आई-बाबांनी आमचं मूळचं नाव मयेकर हे बदललं नाही, बाबा म्हणायचे, ‘तुमच्या जन्मदात्या आई-बाबांची ती आठवण आहे आणि त्यांच्या नावानं तुमचं अस्तित्व असावं.’ असे हे माझे आई-बाबा, ना रक्ताचं नातं ना कसलंच पण एका अनोळखी मुलीला त्यांनी वेगळी ओळख दिली, असेही लोक आज समाजात आहेत ज्यांच्यामुळे अनेकांना आई-वडिलांचं प्रेम मिळतं.

माझे लेख वाचून अमिता मयेकर संपर्कात आली आणि तिची व तिच्या पालकांची जगावेगळी कहाणी तिने मला सांगितली. अमिताची कथा ऐकून माझी खात्री झाली, या जगात अजून अशीही कुटुंबं आहेत, ज्यांनी स्वत:ची मुलं किंवा दत्तक विधीतून आलेली मुलं या पलीकडे जाऊन समाजातील अगदी गरजू मुलांसाठी पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि आनंदाने उपभोगलं आहे. अशाच एका पालकांची ही कथा..

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!

अमिता म्हणाली, ‘‘माझं पूर्ण नाव, अमिता विजय मयेकर. आम्ही दोघी बहिणी आणि आईबाबा रत्नागिरीजवळ गावात राहायचो. बाबा एसटीमधे वाहनचालक होते, मी सहा वर्षांची असताना ते वारले, त्यांच्या आठवणी फारशा नाहीत. परंतु मी आठ वर्षांची असताना आईही गेली ते मात्र सगळं स्पष्ट आठवतं.

आई कामावरून आली आणि म्हणाली, ‘अमिता, मला बरं वाटत नाही, माझ्यासोबत डॉक्टरांकडे चल.’ आम्ही दोघी हॉस्पिटलमधे गेलो, तिथं तिला दाखल व्हायला सांगितलं, परंतु एकही रूम रिकामी नसल्यामुळं तिच्यासाठी व्हरांडय़ामध्ये एक पलंग टाकला गेला. आईनं बाहेरून एक बिस्कीटचा पुडा आणून मला खायला सांगितलं. मला एकटीला परत जाणं शक्य नव्हतं, त्यामुळं मी तिथंच बिस्कीट खाऊन आईच्या पायाशी झोपले. सकाळी चार-पाचच्या सुमारास आत्या, काका आणि काही शेजारी आले, त्यांनी मला हलवून उठवलं. एवढच म्हणाले, ‘आईला नमस्कार कर आणि बाहेर जा.’ काय सुरुआहे, काहीच कळलं नाही, सांगितल्याप्रमाणे नमस्कार केला आणि बाहेर शेजारच्या काकू आणि माझी लहान बहीण श्रद्धा रिक्षात बसलेल्या होत्या तिथं जाऊन बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आत्याच्या घरी आलो. सगळे भेटायला येणारे म्हणायचे, ‘तुझी आई देवाघरी गेली.’ आम्हा दोघी बहिणींना मात्र काहीच उमगत नव्हतं. एवढचं जाणवलं, आई कायमची गेली.

आत्यानं लग्न केलं नव्हतं, ती तिच्या दोघा भावांचा सांभाळ करायची. या चार भावंडांमध्ये माझ्या बाबांचं तेवढं लग्न झालेलं. धुणं-भांडय़ाची काम करून ती घर चालवायची. त्याही परिस्थितीमधे तिनं आम्हाला गावातल्या शाळेत पाठवायला सुरुवात केली. आत्या ज्या भाडय़ाच्या घरात राहायची तिथंच वरती एक शिक्षिका राहायच्या, नलिनी नागवेकर. त्या माझ्या शाळेत निरीक्षणासाठी यायच्या. बाईंनी आमची शाळेत चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं, अमिता आणि श्रद्धा यांना आई-बाबा नाहीत. आत्या घरकाम करून दोन भावांसोबत या दोघींचा सांभाळ करते. बाई माझ्या आत्याला भेटायला आल्या आणि म्हणाल्या, ‘माझा भाऊ, हरिश्चंद्र नागवेकर व त्याची पत्नी सुषमा नागवेकर दोघंही ठाण्यात राहतात. त्यांना स्वत:चं मूल नाही; परंतु त्यांनी आतापर्यंत दोन गरजू मुलींना आपलं केलं. तुमची इच्छा असेल तर मी त्याच्याशी बोलते. अमिता व श्रद्धा त्याच्याकडं गेल्या तर त्यांचं आयुष्य मार्गी लागेल.’ बाईंना रत्नागिरीत एक चांगली शिक्षिका म्हणून सगळेच मानायचे. आत्याने विचार करून त्यांना सांगितलं, ‘आधी आपण मोठय़ा मुलीला पाठवू या. श्रद्धा अजून लहान आहे, तिला आत्ताच नको पाठवायला.’ बाई लगेच त्यांच्या भावाशी बोलल्या आणि भाऊ रत्नागिरीत आम्हाला भेटायला आले. या सगळ्या घटना आई गेल्यापासून केवळ तीन-चार महिन्यांत घडल्या.

मनात विचार यायचे, कोण आहेत हे? यांच्यासोबत आपण राहू शकणार का? मी थोडी घाबरतच त्यांना भेटायला बाईंच्या घरी आले. त्या वेळेस ते समोरच्या खोलीत खुर्चीवर बसले होते, चेहऱ्यावर स्मितहास्य आणि त्यांचा तेजस्वी चेहरा बघून मला लगेच आपलेपणा वाटला. मी त्यांच्याजवळ जाऊन बसले. त्यांनी प्रेमानं माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, ‘बेटा, येणार ना आपल्या घरी? तिथं आई वाट बघत आहे तुझी!’ त्यांचा मायेचा स्पर्श मनाला भावून गेला. मे महिन्याच्या सुट्टीत माझी ठाण्याला जाण्याची तयारी झाली आणि मी बाबांसोबत ठाण्याला यायला निघाले.

मी निघताना सगळ्यांचा निरोप घेतेवेळेस बाईंनी एक गुलाबाचं फूल दिलं, म्हणाल्या, ‘प्रवासात वास घे, बसमध्ये मळमळ होणार नाही.’ पूर्ण दहा तासांच्या प्रवासात मी बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले ते थेट ठाण्याला आल्यावर त्यांनी मला उठवलं तेव्हाच उठले. बाबांसोबत घरी आले तर आई (मी तिला नेहमी भाभी म्हणायचे) वाट बघत होती. तिनं मायेनं जवळ घेतलं आणि माझी विचारपूस केली. हातपाय धुवून आल्यावर चहा-बिस्कीट खायला दिले. आयुष्यात जेवण हे टेबलावर करतात, याचा पहिल्यांदा अनुभव घेतला, सगळं कसं उंच उंच वाटत होतं!

थोडय़ाच दिवसांत आई-बाबांनी मला शाळेत दाखल केलं. सगळं आयुष्य हे परीसारखं आहे असं वाटायचं. भाऊ आणि भाभींच्या रूपानं मला परत आई-बाबा भेटले. बाबांनी माझ्यासाठी परीसारखी एक मच्छरदाणी बनवून घेतली होती. किती लाड करायचे आई-बाबा! कधी स्वप्नात विचार केला नाही असं आयुष्य जगत होते मी. आता विचार केला तर वाटतं, किती महान व्यक्ती होते माझे आई-बाबा. मला कधीही त्यांच्या बोलण्यात, वागण्यात उपकाराची भावना जाणवली नाही.

दोघंही शिक्षण खात्यात नोकरीला होते, स्वत:ला मूल नाही म्हणून कुढत न बसता त्यांनी त्यांच्या आयुष्यात चार मुलींना घर दिलं, त्यांच्यासाठी शिक्षण, नोकरी, लग्न सगळंच खूप आनंदानं केलं. मी यांच्या आयुष्यात आलेली तिसरी मुलगी. पहिली मुलगी रतनताई, दुसरी कृष्णीताई आणि आम्ही दोघी बहिणी. रतनताईला मी कधी भेटले नाही; परंतु बाबांच्या बोलण्यात तिचा उल्लेख नेहमी असायचा, पहिली लेक ना त्यांची! दुसरी मुलगी कृष्णीताई जी आजही माझी ताई म्हणून माझ्या संपर्कात आहे.

मी जेव्हा घरी आले त्या वेळेस आई-बाबा दोघेही निवृत्त होते. परंतु त्यांना त्याचं वय हे पालक होण्यासाठी कधीही अडचणीचं वाटलं नाही. आई-बाबांनी मला भरभरून प्रेम, माया, संस्कार दिले. आई-बाबांना सारखं वाटायचं, या दोघी बहिणी सोबत असाव्यात. आत्याचा श्रद्धावर जीव, त्यामुळे ते फारसे आग्रही नव्हते. काही वर्षांनी परत बाईंनी आत्याशी बोलून श्रद्धाला ठाण्याला आमच्याकडे पाठवलं. ती आली, परंतु तिला थोडय़ाच दिवसांत ब्रेनटय़ुमर झाल्याचं निदान झालं. आई-बाबांनी तिची सगळी जबाबदारी घेतली, तिचं आजारपण, काही दिवस ती कोमात होती. तो काळ, सगळं आई-बाबांनी धिरानं केलं. केवढा खर्च झालेला त्या वेळेस! त्यांनी मात्र आम्हाला कधीही याची जाणीव होऊ दिली नाही. त्याचं प्रेम आणि जिद्द म्हणूनच या सगळ्या आजारपणातून श्रद्धा बरी झाली. त्यानंतर आई-बाबा तिला खूप जपायचे. तिच्या तब्येतीमुळे तिला अभ्यासाचं ओझं पेलणार नाही हे बघून त्यांनी तिला रत्नागिरीला आपल्या बहिणीकडे म्हणजे बाईंकडे पाठवलं.

आई-बाबांनी आमचं मूळचं नावं ‘मयेकर’ हे बदललं नाही, बाबा म्हणायचे, ‘तुमच्या जन्मदात्या आई-बाबांची ती आठवण आहे आणि त्यांच्या नावानं तुमचं अस्तित्व असावं.’ बाईंनी रत्नागिरीला धडपड करून श्रद्धासाठी अनुकंपा म्हणून एसटीमध्ये नोकरी मिळवली. नंतर तिचं लग्न झालं आणि आज ती मजेत आयुष्य जगत आहे. मी शिक्षणात तशी ठीकठाक त्यामुळे आईबाबा म्हणायचे, ‘अमिता खूप शिक आणि मोठी हो बाळा!’

२००९ मध्ये बाबा गेले, त्या वेळेस ते ९३ वर्षांचे होते. मी कोसळले.. बाबांशिवाय आयुष्य याचा कधी विचारच केला नव्हता! आईकडं बघून मी स्वत:ला सावरायचा प्रयत्न करायचे. बाबा गेले याची जखम खूप खोलवर होती. २०१३ मध्ये आईपण आम्हाला सोडून गेली. जगण्याला काही अर्थच उरला नव्हता! सहा महिने मी पूर्ण नराश्येच्या खोल गत्रेत होते. मला तो काळ आजही आठवत नाही. आई-बाबांच्या सगळ्या नातेवाईकांनी मला या काळात खूप जपलं, मला परत आयुष्य सुरू करायला मदत केली.

खरंच ताई, रक्ताची नाती कुठलीच नाही गं, पण या सगळ्या मानस नात्यांमध्ये प्रेम, माया हे मी भरभरून अनुभवतेय. मी रसायनशास्त्रामधून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. मला गोव्याला नोकरीची संधी आहे हे कळलं तेव्हा लगेच माझ्या गोव्याच्या मामी म्हणाल्या, ‘आमच्याकडं राहायचं अमिता.’ सध्या मी त्यांच्याकडं राहून माझी नोकरी सुरू केली आहे.

माझ्या रत्नागिरीच्या बाई आज ८३ वर्षांच्या आहेत. माझ्या जन्मदात्यांनी नक्कीच काही पुण्याई केली असावी ज्यायोगे आम्हाला असे आई-बाबा आणि नातेवाईक भेटले. ताई, या लेखाद्वारे माझ्या भावना मी या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवू शकले आणि हे फक्त तुझ्यामुळं शक्य झालं.

माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, या सगळ्यांकडून एक एक चांगला गुण घेऊन एक उत्तम माणूस म्हणून मी जगावं. आयुष्यात माझीही मुलगी दत्तक प्रक्रियेतून यावी अशी माझी इच्छा आहे!

संगीता बनगीनवार  sangeeta@sroat.org