तृप्ती जोशी-कुलश्रेष्ठ

आपल्या पांघरुणाची घडी करणं, अडीनडीला वाणसामान आणून देणं, घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी देणं, वेळ पडल्यावर चहा करणं.. ही सगळी कामं कितीही किरकोळ वाटली, तरी ही सर्व ‘जीवनकौशल्यं’ आहेत. आपल्याला जी गोष्ट योग्य वाटत नाही, त्याला ठामपणे ‘नाही’ म्हणणं हेही जीवनकौशल्यच आहे. मुलांनी फक्त अभ्यास व्यवस्थित करून भागणार नाही. कोणत्याही क्षणी गरज भासू शकेल अशी, प्रत्येक वेळी पैशानं विकत न घेता येणारी जीवनकौशल्यं त्यांना शिकवावीच लागतील.

Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : आता कोठे हरवली भाजपची नैतिकता?

घरात पाहुणे आले होते. रुद्रची आई त्यांच्यासाठी कॉफी करायला स्वयंपाकघरात आली आणि तिच्या लक्षात आलं, की कॉफी संपली आहे. तिनं पटकन रुद्रला कॉफी आणायला दुकानात पाठवलं. दुकानात गेल्यावर दुकानदारानं त्याला विचारलं, कोणती कॉफी पाहिजे? किती पाहिजे? पण रुद्रला कोणत्या कंपनीची कॉफी घ्यायची ते नावच माहिती नव्हतं. तो ‘लाल कलरचा कप त्याच्यावर असतो’ वगैरे सांगत राहिला. शिवाय किती कॉफी हवी आहे हे घरी विचारून येतो म्हणाला आणि परत आला.

रुद्र रिकाम्या हातानं घरी आला म्हटल्यावर खरंतर आईला खूप राग आला होता. पण पाहुण्यांसमोर ती हसून म्हणाली, ‘‘आमच्या रुद्रला अभ्यासापलीकडे काहीच माहिती नसतं! स्वयंपाकघरात तर तो पाय ठेवत नाही.’’ रूद्रसारखी अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती सापडतील, कदाचित आपल्या घरातही हे थोडय़ाफार फरकानं घडत असेल. तसं असेल, तर ती धोक्याची घंटा आहे. जीवन जगण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्तही बऱ्याच कौशल्यांची गरज असते. जी कौशल्यं कदाचित पैशाला पर्याय नसतात. अशा रोजच्या आयुष्यात आवश्यक असणाऱ्या किंवा उपयुक्त ठरणाऱ्या कौशल्यांना ‘जीवनकौशल्य’ असं म्हणतात. स्वयंसेवी संस्थांच्या निवासी केंद्रांमध्ये जी मुलं राहातात त्यांना ही कौशल्यं सोशल वर्कर्स किंवा समुपदेशक हमखास शिकवतात. पण घरात राहाणाऱ्या मुलांना ही जीवनकौशल्यं घरात आणि शाळेत दोन्ही ठिकाणी शिकवण्याबाबत हल्ली उदासीनता दिसते. आपल्याला ज्या गोष्टी सहजपणे, रोज जगताना शिकायला मिळाल्या, तीच कौशल्यं आपल्याला आज पालक म्हणून मात्र मुलांना आवर्जून शिकवावी लागणार आहेत.

   मध्यंतरी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर एक पोस्ट फिरत होती. तीन-चार वर्षांच्या एका मुलीची आई गरोदर होती. ती पायऱ्यांवरून घसरून पडल्यावर त्या चिमुकलीनं हॉस्पिटलच्या हेल्पलाइनला कॉल केला आणि वेळेत रुग्णवाहिका येऊन तिच्या आईचा जीव वाचला. ही घटना परदेशातली होती, पण आपल्याला अंतर्मुख करणारी आहे. कोणत्याही आपत्तीला तोंड द्यायला तयार करणं हे कौशल्य शिकवणंच आहे. आपण मुलांना सर्व सुविधा देण्याच्या नादात, त्यांचे लाड करण्याच्या नादात  त्यांना सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देण्यास सक्षम करण्याऐवजी जाणता-अजाणता परावलंबी बनवतो. ‘आपल्या मुलाला काही कमी पडू द्यायचं नाही’ याची काळजी घेण्याच्या चुकीच्या कल्पनांमुळे उलट मुलांचं नुकसानच करतो. आपण मुलांचं ‘सुरक्षा कवच’ कधीपर्यंत बनू शकतो? आताही आपण त्यांचं कवच होऊन सर्वत्र फिरू शकत नाही. त्यांनाही बाहेरगावी गेल्यावर, प्रवासात, शाळेत आणि कुठेही आपल्या अनुपस्थितीत विविध जीवनकौशल्यांची गरज पडत असते. ‘स्ट्रीट स्मार्टनेस’ या शब्दाला योग्य पर्यायी शब्द मराठीत पटकन सुचत नाही, पण हा शब्द परिस्थतीवर, एखाद्या अडचणीवर पटकन तोडगा काढण्याची क्षमता नेमकी स्पष्ट करतो. ती आज काळाची गरज आहे. त्या दृष्टीनं मुलांच्या मेंदूला प्रशिक्षण मात्र द्यायला हवं.

  एखादी आपत्ती ओढवल्यावर मेंदू बंद होऊन जाण्यापेक्षा मेंदूनं नवीन पद्धतीनं नवीन पर्याय शोधावेत, असं प्रशिक्षण असायला हवं. त्यासाठी भूकंप, पूर, आग लागणं, आदी विविध संकटं, त्यांचं स्वरूप आणि आपल्यावर होणारे परिणाम याची चर्चा करून अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो याबाबत मुलांनाच विचारून संभाव्य उपाययोजना-आपल्या कृतीची रूपरेषा निश्चित करता येईल. मुलांना इतर मुलांच्या साहसकथाही जरूर सांगा. २६ जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाणारे ‘बाल शक्ती पुरस्कार’ मुलांना नक्कीच प्रेरणादायक ठरतील. आपत्कालीन परिस्थितीत, उदा. आग लागल्यावर काय करावं, कधी वाळू आणि ब्लँकेट, कधी पाणी टाकावं, अग्निशामक दलाचा नंबर काय, पोलिसांचा नंबर काय, हे मुलांना माहिती असावं आणि त्या नंबरवर बोलण्याचा आत्मविश्वासही त्यांच्यामध्ये असावा.

   मुलं जशी मोठी होतील तशी नवनवीन प्रलोभनं त्यांच्यासमोर येत राहातील. अनेकदा मनात नसतानाही मुलं समवयस्कांच्या दबावाला बळी पडतात. श्रेयसच्या मनात नसतानाही क्लासला दांडी मारून त्याचे मित्र बाहेर टाइमपास करायला जायचे आणि त्यालाही न्यायचे. एक-दोनदा असं झाल्यावर श्रेयसला अपराधी वाटायला लागलं. पण त्याला मित्रांना ‘नाही’ म्हणणं जमत नव्हतं. ‘नाही म्हणायला शिका’ हे एक महत्त्वाचं जीवनकौशल्य आहे. अशी स्पष्टपणे नाही म्हणण्याची गरज व्यसनाला नाही म्हणताना, बेकायदा काम करायला नाही म्हणताना नक्की लागते. पूर्वी मी या जीवनकौशल्याची गरज इतक्या महत्त्वाच्या प्राधान्यानं लिहिली नसती. पण ज्या प्रमाणात ड्रग्जचं व्यसन समाजात पसरत चाललं आहे, ते पाहाता मुलांना हे कौशल्यच वाचवू शकेल असं वाटतं. बालगृहामध्ये काम करताना नशेसंबंधीच्या एका सत्रात मी मुलांना विचारलं होतं, की ‘‘नशा जास्त महाग आहे की वडापाव?’’, यावर मुलांनी सांगितलं, की ‘‘वडापाव जास्त महाग आहे. कारण दहा-पंधरा रुपयांचा एक वडापाव खाल्ला, की चार तासांत परत भूक लागते. पण दहा-पंधरा रुपयांचा नशा दहा-बारा तास उतरत नाही आणि भूकही लागत नाही.’’ किती धोक्याची घंटा आहे ही. सडकून भूक लागून, भरपूर खेळून, व्यायाम करून शरीर कमवायच्या काळात मुलं नशेच्या आहारी जाऊन दिवसेंदिवस पडून राहायचा पर्याय निवडतात. ड्रग्जचं व्यसन नवीन पिढीला खूप अधोगतीला घेऊन जाणारं आहे. हे सगळं वाचताना ‘ही समस्या माझ्या मुलाच्या बाबतीत नसून हे कोणत्या तरी वेगळय़ाच मुलांच्या बाबतीत आहे’ असं अजिबात समजू नका. ड्रग्जचं व्यसन हे आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक, सगळय़ा कक्षा भेदून सगळय़ांपर्यंत पसरलं आहे. त्यामुळे अशा प्रलोभनांना बळी न पडण्यासाठी मुलांना ठामपणे ‘नाही’ म्हणता यायला हवं.

रमाच्या घरी पाच दिवसांचा गणपती असतो. तिचे आई-बाबा तिला गणपती यायच्या आधी खर्चाचं एक छोटं अंदाजपत्रक बनवायला सांगतात. त्यात गणपतीची मूर्ती, फुलं, हार, बाहेरून आणायचा प्रसाद, सजावटीचं साहित्य आणि इतर खर्च धरलेला असतो. तिनं एकदा बजेट दिल्यावर आई-बाबा रमाकडे बजेटमध्ये लिहिल्याप्रमाणे एकूण रक्कम सुपूर्द करतात आणि रमाला गणपती विसर्जनानंतर दोन दिवसांत पूर्ण हिशोब सादर करायचा असतो. त्या दिवसांत गणपती उत्सवाच्या बाबतीतले सगळे खर्च रमाच करते. स्वत:च्या हातात हिशोब आल्यावर रमा पैसा जपून वापरू लागली आणि तिनं तिच्या आई-बाबांनाही तसंच करायला सांगितलं. इथेच तिला पुढे आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असणारे आर्थिक नियोजनाचे धडे मिळाले. हल्ली मुलांना ‘कॅम्पस इंटरव्ह्यू’मधून मोठमोठय़ा कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या लागतात. अशा वेळी आर्थिक नियोजनाचे धडे हे बालपणापासूनच मिळालेले असले, की पैसा हाताळणं सोपं जातं. मॉलमधली आवडलेली गोष्ट घ्यायची आर्थिक परिस्थिती येण्याबरोबरच ती वस्तू तेवढय़ा किमतीला खरंच न्याय देते का, हा विचारही मुलांना देणं गरजेचं आहे.

   निर्णय घेण्याची क्षमता हे आणखी एक जीवनकौशल्य आहे. योग्य करिअर निवडणं, योग्य जोडीदार निवडणं आणि अशांसारखे आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय जर चुकले, तर त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. ही क्षमता अचानक एखाद्या रात्रीत देता येणार नाही, तर त्यासाठी निर्णय घेताना काय काय विचार करायचा, कशा पद्धतीनं करायचा, याचं प्रशिक्षण लहानपणापासूनच द्यायला हवं. कोणताही निर्णय घेताना आपण स्वत:शी बोलतो. ते स्वत:शी बोलणं खूप शांतपणे आणि योग्य दिशेनं झालं, तर ती व्यक्ती योग्य निर्णय घेते. उदाहरणार्थ- मुलांसाठी कपडे घेताना ‘तुला काय कळतंय’ असं त्यांना म्हणण्यापेक्षा तुम्ही काय विचार करताय ते मुलांना सांगू शकता. थोडय़ा मोठय़ा मुलांना तर आपण नोकरी बदलताना, बढती स्वीकारताना किंवा एखादा प्रस्ताव नाकारताना काय विचार करतो, तेसुद्धा त्यांना समजेल अशा पद्धतीनं सांगणं फायदेशीर ठरू शकतं. घरातले छोटेमोठे निर्णय घेताना त्या निर्णयप्रक्रियेत मुलांना सहभागी करून घेऊ शकतो.

  लहानपणी वाचलेली रामूची गोष्ट आठवते का? रामूची आई रामूला दुकानातून पानात बांधून लोणी आणायला सांगते, पिशवीतून न सांडता साखर आणायला सांगते आणि मामाकडून टोपलीमध्ये कुत्र्याचं छोटंसं पिल्लू आणायला सांगते. रामूला ऐनवेळी काहीच आठवत नाही. तो पानात साखर बांधून आणतो, पिशवीचं तोंड गच्च बांधून त्यातून कुत्र्याचं पिल्लू आणतो आणि लोणी टोपलीतून आणतो. सगळय़ाचाच सत्यानाश! पानात बांधलेली साखर सांडते, कुत्र्याचं पिल्लू नीट श्वास न घेता आल्यानं मरतं आणि टोपलीतलं लोणी वितळून सांडून जातं. या गोष्टीत रामूच्या व्यावहारिक ज्ञानाची कमतरता दिसते. प्रत्येक वेळी सगळय़ाच गोष्टी उलगडून नाही सांगता येत, पण ती उकल ओळखण्याचं ज्ञान मुलांकडे असावं.

   घरात पाहुणे आले तर त्यांना आल्यावर पाणी विचारणं, लहान मूल आपल्या घरी आलं तर त्याला तात्पुरतं का होईना पण आपल्या वस्तू खेळायला देणं, अशा गोष्टी मुलांनी सहजतेनं करणं गरजेचं आहे. ज्युनियर, सीनियर केजीमध्ये तक्त्यावरची भाज्यांची चित्रं ओळखून दाखवून गुण मिळवायचे आणि प्रत्यक्षात कॉलेजमध्ये गेल्यावरही फरसबी आणि घेवडा यातला फरक ओळखता येत नाही, हा विरोधाभास आपल्याला काय सांगतो? गावाला जाताना आपली बॅग भरता येणं, आपापलं कपाट आवरणं, घर झाडणं, बल्ब बदलता येणं, चहा करणं, वरण-भाताचा कुकर लावणं, खिचडी, पोहे असे सोपे पदार्थ करता येणं, हे तरी दहावीच्या आत मुलांना आलं पाहिजे.

मुलांचे लाड जरूर करा, पण त्यांना लाडवून ठेवून त्यांचा ठोंब्या करू नका. पलंगावर स्वच्छ बेडशीट घातल्यावर किती नीटनेटकं वाटतं, पेपर वाचून झाल्यावर व्यवस्थित घडी केली तर किती नेटकं वाटतं. आजकाल मुलं परदेशात, दुसऱ्या शहरांत शिकायला जायचं प्रमाण खूप वाढलं आहे. तिथे गेल्यावर पैसे कितीही असले, तरी बहुतांश सगळी कामं त्यांची त्यांनाच करावी लागतात. अशा वेळी जीवनकौशल्यांअभावी मुलांचे खूप हाल होतात. मानसशास्त्रामध्ये समस्यांचं निराकरण, संवाद-भावनांचं समायोजन, ताणतणावाचं समायोजन, अशी बरीच जीवनकौशल्यं सांगितली आहेत. जीवनकौशल्यं हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. तो एका लेखामधून पूर्ण होणं शक्य नाही. पण पालक म्हणून तुम्हाला या जीवनकौशल्यांचं महत्त्व कळावं, मुलांना त्यानुसार तसं प्रशिक्षण आपापल्या परीनं देण्याचा तुम्ही प्रयत्न करावा हे जास्त गरजेचं आहे. करोनामुळे आलेल्या टाळेबंदीत किमान गोष्टींसह कसं जगावं, याचं प्रशिक्षण मुलांना मिळालंच आहे. आता त्याच विचारासह त्यांना पुढे घेऊन जा. पक्ष्याला आपल्या पंखांनी उंच आकाशात उडणं जास्त आवडेल, की आपण पक्ष्याला पिंजऱ्यात घालून विमानातून फिरवून आणणं त्याच्यासाठी आनंददायक असेल? फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करून मुलांची एकच बाजू बळकट होईल. पण आकाशात उंच झेप घेण्यासाठी परिपूर्ण विकास गरजेचा आहे.

trupti.kulshreshtha@gmail.com