scorecardresearch

पालकत्व : फुल्या फुल्या आणि फुल्या!

समुपदेशक म्हणून काम करताना मुलांशी बोलल्यावर जिथे केवळ ‘फुल्या फुल्या फुल्या’च लिहाव्या लागतील अशी वाक्यं मुलं रोज वापरताहेत हे समजतं.

पालकत्व : फुल्या फुल्या आणि फुल्या!
पालकत्व : फुल्या फुल्या आणि फुल्या!

तृप्ती जोशी-कुलश्रेष्ठ

समुपदेशक म्हणून काम करताना मुलांशी बोलल्यावर जिथे केवळ ‘फुल्या फुल्या फुल्या’च लिहाव्या लागतील अशी वाक्यं मुलं रोज वापरताहेत हे समजतं. कधी मुलांमध्ये आईवरून शिवी दिली म्हणून खच्चून मारामारीही होते, तर कधी शिव्या न देणारी मुलं ‘पीअर प्रेशर’खाली कोमेजून जातात. मुलांमधल्या आजच्या या सार्वत्रिक प्रश्नाबद्दल..

पु. ल. देशपांडे यांचा ‘अंतू बर्वा’ आठवला की मला आधी ‘शिंच्या’ आठवतं! आता कुणी कुणाला प्रत्यक्ष ‘शिंच्या’ म्हटलेलं मी तरी ऐकलेलं नाही, अन्यथा, जे आजूबाजूला ऐकू यायला लागलंय ते लिहिण्यासाठी ‘फुल्या फुल्या फुल्या’च माराव्या लागतील, असं वातावरण सध्या आहे. त्यामुळे वाटलं, की आता पालकांनी हा ‘न बोलण्याचा’ विषय दुर्लक्षित करून चालणार नाही. हो, आज आपण शिव्यांबद्दल विचार करणार आहोत.

   एकदा लोकलमधून प्रवास करताना नेहमीसारखं जोरदार भांडण सुरू झालं. कॉलेजला जाणारी एक मुलगी भर गर्दीतही आत न जाता ट्रेनच्या दारातच उभी राहिली म्हणून एका चाळिशीच्या बाईनं तिला जोरदार शिव्या द्यायला सुरुवात केली. अस्सल मराठीतल्या गावरान शिव्या ऐकल्यावर ती मुलगीही गप्प बसली नाही. तिनंही इंग्लिशमधल्या शिव्या द्यायला सुरुवात केली. हे सगळं जे काही चाललं होतं, ते भांडणात सामील नसणाऱ्यांसाठी असह्य होतं. पूर्वी ट्रेनमध्ये किंवा एकंदरीतच सार्वजनिक भांडणांमध्ये, ‘इथे लोकांमध्ये आहे, म्हणून सोडतो. नाही तर बोललो असतो..’ एवढं तरी म्हटलं जायचं. पण, आता सगळं ‘पारदर्शक’ आहे! वैयक्तिक भांडणात बोलले जाणारे शब्दसुद्धा आता सार्वजनिक ठिकाणी वापरले जातात. आधी या शिव्यांची शास्त्रीय व्याख्या पाहू. शिवी म्हणजे दुसऱ्या माणसाचा अपमान करण्यासाठी, त्याला दुखावतील असे असभ्य, अश्लील किंवा अपमानकारक शब्द वापरून टोचून बोलणं. शिव्या गावांनुसार बदलत जातात. त्या त्या गावात, प्रांतात कधी कधी त्या शिव्या इतक्या रूढ होऊन जातात, की त्या संबोधन म्हणून वापरल्या जातात. उदाहरणार्थ, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात काही काही शब्द इतक्या सहजपणे वापरले जातात, की त्यांचा अर्थ लक्षात घेतला तर निश्चितच तो इतरांना रुचणार नाही. कोकणातला अंतू बर्वासुद्धा कुणाचा अपमान करण्यासाठी किंवा कुणालाही दुखावण्यासाठी ‘शिंच्या’ शब्द वापरत असेल असं वाटत नाही. उलट त्यात समोरच्याबद्दल वाटणारी आपुलकीच होती. पण, हे चित्र आता बदललंय. लाडानं, आपुलकीनं म्हणा, नाहीतर रागानं म्हणा, शिव्या हा विषय फक्त प्रौढांपुरता मर्यादित होता. आता तसंही राहिलं नाही. शिव्या नकळत्या वयापर्यंत पोहोचल्या. तिथेच विषय गंभीर झाला.

तेरा वर्षांचा केदार मित्रांपासून अचानक अलिप्त राहायला लागला होता. आतापर्यंत त्याला भरपूर मित्र होते. सात-आठ वर्षांपर्यंतची मुलं खेळायला, फिरायला आणि भावनिकरीत्याही आई-वडिलांवर अवलंबून असतात. दहा-बारा वर्षांपर्यंतच्या मुलांना समवयस्क खेळायला हवे असतात. मात्र, त्यापुढच्या वयासाठी भावनिक विश्वात त्यांना मित्र असणं आवश्यक आहे. नेमकं याच वयात केदार वर्गातल्या नव्या मुलांशी मैत्री करू शकत नव्हता. रोज घरी येऊन ‘हा चांगला नाही, तो चांगला नाही,’ म्हणून धुसफूस करायचा. त्यामागचं कारण काही कळत नव्हतं. एक दिवस बाबा त्याला आईस्क्रीम खायला बाहेर घेऊन गेला. बाबा केदारचा ‘पक्का दोस्त’ होता. त्या दिवशी केदारनं बाबाला सांगून टाकलं, की ‘‘वर्गातली मुलं खूप घाण घाण शिव्या देतात. नावानं हाका पण मारत नाहीत. ‘अबे ०’ म्हणून सगळय़ांसमोर बोलावतात. समोरच्याला ते आवडलं नाही तरी ते त्याच पद्धतीनं शिव्या देऊन बोलावतात. ’’ असं सांगून त्या दिवशी पहिल्यांदाच केदार खूप रडला. ही परिस्थिती इतकी वाढती आणि टोकाची झाली आहे, की केदारसारख्या परिस्थितीतून गेलेल्या अनेक मुलांना या समस्येतून बाहेर येण्यासाठी समुपदेशनाची मदत घ्यावी लागत आहे. ही सगळी मुलं समवयस्कांकडून येणाऱ्या दबावाला (पीअर प्रेशर) बळी पडत आहेत.

   पूर्वी निदान अपवादात्मक स्वरूपात शिव्या ऐकायला यायच्या, पण आता त्या कुठल्याही स्तराशी निगडित राहिलेल्या नाहीत. मग त्या आल्या कुठून आपल्या घरापर्यंत? आताही हा लेख वाचणाऱ्या कित्येक पालकांना आपली मुलं बाहेर शिव्या वापरत असतील हे माहीतही नसेल. शाळेत किंवा कॉलनीत खेळणाऱ्या मुलांमध्ये एखादं मूल शिव्या देताना आढळलं तर आधी आई-बाबांचा उद्धार होतो. ‘हे शिकवतात का घरी?’ असं विचारलं जातं. पण हे सगळं मुलांपर्यंत पोहोचवणारे नेहमी पालक किंवा कुटुंबच असतं असं नाही. तर ते टीव्ही आणि मालिकांमधून किंवा त्याहूनही जास्त वेब सीरिजमधून येत असल्याचं दिसतं. जास्तीत जास्त ‘कूल’ असल्याचं दाखवण्यासाठी कोणतीही भीडभाड न ठेवता सगळय़ाच प्रतिबंधित शिव्या या वेब सीरिजमध्ये वापरलेल्या दिसतात. तेरा वर्षांपुढील मुलांना बहुतेक वेब सीरिज पाहण्यासाठी मान्यता असल्यामुळे (वयाचं रेटिंग- थर्टीन प्लस) पालक मुलांबरोबर किंवा प्रसंगी एकटय़ालाही एखादी वेब सीरिज पाहण्यासाठी परवानगी देतात. ‘१३ वर्षांपुढे’ या शीर्षकाखाली आक्षेपार्ह भाषेकडे (अब्युसिव्ह लँग्वेज) ‘सेक्शुअल कंटेंट’च्या तुलनेत जरा दुर्लक्ष केलं जातं. अशा शिव्या खोलवर मनात रुजत जातात आणि ज्या प्रसंगात अतिशय राग येतो, तिथे त्या बाहेर पडतात. आपण पालक म्हणून शिव्यांचं उगमस्थान विसरून जातो आणि विचार करत राहातो, ‘शिकल्या कुठून या शिव्या?’

शिव्या कधी वापरल्या जातात याचा विचार करताना असं लक्षात आलं, की खूप राग आल्यावर एखाद्याला हिणवून बोलताना आपण शिव्या देतो. पण मग रागाची तीव्रता आणि दिलेली शिवी यांचा एकमेकांशी काही संबंध आहे की नाही? माझ्या ओळखीतल्या एका कुटुंबामध्ये लहान मुलांच्या हातून फक्त पाणी जरी सांडलं, तरी आईबहिणीवरून दिल्या जाणाऱ्या शिव्या वडीलच मुलांना देतात. थोडा तर्काला धरून विचार केला, तर मुलाला आईवरून दिली जाणारी शिवी ही त्या व्यक्तीच्या बायकोला पण लागत असते. पाणी सांडण्यावरून अशा शिव्या देण्याची गरज आहे का, कमी तीव्रतेच्या प्रसंगांत राग आवरला गेला नाही तर आपण साध्या शिव्या वापरू शकतो का, हे पाहायला पाहिजे. काही पालक स्वत:च्या रागाला खूप कुरवाळताना दिसतात. ‘मला राग आला ना, की मी काय आणि कुणाला बोलतो ते मलाच कळत नाही,’ असं सांगताना ते आपला राग कसा भयानक आहे याचं वर्णन करत राहातात. हे सर्व ऐकणारं मूल राग आल्यावर तोंडाला येईल ते बोलणं सर्वमान्य आहे ही धारणा स्वत:मध्ये रुजवत जातं. मी मागे एका लेखामध्ये लिहिल्याप्रमाणे बाळ जन्माला आल्याबरोबर आपल्या घरात अदृश्य पाटी येते-

‘You are under human CCTV surveillance’. पालक म्हणून, प्रौढ म्हणून आपण वाटेल ते करायचा अधिकार मिळण्यापेक्षा उलट दोन-चार नियम आपल्याला जास्तच लागू होतात.

पौगंडावस्थेतली किंवा त्याहून लहान मुलं शिव्या देतात हे त्यांच्या पालकांना खूप उशिरा समजतं. जेव्हा समजतं, तेव्हाही नक्की काय करायचं ते त्यांना कळत नाही. नुसताच आरडाओरडा, धाक दाखवून, प्रसंगी मार दिल्यानं यातून मूल एवढाच बोध घेतं, की आपण शिवी दिल्याचं प्रकरण घरापर्यंत येऊ द्यायचं नाही. पण त्यांनी घेतलेल्या बोधामधून आपलं उद्दिष्ट साध्य होतं का? त्यानं शिव्या देऊ नये हे आपलं उद्दिष्ट आहे, शिव्या द्यायची सवय लपवावी हे उद्दिष्ट नाही. मी एका स्वयंसेवी संस्थेच्या निवासी केंद्रामध्ये समुपदेशक म्हणून काम करत होते. तिथे सगळय़ा १२ ते १८ वयोगटातल्या मुली होत्या. त्या काळात त्या केंद्रात शिव्यांचं प्रस्थ थोडं जास्तच वाढलं होतं. एके दिवशी एका सत्रामध्ये मी मुलींना विचारलं की, ‘‘तुम्ही जी शिवी देता, खरंच त्याच अर्थाचं तुम्हाला समोरच्याला म्हणायचं असतं का?’’ उदाहरणार्थ, आईवरून दिल्या जाणाऱ्या शिवीचा अर्थ समोरच्याचे त्याच्या आईशी लैंगिक संबंध आहेत असा होत असेल, तर नक्की मुलींना तोच अर्थ अभिप्रेत असतो का? त्या मुलींनी उत्तरादाखल सांगितलं की, त्या शिव्यांचा अर्थ काय असेल असा विचारही करत नाहीत. एका मुलीनं मात्र हे सगळं ऐकल्यावर उठून सांगितलं, की ‘‘जर आईवरून दिल्या जाणाऱ्या शिवीचा अर्थ इतका वाईट असेल, तर मी यापुढे कधीच अशी शिवी देणार नाही.’’

हा प्रश्न एवढा बिकट झाला आहे, की त्याचं एका गोळीनं भागणार नाही. जरा चार-पाच गोळय़ांची (उपायांची) मात्रा द्यावी लागेल. कोणत्याही उपायानं प्रश्न पूर्णपणे सुटणार जरी नसेल, तरी त्याची तीव्रता हळूहळू कमी होत जाईल. आपली भीडभाड बाजूला ठेवून, मुलांशी मोकळेपणानं बोलून जर त्यांना शिव्यांचे अर्थ त्यांना समजतील अशा भाषेत सांगितले, तर निश्चितच फायदा होईल. तोंडाला येईल ते बोलण्यापेक्षा मुलं निदान विचारपूर्वक बोलायला तरी शिकतील.

पण त्या केंद्रातल्या सत्रामध्ये मुलींनी असंही सांगितलं, की ‘राग अनावर झाल्यावर समोरच्याला धरून भरपूर मारावं असं वाटत असतं. पण एखादी शिवी दिल्यावर निदान मार देण्याची इच्छा तरी कमी होते.’ मान्य! होतं ना असं. शारीरिक इजा पोहोचवण्यापेक्षा एखाद्या शिवीवर भागलं तर बरंच आहे. पण मग कोणत्या शिव्या चालू शकतात याविषयी प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. माझ्या सत्रात मी मुलींना गमतीत विचारलं होतं, ‘‘चित्रपटातलं धर्मेद्रचं ‘कुत्ते-कमीने’ जास्त त्रासदायक आहे, की मकरंद अनासपुरेचं ‘रताळय़ा’ किंवा ‘भेंडी’ जास्त त्रासदायक आहे?’’ मुलींनी सांगितलं, ‘कुत्ते-कमीने’ जरा जास्त अपमानास्पद आहे. आता कुणी म्हणेल, एकानं शिव्या द्यायला प्राणी वापरला, दुसऱ्यानं भाजी. काय फरक पडतो? तार्किकदृष्टय़ा अगदी बरोबर. पण आपण ज्या प्रकारे हिणवून ‘कुत्र्या’ म्हणू, ते जास्त अपमानास्पद आहे. त्या मानानं ‘रताळय़ा’ म्हटलेलं काही मनाला जास्त लागत नाही. अर्थात हे फक्त उदाहरण आहे. (आपला राग व्यक्त करण्यासाठी कोणत्याही प्राण्याचं विशेषण खरंतर कशाला द्यावं!) मी त्या सत्रात स्त्री किंवा पुरुषांच्या गुप्तांगांवरून, लैंगिक संबंधांवरून किंवा समोरच्याच्या पालकांवरून असणारी कोणतीही शिवी द्यायची नाही, असं मुलींना ठरवून दिलं होतं. ज्या पालकांना, विशेषत: वडिलांना शिव्या देण्याची सवय असेल त्यावर  मर्यादा येतील. यातून मुलांना दुरुस्त करण्याचा अधिकार तरी तुम्ही गमावून बसणार नाही.

शिवकाळात किंवा राजे-रजवाडय़ांच्या काळात सगळेच एकमेकांना अहो-जाहो करायचे. काळ बदलत गेला, तशी स्त्रियांमधली जी नाती होती ती एकेरीवर आली. म्हणजे ती आजी, आई, मामी, काकू वगैरे. अजून थोडं पुढे आल्यावर आता बायको नवऱ्याला, मुलं वडिलांना मैत्रीपूर्ण नात्यातून अरे-तुरे करायला लागले आहेत. कित्येक घरांमध्ये ‘ए बाबा’ हा ‘ए आई’च्या एवढाच लाडका झाला. दुराव्याची, भीतीची भिंत पडून तिथे छान मैत्री झाली. पण असाच बदल होत होत पुढच्या टप्पात समाजाची भाषाच शिवराळ होईल का? आपल्याला कल्पना नसेल एवढय़ा झपाटय़ानं मुलांच्या संभाषणात शिव्या समाविष्ट झाल्या आहेत. शिव्या या तुमच्या आत्मसन्मानाला, स्व-आदराला ठेच पोहोचवणाऱ्या असतात. त्या संभाषणात रुळल्या तरी त्यातून होणारं नुकसान टळणार नाही.

पूर्वी खेळाच्या मैदानात मधलं बोट दाखवलं म्हणून कारवाई व्हायची आणि त्याची बातमी व्हायची. ते आता मागे पडलं, कारण दखल घेण्यासारखं काही वेगळं घडत नाही. इतकं मधलं बोट दाखवणं हे सर्वसामान्य झालं आहे. हे सगळं खटकणाऱ्या मुलांवर साहजिकच याचे नकारात्मक परिणाम होत आहेत.

शिव्यांचा अगदी सहज झालेला फैलाव जर थांबवायचा असेल तर एकटय़ादुकटय़ानं उपाय करून भागणार नाही. शिक्षकांना मुलांबरोबर एकत्रितपणे या विषयावर बोलावं लागेल, वारंवार बोलावं लागेल. फक्त ते बोलणं म्हणजे ‘रागावणं’ पातळीवर न ठेवता त्यांच्या विचारपूर्वक वागण्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करणारं असावं. कॉलनीतल्या मुलांना एकत्र करून पालक हळुवार पद्धतीनं हा विषय मांडू शकतील. छोटय़ा छोटय़ा समूहांमध्ये बदल होत गेल्यानंच मोठय़ा समूहात ते बदल ठळकपणे समोर येतील. तुम्हीही या विषयावर वैयक्तिक पातळीवर जरी काही पद्धती अवलंबल्या असाल तर आम्हाला नक्की कळवा.

trupti.kulshreshtha@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या