scorecardresearch

Premium

पालकत्व : ‘स्क्रीन’च्या व्यसनाचं आव्हान

कोवळे हात, कोवळय़ा डोळय़ांवर सतत मोबाइल हातात असण्याचा परिणाम होतोच, शिवाय तो मनावर आणि त्यांच्या वर्तनावरही होतो.

cha7 parents
पालकत्व : ‘स्क्रीन’च्या व्यसनाचं आव्हान

तृप्ती जोशी-कुलश्रेष्ठ

आज जो तो सतत मोबाइलशी खेळत बसलेला असतो. मोठय़ांचं बघून लहान मुलंही तेच करू लागली आहेत. कोवळे हात, कोवळय़ा डोळय़ांवर सतत मोबाइल हातात असण्याचा परिणाम होतोच, शिवाय तो मनावर आणि त्यांच्या वर्तनावरही होतो. मोठय़ांच्या बाबतीत ‘कळतं पण वळत नाही’ अशी परिस्थिती आहे. पण लहान किंवा किशोरवयीन मुलांच्या बाबतीत स्क्रीनचं हे व्यसन त्यांच्या वर्तमानावर आणि भविष्यावर घातक परिणाम करणारं ठरू शकतं.

Fire at Wedding Hall in Iraq
लग्नाच्या हॉलमध्ये भीषण आग, वधू-वरासह १०० जणांचा होरपळून मृत्यू, १५० हून अधिक जखमी
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…

सलोनीच्या घरातून खूप आरडाओरडा ऐकू येत होता. नेहमी हसतमुख असणारी सलोनी आज एवढी चिडलेली का होती तेच कळत नव्हतं. बाजूच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आजी तिला बघायला आल्या, तेव्हा सलोनीच्या आईनं सांगितलं की, तिचा मोबाइल काढून घेतला म्हणून ती चिडली आहे. संतापली आहे असं म्हणणं जास्त योग्य ठरलं असतं. आजी सलोनीला घेऊन आपल्या घरी गेल्या. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. नाक लाल झालं होतं. आजीनं तिला खायला बेसनाचा लाडू दिला, प्यायला पाणी दिलं आणि मग सलोनीच्या पाठीवर मायेनं हात फिरवल्याबरोबर तिच्या डोळय़ांतून गंगा-जमुना परत सुरू झाल्या. ती रडत म्हणाली, ‘‘आजी, सगळय़ांकडे मोबाइल आहे. मैत्रिणींनी मेसेज केलेले असतात, ते बघायला मोबाइल हातात घेतला की ही मला ओरडते. स्वत: मात्र चोवीस तास ऑनलाइन असते. बाबांचंसुद्धा फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप असं सुरूच असतं. त्यांना कुणीच काही बोलत नाही. सारखे माझ्याच मागे लागतात..’’

सलोनीची तक्रार आजीच्या लक्षात आली. पालक जे स्वत: करत आहेत, ते मुलांना मात्र करू नकोस असं सांगत आहेत. आजीनं सलोनीच्या अपरोक्ष तिच्या पालकांना स्क्रीनच्या वापरावर थोडा आळा घालण्याचा सल्ला दिला. इतकं सोपं नाहीये त्या दोघांसाठी, पण लेकीसाठी त्यांनी प्रयत्न मात्र सुरू केले. तुमच्या मनात आलं असेल की, इथे सलोनीच्या जागी घरोघरीच्या कितीतरी मुलांची नावं घालता येतील इतका हा सर्वव्यापी विषय आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ तसं स्क्रीनच्या व्यसनाचं झालं आहे. आता प्रथम स्क्रीनच्या व्यसनाचं मूळ स्वरूप काय हे समजून घेऊ. ते आहे उद्दीपन. आपल्या पंचेंद्रियांना उद्दीपन देणाऱ्या विविध घटकांना उद्दीपक म्हणतात. ही संकल्पना समजावून घेण्यासाठी आपल्याला पूजेचं उदाहरण घेता येईल. गणपतीच्या निमित्तानं घरोघरी रोज बाप्पाची पूजा झाल्यामुळे हे उदाहरण समजून घ्यायला सोपं जाईल. पूजेच्या वेळी आपण दिवा लावतो, तो डोळय़ांना उद्दीपक असतो, उदबत्ती लावतो, सुगंधी फुलं वाहतो ते नाकासाठी उद्दीपक, घंटी, टाळ वाजवतो ते कानासाठी उद्दीपक, गंध-चंदन-कुंकू लावतो ते त्वचेसाठी उद्दीपक आणि प्रसाद खातो तो म्हणजे जिभेसाठी उद्दीपक, हे सगळे सौम्य उद्दीपक आहेत. त्यांचा प्रभाव काही वेळानं कमी होतो. पण त्या जागी जर तीव्र उद्दीपक असले तर त्याची झिंग चढते. उदाहरणार्थ, सार्वजनिक उत्सवांच्या ठिकाणी लावले जाणारे मोठय़ा आवाजांचे ध्वनिक्षेपक, तीव्र प्रकाशयोजना आदी. त्यांचा प्रभाव अधिक काळ टिकतो. कोणतेही रंग प्रत्यक्षात जेवढे सुंदर दिसणार नाहीत, त्यापेक्षा जास्त चमकदार, आकर्षक मोबाइलच्या स्क्रीनवर दिसतात. डोळय़ांना गरजेपेक्षा जास्त उद्दीपन मिळतं आणि ते टिकूनही राहातं आणि म्हणूनच लहान बाळाला त्याचं आकर्षण वाटतं. मोबाइलमध्ये आपण काय पाहतो आहोत हे अनेकदा त्याला कळतही नसतं. पण ती चलतचित्रं, रंग, आवाज यांच्यात मूल अडकतं, मोबाइलशी चाळे करू लागतं. कित्येक घरांत त्याचंही कौतुक होतं. ‘मोबाइलच पाहिजे या लबाडाला!’, ‘आमच्या सोनूला सगळं कळतं मोबाइलमधलं’, ‘यूटय़ूबवर बरोबर त्याला पाहिजे ते लावतो’.. वेडावाकडा कसाही स्क्रीनवर हात फिरवला तरी मोबाइलवर काहीतरी चालू होतं आणि सवयीनं मूल तेच तेच करू लागतं. पालकांना वाटतं, आता आपलं मूल सुंदर पिचईच्या पावलावर पाऊल ठेवणार! अर्थात ही चमकदार स्क्रीन लहान मुलांनाच नाही, तर मोठय़ांनाही वेड लावत आहे. लहानपणी शाळेत असताना ‘दूरदर्शन- शाप की वरदान’ असा निबंध लिहिलेल्या पिढीची पुढची पिढी मोबाइलच्या स्क्रीनवर गुंतली आहे. त्या काळी टीव्हीला ‘इडियट बॉक्स’ म्हटलं जायचं. पण आता मागे वळून बघितल्यावर टीव्हीला इडियट बॉक्स म्हटल्याबद्दल माफी मागावी की काय, इतकं हे मोबाइल नावाचं धाकटं भावंड नाठाळ निघालं आहे! पण मग सपशेल शरणागती पत्कारायची

का या धाकटय़ापुढे?..

घरात लहान मूल सतत मोबाइल मागत असेल, तर त्याला आकर्षण कसलं असतं ते वरील उदाहरणांवरून आता पुरेसं स्पष्ट झालं असावं. समस्येचं मूळ सापडलं की मग उपाय सापडतोच हे आपलं सूत्र आहे. मग आता स्क्रीनचं व्यसन सोडण्यासाठी आपल्याला तोच मोबाइल काही प्रमाणात उपाय म्हणून वापरता येईल. मोबाइलमधलं आकर्षण कमी करण्यासाठी तो थोडा अनाकर्षक करा! ‘नाइट मोड’वर फोन ठेवा, त्याचा ‘ब्राइटनेस’ कमी ठेवा, त्यामुळे मोबाइलमधून होणाऱ्या उद्दीपनाची तीव्रता कमी होईल. पर्यायानं मुलांचं आकर्षण कमी होईल. आता तुम्ही म्हणाल की, मुलांना या सगळय़ा सेटिंग्ज बदलता येतात. पण आधी सांगितल्याप्रमाणे हा पूर्ण उपाय नाही. स्क्रीनचं व्यसन दूर करण्यासाठी वापराला नियम लावणं याशिवाय दुसरा उपाय नाही. याचा फायदा फक्त मुलांना नाही, तर पालकांना आणि संपूर्ण कुटुंबालाही होईल. घरातलं वातावरण जास्त चांगलं होईल.

ऋतुजाच्या आईचा तिनं मोबाइल वापरण्यास ठाम विरोध होता, पण तो फक्त शाळेच्या दिवसांमध्ये. शाळेला सुट्टी लागली की, ‘आता तुला मोबाइल किंवा लॅपटॉपवरून काहीच बोलणार नाही’ असं धोरण ती घ्यायची. यावरून लक्षात येतं, की ऋतुजाच्या आईला स्क्रीन हा केवळ अभ्यासातला अडथळा वाटत होता. एरवी स्क्रीनमुळे काही परिणाम होतात असं तिला वाटत नव्हतं. पण अभ्यासातला अडथळा एवढाच स्क्रीनचा मर्यादित परिणाम नाही. आपलं लहानपण आठवून बघा. उन्हाळय़ाच्या-दिवाळीच्या सुट्टीत सगळी भावंडं एकत्र जमली की, कुणीतरी अवलिया असायचा, जो भुताच्या गोष्टी सांगायचा. तो सांगायचा की, एक मोठा जुना वाडा होता, त्यात एक पिंपळाचं झाड होतं.. मग प्रत्येकाच्या डोळय़ांसमोर वेगवेगळा दिसणारा, वेगवेगळय़ा प्रकाशातला वाडा यायचा. आपण गोष्ट ऐकायचो, त्यानुसार आपली कल्पनाशक्ती ते चित्र रेखाटायची व आपली कल्पनाशक्ती वाढायची. त्या काळी मोठय़ांना आपल्याकडून आखीव-रेखीव ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ करून घेण्यात काही रस नव्हता, नाहीतर त्या कल्पनाशक्तीतली चित्रं काढून घेतली असती, तर किती वेगवेगळी चित्रं समोर आली असती! आता ‘हॅरी पॉटर’ वाचताना कल्पनाशक्तीला इतका वाव असताना ते सर्व चित्रपटांत आयतं पाहायला मिळतं. ‘हॅरी पॉटर’ मध्ये दाखवतात तसाच झाडू पुस्तक वाचताना आपल्या डोळय़ांसमोर आला असता का, की वेगळा आला असता?.. या स्क्रीनच्या प्रभावामुळे कल्पनाशक्ती खुंटते, हा त्याचा महत्त्वाचा दुष्परिणाम आहे. तुम्ही म्हणाल, कल्पनाशक्तीमुळे एवढा काय महत्त्वाचा फरक पडणार आहे आयुष्यात? तर हे लक्षात घेतलं पाहिजे की, कोणत्याही संशोधनाची सुरुवात ही जिज्ञासेबरोबरच कल्पनाशक्तीमधून होते. रात्री मोकळय़ा मैदानातून जाताना पहिल्यांदा कुणीतरी दोन मित्र असतील ज्यांना चंद्राकडे पाहून ‘आपल्याला तिथे जाता येईल का’ असा विचार आला असेल. या कल्पनेचा विस्तार होत चंद्रावर जाण्याची मोहीम पूर्ण झाली. या दृष्टीनं थोडा विचार करून पाहा, प्रत्येक व्यवसायात या कल्पनाशक्तीची गरज असते. ती विद्यार्थीदशेत फुलते, विकसित होते. मग पुढे प्रत्यक्षात काम करते. त्यामुळे पालकांनी कोणत्याही साहित्यावर आधारित चित्रपट दाखवण्याआधी ते मूळ साहित्य- पुस्तक मुलांना वाचायला लावावं. मान्य आहे, हे थोडं अवघड आहे. पण पालकत्वच कुठे सोपं आहे! त्यामुळे करावं तर लागेलच.

साधारणपणे ३० वर्ष जुन्या ‘लव्ह’ या चित्रपटात एका गाण्यात हॉटेलमध्ये बसलेले रेवती आणि सलमान खान टेबलक्लॉथवर गोळा-फुली-गोळा हा खेळ खेळतात. त्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून तो टेबलक्लॉथ घेऊन जातात! आता चित्र काय आहे बघा बरं.. हॉटेलमध्ये गेलेल्या कोणत्याही कुटुंबांचं, जोडप्यांचं, मित्रमैत्रिणींच्या घोळक्याचं निरीक्षण करा. आधी लोक आपल्या मोबाइल काढून दोन-तीन सेल्फी काढतात, मग ‘एन्जॉयिंग लंच-डिनर विथ फॅमिली-फ्रेंड्स’ असं समाजमाध्यमांवर टाकतात. गप्पा मारण्यापेक्षा मोबाइलमध्येच डोकं जास्त असतं. तितक्यात पदार्थ आले की, त्यांचे फोटो काढून विविध समाजमाध्यमांवर टाकतात. मग खायचा कार्यक्रम, मुळात रेस्टॉरंटमध्ये येण्याचं उद्दिष्ट हे केवळ खाणं, की हॉटेलची जाहिरात करणं, की समाज- माध्यमांवरची हजेरी, की कुटुंबासह एकत्रित वेळ घालवणं, हे स्पष्ट असायला हवं. त्यासाठी आधी पालकांना अशा ठिकाणी गेल्यावर आपला मोबाइल न वापरण्याचं बंधन स्वत:वर घालून घ्यावं लागेल. पालक म्हणून तुम्ही दोन-पाच मिनिटं मोबाइल पाहाल, पण तुमचं बघून मुलं पूर्णवेळ हेच करतील. मुलं ही आपल्यापुढे दोन पावलं असतात. त्यामुळे तुम्हालाच नियम ठरवून घ्यावे लागतील. मुलांना याची सवय झाली की, मग आपोआपच घरात पायंडा पडेल. अशा प्रकारचे नियम घरातही करून ते आग्रहानं पाळले गेले पाहिजेत. अर्थात नियम सगळय़ांसाठी असावेत. फक्त मुलांसाठी नाही.

माझी एक समुपदेशक मैत्रीण मला म्हणाली, ‘‘तुला लोकांबद्दल इतकी माहिती कशी असते? समाज म्हणून आपण कसे वागत आहोत, ही माहिती तू कशी मिळवतेस?’’ माझं उत्तर सोपं होतं. प्रवासात, रस्त्यावर चालताना, समाजात वावरताना आजूबाजूला नीट निरीक्षण केलं की कळतं. आमचा संवाद संपला, पण माझ्या मनात विचार इथूनच सुरू झाला. हातात मोबाइल फोन घेऊन प्रवास करणारी मुलं ही कानात हेडफोन घालून एकप्रकारे कान बंद करून घेतात आणि डोळे स्क्रीनवर ठेवून त्यांची नजरही कैद होते! त्या नजरेला आजूबाजूचं काही दिसत नाही. त्यातून सुरक्षित प्रवास कसा होईल हा प्रश्न तर आहेच, पण त्याचबरोबर ही मुलं समाजात आंधळी आणि बहिरी होऊन वावरत आहेत. ही मुलं एक जागरूक नागरिक, माणूस कशी होतील?.. ‘मला समाजातील प्रश्नांशी काहीच देणंघेणं नाही, चोवीस तास मनोरंजन झालंच पाहिजे,’ असा काहीसा अट्टहास होत चालला आहे. त्यातून एक विकृतीही तयार होत आहे. या परिस्थितीत मुलांशी चर्चा करून त्यांना कान-डोळे उघडे ठेवून वावरण्याचे फायदे समजावून सांगावेत. त्यातून प्रवासातल्या इयरफोनच्या वापराबद्दलचे नियम घालून दिले पाहिजेत.

स्क्रीनचं वेड दोन प्रकारचं दिसत आहे. एक स्क्रीनवर दिसण्याचं आणि एक स्क्रीनकडे बघत बसण्याचं. पूर्वी कलाकारांना मोठय़ा पडद्यावर झळकण्याचं एक स्वप्न असायचं. ते पूर्ण झालं की त्यांना जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. पण आता आपल्याला प्रत्येकाला स्क्रीनवर दिसायचं आहे. सोशल मीडियातून प्रसिद्ध व्हायचं आहे. दिवसरात्र काढलेले फोटो आपण गूगल फोटोज किंवा एखाद्या पोस्टवर टाकतो. आणि ते आपलं स्वप्न काही अंशी पूर्ण करतो. हेही एक व्यसनच.  मुलांना नुसतं स्क्रीनच्या वापरावरून रागवत बसण्यापेक्षा या व्यसनाच्या परिणामांबद्दल अधिक माहिती देऊन त्यांची संवदेनशीलता वाढवावी. या सगळय़ांचा थेट परिणाम त्यांच्याच भवितव्यावर होणार आहे याची जाणीव करून द्यावी.

काही वर्षांपूर्वी मी स्क्रीन व्यसनावर उपाय म्हणून ‘वाचू आनंदे’ नावाचा एक उपक्रम डोंबिवलीमध्ये राबवला होता. बिरबलाची गोष्ट आठवते का, ज्यात अकबर वाळूवर मारलेली रेष हात न लावता छोटी करून दाखवण्याचं आव्हान देतो आणि बिरबल त्या रेषेशेजारी आणखी एक मोठी रेष मारतो. बस हेच करायचं आहे आपल्याला. वाचनातला आनंद कळाला की, मुलं स्क्रीनवर तुलनेत कमी वेळ घालवतील असा विचार करून हा उपक्रम राबवण्यात आला. स्क्रीनवरून केवळ मुलांना ओरडण्यापेक्षा वाचन, बैठे खेळ, फिरणं, विविध छंद ही रेष आपल्याला मोठी करायची आहे. मुलं या सगळय़ांत रमली की मग स्क्रीनची रेष आपोआपच छोटी होईल. हे करताना घरात पसारा होईल, मित्रमैत्रिणी जमतील, गोंधळ-आवाज होईल, आपल्यालाही थोडा वेळ काढावा लागेल. पण मुलांनी पलंग वा सोफ्यावर एका कोपऱ्यात बसून मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसावं, की वरील सर्व गोष्टी कराव्यात, यातलं काय परवडणारं आहे याचा विचार तुम्ही करा.

शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या काळात स्क्रीनचा वापर शून्यावर येणं अशक्य आहे. पण तो किमान असावा आणि जे काही पाहिलं जाईल ते मुलांच्या माहितीत, अनुभवविश्वात भर टाकणारं असावं. त्यासाठी सतत कोणती तरी मालिका पाहणाऱ्या मुलांना ‘डिस्कव्हरी’सारख्या वाहिन्यांवरील चांगले, नवनवीन माहितीपट दाखवावेत, देशाचा इतिहास-भूगोल कळेल अशा ‘भारत एक खोज’, ‘संविधान’सारख्या मालिका दाखवाव्यात. त्यासाठी तुम्हाला त्यांना घेऊन बसावं लागेल. स्क्रीनचं असलं तरी ते व्यसनच आहे. त्यामुळे मुलांकडून विरोध, प्रतिकार होईलच. पण चिकाटीनं प्रयत्न केले, तर आपल्याला बऱ्याच प्रयत्नानंतर बदल दिसतील. हे लक्षात घेऊन तुम्हीच त्यांना व्यसनातून बाहेर काढू शकता याची जाणीव ठेवावी!

trupti.kulshreshtha@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2022 at 00:07 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×