कशी आहेत आपली मुलं? शिक्षकांशी संवाद न करणारी, उदास, अलिप्त?  उलट त्यांच्या प्रत्येकाच्या मनात एक मोर दडला आहे. हातात निळा खडू मिळायचा अवकाश, समोरचा फळा तुझाच आहे, असं आश्वासन मिळायचा अवकाश की तो मनातला निळा मोर साकार होतो आणि थुई थुई नाचू लागतो. कोण शोधणार या मुलांच्या मनातल्या मोरांना?

शिक्षण या गोष्टीचं मला कोडंच पडतं नेहमी! कधी कधी असं वाटतं की ती फार गूढ गोष्ट आहे. इतकी १०-१२ वर्षे आपण शाळेत काढतो, शिकतो पण कुठल्या सरांनी, बाईंनी काय शिकवलं, अमुक एक धडा कसा शिकवला हे क्वचितच आठवतं. आठवतं ते त्या त्या शिक्षकांचं व्यक्तिमत्त्व. सहली नेमक्या कशा लक्षात राहतात? स्नेहसंमेलनं कशी आठवतात? प्रदर्शनांच्या तयाऱ्या, मिरवणुका, वक्तृत्व स्पर्धा कशा आठवतात? एखाद्या सरांनी कसं पु. लं. देशपांडेंना शाळेत बोलावलं होतं ते आठवतं. एखाद्या बाईंनी, ‘तुला ताक आणलंय बरं का. मधल्या सुट्टीत पिऊन जा.’ म्हणून कसं हळूच सांगितलं होतं ते आठवतं. एखाद्या बाईंनी ‘‘मी नवीन क्रेपची फुलं शिकून आले आहे ती तुम्हाला करून दाखवायची आहेत. तुम्ही चौघी या रविवारी,’’ असं प्रेमळ आमंत्रण कसं दिलं होतं. ते कसं विसरत नाही इतकी ५०-५५ र्वष होऊन गेली तरी?
याचा अर्थ असा आहे का की मुलांची शाळेकडे पाहण्याची दृष्टी वेगळीच असते आणि मोठय़ा माणसांची वेगळी? मुलांना खणखणीत छान शिकवणाऱ्या शिक्षकांबद्दल आदर वाटतो. प्रेम वाटतं. अभ्यासापलीकडे जाऊन जे शिक्षक जीवनाबद्दल काही बोलून जातात त्यांच्याबद्दल आपुलकी वाटते. पेपर्स, परीक्षा, मार्क, पहिला, दुसरा नंबर यात मला काही रस नाही. माझे विद्यार्थी, विद्यार्थिनी दहा वर्षांनंतर काय काम करत असतील, कसं करत असतील ते मला समजून घ्यायचं आहे? असं म्हणणाऱ्या द्रष्टय़ा शिक्षकांची स्मृती कधी धूसर होतच नाही.
माझी मुलगी शाळेत होती तेव्हा आम्ही पालक, शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यां शाळेत जायचो. ज्या शिक्षिका आलेल्या नसतील, त्यांचा वर्ग आम्ही सांभाळायचो. काय धमाल यायची तेव्हा! शाळेच्या गेटमधून आत आलो आपण की तिसरीच्या चिमण्या जोरात चिवचिव करून म्हणायच्या, ‘‘बाई आल्या, बाई आल्या.’’ वर्गात गेल्यावर बाईंचा हात धरण्यासाठी धक्काबुक्की. मी त्यांना विचारायची, ‘‘तुम्हाला काय काय करायला आवडतं ते मला लिहून द्याय.’’ आणि नवल म्हणजे तिसरी ‘ड’ मधल्या एका मुलीने पंचाहत्तर गोष्टी लिहून दिल्या १०-१५ मिनिटांत. काय काय आवडावं तिसरीतल्या मुलीला? ही १९८३ मधली गोष्ट आहे. गाणी म्हणायला, गोष्टी सांगायला, विणायला, हस्तकला, चित्रकला, रंगवायला, कानगोष्टी करायला, रंगीत टी.व्ही. बघायला, गुलाब फुलं वेचायला, कोकणात जायला, रांगोळी काढायला, किल्ला करायला, म्हणी सांगायला, नाटकात पात्र व्हायला, अभ्यास करायला, भातुकली खेळायला, फुगे फुगवायला, पेटी वाजवायला, कॅरम खेळायला, भरजरी कपडे घालायला, हसायला, बांगडय़ा भरायला, घोडय़ावर बसायला, आईस्क्रीम खायला, कानात झुंबर घालायला, बाहुल्यांशी खेळायला, मैत्रिणींशी गप्पा, बागेत जायला, सापशिडी खेळायला, प्राण्यांशी खेळायला, सायकल खेळायला, झोपाळा खेळायला, पिक्चर पाहायला, पत्ते खेळायला, वाचायला आवडतं, तंबोरा वाजवायला, लंगडी, घसरगुंडी, कबड्डी, सर्कस आवडते, पोहायला, लढाईच्या गोष्ट, मत्स्यालय पाहायला.. आणि अनेक खेळांची नावं लिहिली आहेत. आपल्याला मोठय़ा माणसांना कुणी असं विचारलं तर किती गोष्टी येतील लिहिता?
इतक्या गोष्टी करायला जर मुलांना आवडतं, तर शाळा यातलं काय काय करू देते? शाळेने करू दिलं किंवा नाही, तरी मुलं यासारख्या अनेक गोष्टी करत असतातच. मध्यंतरी दोन र्वष मी पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जात होते. कधी शिक्षकांचं प्रशिक्षण करायला, कधी साहित्यनिर्मितीच्या कार्यशाळा घ्यायला तर कधी वेगवेगळे वर्ग बघायला.  एकदा पहिलीच्या वर्गात गेले. अशा लहान मुलांच्या वर्गात गेलं की एक सुंदर अनुभव येतो. मुलांचे डोळे उत्सुकतेनं टपोरलेले असतात. ते चमकदार डोळे पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. ही मुलांच्या डोळ्यातली चमक आपल्याला जपता यायला हवी. या मुलांना फळ्यावर चित्रं काढायची असतात, पण त्यांना कुणी फळ्याजवळ जाऊ देत नसतं. की हातात खडू मिळत नाहीत. मी रंगीत खडू टेबलावर मोडून ठेवले आणि म्हटलं दोघा-तिघांनी या, आपल्या आवडत्या रंगाचा खडू घ्या आणि फळ्यावर चित्र काढा. एकेक मूल येत होतं चित्र काढून जात होतं. अगदी मागे भिंतीजवळ एक छोटासा मुलगा मळकट कपडय़ातला, तोंडपण मळलेलं होतं, खाली मान घालून बसला होता. त्याच्याजवळ जाऊन मी त्याला टेबलाजवळ आणलं. त्यानं निळा खडू उचलला आणि पटकन् इतका सुंदर निळा पिसारा फुलवलेला मोर काढला की माझ्या अंगावर सरसरून काटा आला. हा मुलगा मला प्रातिनिधिक वाटला. अशी आहेत का आपली मुलं? शिक्षकांशी संवाद न करणारी, उदास, अलिप्त? उलट त्यांच्या प्रत्येकाच्या मनात एक मोर दडला आहे. हातात निळा खडू मिळायचा अवकाश, समोरचा फळा तुझाच आहे, असं आश्वासन मिळायचा अवकाश की तो मनातला निळा मोर साकार होतो आणि थुई थुई नाचू लागतो. कोण शोधणार या मुलांच्या मनातल्या मोरांना?
शाळा खरं म्हणजे मूल समजून घेणाऱ्या हव्यात. मूल समजून घ्यायचं तर आपले मन त्या मुलाविषयीच्या प्रेमाने, जबाबदारीने, सन्मानाने, नम्रतेने काठोकाठ भरलेलं हवं. आपल्याला त्याच्याबद्दल उत्सुकता हवी. ते काय बोलतं ते आपल्याला कळायला हवंच पण ते काय बोलत नाही ते मौनही आपल्याला कळायला हवं. आपण आपली मोठेपणाची आढय़ता, मोठेपणाचा गर्व, शिष्टपणा, अधिकाराची गुर्मी सगळं वर्गाबाहेर चपलांबरोबर काढून ठेवून मुलांना भेटलं पाहिजे. आपलं त्यांच्याकडे पाहणं असं हवं की, आपल्या डोळ्यातून त्या मुलांना त्यांचा मित्र भेटला पाहिजे. या मोठय़ा माणसाबरोबर आपण बोलू शकू, खेळू शकू असं मुलाला वाटायला पाहिजे. त्याला असंही वाटलं पाहिजे की, या माणसाची उंची जास्त आहे एवढंच पण मनाने तो आपल्या एवढाच, आपल्यासारखाच दिसतो आहे.
आपल्या शाळांच्या वर्गात अनेक पताका लावलेल्या असतात, तक्ते असतात, चित्रं टांगलेली असतात हे सगळं मुलांना हवं असतं का? गृहपाठ मुलांना हवा असतो का? सुविचार लिहिलेले मुलांना आवडतात का? कुणी विचारलंय कधी? शाळेत शिक्षकांची दहशत असते. काही मुलं त्या दहशतीला न जुमानणारी असतात. म्हणजे ती वाईट नसतात तर बंडखोर असतात. एखादं मूल म्हणतं, ‘‘मी नाही वर्गात बसणार. मी मैदानावर खेळेन.’’ ते थोडय़ा वेळानं वर्गात येणारच असतं, पण त्याला थोडा वेळ स्वातंत्र्य हवं असतं. ते मिळालं की ते खूष असतं. आनंदानं शिकतं. शिक्षकांनाही तो आनंद मिळतो. मुलाच्या आवडीची शाळा हवी तर मुलांसाठी तिथे खेळायची वेगळी जागा हवी. त्यांना झोपावंसं वाटलं तर त्यासाठी जागा राखून ठेवलेली हवी. हे मी नाही म्हणत आहे जिल्हा परिषदेच्या शाळेतले शिक्षक, काही द्रष्टे अधिकारी हे म्हणत आहेत. एक अधिकारी प्रतिभाताई भराडे हे सगळं सांगत होत्या. शिक्षकांनी असं ठरवलं की, वर्गात पाहुणे आले तर लगेच मुलांनी उभं राहायला नको. त्यावर काही लोक म्हणाली, तुम्ही मुलांना आदर शिकवत नाही मोठय़ांसाठी. या शिक्षकांनी असं ठरवलं की, प्रत्येक वर्गात पदाधिकाऱ्यांच्या नावांचे तक्ते लावू नयेत, कारण ते मुख्याध्यापकांच्या खोलीत असतातच. त्यावर दहशत म्हणून नियम केला गेला की, असे तक्ते लावले नाहीत तर शिक्षा होईल. त्या शिक्षकाला हे शिक्षक आज असं म्हणू लागले आहेत की, आपली लोकशाही अजून प्रगल्भ झालेली नाही, त्यामुळे आपल्याला आत्मसन्मान, दुसऱ्याचा सन्मान समजत नाही. आपला सर्वाचा मेंदूच गुलामगिरीचा झाला आहे. आपल्याला समोरच्याच्या स्वातंत्र्याचं महत्त्व, मूल्य कळत नाही. आपल्याला असंही वाटतं आहे की लहान मुलांना काय कळतं? मी शिकवल्याशिवाय ते शिकणारच नाही, पण खरं तर स्वत: शिकणं ही फार मोठी गोष्ट प्रत्येक मुलाच्या आत दडलेली असते. ती आपण ओळखली पाहिजे.
फारूक काझी एक प्रयोगशील, संवेदनशील शिक्षक सांगत होते, आज महाराष्ट्रात अनेक शहरांतच नव्हेत तर लहान लहान गावांमध्ये, वाडय़ा वस्त्यांवरच्या शाळांमध्ये प्रयोगशील शिक्षक काम करत आहेत. त्यांना किती गोष्टी उमगलेल्या आहेत त्याबद्दल ते बोलू लागले की आपण थक्क होतो. ते म्हणतात प्रत्येक मूल वेगळं असतं. त्याला स्वत:च्या गतीनं शिकता आलं पाहिजे. मुलांना स्वत: शिकण्याचं स्वातंत्र्य हवं तसं शिक्षकांनाही स्वातंत्र्य पाहिजे. शिक्षकांच्यावर सारखे नियम लादले जातात मग ते कसं काम करणार? मनासारखं काम करताच येत नाही. शिक्षक उत्साहानं नव्या वाटा शोधत असतात, पण त्यांना प्रशिक्षण मिळतात ती जेमतेम दर्जाची. त्यानं काय होतं तर वाढणाऱ्या वाटा बंद होतात. वाचन, लेखन, गणिती क्रिया यांच्यापुढे शिक्षण जाणार तरी कधी? आता काही करू पाहणाऱ्या शिक्षकांनी एकमेकांना बांधून घेतलं आहे. ते एकमेकांना आधार देतात.
आनंददायी शिक्षण झालं, सेमी इंग्रजीची टूम झाली, आता ज्ञानरचनावाद. ज्याच्या त्याच्या सोयीने वरवरची लेबलं बदलत राहतात. खेडय़ापाडय़ातल्या जेमतेम जीव असलेल्या शाळांसाठी फतवे निघतात. लोकवर्गणीतून संगणक घ्या, एल्.सी.डी. प्रोजेक्टर घ्या पण त्याचं वर्षांचं बिल कुणी भरायचं? शिक्षकांनी, पालकांनी? अमुक ही लिंक उघडावी, मेल करावी असं परिपत्रकं येतं. आज किती पालकांना हे येऊ शकेल? जिथे मराठी माध्यमाच्या शाळा चांगल्या चालतात तिथे इंग्रजी शाळेतून काढून मुलांना मराठी शाळेत घातलं आहे पालकांनी. मुलं आनंदात शिकली तर शिक्षकांनाही आनंदच होईल ना? शिक्षक म्हणतात,
‘‘वाडय़ा-वस्त्यांवर काम करणारे जे चांगले शिक्षक आहेत त्यांचं शासनाकडून कौतुक झालं पाहिजे.’’  वाचून कळेल अशी परिपत्रकांमधली भाषा हवी. ‘‘आज वाचून काही कळतच नाही अशी शैक्षणिक शाळा क्लिष्ट आहे.’’ ‘‘चांगल्या शिक्षकांचं खच्चीकरण होतं आहे’’ ‘‘मुलांना शाळेत पुस्तकं हवीत. खेळणी हवीत. फुटबॉल पाहिजेत.’’
शाळा म्हणजे आनंदानं शिकण्याचं ठिकाण व्हायला हवं. शिक्षित पालकांनीही मुलांना ताण देणं बंद करावं. द्या भरपूर गृहपाठ म्हणजे मुलं त्याखाली दबलेली राहतील, असा विचार पालकांनी करूच नये. केवळ माझं मूल रेस कशी जिंकेल असा विचार न करता निदान आपल्या राज्यातल्या सर्व मुलांचा विचार करावा. ‘‘आमच्या शिक्षणाचं काय?’’ असा प्रश्न विचारणाऱ्या वंचित मुलांचा विचार आपण कधी करणार? कधी त्यांच्यासाठी काही काम करणार?
    shobhabhagwat@gmail.com