गेले लिहायचे राहून.. | Painter Gopalrao Deoskar Bapu memorial day canvas Senior artist Vijayabai Mehta amy 95 | Loksatta

गेले लिहायचे राहून..

माणसं माणसांना शिकवतात, बिघडवतात आणि घडवतातही. कायम रंगरेषांच्या वळणांमध्ये राहाणाऱ्या चित्रकार गोपाळराव देऊस्करांकडून मी महत्वाच्या गोष्टी शिकले.

गेले लिहायचे राहून..

मृदुला भाटकर

माणसं माणसांना शिकवतात, बिघडवतात आणि घडवतातही. कायम रंगरेषांच्या वळणांमध्ये राहाणाऱ्या चित्रकार गोपाळराव देऊस्करांकडून मी महत्वाच्या गोष्टी शिकले. त्या बापूंबरोबरच्या मैत्राच्या आठवणी, त्यांच्या नुकत्याच झालेल्या स्मृतीदिनाच्या निमित्तानं..

A lawyer who knows only law is a
mason, but who knows literature is
an artist.
असं म्हटलं जातं.

पारिजातकाच्या झाडाखालून जाताना त्या फुलांचा सुवास येतोच. तो बरोबर घेऊनच आपण पुढे जातो. त्या सुवासाचाही एक संस्कार आपल्या मानसिकतेवर होतो. सर्वार्थानं समृद्ध करणारे जाणीव आणि नेणिवेचे अनेक क्षण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतात. न्यायाधीशाचं माणूसपण कोणत्या मुशीतून घडलेलं आहे याचा न्यायदानाचं काम करताना परिणाम होत असतो. आयुष्य नेहमी सरळ रेषेत नसतं. समाजाचा कॅनव्हास जरी एकच असला, तरी वेगवेगळय़ा रंगांनी, चित्रविचित्र रेषांनी प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य रेखाटलं जातं. त्याची ओळख मला प्रथम करून दिली ती बापूंनी, म्हणजेच चित्रकार गोपाळराव देऊस्करांनी. म्हणून त्यांच्याविषयी थोडंसं.. त्यांचा ११ सप्टेंबर हा स्मृतिदिन, त्यानिमित्तानं..

१९७४ च्या मे महिन्यात ज्येष्ठ रंगकर्मी विजयाबाई मेहता यांच्या एक महिन्याच्या नाटय़ प्रशिक्षणासाठी मी रवींद्र नाटय़मंदिरात दाखल झाले होते. तिथे माझी जुईलीशी ओळख झाली. त्याच दिवशी मला ‘ती गोपाळराव देऊस्करांची बायको आहे आणि त्यांच्या वयात सुमारे पस्तीसएक वर्षांचं अंतर आहे. ते खूप मोठे चित्रकार आहेत,’ ही माहितीही तातडीनं बाकीच्या लोकांकडून पुरवण्यात आली. बापूंबद्दल मग तिच्याचकडून ऐकलं. तिच्या वरळीच्या घरी बापूंनी काढलेली दोन-तीन पोट्रेट्स पाहिली. मला आठवतं, ते हातात फूल घेतलेलं रजनी दांडेकरांचं समोरच ठेवलेलं मोहक पोट्रेट. तेव्हा मला अशा चित्रांना ‘पोट्रेट’ म्हणतात हे पहिल्यांदाच कळलं होतं. बापू खूप कडक आहेत, विक्षिप्त आहेत आणि वेळेबाबत वक्तशीर, वगैरे वगैरे ऐकलं होतंच इतरांकडून. बापू पुण्याला राहात होते. मे १९७५ मध्ये मी पुण्याला राहायला गेले आणि फग्र्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. एकदा जुईली मुंबईहून पुण्याला आलेली होती. मला म्हणाली, ‘‘घरी ये. ‘स्नेहबंध’ मध्ये, भांडारकर रोड’. ‘पवार क्वार्ट्स’ नावाची दोन-तीन मजली बििल्डग. मोठय़ा अक्षरात नाव लिहिलेलं आहे. त्याच्या समोरची छोटी गल्ली. तिथेच डावीकडे ‘स्नेहबंध’ सोसायटी आहे. ४ वाजता ये. तेव्हा बापू मोकळे असतील. पण बरोबर ४ वाजता ये!’’ (खरंतर या घटनेचा उल्लेख आधीच्या एका लेखात आलेला आहे. पण इथे पुनरावृत्ती गरजेची वाटत असल्यानं मी तो प्रसंग थोडक्यात लिहीत आहे.) मी राहात होते क्वीन्स गार्डन, कॅम्पमध्ये. सायकल काढली आणि निघाले. भांडारकर रोडवर आले, पण ‘पवार क्वार्टर्स’ दिसेना. परत त्या भागात तीन-चार वेळा खाली-वर चकरा मारल्या, साडेचार वाजले. त्याच वेळेस एका बाईनं एका भिंतीवर वाळत घातलेली साडी काढली आणि त्या साडीखाली अक्षरं दिसली ‘पवार क्वार्टर्स’. मी तातडीनं सायकल ‘स्नेहबंध’कडे वळवली. त्यांच्या घरात गेले, तर पावणेपाच वाजले होते. सोनेरी काडीच्या चष्म्याआडून माझ्याकडे तीक्ष्णपणे पाहाणारे बापू. समोर एक घडय़ाळ, चहाचा सरंजाम, विडय़ांचं बंडल, काडेपेटी, वही-पेन. पिवळा टी-शर्ट आणि अर्धी विजार घालून बसले होते. ‘‘सॉरी, सॉरी’’ करत मी त्यांना उशिराचं कारण सांगितलं. त्यावर त्यांना हसू आवरेना! झालेला उशीर त्यामध्ये उडून गेला. ते म्हणाले, ‘‘तू झपाटा आहेस.’’ आणि मग त्यांच्या लेखी माझं नावही ‘झपाटा’ झालं. त्यानंतर मी बापूंना अनेक वर्ष भेटत गेले.

बापू मला भेटले तेव्हा ते सुमारे ६५-६६ वर्षांचे असतील. मी १८ वर्षांची होते. चित्र, चित्रकला, रंग, ब्रश यात मला काडीचा रस नव्हता किंवा त्याचा काही गंधही नव्हता. शाळेत मला चित्रकलेत कायम काठावर पस्तीस गुण देऊन पास करायचे. तरीही बापूंची आणि माझी गट्टी जमली. आम्ही वेगवेगळय़ा विषयांवर बोलायचो. अर्थात त्यात चित्र हा विषय असायचाच. मला त्यांच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी तडमडायची परवानगी होती. सुरूवातीला दुर्दैवानं मला ते किती मोठय़ा दर्जाचे, श्रेष्ठ चित्रकार आहेत याची जाणीव नव्हती. त्यांना मी पाहिलं, ते ‘टिळक स्मारक’मधलं खालच्या दालनातलं भलंमोठं भित्तीचित्र (म्यूरल) चितारताना. श्रीकांत देऊस्कर- त्यांचा पुतण्या मॉडेल असायचा. तो टिळक, मजूर, शेतकरी वगैरे कुणीतरी व्हायचा. बापूंच्या रंगरेषांचं काम मी बसून पाहात असे. बापूंना मी विचारलं, ‘‘हे असे सगळे पिवळे, मंद रंग तुम्ही का वापरता?’’ त्यांनी सांगितलं, की ‘‘हे सगळे Earthen Colours आहेत. अजिंठय़ातली चित्रं पाहिली आहेसच ना!’’ त्यात वापरलेला पिवळा रंग हा त्यांचा आवडता होता. तसाच रस्ट, ऑरेंजही.. त्यांचे टी शर्टसुद्धा त्याच रंगाचे- रस्ट, पिवळे. त्यावर सोनेरी काडय़ांचा चष्मा घालून मध्येच अर्धी विडी ओढणारे, भेदक दृष्टीनं पाहाणारे, ओठांची घट्ट मुरड असणारे बापू स्वत:च माझ्या दृष्टीनं एक पोट्रेट होते.

बापू वयाच्या अगदी तिसऱ्या-चौथ्या वर्षी आईवडिलांविना पोरके झाले. त्यांना सांभाळलं ते भालचंद्र पेंढारकरांच्या वडिलांनी. त्या आश्रितपणाच्या दु:खाची सावली त्यांच्या आयुष्यभर पसरली होती. त्यांच्या विक्षिप्त, तऱ्हेवाईक, कडवट स्वभावामागे पोरक्या लहान वयाचे दुखरे व्रण उघडेच राहिले होते. ते मला त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगत. ते शाळेत चौथी-पाचवीत होते. त्या वेळी वर्गात गुरुजी नसताना त्यांनी फळय़ाजवळ जाऊन एक वर्तुळ काढलं. मग त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, पण त्यांनी तशी पाच-सहा वर्तुळं काढली. ती सगळी एकाच आकाराची होती. तेवढय़ात गुरुजी आले. बापू खडू टाकून जागेवर पळाले. गुरुजींनी फळय़ाकडे पाहिलं आणि विचारलं, ‘‘हे गोल कोणी काढले?’’ मुलांनी सांगितलं, की गोपाळनं. बापूंना वाटलं, आता बत्ती मिळणार! पण गुरुजींनी त्यांना फळय़ाजवळ बोलावलं, खडू दिला आणि सांगितलं, ‘‘असेच दोन-चार गोळे काढ.’’ बापूंनी त्यांच्यासमोर तशीच वर्तुळं काढली. तीही सारखीच. मग गुरुजींनी कंपास घेतला. मधे एक टोक घेऊन एका गोळय़ाभोवती गिरवलं. दुसऱ्या-तिसऱ्या-चौथ्या.. आणि काय आश्चर्य! सगळी वर्तुळं सारखीच होती. गुरुजी गोपाळला खांद्यावर घेऊन हेडगुरुजींकडे गेले. मग हेडगुरुजी, गुरुजी आणि गोपाळ अशी वरात प्रत्येक वर्गात फिरली. गोपाळनी तीन-चार गोळे काढायचे आणि गुरुजींनी कंपासनं ते मोजून सारखेच आहेत हे तपासायचं! गोपाळला तेव्हा कळलं की त्याच्या हातात काय जादू आहे ते. बापू ‘स्नेहबंध’मधून नंतर फग्र्युसन कॉलेजमध्ये राहायला गेले. तिथली पेंटिग्ज त्यांना बनवायची होती. मी त्यांना मांजरी काढून दाखवत असे. तेवढंच यायचं मला. मला त्यांनी सांगितलं होतं, की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस ते जर्मनीला गेले होते. त्यांना तिथे एके ठिकाणी खूप मोठी सभा दिसली. ते तिकडे गेले, तर सैनिकी गणवेषातला एक माणूस अतिशय आक्रमकपणे भाषण देत होता. तो चक्क गोबेल्स होता! त्यानंतर काही दिवस ‘गोबेल्स ऐकलेला माणूस’ असं विशेषण मी त्यांना लावत असे.

बापू म्हणत, ‘‘माणसाच्या शरीराचं चित्र काढतांना- विशेषत: थोबाड काढताना सर्वात भान ठेवायचं ते प्रमाणांचं, प्रपोर्शनचं. नाक, डोळे, हनुवटी या सर्वामध्ये चित्रकाराला कळायला हवी ती प्रमाणबद्धता.’’ चित्रामध्ये प्रमाणबद्धतेला कसोशीनं पाळणाऱ्या बापूंच्या आयुष्याच्या रेषा मात्र वेडय़ावाकडय़ा उमटल्या होत्या. बापू कधी कधी अव्र्याच्य भाषेत दुसऱ्या माणसाला संबोधत. तिरसट, अतीहिशेबी, भयंकर कंजूष वागत. पण मी त्यांच्या वागण्याचा अर्थ त्याही वयात समजू शकत होते आणि त्यामुळे आमची मैत्री एका निव्र्याज समंजसपणावर उभी होती.

मला कदाचित ते अजिबात आवडले नसते, पण त्याचवेळी मला माझ्या मित्रानं- विवेक लागूनं एक पुस्तक दिलं होतं. प्रसिद्ध चित्रकार Paul Gauguin यांच्या जीवनावर आधारलेलं Somerset Maugham लिखित The Moon & Sixpencel मी ते वाचलं आणि विनोदाचा भाग म्हणजे मला त्यातलं ‘I’ चं पात्र म्हणजे मी Charles Strickland म्हणजे बापू आणि Mrs. Strickland म्हणजे जुईली असंच काहीसं वाटत राहिलं. १७ वर्षांचा संसार झाल्यावर एकाएकी शांतपणे बायको आणि दोन मुलांना सोडून पॅरीसमध्ये आणि मग ताहिती बेटावर निघून जाणारा Mr. Strickland. ‘का सोडून गेलास बायको मुलांना?’ या कुटुंबियांच्या प्रश्नावर want to paint असं थंड उत्तर देणारा Strickland त्याच्या जगण्याच्या उद्देशाला आतून होकार देणारा वाटला. मला तो Strickland समजला तो बापूंमुळे अन् बापू उमगले ते Maugham च्या Strickland मुळे. पुस्तकं नेहमीच माणसं वाचायला मदत करतात अन् माणसं वाचता वाचता पुस्तकातले अर्थ उलगडतात. यातली गंमत पण पहिल्यांदा त्या वेळी कळली. सगळे अस्पष्ट रंग एकत्र येऊन त्यांचं स्पष्ट इंद्रधनुष्य दिसावं तसं.

बापूंना कफ व्हायचा आणि मलाही. ‘ब्रॉन्कायटिस.’ तेव्हा आपल्या छातीला एक झिप हवी, ती ओढून फुफ्फुसं बाहेर काढून ती धुवून, वाळवून परत घालता यायला हवीत, या माझ्या कल्पनेवर ते खूप हसायचे. बापूंनी मला १५ वर्ष जुनं गाईचं औषधी तूप कफ झाल्यावर पाठीला लावायला दिलं होतं. ते रिकाम्या छोटय़ा ‘स्नो’च्या बाटलीत भरून ठेवलं होतं. वर्षभरानं ब्रॉन्कायटिस झाल्यावर मला त्याची आठवण झाली, तर बाटली रिकामी! मी कामवाल्या लीलाला विचारलं, तर ती म्हणाली, की ते ‘फ्लॉली’ होतं. मी लावत नाही म्हणून तिनं ‘फ्लॉली’ लावून हळूहळू संपवलं होतं! त्या अगम्य संवादातून तिला अपेक्षित असलेलं ‘फ्लॉली’ म्हणजे ‘फेअर अँड लव्हली क्रीम’ हे मला नंतर उमगलं. त्यानंतर ‘फ्लॉली’ हा आमचा हसण्याचा शब्द झाला.
मी आणि बापू, आम्ही वाचलेल्या पुस्तकांवर बोलायचो. त्यांना नवकाव्य वगैरे अजिबात आवडायचं नाही. त्यांना स्त्रीचा सुंदर, पण सात्विक चेहरा आवडत असे. त्यांना एखादा माणूस आवडला नाही की ते स्पष्टपणे सांगत, की हा माणूस इथे येता कामा नये. गंमतीचा भाग म्हणजे माझ्या वडिलांची आणि बापूंचीही मैत्री होती आणि दोघांच्याही एकमेकांबरोबरच्या भेटी स्नेहमय, आदरपूर्ण असत. रमेशला त्यांनी माझा ‘बॉयफ्रेंड’ म्हणून ‘पास’ केलं होतं.
विश्राम बेडेकरांच्या ‘रणांगण’ आणि ‘हार्टा’बद्दल आम्ही बोलत होतो. मी बापूंना त्यांचा स्वभाव आत्मकेंद्री आहे, असं सांगून विचारलं, की ‘‘तुम्ही कधी उधळून प्रेम केलंत का?’’ ‘‘हो, केलंय. अगदी मनापासून. एकदाच. माझ्या पहिल्या बायकोवर. पण ती माझ्या मित्राच्या प्रेमात पडली. मला सोडून गेली. मी घटस्फोट दिला विनातक्रार.’’

१९७८ मध्ये मी लग्न केलं. त्यानंतर तीन वर्षांनी मी वकील झाले आणि वकिली सुरू केली. जुईली बरोबरच्या १७ वर्षांच्या संसारानंतर त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. माझी पहिली घटस्फोटाची केस होती ‘बापू विरुद्ध जुईली’. संमतीनंच घटस्फोट होता. त्यामुळे मी ते पीटिशन पुण्याच्या दिवाणी न्यायालयात दाखल केलं. चार-पाच दिवसांनी बापूंच्या केसचा नंबर घ्यायचा म्हणून पाहायला गेले, तर केसला नंबर दिलेला नव्हता. केस ऑब्जेक्शनवर पडून होती. मी तिथल्या भाऊसाहेबांकडे चौकशी केली. ते म्हणाले, ‘‘अहो, तुम्ही वय चुकीचं घातलं आहे. मग नंबर कसा देणार? ते बरोबर करा.’’ बापूंचं वय होतं सुमारे ७३ वर्ष आणि जुईली ३७ वर्षांची होती. मला ७३ हा आकडा दाखवून भाऊसाहेब म्हणाले, ‘‘आकडा उलटा लिहिलात. ३७ लिहा.’’ मी म्हटलं, ‘‘नाही, हे असंच बरोबर आहे. नंबर द्या!’’ एकूण काय तर रुढार्थानं जे उलटं असतं, दिसतं त्या पलिकडे त्या रंगरेषांच्या कलंदराचं होतं. त्यांनी काढलेली पार्लमेंटमध्ये असलेली पेंटिंग्ज, बालगंधर्व रंगमंदिरातले बालगंधर्वाची ‘खडा मारायचा झाला तर’ या ‘स्वयंवर’ मधील रुक्मिणीचं आणि हाताची घडी घातलेले अशी दोन पोट्रेट्स. इंग्लंडच्या राणीनं रॉयल म्युझियममध्ये ठेवलेली त्यांची पेंटिंग्ज, टिळक स्मारकमधलं म्यूरल, डॉ. राजेंद्रप्रसादांचं, ग्वाल्हेरच्या राणीचं पोट्रेट, खूप सारी पेंटिंग्ज मागे ठेवून बापू पलीकडे निघून गेले. पण मला ते स्पष्ट दिसतात, आठवतात. त्यांनी मला सांगितलं होतं, ‘‘जोपर्यंत दृष्टी स्वच्छ आणि हात स्थिर आहेत तोपर्यंत मी पोट्रेट करत राहीन. एक लक्षात ठेव, दोन अक्षरी मंत्र आहे- ‘हार्ड वर्क’. तुम्ही कितीही बुद्धिमान असा, पण हार्ड वर्कला पर्याय नाही.’’ मला ते कायम स्मरणात आहे.

कधी संध्याकाळी मी जात असे, तेव्हा बापू ‘ज्योतीत्राटक’ करत. एकाग्रता वाढवण्यासाठी, निरांजनाच्या ज्योतीसमोर बसून. ते मी त्यांच्याकडून शिकले. अशा खूप आठवणी आणि तो ज्योतीचा ऑरेंज पिवळा रंगही..
chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
संशोधिका : विषाणूंच्या अभ्यासाचं रंजक विश्व

संबंधित बातम्या

संशोधिका : मज्जासंस्थेचं चिकित्सक संशोधन!
गेले लिहायचे राहून.. : कायदे जिंकलेले, कायदे हरलेले!
जगण्याची ‘आत्मचरित्री’ ओळख!
संशोधिका : शरीराच्या अज्ञात जगातला प्रवेश!
समष्टी समज : ‘कॅन यू बी रीअल?..’

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“सोलापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल, तर आम्हाला…”, संजय राऊतांचे मुख्यमंत्री बोम्मईंना प्रत्युत्तर
“शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे”, म्हणत उदयनराजे भोसलेंची मोठी घोषणा; म्हणाले, “आझाद मैदानात…!”
मेट्रोचा पहिला टप्पा मार्चअखेरपर्यंत पूर्ण; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
Car Tips: अपघातानंतर वाहनाला आग लागल्यास ‘या’ गोष्टींमुळे वाचतील तुमचे प्राण; जाणून घ्या प्रवास करताना काय काळजी घ्यावी
रशियातही ‘पुष्पा’ फिव्हर, ‘सामी सामी’ गाण्यावर रशियन महिला थिरकल्या, चिमुकल्यांचाही भन्नाट डान्स, Video होतोय तुफान Viral