ही लेखमाला सुरू झाली तेव्हापासून एक विषय सतत डोक्यात आहे, ‘बाबाचं एकल पालकत्व’. दत्तक प्रक्रियेतून एकल पालकत्व स्वीकारणारे पुरुष अगदी बोटावर मोजता येतील एवढेच आहेत. प्रकाशची आणि माझी ओळख तशी नवीन, त्यानं बराच विचार करून स्वत:चा प्रवास नाव बदलून आणि थोडे संदर्भ बदलून वाचकांपर्यंत पोचवायला परवानगी दिली. प्रकाशचा स्वत:चा व्यवसाय आहे, घरात आईबाबा आणि हे दोघं, प्रकाश आणि त्याचा मुलगा श्रेयस. प्रकाश तसा शांत स्वभावाचा, मात्र श्रेयस खूपच बडबडा. मी प्रकाशला म्हणाले, ‘‘मी स्वत: एकल पालकत्व अनुभवतेय, परंतु तुझा प्रवास हा बऱ्याच पुरुषांसाठी अनुकरणीय होईल असं मला वाटतं. तू लग्न न करता पालक होण्याचं का आणि केव्हा ठरवलंस?’’

प्रकाश म्हणाला, ‘‘मी महाविद्यालयामध्ये असताना माझी एक मैत्रीण होती, सायली. आम्ही स्वत:च्या पायावर उभं राहिल्यावर लग्न करू या, असं ठरवलं होतं, परंतु आपण ठरवतो तसं नेहमीच होत नसतं ना ताई! आम्ही दोघांनी ठरवलं होतं, लग्न झाल्यावर पाच वर्ष भरपूर काम करायचं व दोघांनी एकमेकांना मस्त वेळ द्यायचा. मग दत्तक प्रक्रियेतून आईबाबा व्हायचं. शिक्षण संपलं, मी ठरवल्याप्रमाणे स्वत:चा व्यवसाय सुरू केला आणि सायलीनं नोकरी सुरू केली. दोघांच्या घरी आमच्या नात्याबद्दल कळलं, आम्हाला खात्री होती तसंच दोन्ही घरच्यांनी आमच्या लग्नाला मान्यता दिली. परंतु नियतीला काही वेगळचं मान्य होतं! आम्ही दोघं सुट्टीसाठी बाहेरगावी निघालो होतो आणि वाटेत आमचा अपघात झाला. दोघांना बरंच लागलं. आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला जवळच छोटय़ा गावातील रुग्णालयामध्ये दाखल केलं. माझ्या एका पायाचं आणि हाताचं हाड मोडल्यामुळे प्लास्टर घातलं गेलं. सायलीच्या मात्र पोटात मार लागला होता, सुरुवातीला डॉक्टरांना नीट कळलं नसावं, तिला शहरात आणून तिची तपासणी करायला पुढील दोन तीन दिवस गेले. ते दोन तीन दिवस वेळ वाया गेला नसता तर ताई, कदाचित आज सायली आपल्यासोबत असती!

सायलीच्या पोटात खूप रक्तस्राव झालेला, त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेलं, ‘आम्ही प्रयत्न करू परंतु यश येईल की नाही सांगता येणार नाही.’ मला फक्त माझी सायली हवी होती, माझ्या तशाही अवस्थेमध्ये मी रोज तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये असायचो. तशी ती शुद्धीत होती, त्यामुळे गप्पा मारायची, परंतु मला तिच्या वेदना कळायच्या. त्या तीन आठवडय़ात तिनं कधीही तिच्या वेदनेबद्दल चकार शब्द काढला नाही. फक्त जायच्या दोन दिवस आधी मात्र मला म्हणाली, ‘प्रकाश, मला आज स्वप्न पडलं. तू, मी आणि आपला लेक श्रेयस असं आपलं घर दिसलं. श्रेयस अतिशय मस्तीखोर आणि तुमची मस्ती चालू होती. मी मात्र लांबून सगळी मजा बघत होते. प्रकाश, तुमची मस्ती चालू असताना मी तुमच्या दोघांसोबत का रे नव्हते?’ ताई, त्यावेळेस मी तिला एवढंच म्हणालो, ‘अगं, आईला फक्त बापलेकाची मस्ती बघायला आवडतं, आईचं मुलासोबतचं खेळणं वेगळं असतं.’ मला स्वत:ला हे मान्य नाही, आई पण मुलांसोबत धुमाकूळ घालते. ताई, तू एक आई म्हणून हे नक्कीच मान्य करशील, कारण मी बघितलं तुला तुझ्या लेकीसोबत. परंतु फक्त सायलीला छान वाटावं म्हणून मी हे बोलून गेलो. कदाचित तिला जाणीव झाली असावी की ती श्रेयसला प्रत्यक्षात कधी भेटणारच नाही, ती फक्त लांबून आमच्यासोबत असेल. सायलीच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नव्हती, उलट गुंतागुंत वाढत होती. तिच्या स्वप्नानंतर दोनच दिवसांनी सायली मला कायमची सोडून गेली. खूप हताश झालो होतो मी. वाटलं, सगळं संपलं!

या काळात आईबाबा आणि माझी ताई रमा यांनी मला खूप जपलं. जवळपास सहा महिने मी स्वत:ला सावरू शकलो नाही. मी सायलीशिवाय जिवंत असू शकतो हे मला मान्यच नव्हतं! एक वर्ष गेलं आणि आईबाबांनी मला लग्नाबाबत विचारलं. मी त्यांना सांगितलं, ‘सायलीसोबत तोही विषय तिथंच संपला. मी फक्त सायलीला माझी बायको म्हणून बघू शकतो, त्यामुळे लग्न करून मला त्या दुसऱ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही. माझं आणि सायलीचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न मला जगायचं आहे. आईबाबांना माझ्या भावना कळल्या आणि त्या दिवसानंतर आईबाबा आणि ताईनं कधीही लग्नाचा विषय काढला नाही.

थोडय़ाच दिवसांनी मी आईबाबांना मुलं दत्तक घेण्यासंदर्भात बोललो. आम्ही चौघे एकत्र बसून चर्चा केली आणि निर्णय पक्का झाला. त्याच आठवडय़ात मी संस्थेमध्ये जाऊन आलो. त्यांनी माझी संपूर्ण चौकशी केली. त्यांनी यापूर्वी मुलींना एकल पालकत्व अनुभवायला मदत केली होती, परंतु माझी केस पुरुष एकल पालक म्हणून त्यांच्यासाठी पहिलाच असा अनुभव होता. मी आणि माझे पालक ही जबाबदारी सहजपणे पेलू हे पटायला सुरुवातीला त्यांना थोडा वेळ लागला. थोडय़ाच दिवसात प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळेस नियमाप्रमाणे मला फक्त मुलगाच दत्तक घेणं शक्य होतं. मला वाटतं आताही नियम असाच आहे. संस्थेच्या नियमानुसार आणि तिथल्या सगळ्या प्रक्रियेत जवळपास एक वर्ष मला वाट बघावी लागली. १३ महिन्यांनी श्रेयस घरी आला. घरी आला त्यावेळेस तो फक्त आठ महिन्यांचा होता. आई आणि रमाताई या दोघींमुळे तसा माझा पालकत्वाचा प्रवास सहज आहे. श्रेयस माझ्या आईला ‘आई’ म्हणतो तर रमा त्याची ‘माई’ आहे. श्रेयस सायलीला कधी भेटला नाही, परंतु माझ्या संवादामधून सायलीची आणि त्याची मस्त गट्टी आहे. तो आता दहा वर्षांचा आहे, त्याला कळतं तेव्हापासून तो म्हणतो, ‘मम्मा तू आम्हाला फक्त दिसत नाही, परंतु तू आमच्यासोबतच आहे.’

श्रेयसला वेळ देणं आणि त्याला मोठं होताना बघणं यात खूप सुख आहे. मी माझं काम बऱ्याचदा घरून करतो, श्रेयस शाळेला जातो तेव्हा बाहेरची काम करून घेतो. त्यामुळं तो आल्यावर मी बहुतेक वेळा त्याच्यासोबत असतो. सकाळी त्याला तयार करणं, शाळेत सोडणं, शाळेतून आल्यावर त्याच्यासोबत गप्पा, मग त्याचा थोडा फार अभ्यास आणि संध्याकाळी फिरायला जाणं, सगळंच खूप आनंद देणारं आहे. हे सगळं करताना माझ्या आईची नक्कीच सोबत असते. ती नसती तर कदाचित श्रेयसला आईची उणीव जास्त जाणवली असती. रमासुद्धा न चुकता श्रेयसला वारंवार भेटते, तिचं काम आणि मुलं सांभाळून ती श्रेयसला वेळ देते. तिचं सगळं कुटुंब कुठेही बाहेर जाणार असेल तर त्यात श्रेयस हा त्यांच्यासोबत असतोच. मला सुरुवातीला वाटायचं, यांना त्रास होईल. सगळे एवढे मजा करतात हे बघून मी पण श्रेयसला जाऊ देतो. आता तो रमाताईच्या कुटुंबाचा एक भाग बनला आहे.

श्रेयस पाच वर्षांचा असताना एकदा त्याला खूप ताप आला होता, नेमकी त्यावेळेस माझी आई गावाला गेली होती. रात्री झोपेत सारखं ‘आई आई’ म्हणत होता. त्या क्षणाला खूप वाईट वाटलं, आपण आपल्यापरीनं त्याच्या आईची उणीव भरून काढायचा प्रयत्न करतो, पण काही क्षण असे येतात की वाटतं, श्रेयसला आईची उणीव भासते. कधीकधी त्याच्या मित्रांच्या घरी तो जातो त्यावेळेससुद्धा त्या मित्राच्या आईसोबत गप्पा मारायला श्रेयसला जास्त आवडतं. ताई, तुझ्या मुलीच्या बाबतीत पण असं होतं का गं?

एकल पालक होताना मला नेहमीच वाटतं, आपण एकटे पालक होत नसतो तर आपलं सगळं कुटुंब या पालकत्वाचा अविभाज्य भाग असतात. त्यांच्यामुळंच मुलांना संपूर्ण कुटुंब मिळतं. ताई, तुला लेखात नावं आणि संदर्भ बदलायला सांगितले. कारण श्रेयसला दत्तक प्रक्रियेबद्दल माहीत असलं तरीसुद्धा पुढे त्याला याविषयी काही बोलायची इच्छा नसेल तर त्याला याचा त्रास होवू नये.’’

प्रकाशसोबत गप्पा मारल्यावर नेहमीच छान वाटतं, त्याचा प्रवास नक्कीच समाजात वेगळा बदल घडवून आणायला मदत करेल याची मला खात्री आहे.

संगीता बनगीनवार

sangeeta@sroat.org