आरती म्हणाली, ‘‘आदिवासी कुटुंबात जन्म होणं हा माझा दोष होऊ  शकतो का? जन्मत:च आई गेली, वडिलांनी मला प्रकाश आमटे कुटुंबाकडे सुपूर्द केलं. आई-बाबा आणि दोन्ही भावांनी मला अतिशय लाडात वाढवलं आणि चांगले संस्कार दिले. जेव्हा कधी कुत्सितपणे बोलणारे लोक भेटले त्यावेळी आई-बाबा आणि दोन्ही दादा माझ्यासोबत खंबीरपणे उभे असायचे. आणि आता लग्नानंतर नवरा, उदयही तितक्याच खंबीरपणे माझ्या मागे असल्याने मला आता त्याचा त्रास होत नाही.’’

या लेखमालेतील सुरुवातीच्या एका लेखात आपण एकीचा प्रवास ‘ती दत्तक आहे हे कळल्यापासून, ते तिचं लग्न आणि तिची मुले’ असा वाचला. मी ही लेखमाला सुरू केली तेव्हापासूनच ‘दत्तक प्रक्रियेतून आलेल्या मुलांची लग्न’ हा विषय डोक्यात होता. हा विचार आला की नेहमीच मला आठवण होते ती आरती आणि उदय नानकर यांची. आरती ही प्रकाश आमटे यांची मानसकन्या आणि उदय माझ्या मैत्रिणीचा भाऊ. उदय माझ्याकडे प्रशिक्षणार्थी म्हणून आला होता, अतिशय हुशार, समंजस आणि उच्चशिक्षित. त्याचं मन कायमच सामाजिक कामात रमतं, त्यामुळे सुरुवातीला त्याला बरेच जण, ‘उदय, तू खूप कमाऊ  शकतोस, चांगली नोकरी कर, वेडेपणा करू नकोस.’ असे एक ना अनेक सल्ले द्यायचे.

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…
girl committed suicide Pavnur
वर्धा : परीक्षेत नापास होण्याची भीती, शेतकरी कन्येने उचलले टोकाचे पाऊल…

परंतु उदयने नेहमीच त्याचं मन रमेल असंच कामाचं क्षेत्र निवडलं. उदयच्या लग्नाचा विचार जेव्हा सुरू होता. त्या वेळेस एका विवाहविषयक संस्थेत त्याला आरतीचे तपशील मिळाले. त्या वेळी उदय नोकरीत स्थिर व्हायचा होता, त्याने दोन तीन नोकऱ्या बदलल्या होत्या. त्यामुळे तो जेव्हा आरतीला भेटला त्या वेळेस आरतीला सगळं काही आवडून सुद्धा उदयला तिने ‘नाही’ म्हणून कळवलं. मी आरतीला विचारले ‘हो’ कधी म्हणालीस मग? आरती तशी एकदम मनमोकळी, गप्पा मारणारी मुलगी. यापूर्वीही भेटल्याने सगळंच मोकळ्या मनाने बोलली.

आरती म्हणाली, ‘‘मी ज्या वेळेस उदयला नाही म्हणाले त्या वेळेस पुण्यात मी एका नामांकित हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करत होते. माझ्या आयुष्यात माझे बाबा, प्रकाश आमटे हे फक्त बाबा नसून माझे एक चांगले मित्र आहेत. त्यांना मी नेहमीच माझ्या मनातलं सगळं सांगते आणि ते मला खूप छान समजून घेतात आणि मार्गदर्शन करतात. त्यांना मी जेव्हा उदयबद्दल सांगितलं, त्या वेळेस ते म्हणाले, ‘‘आरती बेटा, तुला उदय आवडला, त्याला तू आवडलीस. फक्त नोकऱ्या बदलल्या म्हणून हा मुलगा संसार नीट करेल की नाही अशी भीती बाळगू नकोस. उदय शिकलेला आहे, संस्कारी आहे. त्याचे आई-वडील, बहिणी यांनी त्याच्यावर नक्कीच चांगले संस्कार केलेले आहेत. तू एकदा परत विचार कर.’’ जवळपास वर्षांनंतर मी परत त्याला भेटले आणि माझा होकार कळवला. आमचं लग्न एकदम साध्या पद्धतीने झालं. उदयचे आई-बाबा आणि बहिणी यांनी मला छान स्वीकारलं. मला दोन्ही घरी कधीच वेगळी वागणूक मिळाली नाही.’’

‘‘तू प्रकाश आमटे यांची दत्तक कन्या आणि जन्म आदिवासी कुटुंबात झालेला त्यामुळे तुला आलेले वेगवेगळे अनुभव सांगशील का?’’

त्यावर आरती म्हणाली, ‘‘ताई, आदिवासी कुटुंबात जन्म होणं हा माझा दोष होऊ  शकतो का? जन्मत:च आई गेली, वडिलांनी मला आमटे कुटुंबाकडे सुपूर्द केलं आणि निघून गेले. परंतु आई-बाबा आणि दोन्ही भावांनी खूप जीव लावला मला. अतिशय लाडात वाढवलं आणि चांगले संस्कार दिले. आज मी जे काही आहे ते फक्त त्यांच्या संस्कारांमुळे. जसे मला स्वीकारणारे अनेक लोक आहेत तसेच कधी कधी कुत्सितपणे बोलणारे थोडेफार लोक भेटलेत. प्रत्येक वेळेस आई-बाबा आणि दोन्ही दादा माझ्यासोबत खंबीरपणे उभे असायचे आणि आमचं नातं एवढं घट्ट आहे की त्यामुळे या अनुभवातूनही मी सहजपणे बाहेर आले. मला आठवतं, मी पाचवी-सहावीत असेन, त्या वेळेस आमच्या संस्थेत राहणाऱ्या एक काकू मला म्हणाल्या, ‘‘आरती, तू प्रकाश आमटेंची मुलगी नाही, तुझ्या वडिलांनी तुला इथे आणून सोडलंय. तुझे हे खरे आई-बाबा नाहीत.’’ त्या वेळेपर्यंत मला कधी या गोष्टीचं गांभीर्य वाटलं नव्हतं. त्या दिवशी घरी गेल्यावर मी खूप रडले, काय करावं काही सुचत नव्हतं! संध्याकाळी आईशी बोलले आणि तिला सांगितलं. तिने मला समजावून सांगितलं, ‘‘हे जरी सत्य असलं तरी तू आमची आहेस हेही तितकंच सत्य आहे. आम्ही तुला कधी परकं मानलं नाही. तुला कधी तसं वाटलं का आरती? जसे दिगंत आणि अनिकेत तशीच तू पण आमची आहेस. एक लक्षात ठेव आरती.. आपलं नातं हे आपल्याला माहीत आहे बेटा, बाहेरचे हरतऱ्हेने बोलणारे लोक भेटतील. तू आमच्या आणि तुझ्या दादांच्या आयुष्यात किती मोलाची आहेस ते बाहेरच्यांनी नाही ठरवायचं. ते फक्त आपण सगळे अनुभवू शकतो.’’ आईशी बोलून मला खूप हलकं वाटलं.

खरं तर आमच्या घरात मला कधीच परकेपणा जाणवला नाही. दोन्ही दादा नेहमी म्हणतात, ‘‘तू आई-बाबांची सर्वात जास्त लाडकी आहेस.’’ दिगंतदादा हा नेहमीच माझ्यासाठी आदर्श आहे. अनिकेतदादा आणि माझं नातं काही वेगळंच आहे, आम्हा दोघांना न बोलताही एकमेकांच्या भावना कळतात. माझ्या दोन्ही वहिनींचा पण माझ्यावर खूप जीव आहे, त्या माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. लग्नानंतर उदयच्या घरच्यांनीसुद्धा मला वेगळं मानलं नाही. परंतु कधीतरी कुणीतरी बोलून जातं, ‘‘तू प्रकाश आमटय़ांनी घरी आणलेली त्यांची दत्तक मुलगी ना?’’ असा अनुभव आला की आजही वाटतं, कधी बदलणार हा समाज? एक व्यक्ती म्हणून नाही का मला स्वीकारू शकत हे लोक? उदयला माझी व्यथा न सांगताही कळते आणि तो लगेच मला समजावून सांगतो, ‘‘आरती, आपलं नातं बघ गं! तू, मी आणि आपली मुलं किती छान आहे सगळं. मला आणि आपल्या मुलांना फरक पडतो का या गोष्टीमुळं? आपण एकमेकांना समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं! तुझी सोबत माझ्या आयुष्यात किती मोलाची आहे हे तुला कुणी बाहेरच्यानं नको ना सांगायला?’’ ताई, उदयसारखा समंजस नवरा मिळाला मला हे माझं भाग्य. तो सोबत आहे म्हणून असे अनुभव फारसे त्रासदायक होत नाहीत.

आमच्या आमटे घरातून मला नेहमीच ही शिकवण मिळाली, ‘‘तुझं अस्तित्व तू घडव, त्याला आमटे नावाची गरज नको भासायला.’’ ताई, आजपर्यंत मी कधीही, कुठेही ‘मी, प्रकाश आमटय़ांची कन्या’ असं सांगून काम केलेलं नाही. माझ्या लग्नाच्या सुरुवातीला एकदा नातेवाईकांपैकी कुणीतरी म्हणालं, ‘‘देव जाणे उदयसोबत कसा संसार करेल ही पोरगी!’’ त्या वेळेस मी खूप दुखावले होते, परंतु उदय म्हणाला, ‘‘जाऊ  दे आरती, त्यांची विचार करायची कुवत तेवढीच आहे. काही वर्षांनी हेच लोक बघतील आपण आनंदाने सुरू केलेला सहजीवनाचा प्रवास किती आनंदाने जगतोय ते!’’ आमच्या लग्नाला ९ र्वष झालीत आणि मागे वळून विचार केला तर वाटतं, काही फरक पडला का अशा  बोलण्यामुळं? मला तर कळतंच नाही, कशाला लोक एवढी ढवळाढवळ करतात दुसऱ्यांच्या आयुष्यात.    माझ्या आणि उदयच्या नात्यात कधीही मी आदिवासी आहे किंवा आमटे कुटुंबातील आहे यामुळे फरक पडला नाही. कारण त्याने नेहमीच मला आणि मी त्याला फक्त एक व्यक्ती म्हणून स्वीकारलेलं आहे. सध्या मी आणि उदय आमच्या ‘स्वच्छ’ संस्थेच्या कामात गर्क आहोत. सोबतच मी सध्या अमरावतीजवळच्या पारध्यांच्या वस्तीत काही डॉक्टरांना घेऊन कामाला जाते. दर शनिवार रविवार हे लोक आमची आतुरतेनं वाट बघत असतात. मलाही इथं त्यांची सेवा करून समाधान मिळतं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

तिथं मी सगळ्यांसाठी फक्त आरतीताई असते. ‘मी प्रकाश आमटय़ांची कन्या किंवा माझा आदिवासी घरात जन्म’,  हे सगळं गौण आहे. जे या अशिक्षित लोकांना सहज कळलंय ते शिकल्यासवरल्या आणि सुसंस्कृत लोकांना कधी कळावं गं?

ताई, आम्हाला दोन मुलगे आहेत आणि माझी खूप इच्छा आहे की मला एक मुलगी हवी. मी आणि उदयने ठरवलं आहे, संस्थेचं काम थोडं सुरळीत झालं की आपण आपली मुलगी दत्तक प्रक्रियेतून घरी आणू या. माझा विश्वास आहे आम्ही आमच्या लेकीला लवकरच घरी आणू.’’

आरती आणि उदय या दोघांना भेटलं की नेहमीच वाटतं हे दोघंही एकमेकांना किती समजून घेणारे आणि साथ देणारे आहेत. असाच समंजसपणा समाजात मोठय़ा स्तरावर निर्माण व्हायला हवा.

संगीता बनगीनवार

sangeeta@sroat.org