा – ओके. एन्जॉय.
अर्थातच आधारासाठी तिच्याकडे मायेची कूसही नाही. हा लढा आपला एकटीचा आहे, याची तिला त्याच क्षणी कल्पना येते. साराची केस लढवण्यासाठी सरकारतर्फे वकील कॅथरिन मर्फी हिची नेमणूक केली जाते. बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा झालेली आहे. मात्र सारा सरकारची भरवशाची साक्षीदार ठरू शकणार नाही, असे मर्फी सांगते. त्यावर सारा तिच्यावर प्रचंड वैतागलेली असते. मर्फी तिची माफी मागते. बलात्काराला प्रोत्साहन देणाऱ्यांना १० हजार अमेरिकी डॉलरच्या जामिनावर मोकळे सोडलेले असते. मर्फीला त्यांनाही शिक्षा व्हावी असे वाटते आणि ती तो लढा हाती घेते. हा या चित्रपटाचा वेगळेपणा. बलात्कार करणाऱ्यांइतकेच त्याला प्रोत्साहन देणारेही तेवढेच दोषी असल्याने त्यांनाही शिक्षा व्हायला हवी, यासाठी कॅथरिन शेवटपर्यंत लढते आणि न्याय मिळवते.
वास्तविक, ज्या रात्री सारावर सामूहिक बलात्कार होतो, त्या वेळी ती दारू प्यायलेली होती, तिने ड्रग्जचा एखाद्दुसरा सुट्टा मारला होता, बलात्कार होण्याआधी त्यांच्याबरोबर थट्टामस्करी केली होती, गेमरूममध्ये गेम खेळली होती, त्यांपैकी एकाला चुंबन घेऊ दिले होते, सेक्सी कपडे घातले होते.. खरे तर हे सर्व मुद्दे मर्फीच्या विरुद्ध बचाव पक्षाने लावून धरलेले असतात. तरीही मर्फी दिवसरात्र अभ्यास करून या केसमध्ये साराला न्याय कसा मिळेल याचा विचार करीत असते. ती आपल्या अधिकाऱ्याला स्पष्टपणे सांगते ‘I owe her’. एक ‘स्त्री वकील’ म्हणून एका ‘स्त्री अशिलाला’ आपले सर्व कसब पणाला लावून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते. मर्फीला एक महत्त्वाचा मुद्दा तसेच पुरावा सापडतो. बलात्काराला प्रोत्साहन देणे हाही शिक्षापात्र गुन्हा आहे आणि दुसरे म्हणजे केनेथचा ध्वनिमुद्रित आवाजही तिला मिळतो.
मर्फी साराची मैत्रीण सॅलीची मुलाखत घेते. तिला या घटनेविषयी विचारते. सॅली पूर्ण सहकार्य करते. ओळख परेडला मर्फीबरोबर जाते, एक-दोन गुन्हेगारांना ओळखते. प्रोत्साहन देणाऱ्यांपैकी एकाच्या हातावर विंचूसदृश टॅटू होता हेही सांगते. दुसरी मुलाखत घेते ती केनेथची. व्हिडीओ मशीनवरून त्याचे नाव मिळवते, त्याचा फोटो पाहते, त्याचा शोध घेत त्याच्या कॉलेजला पोहोचते. त्याला साक्ष देण्याची विनंती करते. प्रथम ‘माझा काय संबंध?’ म्हणून केनेथ हात झटकतो. मर्फी त्याला त्याचा ध्वनिमुद्रित आवाज ऐकवते. तो साक्ष देण्यास तयार होतो. न्याय मिळण्याच्या संदर्भात, इतर काही घटकांपैकी, ही साक्ष एक महत्त्वाचा घटक ठरते.
मुख्य म्हणजे मर्फी खुद्द साराला न्यायालयात साक्ष देण्यास सांगते. साराला न्यायालयात जे संभाव्य प्रश्न विचारले जाऊ शकतील, त्यांची रंगीत तालीम म्हणून, स्वत:च त्यांची सरबत्ती सारावर करते. ‘तू दारू पितेस का? फ्लर्ट करतेस का? अंतर्वस्त्रे घातली होतीस का? कितीदा गर्भपात झाला? एकाच वेळी अनेक पुरुषांबरोबर झोपतेस का? सेक्सी, झिरझिरीत कपडे घातले होतेस का?.. इत्यादी इत्यादी. एका क्षणी सारा खवळून उठते. या सर्व गोष्टींचा सामूहिक बलात्काराशी काय संबंध आहे? ‘‘माझ्या शरीरावर माझा आणि फक्त माझाच अधिकार आहे. मी ज्या तऱ्हेने राहते त्याचा अर्थ हा नव्हे की मी बलात्कारासाठी उपलब्ध आहे.’’ (इथे २०१६ मधील ‘पिंक’ या हिंदी चित्रपटाची आठवण येते.)
साराची न्यायालयात साक्ष देतानाची जी अवस्था आहे ती आपल्याला एक प्रेक्षक म्हणून अस्वस्थ करते. केनेथ साक्ष देत असताना फ्लॅशबॅकने आपल्याला ते सर्व प्रसंग पडद्यावर दिसत असतात. शेवटी जनतादरबारी दोन्ही पक्षांचे वकील अपील करतात. नंतर ज्युरी निर्णय देतात. मर्फी केस जिंकते. आरोपींना शिक्षा होते. केस जिंकल्यानंतर ज्या नजरेने मर्फी व सारा एकमेकींकडे पाहतात ते पाहून आपलेही डोळे ओलावतात.
वकील म्हणून साराची केस घेणे, ते ती जिंकण्याच्याच जिद्दीने लढणे, या प्रवासात मर्फी आणि सारा यांच्यातील नाते केवळ वकील आणि अशील न राहता हळूहळू मैत्रीत रूपांतरित झालेले असते. न्यायालयातून बाहेर पडल्यावर मर्फी व सारा या दोघींनाही पत्रकार प्रश्न विचारून भंडावून सोडतात. साराला सर्व ताणातून मोकळे होऊन, घरी जाऊन सॅडीशी- तिच्या कुत्र्याशी खेळायचे असते.
साराला न्याय तरी मिळाला. प्रत्यक्षात तोही अनेकींना मिळत नाही. मनात सतत एक प्रश्न येतो, की बलात्काराच्या समस्येवर उत्तर आहे का? जयवंत दळवी यांच्या ‘पुरुष’ नाटकात अंबू तिच्यावर बलात्कार करणाऱ्या गुलाबरावाचा लिंगविच्छेद करते. तर काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक तरुण चोप्रा यांच्या ‘W’ चित्रपटात तिघी मैत्रिणी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला म्हणून ‘त्या’ तिघांना तशाच प्रकारची शिक्षा करतात, परंतु ही या समस्येवरील उत्तरे नव्हेत, असे मला वाटते. माझी एक मैत्रीण नेहमी म्हणायची, ‘पुरुषांच्या दृष्टीने स्त्री असण्याचा अर्थ तिच्या दोन मांडय़ांमध्ये आहे. पुरुषांची ‘ही’ वृत्ती जोपर्यंत बदलत नाही, त्यांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत ही समस्या या न त्या स्वरूपात पुढे येणारच.’ मानसिकता बदलण्याचे प्रयत्न नक्कीच सुरू आहेत. काही पुरुष कार्यकर्ते सामाजिक चळवळींच्या माध्यमातून ते करताहेत. स्त्रियांनीदेखील स्वत:ची मानसिकता बदलायला हवी. साराप्रमाणे बलात्काराच्या घटनेमुळे खचून न जाता नव्याने जीवन जगण्याची उमेद बाळगायला हवी.
‘द अॅक्युज्ड्’ या चित्रपटात बलात्कारासारख्या संवेदनशील विषयाची अतिशय काळजीपूर्वक हाताळणी केली आहे. हळूहळू या घटनेतील क्रौर्य प्रेक्षकांना जाणवत राहते. नायिकेच्या भूमिकेत असणाऱ्या ज्यूडी फॉस्टर (सारा टोबायस) हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आणि ३९ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘गोल्डन बेअर’साठी नामांकनही मिळाले. केली मॅकगिलिस (कॅथरिन मर्फी) व बर्नी कूलसन (केनेथ) या कलाकारांनीही आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. मला हा चित्रपट ‘जागतिक चित्रपट आणू या मराठीत’ या उपक्रमांतर्गत समाज ब्रम्हे ग्रंथालयाने पाठवलेल्या लिंकवर पाहता आला. कुणाला पाहावयाचा असल्यास brahmegranthalaya@gmail.com यावर ई-मेल पाठवून संपर्क करावा. ओटीटीवरही हा चित्रपट उपलब्ध आहे.